साहेब निर्मितीचे कारखाने

छोटे छोटे साहेब ते मोठे मोठे साहेब अशी एक साहेबयात्रा वर्षानुवर्षे सुरूच राहते. या यात्रेला आरंभ नसतो म्हणून अंतही! नवे नवे साहेब जन्माला घालून त्यांच्यासाठी ‘झिंदाबाद! झिंदाबाद!’ घोषणा देत राहणं हीच आपली आयुष्य घडवणारी सोपी पायवाट आहे असं मानणारा, लाचारीच्या सातत्याने बाह्यसुखालाच यशस्वी आयुष्य मानणारा महाप्रचंड जमाव, अगतिक करणार्‍या गुलामीच्या भक्तिभावाने नवे नवे आपले साहेब निर्माण करत असतो. 

घराबाहेर पडलो, भल्या सकाळीच. जरा बर्या हवेत फिरायला म्हणून! पण काल रात्री जे नव्हतं ते अचानक घराबाहेरच्या चौकात प्रकटलं होतं. ते होतं महाप्रचंड पोस्टर. अगदी नुकतंच मिसरूड गर्द होत चाललेल्या तरूणाचा चेहरा त्या पोस्टरवर इच्छा असो वा नसो (नसोच खरं तर) डोळ्यांवर आदळत होता नि त्या चेहर्यावर पंधरावीस छोट्या चेहर्यांची कतार होती. मग वळणदार ठळक अक्षरे वाटसरूंचे ध्यान बळेच वेधून घेत होती. ‘लक्षावधी दिलांचे जानजिगर चिंटूसाहेब यांचे अभिनंदन! तेविसाव्या वाढदिवसाबद्दल.’

 प्रश्न पडलाचिंटू साहेब

कोण बुवा हे चिंटू साहेब? नि इतकी वर्षे आपल्या प्रभागातील ह्या लक्षावधी दिलांच्या जिगरबाज चिंटूसाहेबांविषयी मला कसं  काहीच माहीत नाही? आपलं समाजभान एवढं एकाएकी कसं खालावलं? पुढे चालत गेलो नि जागोजागी, कोपर्यावर, पुलाच्या मध्यावर, तलावाच्या कट्ट्यावर, नाट्यगृहाच्या दारावर सर्वत्र हेचिंटूसाहेबमाझा पाठलाग करत राहिले. आता महिनो महिने सभा संमेलनात हे नवेसाहेबमिरवत राहतील. त्यांना आग्रहाने बोलावले जाईल. शाली स्वीकारून त्यांची पाठ आणि गुच्छ स्वीकारून त्यांचे हात धन्य होतील; नि चारपाच वर्षात एक नवासाहेबविधानसभेत कुठल्यातरी खात्याचा मंत्रीही होऊन जाईल

साधं ड्रायव्हिंग करताना त्या व्यक्तिला परवानापत्र देण्यापूर्वी परीक्षा घेतात. ट्रेनिंग दिलं जातं. मग त्याला वाहन चालवता येतं. अधिकृतरीत्या! पण राज्य चालवण्यासाठी त्या खात्याची शून्य माहिती असताना त्या व्यक्तिला ती जबाबदारी दिली जाते नि सरकार कोसळेपर्यंत वा बिनबोभाट चालेपर्यंत हेसाहेबनिर्वेधपणेखातेदारी सांभाळतात. तेही अनेक कोटींचे मलईदार लोणी खाऊन. राजरोसपणेआदरणीयवासन्माननीयहे बिरूद मिरवीत गल्लीतून थेट दिल्लीकडे जातात

एक गंमतच वाटते, ‘साहेब’च नव्या साहेबांना जन्म देतात. आधीचे छोटे छोटे साहेब सालाबादप्रमाणे मोठे मोठे होत जातात नि मग त्यांचे पोस्टर बदलते, जागा वेगळी होते. वृत्तपत्रातील संपूर्ण पान त्याचा मलईदार चेहरा व्यापून जनतेला नैतिकतेचा संदेश देत मिरवतो. मोठ्या साहेबांचे त्रेपन्नावे, अठ्ठावन्नावे वाढदिवस छोटे छोटे साहेब टीव्हीवर मोठी जाहिरात देऊन साजरे करतात. मोठ्या साहेबांचा जितका जास्तीत जास्त उदो उदो या नव्या छोट्या चिंटू, पिंटू, मंटू साहेबांना करता येतो तितके त्यांचे मोठा साहेब होण्याचे मार्ग मोकळे होतात

छोटे साहेब ते मोठे साहेब अशी एकसाहेब यात्रावर्षानुवर्ष सुरूच राहते. या यात्रेला आरंभ नसतो म्हणून अंतही. हे नवे साहेब जन्माला घालून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत झिंदाबाद घोषणा देत राहणं हेच ते आपलं यशस्वी आयुष्य असं मानणारा महाप्रचंड जनसामान्यांचा जमाव आपल्या आतल्या गुलामीच्या ओढीपायी आपले नवे नवे साहेब निर्माण करीतच असतो.

ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घेताना डोक्यावरसाहेब संस्कृतीची हॅट अशी काही घट्ट बसवली की स्वातंत्र्यानंतर त्याचा एक मनोरोगच झाला. मान देण्याचा तो उपचार राहता, मान तुकवून जगण्याचा तो आचार झाला आणि आता तरसाहेब! साहेब!’ या संस्कृतीने हाहाःकार माजवला. या साहेबपणासाठी कर्तृत्वाची, शिक्षणाची, प्रतिभेची काहीच गरज नसते हे सिद्धच झाले आहे. पहिल्यापासून विनम्र चेहर्याने आडदांडगिरी करण्याचं साहस फक्त लागतं! मग तो अगदी शाळकरी वयातही सहजसाहेबहोऊन जातो. एकदा का आपल्या घरात कोणी एखादासाहेबझाला की मग पुढील असंख्य पिढ्यांनासाहेबहोण्याचे रानच मोकळे मिळते.

मोठ्या झालेल्या साहेबांची अनेक मुले पुढे ओघाने साहेब होतातच पण इतकेच काय तर पुढे त्यांचीही मुले ‘चिरंजीव साहेब’ होतात. साहेबपणाची पिलावळ भोवतीचे हुजरेच वाढवतात आणि मग घरातल्या स्त्रियाही ‘बेबी साहेब’ होतात. मी तर एका शाळेच्या संचालकाच्या घरात नुकत्याच जन्मलेल्या, नावही ठेवलेल्या बालकाला त्या शाळेतले शिक्षकचिंगुले साहेबम्हणताना ऐकले. आता ते बालक पहिला वाढदिवसही पोस्टरवर अलगद चढून साजरा करणार! जनतेच्या मनात कुणीतरी आपलाराजाअसावा नि आपण त्याचेमोस्ट ओबिडीयंट सर्व्हन्टअसावं ही आदिम इच्छा असावी की काय हा माझ्या उत्सुकतेचा विषय आहे. साहेब निर्माण केला जातो आणि मग त्याच्या सावलीत सुरक्षित राहता येते ही एक मानसिकता असावी.

कॉलेजमधल्या वर्गातही मी भविष्यातले असंख्यसाहेबपाहिले आहेत. अभ्यास हा विषयचऑप्शनला टाकून रग्गड आडदांडगिरी करणारी, साध्या सी.आर.जी.एस. या मजेच्या निवडणुकांनाही राजकीय रंग आजकाल दिला जातो. शस्त्रे परजली जातात. गँग मागवली जाते. महाविद्यालयांचे अंगण हे यःकश्चित सत्तेचे रणांगण बनते आणि ढोलताशांच्या गजरात, गुलालाच्या रंगात हा नवा साहेब शिट्ट्यांच्या पावसात जमावाची सूत्रे हाती घेतो. आज माझ्याच विद्यार्थ्यांना मला स्टेजवरअमके साहेबम्हणावे लागते तेव्हा वर्गातले त्याचे सारे पराक्रम आठवून गंमत वाटते. गंभीरपणे शिकून परीक्षा दिलेले नव्वद टक्के विद्यार्थी अमेरिकेला स्थायिक झाले तर उरलेल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या सत्ताकेंद्रांचेसाहेबझाले. त्यांच्या बोलण्याचे वृत्तपत्रात मथळे होतात. साध्या बोलण्याचे आदेश होतात नि घोटाळ्यांचे रूपांतर पक्षवाढीसाठीच्या निधीसाठी केलेल्या धर्मकार्यात होते. साहेबांच्या माजोरी बोलण्याच्या व्हिडिओला यू ट्युबवर लक्षावधीनेलाईक्समिळतात. बारावी नापास साहेबांच्या पदरी आयएस अधिकार्यांची फौज नोकरी करू लागते. या सार्याचे इतके उदात्तीकरण गल्लाभरू माध्यमे करतात की बुद्धिने कष्टाने फारसा प्रभाव पाडू शकणार्यांना त्यापेक्षा गल्लीबोळात चारदोन स्थानिक प्रश्नांवर आंदोलनाचे नाटक उभारूनसाहेबहोणे सोपे असे वाटू लागते. साहेबनिर्मितीच्या उपासकांना नवे साहेब निर्माण करण्याचे कारखाने अष्टौप्रहर सुरूच ठेवावे लागतात

आताची आंदोलने अस्वस्थतेतून वा अन्यायाच्या जाणिवेने, बंडखोरीतून होत नाहीत ह्याचाही इव्हेन्ट झाला. त्यामुळे ‘साहेब’ मंडळींना आंदोलनाची इव्हेन्ट मॅनेजमेंट जमणे आवश्यक असते. मोबाईलच्या एका क्लिकवर हजारो तरूणपरीक्षा नकोतम्हणून रस्त्यावर हैदोस घालतात काय नि दुसर्या क्लिकवर वांगी पोत्यात भरावीत तशी ही मुले नाहीशी होतात काय! मध्यमवर्गीय निष्क्रीयता फक्त ब्रेकिंग न्यूजची सिरिअल बघण्यात सामाजिक भान मानते पण दरम्यान खर्या उसळलेल्या प्रश्नांवरून ध्यान हटवण्यात साहेब संस्कृती ही यशस्वी होते. यात त्या तरूणांच्या मानसिकतेची, भविष्याची काय वाट लागते ती बघण्याचे ह्यासाहेबमंडळींना कारण नसतं. जे आंदोलनजीवीसाहेब जन्माला घालतात. पुढे त्यांनाच पास करून साहेब आपली पोटं भरतात. आपलाघासहोईपर्यंत आंदोलनजीवी पार कणाहीन, कर्तृत्वशून्य झालेले असतात. त्यातून पुन्हा एखादा नवा साहेब जन्माला घालणारी नवी कोरी, तरतरीत पिढी जन्माला आलेली असते. जुनी पिढी स्वतःचे सरण रचले जाताना पाहत उदास बसलेली असते.

जगातली कुठलीही सत्ताज्यावर आपले सिंहासन अवलंबून आहे अशा समाजाला जागृत होऊ देत नाही, हा इतिहास आहे. ते जनजागृतीविषयी बोलतील, खूप बोलतील. त्या बद्दलचे आपले प्रचारकार्य करून औदार्याची, सहिष्णुतेची प्रतिमा निर्माण करतील पण प्रत्यक्ष जनजागृतीकशी होणार नाही याचीच काळजी घेतली जाते कारण जनता अंतर्बाह्य जागी होणे हेसाहेब संस्कृती विनाशकारी ठरणारे असते. निष्क्रिय, अंधश्रद्धाळू, आळशी माणसांना ज्याप्रमाणे प्रयत्न करताचदेणारा कुणी एकआहे असा आभासी दाता लागतो आणि असा दाता आळशांना, व्यवसनांधांना, अडाण्यांनाही भरपूर देतो असे सांगणारा एक ढोंगी बुवा ते निर्माण करतात. हा बुवा म्हणजेच सदेह रूपातील तो ऊर्जावंत परमेश्वर बरं का! असं वारंवार सांगत राहणारी जशी एक आध्यात्मिक टोळी असते त्याचप्रमाणे समाजातील एक मोठा वर्ग जरा घोषणा दिल्या की आपले पोट भरेल इतक्या सोप्या पद्धतीने जीवन जगू पाहतो. त्यांनायत्न तो देव जाणावाहे सांगणारी खरी मंडळी नको असते. ‘साहेब हाचि देव जाणावाअसा बदल ते स्वतःपुरता करून घेतात. त्यातून मगफुकट तेच हक्काचंमानण्याचं वातावरण निर्माण होतं.

श्रममेव जयते!’ ही संस्कृती खरी सुखी संस्कृती असते पण साहेब संस्कृतीत ‘लाचारमेव जयते!’ अशी वृत्ती फोफावते. लाचारीच्या स्पर्धेला ऊत येतो. साहेब संस्कृतीत स्वाभिमानाला, बाणेदार कण्याला, बुद्धिवादाला थारा नसतो. तेथे फक्त ‘होयबां’ चे पीक असते. पुढे हा सायबा आणि त्याच्या पायाशी होयबा! असे चित्र हे गुलाम वृत्तीच्या, प्रगतीशून्यतेकडे निघालेल्या मेंढीच्या कळपाप्रमाणे भासते. घोषणांचे बें बें करीत, पोटापुरता चारा शोधणार्या मेंढ्यांना पुढे आपले काय होणार याची संवेदनाच नसते. मेंढी पाळणारा त्यांना खाऊपिऊ घालून मस्त करणारा मात्र आपल्या कळपावर खूश असतो कारण त्याच्या स्वार्थाचा तोच तर कच्चा माल असतो.

समाजातील बहुसंख्य घटकांना फुकटेपणा प्रिय असतो हे जातिवंत साहेबाने ओळखलेले असते. मूलभूत प्रश्न सोडवताच ज्याने थातुरमातुर नसलेल्या समस्या सोडवून सामाजिक कार्याची, पुढच्या ध्येयासाठी जाहिरात करता येईल अशी खिरापत (तीही जनतेच्या पैशाने) वाढण्याचे कसब साहेबात आलेले असते. उदाहरणार्थ निम्नवर्गीयांना यात्रेच्या बसची फुकट सोय करणे, पावसाळ्यात फुकट छत्री वाटप, दिवाळीत घरोघरी मिठाईचे खोके वाटणे आणि हे सारे कधीही कोणीही मागितलेले नसते पण समाजाला अशा गोष्टी देऊन, मिंधे करून निपचित करणे ही युक्ती गल्ली ते दिल्लीतील साहेब संस्कृतीने ओळखलेली असते. फ्लॅटधारकांना तांदूळ, गहू, चहाची पावडरफुकटदेऊन काय साधते? बरे सर्व पाकिटांवर मोठ्ठ्या साहेबांचा नि मग वयानुक्रमे छोट्याछोट्या साहेबांचे फोटो. आपल्या नातवंडापंतवंडांनाही कोणत्या साहेबांना तोंड द्यावे लागणार आहे ते यामुळे कळते. फुकट यात्रा घडवली की रस्त्यांचे खळगे भरले नाहीत तरी चालते. फुकट दंतमंजन वाटले की नळाला पाणी येण्याची आरडाओरड थिजून जाते. कोट्यवधीचे घोटाळे आपल्या परदेशी खात्यात कोंबण्यासाठी काही लाखांचे रमणे वाटले जातात. फुकटपणाचा हव्यास धरणारा, सतत ओंजळ धरून बसलेला कणाशून्य समाज हाच साहेब संस्कृतीचा पोशिंदा असतो. 

आपल्या भागात उत्तम सार्वजनिक वाचनालय, पुस्तक पेढी, आदर्श शाळा, सुसज्ज व्यायामशाळा, सुसज्ज बागा हव्यात असा आग्रह करणारा समाज कुठे आहे? तो आपण निर्माणच होऊ दिलेला नाही. ‘विनामूल्य ग्रंथभेट दिले जातीलअसे जाहीर केले तर किती जण येतील? निविनामूल्य चकल्या पाकिटे वाटली जातीलअसे जाहीर केले तर किती लोक येतील हे त्यांना माहीत असते.

आजच्या सर्वपक्षिय साहेबांकडे जर तिर्हाईत नजरेने पाहिले तर जाणवेलजशी जनता तसे त्यांचे नेते!’ आपल्या सर्वसामान्य जनतेचा बौद्धिक लघुत्तम साधारण विभागाला अनुसरून आपले साहेब जनता निर्माण करीत असते. एका राजाची राजेशाही नाहीशी झाल्यासारखे भासून आपण लोकशाहीत आहोत, ही सुद्धा अफवा वाटावी अशी स्थिती आज असंख्य साहेबांच्यासाहेबशाही आहे. आता अनेक संमेलनासारखे एकअखिल भारतीय साहेब संमेलनभरवायला हवे असे वाटते आणि तेही एखाद्या अगदीवरच्यासाहेबालाच शक्य होईल.

आदराने वा प्रासंगिक सन्मान म्हणून एखाद्यालासाहेबसंबोधने वेगळे नि केवळ लाचार, स्वार्थी वृत्तीने, कर्तव्यशून्य माणसाचा उदोउदो करीत त्याला आपला मालक मानणं वेगळे. आज रक्तात रूजलेल्या गुलामीचे दृश्य रूपसाहेबजन्माला घालण्यातून प्रकट होते. साहेब निर्मितीचा कारखाना हा आपल्या आदिम शरण्यभावात आहे. नेतृत्व निर्माण करणं ही समूहाची गरज असते. आक्रमण परतवण्यासाठी, शोषणाविरूद्ध दाद मागण्यासाठी, समूहाला एकप्रमुखलागतोच पण ज्या साहेब संस्कृतीविषयी मी बोलतोय ती आजची पुंड प्रवृत्तीचीसाहेब वृत्तीनिरपेक्ष वृत्तीची नसून ती ओरबाडण्याची, भाबड्या गरजू जनतेला नडून पिढ्यांपिढ्यांसाठी धनदांडगेपण करण्यासाठी निर्माण झाली आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याचे धाडस या विलासी वृत्तीत नसून व्यक्तिला कायमचे संपवण्याच्या षडयंत्र प्रवृत्तीचे आहे. म्हणून साहेब संस्कृतीच्या पावलांनी आपण पुन्हा एकदा हुकुमशाही राजसत्तेला पायघड्या घालीत आहोत याचे भान वेळीच यायला हवे.

हे आपणच भयगंडापोटी निर्माण केलेलेसाहेबकेवळ सत्तेच्या राजकारणातच आहेत असे कोणी समजत असेल तर ते भाबडेपण ठरेल. जेथे जेथे आर्थिक केंद्र निर्माण होते तेथे तेथेसाहेबनिर्माण केले जातात. ते या सत्ताप्रदेशाचे अनभिषिक्त राजेच असतात. राजांना हुजर्यांचे, मुजर्यांचे प्रचंड व्यसन असते. त्या व्यसनांचे पाणवठे बनून होयबांचे काफिले तयार होतात.

पतपेढ्या, साखर वा कोणतेही कारखाने, बँका, शैक्षणिक, साहित्यिक संस्था अन् अशा अनेक प्रदेशात हे साहेब त्यांच्या त्यांच्या घराण्याचा वारसा निर्माण करीत आजोबा ते नातू-पणतू असा प्रवास करीत राज्य करीत असतात. अनेक शिक्षणसंस्था ज्याच्या भुवईने वर-खाली होतात अशा कितीतरी मग्रुर साहेबांना ‘शिक्षणसम्राट’ असे गौरवाने म्हटले जाते हेच या भूलोकीचे आश्चर्य आहे. सरस्वतीच्या चरणी अनन्यभावाने, सेवावृत्तीने, सर्वस्व समर्पित वृत्तीने जेथे कार्य करावयाचे तेथे जर अर्थसाम्राज्य उभे राहिले, त्या साम्राज्याच्या संचालकालासम्राटम्हणवून घेणे हजारोच्या समुदायाला तसे म्हणणे जर आवडू लागले तर पिढ्यांचा सांस्कृतिक मानसिक विनाश अटळ आहे आणि तो होतोच आहे

सेवावृत्तीचा केवळमेकअपकरणार्या ह्या देशव्यापी साहेबांना पदवीधरांचेभटारखाने काढायचेअसतात. विद्याधरांचे गुरूकुल निर्माण करायचे नसते. त्यांच्या नुसत्या वातानुकुलित कचेर्यांना भेटी द्या, तेथील राजेशाही थाट पहा, उंची फर्निचर नि वरील हंड्या, झुंबरे पहा, संगमरवरी भिंती पहा नि गाड्यांचा ताफा पहा. समर्पित वृत्तीचा शैक्षणिक कार्य करणारा, वृतस्थ ज्ञानयोगी अशी चैन कशी करू शकतो? ज्यांनी खरोखर या महाराष्ट्रात, खेड्यापाड्यात, उपेक्षित समाजात शिक्षणसंधीची बिजे रूजवली, रात्रं न् दिवस समाजाकडे संस्थेच्या कार्यासाठी समाजाच्या विकासासाठी ओंजळ धरली त्यांचे आयुष्य कसे पुढे गेले? ते चिरंतनात विलीन झाल्यावर कृतज्ञतेने त्यांचे पुतळे उभारले गेले. आज स्वतःच्या समोरच, स्वखर्चाने पुतळे करून घेण्याची घाई झालेली दिसते. जाणो, नंतर कुणी नाही केला तरसमाज आपले नाव विसरला तर…! साहेबांचा स्वार्थ त्यांच्यात भयगंड निर्माण करतो. आपले अनुयायी हे विचारांचे अनुयायी नसून लोभानुयायी आहेत हे त्यांना माहीत असते. एकांत त्यांना सोसत नाही. गर्दी, माध्यमांची गजबज एकसारखी! प्रसिद्धी हा साहेबसंस्कृतीचा प्राणवायू असतो. ‘साहेबम्हणूनच स्वतःला प्रस्थापित करणे ही एक अथक साधनाच आहे. त्यात विचारांचा भाग नसून हव्यासाचे सातत्य असते. बेगडी रोषणाईची वर्षे झपाट्याने विझून जातात. केवळ साहेबांच्या मर्जीत राहण्यातच दंग असणार्यांना त्यांची चूक अति उशिराने उमगते. अरे, कमावले ते साहेबाने; मी मात्र गमावलेच! ही खिन्नता साहेबांची प्रतिमा निर्माण करणार्या त्यांच्या भोवतीच्या घोळक्याला होते पण आता पश्चातापाला अर्थच नसतो. काळाप्रमाणे असंख्य ‘साहेब‘ येतात पोस्टर उतरवावे तसे कालांतराने खाली उतरतात. चार दिवसांचा आकाशकंदिल कधी ‘धु्रवतारा’ होऊ शकतो का? …पण तोच अखेर उरतो, जो काळोखाच्या पहाडात आपल्या आयुष्याचा पलिता करतो. स्वतः जळतो, जग उजळवतो तेच महामानव होतात! काळाच्या हृदयातील हृदयरत्न!

प्रवीण दवणे, ठाणे

प्रसिद्ध साहित्यिक, गीतकार 

संपर्क – 9820389414

पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२

‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा