मागे वळून पाहताना

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षाच्या कालावधीत स्वातंत्र्याची मागणी करणारे व त्यासाठी निष्ठेने आपले आयुष्य वेचणारे जेवढे थोर व सामान्य स्त्री-पुरूष या देशात झाले त्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय द्यावयास हवे.

स्वातंत्र्याच्या समारंभापासून आणि जल्लोषापासून महात्मा गांधी दूर होते. ते नौखालीत उसळलेल्या दंगलीत पीडितांचे अश्रू पुसत होते. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाली. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात मोठी दंगल उसळली. महाराष्ट्रातील कलुषित वातावरणाचे प्रातिनिधिक चित्रण व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वावटळ’ या कांदबरीत आलेले आहे. फाळणीचे हत्याकांड आणि गांधी हत्येनंतरची जाळपोळ यामुळे गढूळ झालेले समाजमन स्वच्छ व्हायला बराच काळ गेला. या घटनांमुळे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद आणि तो साजरा करण्याचा उत्साह यावर पाणी पडले. जनमानस ढवळून टाकणार्‍या या घटनांविषयीचे पडसाद ज्या प्रमाणात साहित्यात उमटायला हवे होते, त्या प्रमाणात ते उमटले नाहीत.

वर्षादोन वर्षातच  महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकारण सत्तास्थानाच्या  दिशेने आक्रमक झाले. स्वातंत्र्यापायी सर्वस्व गमावलेले स्वातंत्र्यसैनिक मागे पडले आणि धूर्त राजकारण्यांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर सुराज्याची जी स्वप्ने सामान्य माणसांनी पाहिली होती ती भंगली. पुढील काळात सत्तेवर येणारे पक्ष बदलले  पण सत्ता भोगणारी घराणी मात्र तीच राहिली.

1950 ते 2000 हा कालखंड मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. 1800 ते 1950 या दीडशे वर्षात विपुल साहित्यनिर्मिती विविध साहित्य प्रकारात झाली असली तरी ‘देशाचे स्वातंत्र्य’ हेच त्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते.  स्वातंत्र्यामुळे समाजाचे आत्मबळ वाढले. त्याला आत्मभान आले. नवी स्वप्ने खुणावू लागली. लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे मोल समजू लागले. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे नवशिक्षितांचा वर्ग परंपरेची चिकित्सा करू लागला होता. ठराविक वर्गातली, वर्णातली माणसेच लिहित होती आणि त्यांचेच लेखनसाहित्यम्हणून ओळखले जात होते. ते चित्र पालटले. खेड्यापाड्यातली आणि सर्व जातीधर्मातली माणसे लिहू लागली. त्यामुळे साहित्याचा परिघ विस्तारला. साहित्याला आलेले साचलेपण दूर होऊन साहित्यक्षेत्राची व्याप्ती साहित्याची निर्मिती वाढली. साहित्याचा अभ्यास सुरू झाला आणि अभ्यासाच्या वेगवेगळ्या शाखा अस्तित्वात आल्या.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1960 पासून महाराष्ट्रात नवे राजकीय पर्व सुरू झाले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, लोकसाहित्य समिती यांची स्थापना झाल्यामुळे साहित्य व संस्कृतीला नवे बळ मिळाले. दुसरीकडे शहरीकरणाने वेग घेतलेला होता. शहरे फुगत चालली होती. खेडी ओस पडत होती कारण पोटापाण्यासाठी माणसांचे लोंढे शहराच्या दिशेने येत होते. यांत्रिकीकरणाचा वेग वाढत होता. माणसांची जागा यंत्रे घेऊ लागली होती. दुसरे महायुद्ध, फाळणीनंतरचे हत्याकांड, यंत्रयुगात वाढत चाललेला कोरडेपणा, राजकारणाचा कडेलोट, महागाईटंचाईकुचंबणाकोतेपणा यांनी गांजलेल्या, साम्यवादसमाजवादस्त्रीवाद या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेल्याअपराधगंडाने पछाडलेल्या माणसांची घुसमट साहित्यातून लेखक मांडत होते. व्यक्तिजीवन समाजजीवन, भावपूर्णता तटस्थता, वास्तव आणि अतिवास्तव, जाणीव आणि नेणीव, दृश्य जग मानसिक विश्व अशा द्वंदातून आपापल्या प्रतिभेशी संवादी अशा कथासूत्रातून 1950-55 नंतरची कादंबरी अस्तित्वात आली. ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रात्मक अद्भूतरम्य, वैज्ञानिक, रहस्यमय अशा सर्व प्रकारच्या कादंबर्या मराठीत निर्माण झाल्या. फडकेप्रणीत तंत्रशरण कादंबरी लेखनाचा काळ संपून अतिवास्तववाद, मॅजिक रिअॅलिझम अशा वेगवेगळ्या तत्त्वदृष्टींचा प्रभाव मराठी कादंबर्यांवर पडला. वसाहतवादाचे जोखड दूर सारून, अंतःप्रामाण्याला प्राधान्य देणार्‍या कादंबरीकारांमुळे मराठी जीवनवास्तवातील अस्सलपणाची अनुभूती वाचकांना आली.

आधुनिक मराठी कथानिर्मितीची सुरूवात हरिभाऊंच्यास्फुटगोष्टीपासून होते. वि. सी. गुर्जर यांनी स्फुट गोष्टीला संपूर्ण गोष्ट बनविले. दिवाकरांनी मराठी कथेला रूप प्राप्त करून दिले. मासिक मनोरंजननंतर नवयुग, रत्नाकर, यशवंत, किर्लोस्कर, प्रतिभा, पारिजात, वागीश्वरी, ज्योत्स्ना, अभिरूची, सत्यकथा, हंस, वसंत, सुगंध या आणि अशा अनेक मासिकांनी कथा समृद्ध केली. मराठी कथेचे नवे तंत्रनिष्ठ रूप गुंतागुंत, निरगाठ, उकल या संकेतांशी बांधले गेले असले तरी अनेक कथाकारांनी वेगळ्या धाटणीची कथा लिहिली. 1942 ते 45 आसपास झालेल्या, मराठी नवकथेच्या उदयास अशी पार्श्वभूमी लाभलेली होती. मराठी नवकथेला आलेले साचलेपण जी. ए. कुलकर्णी यांनी दूर केले. पुढे कथेचा हा प्रवाह समृद्ध करण्याचा प्रयत्न अनेक कथाकारांनी केला.

1955 ते 70 या कालावधीत विद्रोहाचा एक आगळावेगळा आविष्कार मराठी साहित्यविश्वात झाला तो लघुतनियतकालिकांचा. प्रस्थापित व्यवस्थेच्या मर्यादा उघड करणे आणि एकंदरीतच साहित्यव्यवहाराची उलटतपासणी करणे हे काम लघुनियतकालिकांनी केले. 1970 नंतर लघुनियतकालिके हळूहळू बंद होत गेली.

1960 नंतर मराठी साहित्य क्षेत्राचा चेहरा बदलून टाकणारा दलित साहित्याचा प्रवाह आला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  विचाराने दलित समाजाला आत्मभान आले. वेदना, विद्रोह आणि नकार ही त्रिसूत्री दलित साहित्याच्या केंद्रस्थानी राहिली. दलित साहित्यिकांनी पिढ्या न् पिढ्या भोगलेल्या यातनांची आणि दुःखांची विदारकता एवढी प्रचंड होती की ती व्यक्त करण्यासाठी त्यांना कोणतेही प्रतिभासाधन करावे लागले नाही. त्यांच्या अनुभवांना शब्दरूप मिळाले आणि कसदार कलाकृती निर्माण झाल्या. कविता, आत्मचरित्र, कथाकादंबरी, नाटक या प्रकारात दलित लेखकांनी लक्षणीय साहित्यनिर्मिती केली आणि एकंदर भारतीय साहित्यसमृद्धीस दलित साहित्याने हातभार लावला.

ग्रामीण साहित्याची चळवळ 1977 पासून सुरू झाली. शहरातील पांढरपेशे लेखक कल्पनेने खेड्यातील जीवनाचे चित्रण करीत होते. ते कृत्रिम होते. खेड्यातील माणसाची जीवनपद्धती, तिथली कृषिप्रधान संस्कृती, कधी अतिदृष्टी तर कधी दुष्काळाचे दुष्टचक्र, तिथले सत्ताकारण, राजकारण, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व्यवस्था आणि त्यातून होणारे शोषण, माती आणि शेतीशी नातं जोडलेली तिथली माणसं, त्यांचं भावजीवन, कुटुंबव्यवस्था, शहरी जीवनाचे तिथल्या माणसांना वाटणारे आकर्षण हे सारे ग्रामीण साहित्यात कसदारपणे आणण्याचे काम या चळवळीतील लेखकांनी केले.

आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक असा केशवसुतांचा उल्लेख केला जातो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणार्‍या सुधारकांचा विचार त्यांनी मराठी कवितेत रूजवला. त्यांच्या कवितेतील प्रयोगशीलतेने त्यांनी काव्याची भाषा आणि गद्याची भाषा यातील भेद संपुष्टात आणला. त्यांच्यानंतर आजच्या समकालीन कवींची कविता आपण वाचतो तेव्हा गद्यकाव्य भाषाभेद समाप्तीच्या केशवसुतांच्या कार्याचे दूरगामी महत्त्व लक्षात येते. पुढे वेगवेगळ्या प्रकृतीच्या कवींनी वेगवेगळ्या धाटणीची कविता लिहिली. त्यात काव्यभान, सामाजिक जाणीव आणि अलौकिकाचा वेध घेण्याबाबत एकात्मता जाणवते. अनिल, कुसुमाग्रज आणि बोरकर यांच्या काव्यलेखनाची सुरूवात पारतंत्र्यात झाली. स्वातंत्र्याची आस त्यांच्या कवितेत प्रकट होणे स्वाभाविकच होते. अनिलांच्या कवितेने आशय आणि विषयांच्या बाबतीत रविकिरण मंडळातील कवींच्या कवितेला आलेले साचलेपण दूर केले. बोरकरांच्या कवितेच्या केंद्रस्थानी निसर्ग आणि प्रेम हे विषय राहिले. समाजाभिमुखता आणि राष्ट्रप्रेम यामुळे कुसुमाग्रजांच्या कवितेला वेगळे परिमाण लाभले. मराठी कवितेत क्रांतिकारी बदल झाला तो मर्ढेकरांपासून. प्रबोधन कालातील मानवकेंद्री जीवनदृष्टीकडे पाठ फिरवून मर्ढेकर  कवितेला आधुनिकवादी जीवनदृष्टीत घेऊन गेले. मर्ढेकर हे मराठी कवितेचे एक टोक आहे तर पु. शि. रेगे हे दुसरे टोक आहे. रेंग्यांच्या काव्यनिर्मितीने काव्याशयाची वलये विस्तारत नेली. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कवितेत आशय, रूप आणि भाषा या तिन्ही पातळ्यांवर क्रांतिकारी बदल झाले. आधुनिक युगातील माणसांची घुसमट, त्यांचे एकाकीपण, बुद्धी व भावना, शरीर व आत्मा, पाप व पुण्य, सत्य व सत्याभास यातील द्वंद्व, पर्यावरणातील अशांतता, दहशतवाद, स्त्रियांची अवहेलना, भ्रष्टाचार, मूल्यांची पडझड यासह कितीतरी विष आपल्या कवेत घेत मराठी कविता उत्तरोत्तर समृद्ध होत गेली. यात कवी आणि कवयित्रींचे योगदान महत्त्वाचे आहे.

1971 साली भारताच्या पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधींनी अणीबाणी लागू केल्यानंतर त्याचे पडसाद कराडच्या साहित्य संमेलनातही उमटले. संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत यांनी अणीबाणीवर शासनावर निर्भयपणे टीका केली आणि त्याला कडवेपणाने विरोध केला. अणीबाणीचे चित्रण मराठी साहित्यातही झाले. कविता आणि कांदबरी या साहित्यप्रकारात ते अधिक ठळकपणे झाले.

पाश्चात्यांच्या प्रभावाने स्त्रीपुरूष समानतेची चळवळ जरी 1970-75 मध्ये जगभरात भारतात सुरू झालेली असली तरी त्यापूर्वी अनेक वर्षे या देशात सर्वच थोर स्त्रीपुरूषांनी स्त्रियांच्या बहुविध प्रश्नात लक्ष घातले होते. स्त्री प्रथम सुविद्य झाली तरच तिच्या आत्मप्रकटीकरणाचे युग सुरू होईल असे सर्व समाजधुरिणांना वाटत होते. शिक्षणाच्या प्रचारामुळे आणि प्रसारामुुळे आत्मभान आलेल्या स्त्रियांनी मातृत्वाचा गौरव करणार्या देशात स्त्रित्त्वाची अप्रतिष्ठा कशी का केली जाते या वास्तवाकडे आपल्या लेखनातून लक्ष वेधले.

आधुनिक मराठी साहित्यात आजवर जी विनोदनिर्मिती झाली तिला प्राचीन मराठी  वाङ्मयातील पूर्वपरंपरेचा म्हणावा असा कोणताही आधार नाही. संत, पंत आणि तंत काव्यातील विनोदस्थळे आणि आधुनिक साहित्यातील विनोदी वाङ्मय यांचा कोणताही धागा जोडता येत नाही. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्यासुदाम्याच्या पोह्यापासूनखर्याअर्थाने मराठीतील विनोद वाङ्मयाचा प्रारंभ झाला. काळाच्या त्यात्या टप्प्यावर राम गणेश गडकरी, प्र. के. अत्रे, पु. . देशपांडे, चिं. वि. जोशी, जयवंत दळवी, प्रा. . मा. मिरासदार यांच्यानंतरही कसदार विनोदी लेखनाची परंपरा मराठीत सुरूच राहिली.

जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था आणि उदारीकरण स्वीकारल्यानंतर त्याचे परिणाम त्यात्या राष्ट्रातील भाषा आणि संस्कृतीवरही झाले. माणसांच्या जगण्याचा पोत बदलला. स्वातंत्र्यानंतरमानवकेंद्रीसमाजरचनेचे स्वप्न देशाने पाहिले होते. जागतिकीकरणानंतर ते व्यापारकेंद्री झाले. नफातोटा, ग्राहकविके्रता हे परवलीचे शब्द झाले. कर्जाच्या रूपाने आलेल्या समृद्धीने संपन्नतेचा भास निर्माण केला. सरकारी नोकरी करणारे दोन जामिनदार आणा मगच कर्ज मिळेल असे सांगणार्या बँका कर्ज घ्या म्हणून माणसांच्या मागे तगादा लावू लागल्या. पगाराचे आकडे वाढले. जबाबदारीच्या टांगत्या तलवारी वाढल्या. या काळात मूल्यव्यवस्था बदलली. एकेकाळी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आता तो माणूस कोणत्या भागात राहतो, तो कोणता मोबाईल वापरतोतो कोणत्या कंपनीच्या कारमधून फिरतो यावर माणसाची प्रतिष्ठा ठरवली जाऊ लागली. मुख्य म्हणजे, चार पैसे फेकले की कोणतीही गोष्ट विकत घेता येते ही मानसिकता जास्त फोफावली. प्रायव्हसी’च्या नावाखाली नाती दुभंगली. आपण जे लिहिलो, वाचतो, बोलतो त्याची दखलच घेतली जाणार नसेल तर हे उद्योग करायचेच कशाला असे वाटू लागल्यामुळे मध्यमवर्गीयांची आत्ममग्नता वाढली. एरवी स्वतःच्या आणि समाजाच्या प्रश्नांसाठी कायम सजग असलेला, चळवळीत भाग घेणारा, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारा मध्यमवर्ग हस्तीदंती मनोर्‍यात रमण्यातच धन्यता मानू लागला. एकीकडे आर्थिक समृद्धीचा भास निर्माण केला जात असताना समाजातले वैचारिक दारिद्र्य वाढले. समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनातली जी दरी ज्यालाकल्चरल लॅगकिंवा सांस्कृतिक मांद्य असे म्हटले जाते ती वाढली. हे सारे स्थित्यंतर मराठी साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीत नेमकेपणाने टिपले.

1970च्या दशकात जी पिढी जन्माला आली त्या पिढीने जेवढी स्थित्यंतरे पाहिली तेवढी अन्य कोणी नक्कीच पाहिली नसतील. एका अर्थाने ही पिढी मध्यावरतीच उभी आहे. एकीकडे टोकाचा आदर्शवाद आणि दुसरीकडे धडाधड कोसळणारी मूल्यव्यवस्था यांना जोडणार्या तकलादू पुलावरती ही पिढी उभी होती. मागचे सोडता येत नाही आणि पुढचे स्वीकारता येत नाही अशा पेचात ही पिढी सापडली होती. या पिढीने काय नाही पाहिले? जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था  आणि उदारीकरणाचा स्वीकार करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा समाज पाहिला. आर्थिक मंदी पाहिली. शेतकर्यांच्या आत्महत्या पाहिल्या. दहशतवादी हल्ले पाहिले. कार्पोरेट कल्चर पाहिले. तंत्रज्ञानाच्या आणि संवाद माध्यमातल्या कांतीने निर्माण केलेले गतिमान जग अनुभवले. आभासी जगात रमणार्यांचेलाईक्सआणिकमेंटचे प्रेम अनुभवले. आपले आयुष्य म्हणजे इतरांसाठीची अभिप्राय वही बनविणार्या तरूणाईचे सत्व आणि स्वत्व हरविताना पाहिले. हे सारेही आता पन्नाशीच्या घरात असणार्या लेखकांनी प्रभावीपणे साहित्यात मांडले  पण समीक्षेच्या जुन्या फुटपट्ट्या वापरणार्या समीक्षकांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले.

स्वातंत्र्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षात साहित्यविश्वात इतके बदल घडले. भाषा, विषय आणि आशय याबाबतीतही लेखनात अनेक प्रयोग झाले पण तथाकथित (समीक्षकांनीच ठरविलेल्या) महान साहित्यकृतीच्या प्रेमातून ते बाहेर पडायला तयार नाहीत कारण बाहेर पडायचं ठरवलं तर नवे साहित्य बारकाईने, आस्थेने वाचावे लागेल. लेखक, संपादक (वृत्तपत्राचे किंवा मासिकाचे) आणि समीक्षक यांच्या अभद्र युतीने मराठी साहित्यव्यवहाराचे अपरिमित नुकसान केले. फड गाजवणे, सभा गाजविणे या प्रमाणे ‘पुस्तक गाजविणे’ या नव्या रोगाने साहित्यविश्वाला ग्रासले. बेंटेक्सलाच सुवर्णपदक बहाल करण्याचे प्रयोग झाले. हा वाङ्मयीन व्यभिचारच म्हणावा लागेल. तो बोकाळला. त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी वाचनसंस्कृतीवर झाला.

जागतिकीकरणानंतर वाचनसंस्कृतीचा पोत बदलला. कविता, कथा, कादंबरी या ललित साहित्यापेक्षा माहितीपर साहित्याची मागणी वाढली. यात गैर काहीच नाही. जीवनाची विविध क्षेत्रे समजून घ्यावीत आणि आपल्या जाणिवांचा परिघ अधिक विस्तारत न्यावा असे वाचकांना वाटले तर त्यात गैर काहीच नाही. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीयांची आर्थिक ऐपत वाढली. मॉल, मल्टीफ्लेक्स आणि रेस्टॉरंटमध्ये जितक्या सढळ हाताने पैसा खर्च केला जातो तितका पुस्तक खरेदीवर केला जात नाही. मराठीपणाचा अभिमान बाळगणार्या अनेक उच्चभ्रूंच्या घरात उंची फर्निचर आणि महागड्या वस्तू असतात पण मराठीतली दहा उत्तम पुस्तकेही नसतात. हे सांस्कृतिक दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतच आहे.

साहित्यिकांनी समाजाभिमुख होण्याची गरज नेहमीच बोलून दाखवली आहे पण आज खरी गरज आहे ती समाजाने  साहित्याभिमुख होण्याची. भाषा, साहित्य आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात. आपले भाषा आणि साहित्यप्रेम केवळ ओठातून नव्हे तर पोटातून व्यक्त व्हायला हवे. असे झाले तर भाषा आणि संस्कृतीची काळजी कधीच करावी लागणार नाही.

प्रा. मिलिंद जोशी

पुणे । 9850270823

लेखणी आणि वाणीवर जबरदस्त प्रभुत्व असणारे प्रा. मिलिंद जोशी हे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत.

पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२

‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा