आमच्याबद्दल

आचार्य अत्रे यांनी सांगितले होते की, “वृत्तपत्र हा धंदा आहे आणि पत्रकारिता हा धर्म! एकवेळ धंद्याचा धर्म झाला तर चालेल पण धर्माचा धंदा होऊ देऊ नकात!” दुर्दैवाने या पवित्र धर्माचा काहींनी धंदा केल्याने या क्षेत्रात आम्ही नवे मानदंड प्रस्थापित करायचे ठरवले. तत्त्व, तळमळ आणि तिडिक या त्रिसुत्रीच्या जोरावर मी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ही संस्था सुरु केली.

मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या महानगरात आल्यानंतर ‘वयाने लहान आणि पैशाने कमी’ अशी अवस्था होती. मात्र प्रचंड जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची प्रामाणिक खुमखुमी होती. त्यातून २००२ साली ‘चपराक’चा जन्म झाला.

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते ‘चपराक’च्याच कार्यालयात पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी पहिली पंचवार्षिक वर्गणी भरली. त्यांना म्हटले, “काका, तुमच्याकडून वर्गणी घेणार नाही! तुम्हाला नियमित अंक पाठवणे माझे कर्तव्यच आहे!” त्यावेळी ते म्हणाले की, “मी पंचवार्षिक वर्गणी भरतोय कारण किमान पाच वर्ष अंक चालू ठेवण्याची नैतिक जबाबदारी तुमची आहे. त्यात तुम्ही यशस्वी झालात तर पुढे तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही!” त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी झाली.

वाचकांचे उदंड प्रेम लाभल्याने २००२ पासून आमची वाटचाल अव्याहतपणे सुरूच आहे. एका छोट्या बिंदुपासून सुरु झालेला हा प्रवाह अथांग अशी सिंधु बनु पहातोय! चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेवून आम्ही चुकीच्या प्रवृत्तीला, वाईट विचारांना ‘चपराक’ देण्याचे काम सुरूच ठेवले आहे. अर्थात, ही चपराक देताना जिथे जिथे काही चांगले चालू आहे त्यांना सन्मानित करणे, त्यांचा गौरव करणे यालाही आम्ही कायम प्राधान्य दिले आहे.

एक प्रभावी वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि पुस्तक प्रकाशन अशा तीन आघाड्यांवर आमचे काम चालते. त्यामुळेच वैविध्यपूर्ण विषयांवर वाचनीय आणि दर्जेदार विशेषांक प्रकाशित करणे, उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणे आणि विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे ही आता आमची स्वभाववृत्तीच झाली आहे. कथा, कविता, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, कादंबरी, स्पर्धा परीक्षा, आध्यात्मिक अशा सर्व विषयांवरील पुस्तके
प्रकाशित केल्याने ‘चपराक’चा वाचकवर्ग सर्वदूर निर्माण झाला आहे.

युगपुरुष स्वामी विवेकानंद म्हणायचे, “आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!” असे बौद्धिक क्षत्रिय निर्माण व्हावेत यासाठी आमची धडपड सुरु आहे. आमच्या या प्रयत्नात आपल्यासारख्या वाचकांचा सहभाग मोठा आहे, याची आम्हास पूर्ण जाणीव आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्यात एक अतूट नाते निर्माण होईल आणि ते कायम सुदृढ राहील याची मला खात्री वाटते.

– घनश्याम पाटील,
संपादक आणि प्रकाशक,
‘चपराक’, पुणे.

संपर्क क्रमांक: ७०५७२९२०९२