सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत
तो गावात आला. लोकांना वाटलं की
‘बुढ्ढी के बाल’वाला असेल किंवा कुल्फीवाला तर नक्कीच.
लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी. त्याच्याकडे न बुढ्ढी के बाल होते न कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय?
लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते.
लोकांचा कोण हिरमोड झाला की त्याच्याकडे कुल्फीही नाही अन् बुढ्ढी के बालही. कुरकुरे किंवा साधे खारी बिस्कीट तरी पाहिजेच होते. मग त्याचा असा गावात यायचा उपयोगच काय?
लोकांना अशीही शंका येऊन गेली की तो दहशतवादी असावा किंवा पोरधर्या तरी! पण त्याला दाढी कुठे आहे? लोक आपापसात कुजबूजू लागले.
सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत
तो गावात आला. लोकांना वाटलं की
‘बुढ्ढी के बाल’वाला असेल किंवा कुल्फीवाला तर नक्कीच.
लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी. त्याच्याकडे न बुढ्ढी के बाल होते न कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय?
लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते.
लोकांचा कोण हिरमोड झाला की त्याच्याकडे कुल्फीही नाही अन् बुढ्ढी के बालही. कुरकुरे किंवा साधे खारी बिस्कीट तरी पाहिजेच होते. मग त्याचा असा गावात यायचा उपयोगच काय?
लोकांना अशीही शंका येऊन गेली की तो दहशतवादी असावा किंवा पोरधर्या तरी! पण त्याला दाढी कुठे आहे? लोक आपापसात कुजबूजू लागले.
अरे हा आहे तरी कोण?
पेहरावावरून तर भला माणूस वाटतोय!
दहशतवादी बिदी तर नाही? गावाची टेहळणी करायला आलेला?
अरे काहीच्या काय बोलतोय!
नाहीतर काय फेरीवाला म्हणावा तर त्यानं विकायलाही काही आणलेलं दिसत नाही! नाहीतर त्याच्या सायकलला दिसलं नसतं का आपल्याला!
उगाच आला म्हणावा का?
उगाच यायला आपलं तसंच चाललंय प्रेक्षणीय स्थळ!
मग तो आहे तरी कोण?
त्यानं पाहिलं की लोकांना आपल्याविषयी कुतूहल आहे पण कुणाचीच हिंमत होत नाहीये आपल्याला काही विचारण्याची. मग तोच स्वत:हून लोकांजवळ गेला. लोकांना जरी दिसत नव्हतं तरी तो काही रिकाम्या हाती गावात आला नव्हता. तो काही असा तसा आला नव्हता तर सायकलच्या कॅरेजला भलीमोठी स्वप्नाची पेटी तो बांधून आला होता. लोकांना हे माहीत नव्हतं. माहीत कसं असणार? स्वप्नांची पेटी उघडपणे दिसत नव्हती. दिसेल कशी? ती तर त्याच्या मनात होती. लोकांच्या मनात टाकून देण्यासाठी तर तो इथे आला होता. लोकांना आता मात्र धीर धरवेना. त्यास कुणी विचारेनाही! शेवटी त्यातल्या एकाने पुढाकार घेतलाच. तो म्हणाला,
‘‘अरे, तू विकायला काय आणलंय?’’
‘‘स्वप्न विकायला आणली मी! स्वप्न विकतो. घ्यायची का तुम्हाला?’’
लोकांना प्रश्न पडला. स्वप्न आणि तीही विकत मिळतात? जगात काय काय विकलं जातं अन् खरेदी करता येतं हे लोकांना ठाऊक होतं. लोक एवढेही काही बुद्धू नव्हते! स्वप्न हे कसं विकत मिळेल? ते स्वत:लाच पडावं लागतं. स्वप्नावर कुठे आपली हुकूमत असते का? हा खूप मोठा भोंदू आहे अन् तो आपल्याला भोंदू बनवू पाहतो आहे. लोकांची पुन्हा कुजबूज सुरू झाली. त्याने ती बरोबर हेरली अन् म्हणाला, ‘‘मी खरंच स्वप्न विकत देतो. विश्वास ठेवा माझ्यावर!’’
‘‘चल, काहीतरीच सांगू नकोस. स्वप्न ही काय विकायची गोष्ट आहे काय? की तू आम्हाला वेडं समजलास!’’
‘‘नाहीतर काय? वेडं बनवायचे धंदेच उघडलेत ज्याने त्याने अलीकडे!’’
‘‘कुणी येतो अन् आपल्याला वेडा बनवून जातो!’’
‘‘अरे कशासाठी वेडं बनायचं? आपण का दूधपिते बच्चे आहोत का बाळात्यावरची?’’
‘‘तर! आपण का वेडं बनायचं!’’
‘‘आम्ही तुझ्या थापांना फसणार! आम्हाला इतकंही बावळट समजू नको. स्वप्न विकतोय म्हणे!’’
‘‘तुझ्या भोंदूगिरीला बाकीचे बळी पडले असतील. ती मात्रा आमच्यावर चालवू नको!’’
‘‘नाही खरं तेच सांगतोय!’’
‘‘चल बाबा पुढच्या गावाला लाग!’’
‘‘मार टांग सायकलवर!’’
‘‘निघ बरं इथून एकदाचा!’’
‘‘चेष्टा लावलीय चेष्टा, म्हणे स्वप्न विकतोय!’’
‘‘मला एका गोष्टीचं विशेष वाटतं की तुमच्या गावापर्यंत माझं नाव कसं पोहचलं नाही? स्वप्नविक्या आहे मी स्वप्नविक्या! सारं जग मला ओळखतं, तुम्हीच कसे ओळखत नाही?’’
‘‘तू कुणीही अस आम्हाला काय?’’
‘‘खरंच तुम्ही माझं नाव ऐकलं नाही?’’
‘‘तू काय मंत्रीसंत्री आहेस तुझं नाव ऐकायला!’’
‘‘भल्ताही स्टारबिर लागून गेलायस ओळखायला!’’
‘‘याच्या कॉन्फीडन्सला दाद द्यायला हवी! आपल्यात येऊन आपल्यास उल्लू बनवायची गोष्ट करून राहिलाय.’’
‘‘तुम्ही माझं नाव ऐकलं नाही याचं आता खरंच मला नवल वाटून राहिलंय.’’
‘‘पुन्हा तेच!’’
‘‘तुझ्या डोक्यात फरक पडलाय की तुझ्या मेंदूच्या स्क्रूचे आटे ढिले झालेत!’’
लोकांनी असं सारं बोलल्यावर माघार घेईल तो स्वप्नविक्या कुठला? त्याचं डोकंबिकं काही तापलं नाही. ते त्याच्या स्वभावातच नाही. असला काही स्वभाव तो स्वत:जवळ बाळगतच नव्हता ज्याने त्याचा तोटा होईल! त्याच्या डोक्यावर बर्फ होता अन् जिभेवर साखर. हे तर त्याचं भलभक्कम शस्त्र होतं. याच्याच जोरावर त्याने आजपर्यंत आपली स्वप्ने बिनबोभाट विकली होती. आजही तो तेच करून जाणार होता. तो काहीही झालं तरी त्याचे स्वप्न लोकांना विकूनच जाणार होता. त्याने आपली साखरपेरणी करायला सुरूवात केली. तो म्हणाला, ‘‘स्वप्नविक्या म्हणून मी चौमुलखात प्रसिद्ध झालो आहे! आतापर्यंत मी लाखो स्वप्न विकली आहेत. माझ्या स्वप्नांनी लोकांचं दारिद्य्र मिटवून त्यांस गर्भश्रीमंत केलं आहे. जे गोधडीवर झोपत होते ते गादीवर झोपू लागले. जे सायकलवर फिरत होते ते चारचाकी मर्सिडीजमधून फिरू लागले! जे कपडे घालत होते ते थ्रीपीस घालून लागले. जे देशी पित होते ते इंग्लिश पिऊ लागले. जे झोपडीत राहत होते ते महालात राहू लागले. जे पितळेच्या ग्लासात पाणी पित होते ते सोन्याच्या ग्लासने पाणी पिऊ लागले. अरे हा स्वप्नांचा व्यापार आहे. तोही खुल्लमखुल्ला. ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. चालून तुमच्या दारी आली आहे अन् तुम्ही दवडता आहात. रंकाचा राजा करतो मी एका रात्रीत. अशी ताकद आहे स्वप्नांत! फक्त एकदाच आजमावून पहा! नाहीतर नंतर पश्चाताप कराल! बोला आहे का तुमची तयारी?’’
‘‘कसा चालतो बाबा तुझा हा स्वप्नांचा व्यापार?’’
‘‘अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने!’’
‘‘कसा तो?’’
‘‘तुम्ही मला दहा पैसे द्या, त्या बदल्यात मी तुम्हास शंभर पैसे देईन.’’
‘‘तुम्ही मला शंभर पैसे द्या, त्याचे मी दहा रूपये देईन.’’
‘‘तुम्ही मला दहा रूपये द्या, त्याचे मी शंभर रूपये देईन.’’
‘‘तुम्ही मला शंभर रूपये द्या, त्याचे मी पाचशे रूपये देईन.’’
‘‘तुम्ही मला पाचशे रूपये द्या, त्याचे मी पाच हजार रूपये देईन.’’
‘‘तुम्ही मला पाच हजार रूपये द्या, त्याचे मी लाख रूपये देईन.’’
‘‘तुम्ही मला लाख द्या, मी करोड देईन…’’
लोकांचे डोळे दिपले. तोंडाचा आ वासला. भोवळ यायची बाकी राहिली. त्यांना आसपास पैसेच पैसे दिसू लागले. आभाळात ढगांचा गडगडाट सुरू झाला. लोकांना पैशाचा पाऊस पडल्याचा भास झाला. विहिरी–बारवा पैशांनी भरून गेल्या. नदी पैसे घेऊन वाहू लागली. मातीतून पिकापाण्याऐवजी पैसेच उगवून येऊ लागले. झाडांना पानाफुलांऐवजी पैसेच लगडून आले. डोंगरच्या डोंगर पैशांचे उभे राहिले. जिकडेतिकडे पैसेच पैसे दिसू लागले. पैशांचा असा धुराळा उडाला, असा धुराळा उडाला अन् खाली बसला. लोक भानावर आले अन् त्यांनी स्वप्नविक्यास वेडं ठरवलं. इथे आयुष्यभर घाम गाळून चार पैसे मिळत नाहीत अन् हा दहा पैशाच्या बदल्यात शंभर पैसे देतोय. हा काय पैसे जनणार आहे का? म्हणजे काहीतरी गंडवायचा धंदा आहे याचा. यास आपण बळी पडायचं नाही. नाहीतर हा आपलं सारंच लुटून नेईन. लुटारू आहे लुटारू!
‘‘ये बाबा, डोकं फिरायच्या आत तुझा पाय उचल गड्या या गावातून!’’
‘‘हा पैसे असे देणार आहे जशी याच्या बापाची पैशाची फॅक्टरीच आहे जणू!’’
‘‘अरे अर्ध आयुष्य मातीत गेलं अजून एवढे पैसे पाह्यले न्हायी!’’
‘‘एवढी जर का तुही दानत आहे तर गावोगाव असा भटकतो का बाबा!’’
‘‘म्हणे एका रात्रीत रंकाचा राजा करतो? बर्या बोलाने चालता व्हो नाहीतर फटके खाशील!’’
‘‘नाहीतर काय पैसे का झाडाला लागणार का? पुरी जिंदगी मातीत मिळाली तरी पैसे पहायला मिळाले नाही अन् हा सोन्याच्या ग्लासाने पाणी प्यायला लावणार!’’
‘‘का करतोस बाबा असे खोटे धंदे?’’
‘‘मला तुम्हाला श्रीमंत झालेलं पाहायचं आहे!’’
‘‘नको गंडू बाबा गरीब दुबळ्याला, एखादा शेट–सावकार शोध!’’
‘‘आमच्या खिशात एखाददुसरी फुटकी कवडी सापडेल तुला!’’
‘‘तीच फुटकी कवडी द्या मला अन् विश्वास ठेवा या स्वप्नविक्यावर. एका फुटक्या कवडीत रंकाचा राजा करुन दावतो तुम्हाला!’’
‘‘पक्का घोरपडीसारखा चिकटला राव तू आम्हास, नादही असा दावला तू पैशाचा की मन फशी पडायलाही राजी व्हऊन र्हायलंय!’’
‘‘नको रे जादू करू. आम्हास रंकच र्हावदे!’’
‘‘आम्हाला नाही व्हायचं श्रीमंत!’’
मग मात्र स्वप्नविक्याचा घोर हिरमोड झाला. त्यानं काढता पाय घेण्याचा विचार केला. हे लोक समजदार आहेत. त्याहूनही शहाणे आहेत. आपल्या गळाला लागणार नाहीत याची पक्की खातरी त्यास पटली अन् तो पाय उचलता झाला पण त्यातल्या एक–दोघांनी केलीच हिंमत. त्यास हटकले. हटकताच स्वप्नविक्याचा नूर बदलला. तो छद्मी हसला. स्वत:च्या हुशारीवर खूश झाला. एकाने दहा रूपये दिले. स्वप्नविक्याने त्यास शंभर रुपये दिले. दुसर्याने थेट शंभर रूपये दिले. त्यास पाचशे रुपये मिळाले. स्वप्नविक्याने त्याची पेर केली. त्याला माहीत होतं की आता इथे खूप मोठं स्वप्नांचं पीक उगवून येणार अन् त्याने उत्साहाने आपल्या सायकलवर टांग मारली. जोरजोरात पायडल मारत त्याची सायकल दटवत निघून गेला.
ज्यांनी स्वप्नं विकत घेतलं नाही ते लोक घरी आल्यावर हळहळ व्यक्त करू लागले. आपणही जर स्वप्न विकत घेतले असते तर आपल्यालाही खूप पैसे मिळाले असते. लोक थव्या–थव्याने उभे राहिले स्ट्रीट लाईटच्या उजेडात. एकमेकावर तोंड टाकू लागले. पश्चात्ताप करू लागले. डोक्यात मारून घेऊ लागले. हातची लक्ष्मी लाथाडली म्हणून स्वत:स दोष देऊ लागले.
‘‘तू कच्चं पाडलं मला. नाहीतर मी घेणार होतो त्याच्याकडून स्वप्न!’’
‘‘नाहीतर काय! माझाही विश्वास बसला होता त्याच्यावर पण यानं हाणून पाडला माझा बेत!’’
‘‘हातच्या लक्ष्मीला लाथ मारली आपण!’’
‘‘देव देणार होता तेही छप्पर फाडून पर आपणच नतद्रष्ट. पक्कं छप्पर लावून धरलं. देवाला फाडूनच दिलं नाही. अरेरे! हातची लक्ष्मी लाथाडली!’’
‘‘आपल्यासारखे कमनशिबी आपणच!’’
‘‘देणारा आला होता द्यायला पर झोळी नव्हती घ्यायला! अशी आपली अवस्था!’’
‘‘लई चुकवलं रे आपण लई चुकवलं!’’
‘‘सारं ह्या दीडशहाण्यामुळं झालं, असं भाषण ठोकलं की प्रभावित होऊन गेलो अन् हातचा पैसा जाऊ दिला.’’
‘‘मला का दोष देऊन राहिले तुम्ही? मी का आडवा हात लावला होता? अन् मी काही तुमचा दुश्मन नाही. तुमच्या भल्याचाच विचार मी केला. तुम्हाला जर खाईत जायचे आहे त्याला मी तरी काय करू शकणार आहे?’’
‘‘आमचं भलं नाही, तोटा केला आहेस तू तोटा!’’
लोक एकमेकांना दोष देऊ लागले. हमरीतुमरीवर आले. आता त्यांच्यात मारामार्याच होणार होत्या जर ते मध्ये नसते आले तर! ज्या दोघांनी स्वप्नं विकत घेतली होती ते वेळेवर आले अन् त्यांनी भांडण सोडवलं.
‘‘अरे भांडता कशासाठी? स्वप्नच विकत घ्यायचे आहे नं तुम्हाला?’’
सगळेच एकदम कालवा करत म्हणाले, ‘‘हां हां… आम्हाला विकत घ्यायचंय स्वप्न…’’
‘‘झालं तर मग! स्वप्नविक्या गावातून गेला म्हणजे आपल्या आयुष्यातून थोडाच गेला? तो परत येईन! आम्ही बोलवू त्याला. तुम्ही मात्र तयार रहा! वेळेवर पलटी मारू नका म्हणजे मिळवली!’’
‘‘नाही, आम्ही शब्द देतो तुला आम्ही असं काही करणार नाही.’’
‘‘तुम्ही शंभर टक्के तयार आहात तर!’’
‘‘शंभरची काय बात करतो एकशे एक टक्के!’’
‘‘आम्ही एका पायावर तयार आहोत!’’
‘‘तुमच्या एका पायाचं काय करायचं?’’
‘‘म्हणजे पैसे घेऊन तयार राहतो आम्ही!’’
‘‘वारे भलेबहाद्दर! याला म्हणायची जिगर!’’
‘‘आता बघा तुम्ही नुसते पैशात न्हाऊन निघाल!’’
लोकांना खूप हायसं वाटलं की आपणही स्वप्न विकत घेऊ अन् श्रीमंत होऊन जाऊ. एवढं मातीत राब राब राबलो पण पैशाचं तोंड सुखाने कधी पहायलं मिळालं नाही. चाराण्या-आठाण्यासाठी याच्या त्याच्याकडे भीक मागावी लागते. सगळी साडेसातीच संपून जाईल. पार मुळासकट उखडून पडेल. आता जर का आयतीच संधी आलीय तर ती सोडायची कशासाठी?
लोक उद्याच्या दिवसाची वाट पाहू लागले. लोक स्वप्नं विकत घ्यायच्या आधल्या रात्रीच स्वप्न पाहू लागले की पैशाच्या राशीच्या राशी! हाताने मोजायचे कसे? म्हणून शेतात वापराला येणार्या फावड्याने ते पैशाची विल्हेवाट लावू लागले. काहींना घर बांधायचे होते. त्यांना तर विटाच्याऐवजी पैशाच्या भिंती दिसू लागल्या.
घरात महागडे बेड घ्यायच्या ऐवजी पैशाचेच बेड करण्याची नामी कल्पना सुचली. बरं तरी पैशाचं भाजी कालवण करता येत नाही नाहीतर लोकांनी तसाही विचार केला असता. अगदी पाव्हण्या–रावळ्यांना पैशाचाच चहा आणि पैशाचंच सरबत दिलं असतं. अजून पैशाचं काय काय करता येईल यांच्या विचारात लोक बुडून गेले.
दुसर्या फेरीत स्वप्नविक्या आला तेव्हा लोकांनी त्याच्याभोवती प्रचंड गर्दी केली. त्यातल्या शे–दोनशे जणांनी स्वप्न विकत घेतले. त्यांना खूप पैसे मिळाले. ते पाहून इतरांनाही अभिलाषा झालीच. मग स्वप्नविक्यावर लोकांचा पराकोटीचा विश्वास बसला. एवढा की त्यास कुणीच तोडू शकलं नसतं. प्रत्यक्ष देव जरी आला असता अन् लोकांस यापासून त्याने परावृत्त करू पाहिलं असतं तर लोकांनी देवास अवमानकारक शब्द उच्चरून हुसकावून लावलं असतं. थोडक्यात सांगायचे तर देवाचेही प्रयत्न सपशेल फोल ठरले असते. लोकांनी स्वत:जवळचे होते नव्हते तेवढे पैसे स्वप्नविक्याला दिले. त्यानेही कुठलीही कसर न ठेवता लोकांना मालामाल करून टाकले. लोक आधीचे होते तसे राहिलेच नाही. पैसेच बोलायचे अन् पैसेच चालायचे. त्याचं उठणं, बसणं, हसणं, बोलणं, झोपणं, खाणं–पिणं सारं सारं काही पैशात बदलून गेलं. लोक लोकच राहिले नाहीत. त्यांचे पैसे होऊन गेले. ही सारी किमया केली एकट्या स्वप्नविक्याने…
मधले काही दिवस गेले असतील. पुन्हा एकदा स्वप्नविक्या गावात आला. लोकांची ही गर्दी. स्वप्नविक्याचं तोंड दिसत नव्हतं. जो तो टाचा उंचावून त्याचे तोंड पाहण्याचा प्रयत्न करू लागला. काही तर गर्दीला ढुसण्या देत त्याच्यापर्यंत पोहचलेच. त्यावर त्यानेच तोडगा काढला. सार्यांना खाली बसण्याची सूचना केली. काय आश्चर्य! एका क्षणात गर्दी ढुंगण टेकून जमिनीवर बसली. आता जर का तो म्हणाला असता सगळ्यांनी बैल व्हा! तर सगळ्याचेच बैल झाले असते. तो जर का म्हणाला असता सगळ्यांनी शेळ्या व्हा! तर सगळेच शेळ्या झाले असते. प्रश्न पैशांचा होता. तो देणारा स्वप्नविक्या. त्यासाठी लोकांची काही करायची तयारी होती.
आता मात्र त्याने लोकांना वेगळे अन् अतिशय आकर्षक स्वप्न दाखवले. त्यानं असा वायदा केला की तत्काळ घेतले तर दहाचे शंभर मिळतील. दोन दिवस जर का थांबणार असाल तर दहाचे पाचशे रूपये मिळतील. आठ दिवस थांबणार असाल तर पाच हजार मिळतील. दोन महिने थांबलात तर लाख रूपये मिळतील. चार महिने थांबलात तर एक करोड. लोकांना हा सौदा मोठ्या आनंदाने मंजूर झाला. का होणार नाही? दहा रूपयात करोडपती होण्याची ती संधी होती. लोक अतिशय शहाणे होते. त्यामुळे ती संधी ते बिलकूलही सोडणार नव्हते. फक्त चार महिन्यांचा तर प्रश्न. ते असे उडून जातील पाखरागत. लोकांनी स्वत:जवळचे होते नव्हते तेवढे पैसे त्याला दिले. लोकांकडचे पैसे संपले तेव्हा ज्याचे ज्याचे पैसे होऊ शकतील असे जमीनजुमला, घरदार, गुरंढोरं, बैल–बारदाना अगदी सारेच विकले अन् त्याचे पैसे करून चार महिन्यांच्या वायद्यावर मोठे आणि घसघशीत स्वप्न स्वप्नविक्याकडून विकत घेतले.
आता लोकांच्या अंगावर फक्त कपडे शिल्लक राहिले होते… चार महिने उलटून गेले. त्याच्या नंतरचेही चार महिने उलटून गेले…
लोकांनी स्वप्नविक्याची खूप वाट पाहिली पण तो काही परतला नाही. अंगावरचे कपडे फाटून लोक नागवे झाले…! आता याही गोष्टीला चाराच्या पटीत गुणत राहिलं तरी कित्येक शतकं उलटून जातील.
तरी स्वप्नविक्या परतणार नाही…
कदाचित येईलही पण नव्या अवतारात…!
लोकांना त्याच्या ह्या अवताराचाही थांगपत्ता लागणार नाही. लोक अंगावरची कातडीही खरवडून खरवडून काढतील अन् त्याच्या हवाली करतील…
युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक
ऐश्वर्य पाटेकर
नाशिक । 9822295672
पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२
‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092