लोकप्रतिनिधी कामाचा

संपूर्ण भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती हे आपणास माहीत आहे का?
या प्रश्नाचे आपणा सर्वांना अभिमान वाटावा असे उत्तर आहे, ते म्हणजे पिंपरी-चिंचवड! ही किमया साधण्यात आणि या नगरीच्या उत्थानात सर्वाधिक योगदान देणार्‍या नेत्याचं नाव आहे अण्णासाहेब मगर. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

1952 साली अण्णासाहेब प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी हा हवेली मतदारसंघ होता. अण्णासाहेबांनी आमदार झाल्यावर विविध कामांचा जो धडाका लावला त्यामुळे त्यांचे नाव जिल्ह्यात सर्वत्र पोहोचले.
1957 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र ते खचले नाहीत. हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत त्यांनी नेकीने सुरूच ठेवले. त्यामुळे 1962 ला ते पुन्हा निवडून आले. त्याचवेळी पिंपरी-चिंचवड एमआयडीसीची स्थापना झाली आणि या नगरीचा उद्योगनगरी म्हणून सर्वत्र लौकिक पसरला. त्यावेळी अण्णासाहेबांच्या पुढाकारातून पिंपरी-चिंचवड नवनगर पालिकेची स्थापना झाली. अण्णासाहेब या पालिकेचे शासन नियुक्त नगराध्यक्ष झाले. इथल्या व्यवसाय-उद्योगाची दिवसेंदिवस वाढ होत गेली आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अस्तित्त्वात आले. त्याचे पहिले अध्यक्ष होण्याचा मानही अण्णासाहेबांनाच मिळाला.
1972 च्या निवडणुकीत ते चौथ्यांदा आमदार झाले. 1977 साली ते नव्यानेच रचना करण्यात आलेल्या खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. या शहराच्या सर्वांगिण विकासात अण्णासाहेब मगर यांचे योगदान बहुमोल आहे. पवना सहकारी बँकेची स्थापना असेल किंवा पीसीएमटीसारखी प्रवासी वाहतूक सेवा सुरू करणे असेल या प्रत्येकातून अण्णासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते.

 

 

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

पुढे रामकृष्ण मोरे आणि अजित पवार यांनी या शहराच्या विकासात अत्यंत मोलाचे योगदान दिले. देशातील अनेक बड्या कंपन्या येथे असल्याने ही उद्योगनगरी कायम फुललेली आहे. लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या पिंपरी-चिंचवड नगरीचा विकास लुभावणारा आहे. आपण विदेशात आलोय की काय असे वाटण्या इतपत अनेक भागाच्या सुधारणा झाल्या आहेत.
या महानगरपालिकेतील बराचसा भाग बारामती लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे तर भोसरी विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. या शहराने अनेकांच्या पोटाचा प्रश्न सोडवला. बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघावरही इथल्या श्रमिकांच्या भूमिकेचा वाटा मोठा ठरतो. तब्बल चार खासदारांच्या यश-अपयशात वाटेकरी ठरणार्‍या पिंपरी-चिंचवड भागातील श्रमिकांना आजच्या काळातही सन्मानाने आणि भयमुक्त जगता यावे, यासाठी अण्णासाहेब मगर यांच्यासारखे कार्यक्षम लोकप्रतिनिधी लाभोत, याच सदिच्छा!
घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 11 मे 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा