देशाचा कंठमणी

संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन ऐन भरात होतं. आचार्य अत्रे, सेनापती बापट यांनी मराठी माणसाच्या मनात स्फुल्लिंग चेतवलं होतं. अशावेळी यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्यानं मात्र ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असं म्हणत महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणार्‍यांना साथ दिली होती.

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

हे सगळं घडत असताना एक तोफ सभागृहात धडधडली. भाषावार प्रांतरचनेवरून ते नाराज होते. नरराक्षस मोरारजी देसाई यांच्या आदेशानं सरकारनं मुंबईत जो गोळीबार केला होता त्याच्या चौकशीला नकार देणं त्यांना लोकशाहीविरोधी कृत्य वाटत होतं. मुंबई केंद्रशासित करण्याच्या कल्पनेला प्रखर विरोध करत त्यांनी राजीनामा दिला. या धाडसी नेत्याचं नाव सी. डी. अर्थात चिंतामणराव देशमुख. सीडींनी राजीनामा देताच अत्रेंनी त्यांचा गौरव करणारा अग्रलेख लिहिला. त्याचं शीर्षक होतं, ‘चिंतामणी देशाचा कंठमणी झाला!’

एकदा एका ब्रिटिश उच्चायुक्ताशी त्यांचा परिचय करून देताना पंडित जवाहरलाल नेहरू देशमुखांविषयी म्हणाले होते, ‘इंडियाज मोस्ट चार्मिंग मिनिस्टर.’
नेहरूंनी त्यांची अशी दखल घेण्याच्या खूप आधी त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार देणारे होते, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्याचे झाले असे की वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी चिंतामण देशमुख ‘आयसीएस’ परीक्षेत देशात प्रथम आले. ते वर्ष होतं 1918. आयसीएस म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय प्रशासकीय सेवा. आजच्या भाषेत सांगायचं तर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी! या यशानंतर ते लोकमान्य टिळकांना भेटायला गेले आणि म्हणाले की, ‘सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मला देशसेवा करायची आहे.’
त्यावर टिळक म्हणाले, ‘तुमच्या हृदयातील देशसेवेची उर्मी अशीच उचंबळत ठेवा. ती जागी ठेवून सरकारी नोकरी करा. राज्यकारभाराचा तुमचा अनुभव देशासाठी फार उपयोगी पडेल. एक दिवस तुमची ही देशसेवेची उर्मी तुमच्या हातून मोठे कार्य घडवील.’
पुढे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आणि देशाचे अर्थमंत्रीही झाले. फक्त अर्थमंत्रीच झाले नाहीत तर संयुक्त महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी राजीनामाही दिला. 21 वर्षांची प्रशासकीय कारकिर्द गाजवणारे चिंतामणराव देशमुख 1931 साली महात्मा गांधींनी सहभाग नोंदवलेल्या गोलमेज परिषदेचे सचिव होते. त्यांच्या रूपाने रिझर्व्ह बँकेला पहिला भारतीय गव्हर्नर लाभला. इतकंच नाही तर भारताच्या पहिल्या नोटेवर सही करण्याचं भाग्य त्यांना लाभलं.

हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मौलाना अब्दुल कलाम आझाद हे त्यावेळी देशाचे शिक्षणमंत्री होते. देशमुखांच्या अर्थमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांनी सीडींना विद्यापीठ अनुदान आयोगावर येण्याची विनंती केली. ती त्यांनी स्वीकारली आणि सी. डी. देशमुख यूजीसीचे पहिले अध्यक्ष झाले. अर्थमंत्री असताना त्यांनी एलआयसीसारख्या संस्था उभारल्या.
सी. डी. देखमुख यांना मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी अशा आठ भाषा यायच्या. त्यामुळंच त्यांनी मेघदूतचं मराठी भाषांतर केलं होतं. राम गणेश गडकरी यांच्यासारख्या प्रतिभावंत नाटककारानं त्यांच्यावर कविता केली होती. आजच्या निवडणुकीचं आणि घसरत चाललेल्या राजकारणाचं स्वरूप पाहता अशा नेत्यांची आज मोठी उणीव भासते. ‘माय कोर्स ऑफ लाईफ’ हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालेलं असून त्यातून त्यांचा जीवनपट उलगडतो.
– घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 8 मे 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा