हा किस्सा खरा आहे?

Share this post on:

आज मांडणारा किस्सा खरा आहे का?
निश्चितपणे खरा आहे! अस्सल आहे! चोवीस कॅरेट सोन्यासारखा!
मग कुठला आहे? म्हणजे मतदारसंघ, गाव, शहर?
कुठलाही असू शकतो! त्यातल्या भावना महत्त्वाच्या!
कुणाबाबतचा आहे…?
त्याचेही काही नाव नाही!!
आपण फारतर ‘भाऊसाहेब’ म्हणूया! भाऊ आणि साहेब ही दोन्ही विशेषणं या क्षेत्रातील मंडळींची आवडती! म्हणून आजचे नायक भाऊसाहेब!

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

तर हे भाऊसाहेब निवडणुकीला उभे राहिले. मागच्या वेळी लोकानी मोठ्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं होतं.
पण यांनी काय केलं…? अनेक योजनांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार! कधी मतदारसंघात फिरकले नाहीत की कधी कुणाला कसली मदत केली नाही. तरीही त्यांचा आत्मविश्वास दांडगा. यावेळी त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला आणि त्यांनी चक्क प्रचारसभाही लावली.
या प्रचारसभेत गोंधळ होणार, आरोप-प्रत्यारोप होणार,i लोकाची ओढवून घेतलेली नाराजी उघड होणार असे काहींचे कयास होते. भाऊसाहेबांनाही याचा अंदाज नव्हता असे नाही. तरीही ते सभास्थानी आले.
मतदारांनीही ठरवलं होतं की यंदा भाऊसाहेबांना खडसावून जाब विचारायचा. निवडणुकीलाच आमची आठवण येते का? हे त्यांना तोंडावर विचारायचं.
भाऊसाहेब मात्र महा बेरकी! राजकारण्यांनी गेंड्याची कातडी पांघरावी म्हणतात तसे!
ते आले! सभा सुरू झाली. ते व्यासपीठावर बोलण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले –
उपस्थित बंधू आणि भगिनींनो!
मागच्या येळी म्या तुमच्याकडं मतदान मागन्यासी आल्तो. त्या येळी माह्याकडं काई बी नव्हतं. गावाहून एका कपड्यानिशी या शहरात आल्तो. मजुरी करत करत राजकारणात गेलो. म्या एक सामान्य कार्यकर्ता! आधीच्या नेत्यांवर तुमचा राग असल्यानं तुम्ही मला सपोर्ट केल्ता. त्या येळी माझे खान्याचे वांदे व्हते. जी काय कोरभर भाजी-भाकरी मिळायची ती खाऊनशा माझे दिवस निघायचे.
आपण माझ्यावर कृपा केली आन आज माझ्याकडं कसलीच कमतरता नाय. मायबाप जन्तेनं ठरवलं तर राजाचा रंक व्हतो आन रंकाचा राव. तुम्ही संमद्यांनी मला निवडून देऊन राव केलं. आज या शहरात माझे तीन-चार बंगले हाईत. पेट्रोल पंप टाकलाय. दुकानं हाईत. शोरूम हाय. समद्या महागड्या गाड्या माह्याकडं हाईत. हितकंच काय, मी तुमच्या लेकरांच्या कल्याणासाठी शाळा बी काढलीय. आपले बिअर बार बी जोरात चालत्यात. तुमच्या कृपेनं माझ्याकडं नाय असं आता कायच नाय! सगळ्या इच्छा तुम्ही मायबाप मतदारांनी पुर्‍या केल्या बघा. त्यामुळं तुम्हा संमद्यांना नम्र इनंती हाय, या येळी बी तुम्ही मलाच निवडून द्या. म्हनजी मी तुमची काम करू शकंन.

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

आन् ध्यानात घ्या… माझ्या बिगर तुमी आजून कुणाला बी निवडून दिलं तरी त्याला ह्ये माझ्याइतकं समधं करण्यात पुढली पाच वर्षं अशीच निघून जातील. त्यामुळं तुम्ही मलाच निवडून द्या! आता मातर मी तुमची कामं करू शकंन!!
भाऊसाहेबांचं भाषण झालं. लोकानी ऐकलं. त्यांना जाब विचारायची कुणाचीच टाप नव्हती. आजवर जे कोणी निवडून आले त्यांचं हेच रूप होतं. भाऊसाहेबांनी आज भाबडेपणानं त्यांच्यासमोर मांडलं इतकंच. गावोगावचे असे अनेक भाऊसाहेब आज लोकशाहीचं खुलेआम वस्त्रहरण करत आहेत. करत राहतील. यांना जाब विचारण्याची ताकद सामान्य माणूस कधीच हरवून बसला आहे.
– घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 10 मे 2024

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

One Comment

  1. जबरदस्त,!
    शालीतले फटके मऊमऊ लागतात पण परिणाम साधून जातात. मस्तच…

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!