डॉटच्या बातमीने वाचवला जीव

Share this post on:

सध्याच्या स्पर्धेच्या जगात सेकंदासेकंदाच्या बातम्या ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून पुढे येतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता पणास लागलेली असते. माध्यमांची ताकत काय असते? तर एका चार ओळीच्या ‘डॉट’च्या बातमीवरून एखाद्याचा जीव वाचवण्याची क्षमता त्यांच्यात असते. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, क्रिया-प्रतिक्रिया यालाच ‘बातमीदारी’ समजण्याचा काळ आलेला असताना स्वर्गीय गोपाळराव बुधकर यांच्यासारख्या व्रतस्थ पत्रकाराने घडवलेली एक किमया आज मुद्दाम सांगावीशी वाटते.

ही घटना आहे 1970-71 च्या काळातली. त्यावेळी आजच्यासारखी ‘क्षेत्र पत्रकारिता’ (बीट रिपोर्टिंग) नसल्याने एकाच वार्ताहराला सगळे विषय बघावे लागत. मोबाईल, गाडी अशा सुविधाही नव्हत्या. सायकल काढायची आणि निघायचे बातमीच्या शोधात! बुधकर ज्या वृत्तपत्रात काम करायचे त्या वृत्तपत्रात त्या दिवशी एक डॉटची बातमी होती. डॉटची बातमी म्हणजे काय? तर एखाद्या पानावर बातमी संपली की चार-दोन ओळी उरतात. तिथे डॉट देऊन थोडक्यात पूरक बातमी दिली जाते. बातमीचा आशय असा होता की, ‘जळगाव येथे झालेल्या दंगलीत एका युवकाला गोळी लागली आहे. पुढील उपचारार्थ पुण्यात दाखल करण्यात आले आहे.’
यात तरूणाचे नाव, पत्ता, रूग्णालयाचा तपशील, दंगलीचा तपशील असं काहीही नव्हतं. बुधकरांनी सायकल काढली आणि ते थेट ससूनला गेले. इतक्या तपशीलावर माहिती मिळणे अवघड होते पण यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या सर्व क्षमता पणाला लावल्या. त्यातून कळले की, त्या तरूणाला पुण्यातील औंध उरो रूग्णालयात दाखल केले आहे. जळगावहून छत्रपती संभाजीनगर जवळ असताना त्याला पुण्याला का आणले? असा विचार करत त्यांनी उरो हॉस्पिटल गाठलं. त्यावेळी त्या तरूणाला अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. त्याची प्रकृती चिंताजनक होती. सुहास चंदनवाले असं या 22 वर्षीय तरूणाचं नाव होतं.
सुहासचे वडील तिथं होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते बुधकरांच्या गळ्यात पडून रडू लागले. काही दुःखद तर घडले नाही ना? म्हणून त्यांनी त्यांचे सांत्वन केेले. ते सांगू लागले, ‘मी सुहासचा वडील. त्याला आई नाही. एक बहीण आहे, ती मुंबईला असते. तिला अजून कळवले नाही. कोण आणि कसे कळवणार? हात थरथरतात. लिहिता येत नाही आणि ही घटना सांगण्यासाठी तोंडातून शब्द फुटत नाहीत. मी प्रथमच पुण्यात आलोय. खिशात एक दमडीही नाही. मुलाला इथं सोडून बाहेरही जाता येत नाही. रात्रभर थंडीत कुडकुडत उभा आहे…’
ते ऐकून बुधकरांनी आधी त्यांना खायला आणून दिलं. नंतर रोज ते त्यांच्यासाठी त्यांच्या घरून पोळी-भाजी आणि थर्मासमधून चहा घेऊन जाऊ लागले. सुहासची तब्येत सुधारत होती. चौथ्या दिवशी त्याला आयसीयूतून बाहेर काढलं. तो आता बरा होईल असं वाटत होतं.
अचानक डॉक्टर आले आणि म्हणाले, ‘मुलाची प्रकृती सुधारत आली होती पण आज अचानक…’ पुढचे अप्रिय शब्द कानावर पडू नयेत म्हणून बुधकर उठले आणि सरळ मुख्य डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले, ‘सुहासच्या छातीत जिथे गोळी लागली होती तिथून पू येतोय. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणे अवघड असते. त्यामुळे त्याला वाचवू शकणे अवघड आहे.’
‘यावर काहीच उपाय नाही का?’ असे सचिंत होऊन विचारल्यावर ते म्हणाले, ‘जखमेच्या ठिकाणी विशिष्ट औषधे वापरावी लागतील. ती विदेशी आहेत आणि महागडी आहेत. पुढच्या पाच-सहा तासात ती मिळाली तर जीव वाचू शकतो. ती औषधे पुण्यात उपलब्ध नाहीत. मुंबईत केवळ मिलिटरी हॉस्पिटलला मिळू शकतात.’
सुहासला वाचवण्याचे प्रयत्न करण्यासाठी आता पाच सहा तास हातात होते. त्याकाळी इतक्या कमी वेळात मुंबईत निरोप देणे आणि तिथून ती औषधे पुण्यात येणे शक्य नव्हते. तरीही बुधकर तिथून बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचे परिचित असलेल्या त्यावेळचे भाजप आमदार डॉ. अरविंद लेले यांचं घर गाठलं. ते म्हणाले, ‘कृपया काहीही करा. आपण आमचे आमदार आहात. या मुलाचा जीव वाचला पाहिजे.’
वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. डॉ. लेले यांनी त्यांच्या घरून त्यांना दूरध्वनी केला. थोडक्यात माहिती देऊन फोन बुधकरांकडे दिला. बुधकर इतकंच म्हणाले, ‘एका तरूण आणि निरपराध मुलाचा मृत्यू म्हणजे तुमच्या सरकारच्या विश्वासार्हतेचा मृत्यू. तुमचं सरकार तुम्ही वाचवा. हा मुलगा मरता कामा नये.’
मुख्यमंत्र्यांनी काहीच न बोलता फोन बंद केला.
आता काय होईल हे कुणालाच कळत नव्हतं.
सुहासला मदत मिळेपर्यंत रूग्णालयातून हलायचं नाही असं बुधकरांनी ठरवलं. डॉ. पटेल त्याच्यावर उपचार करत होते.
सुहासचं नशीब बलवत्तर होतं. मिलटरीची एक खास गाडी ती सर्व औषधं घेऊन मुंबईहून पुण्याला आली. सुहासवर योग्य ते उपचार झाले आणि त्याचा जीव वाचला.
सहाव्या दिवशी अर्धगौर असलेला सुहास शुद्धीवर आला आणि त्याचे बाबा सांगू लागले, ‘सायंकाळची वेळ होती. बाजारात दंगा उसळला. पोलीस धावले. दंगा आटोक्यात येईना म्हणून त्यांनी गोळीबार केला. आमचे घर बाजारजवळ आहे. सुहास गच्चीत उभा राहून दंगा पाहत होता. पोलिसांनी उडवलेल्या गोळीपैकी एक गोळी सुहासच्या छातीत घुसली. किंचाळत किंचाळत तो गच्चीत पडला. मी खालीच होतो. तातडीनं गच्चीत गेलो. अनेक लोक धावून आले. त्यांनी आम्हास पुण्यात आणले.’
सुहास पूर्णपणे बरा झाला. डिस्जार्ज मिळाल्यानंतर बुधकरांच्या नवी पेठेतील घरात आला. बाप-लेकाच्या आनंदाश्रुंनी त्यांचं घर भिजलं. त्यानं पुण्यात मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला होता पण या घटनेनं त्याचं वर्ष वाया गेलं.
त्या मुलाचे नाव, जात, धर्म असे कसलेही फुटकळ तपशील माहीत नव्हते. केवळ एक तीन-साडेतीन ओळींची त्रुटक बातमी होती. त्याचा पाठपुरावा केल्याने एका निष्पाप तरूणाचा जीव वाचला होता. ही आहे आमची आदर्श पत्रकारिता. आजच्या बातम्यांचा रतीब घालण्याच्या काळात याचं अप्रूप वाटणं स्वाभाविक आहे. गोपाळराव बुधकर ज्या पद्धतीनं बातम्या लिहायचे ती पद्धत हटके होते. त्याची सुरूवात अत्यंत रंजक असल्यानं पुण्याच्या पत्रकारितेत त्यावेळी अशा बातम्यांना ‘बुधकर एन्ट्रो’ म्हणून ओळखलं जायचं. आज बुधकर सर हयात नाहीत. सुहास चंदनवाले जळगावात असतील. हा पत्रकारितेचा संस्कार मात्र आमच्यासारख्या काही लोकापर्यंत झिरपत आलाय. रणात आहेत लढणारे अजून काही असं म्हणायला वाव आहे. गोष्ट छोटीशी पण डोंगराएवढी म्हणतात त्याप्रमाणे आज या गोष्टीचं तात्पर्य समजून घेतलं तर अनेक प्रश्न सहजी मार्गी लागू शकतील.

-घनश्याम पाटील
7057292092

प्रसिद्धी – दै. पुण्य नगरी ९ फेब्रुवारी २०२५

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!