एक आदर्श सोसायटी म्हणून नावाजलेल्या आमच्या सोसायटीमध्ये काही चांगल्या प्रथा आम्ही सुरुवातीपासूनच अमलात आणल्या आहेत. त्यामध्ये श्री दत्त जयंती, श्री गणेशोत्सव, दहीहंडी, कोजागिरी पौर्णिमा, होळी पौर्णिमा वगैरे सण उत्सव आम्ही सार्वजनिकरित्या साजरे करतो. ज्यायोगे आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या परंपरांचा सार्थ अभिमान बाळगतो!
त्यातही दहावी बारावी मधील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गणेशोत्सवामध्ये, सोसायटीत ज्या मुलाला किंवा मुलीला सगळ्यात जास्त मार्क मिळाले आहेत त्याला किंवा तिला श्री गणेश चतुर्थी दिवशी श्रीगणेशाच्या पूजेचा मान दिला जातो आणि अशा अनोख्या पद्धतीने आम्ही सर्वजण त्या मुलाचे किंवा मुलीचे कौतुक करतो!
एकदा प्रथमच एक मुलगी सोसायटीमध्ये किंवा सोसायटीमधील मुला-मुलींमध्ये पहिली आली. अर्थातच त्यावर्षी गणेश पूजेचा मान तिला मिळायला हवा होता पण सोसायटीमध्ये सगळेच पुरोगामी विचारांचे होते असं नव्हतं. मग चर्चा सुरू झाली.\
“मुलींनी पूजा करावी का?”
“काय हरकत आहे” सदाभाऊ म्हणाले.
“पण रूढी परंपरा काय सांगतात?” नानांनी प्रश्न उपस्थित केला.
“काय सांगतात?” सदाभाऊनी विचारलं.
“बायकांनी किंवा मुलींनी पूजा करू नये असं कुठे लिहिलं आहे?”
असं विचारल्यावर नानांकडे उत्तर नव्हतं पण केवळ महिलांना विरोध करणं एवढंच त्यांना माहीत होतं!
माझ्या पाहण्यात एक कुटुंब आहे. ते गृहस्थ सत्त्याऐंशी वर्षांचे होऊन नुकतेच गेले. गेली पाच वर्षे ते वृद्धाश्रमात होते कारण त्यांना पॅरॅलिसिस झाला होता. नाहीतर त्यांना त्यांच्या मुलींनी वृद्धाश्रमात ठेवलंच नसतं. एवढं जीवापाड त्यांनी वडिलांना सांभाळलं होतं, अगदी मुलगा काय सांभाळेल इतकं! रोज त्या मुली वृद्धाश्रमात वडिलांना भेटायला जात होत्या, हवं नको पाहत होत्या! तरीही वडिलांना आयुष्यभर मुलगा नाही याची खंत राहिली! तसं ते इतकी सेवा करणाऱ्या त्या मुलींना वरचेवर बोलून दाखवत. मुलींची आई त्यांच्या न कळत्या वयात गेली. कॅन्सरसारख्या त्यावेळी असाध्य असलेल्या रोगाने त्यांचा बळी घेतला. आजच्या काळात कॅन्सर बरा होऊ शकतो. कॅन्सर बरा झाल्याची अनेक उदाहरणे आज आपण पाहतो पण चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. मुलींची पहिली आई गेल्यावर वडिलांनी दुसरं लग्न केलं पण तेही त्यांना लाभदायक ठरलं नाही. काही वर्षात दुसरी आईही गेली. “एक मुलगा असता तर बरं झालं असतं” असं म्हणणाऱ्या वडिलांची सेवा शुश्रूषा दोन्ही मुलींनी वडिलांच्या सत्त्याऐंशीव्या वर्षांपर्यंत केली. इतकंच काय वडील गेले तेव्हा याच दोन मुली वडिलांबरोबर त्यांचं शव घेऊन स्मशानभूमीत गेल्या आणि गुरुजी जेव्हा म्हणाले की, “वडिलांचा अंत्यविधी मुलीने केल्यास त्याचं पुण्य मोठं आहे, मुलीची तयारी असेल तर विचारा” तेव्हा मोठया मुलीने कुठलेही आढेवेढे न घेता वडिलांचा तो शेवटचा विधीही पार पाडला!
याउलट दुसरं एक कुटुंब मी असंही पाहिलं की, त्या दाम्पत्याला चार मुलेच होती. चारही मुले आपल्या पायावर उभी होती. आईवडील वय वर्षे पंच्याऐंशी आणि ब्यांणव तब्येत उत्तम असल्याने गावाकडे राहत. या वयापर्यंत त्यांनी मुलांकडून कोणतीही अपेक्षा केली नव्हती. अगदी आर्थिक सुद्धा! पण शेवटी वयानुसार आजारपण आलं. आता त्यांना शहरात घेऊन येऊन त्यांचा औषधोपचार करणं गरजेचं होतं. त्यावेळी प्रत्येक मुलगा दुसऱ्याकडे बोट दाखवू लागला.
“आईवडिलांनी माझ्यासाठी काय केलं?” असं प्रत्येकाला वाटत होतं. “त्यांनी कधी कुणाला प्रेम लावलंच नाही” असंही त्यांचं म्हणणं होतं.
लोकलाजेस्तव एक मुलगा त्यांना घेऊन आला तर बाकी तिघे त्यांना भेटायला देखील आले नाहीत. “तू आणलं आहेस, आता तुझं तू निस्तर!”
वर्ष सहामहिने ठेऊन घेऊन, जमेल तशी सेवा करून, इतर भावांचा काहीच सहभाग होत नाही हे ध्यानात आल्याने तोही एक दिवस त्यांना गावी सोडून आला! त्याला वाटत होतं की प्रत्येकाने तीन तीन महिने सांभाळले तरी आईवडील कायमचे मुलांकडे राहू शकले असते! पण तेवढीही इतर भावांची तयारी नव्हती!
ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. याचा अर्थ सगळीच मुले आईवडीलांशी वाईट वागतात असाही नाही पण स्त्री किंवा महिलाही आईवडिलांच्या सेवेमध्ये कमतरता भासू देत नाहीत. अगदी त्या लग्न होऊन ‘दुसऱ्या’ घरी गेल्या असल्या तरी!
खूपशी सुधारणा झाली असली तरी आणि सरकारने मुलींसाठी अनेक प्रकारच्या प्रोत्साहनपर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी आजही “एक तरी मुलगा हवा! वंशाला दिवा हवा!” म्हणून जीव पाखडणारी मंडळी आहेतच आणि या मानसिकतेचा फायदा घेऊन कायद्याने परवानगी नसतानाही ‘स्त्रीभ्रूण हत्या’ करणारी काही हॉस्पिटल्स, दवाखाने आहेत, ज्यांच्यावर कारवाई झालेली देखील आपण पाहिली आहे. मुलगा जन्माला येण्यासाठी तरी ‘स्त्री’ जगली पाहिजे कारण जन्म देण्याची शारीरिक क्षमता केवळ मुलीतच आहे हे देखील या नराधमांना कळलं नाही किंवा कळलं तरी वळलं नाही असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल!
सुशिक्षित समाजात ‘हुंडाबळी’सारख्या घटना अत्यल्प पाहायला मिळतात. त्यामुळे समाजजागृती हाच एकमेव पर्याय यावर आहे असे वाटते. स्त्री जर आज आपल्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे तर अशा अवास्तव अपेक्षा का ठेवाव्यात? कायद्यानेही हुंड्याला, हुंडा देण्याला आणि घेण्यालाही बंदी आहे. यावरही शिक्षणातून समाजजागृती हाच एकमेव पर्याय वाटतो.
‘निर्भया’सारख्या केसेसमुळे जगात भारताची प्रतिमा मलिन झाली. भारतात ‘वासनांध’ लोकच राहतात की काय? असे वाटावे इतपत या केसने समाज ढवळून निघाला. अतिशय निंदनीय अशी ही घटना घडली. वर्तमानपत्र उघडल्यावर अशी एखादी बातमी, घटना वाचून मन आजदेखील उद्विग्न होतं! अशा घटनांमध्ये नराधमांना अतिशय कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून कोणी नराधम अशा प्रकारचे धाडस करू धजणार नाही! त्याशिवाय सिनेमातून अशा प्रकारची स्त्री वर अत्याचार करणारी बीभत्स दृश्ये अतिरंजित करून दाखवण्यावर बंदी घालावी. पॉर्न फिल्म्सवर देखील बंदी आल्यास आशा घटनांना आळा बसेल, समाजमन चाळवणार नाही असे वाटते. सध्या ऑनलाइन शिक्षणाचा जमाना आहे. अगदी लहान मुलांपासून सर्वांच्या हातात मोबाईल, कॉम्प्युटर्स आले आहेत. त्यामुळे छोट्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. ‘मुले काही वावगे तर पाहत नाहीत ना?’ हे तापसण्याचीही गरज आहे.
सध्याचं स्त्री-पुरुष प्रमाण ज्याला लोकसंख्येच्या भाषेत लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो) म्हणतात ते जगात सर्वसाधारण पणे १:१ अपेक्षित असले तरी प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते. भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालाच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे. याचा ढोबळमानाने असा अर्थ निघतो की १००० पुरुषांच्या मागे ६० पुरुष अविवाहित राहतात. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात हा अविवाहित पुरुषांचा आकडा खूप मोठा असेल. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ही तफावत घातक आहे.
एकेकाळी महिलांनी घरातून बाहेर पडू नये, महिलांनी शिक्षण घेऊ नये, नवरा गेल्यानंतर महिलांनी सती जावं, त्यानंतरच्या काळात महिलांनी केशवपन करावं, पुनर्विवाह करू नये, पुरुषांसमोर बोलू नये अशाही परंपरा रूढ होत्या पण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी आण्णासाहेब कर्वे, महात्मा जोतिबा फुले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, समाजसुधारक आगरकर, लोकमान्य टिळक, महामानव बाबासाहेब आंबेडकर व समकालीन इतर समाज सुधारकांनी त्या त्या काळात या प्रथा परंपरा समाजाचा विरोध पत्करून बदलण्याचा प्रयत्न केला, काही प्रमाणात बदलल्या! त्यासाठी त्यांना मानहानी पत्करावी लागली, प्रसंगी स्वतःच्या घरावर नांगर फिरवायला लागला पण तत्कालीन धर्म मार्तंडांना त्यांनी योग्य मार्गावर आणलं. सुधारणा पटवून दिल्या, घडवून आणल्या!
याचा परिणाम म्हणून आज आपण स्त्री आणि पुरुष सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करतो. स्त्री-पुरुष यामध्ये समानता आहे, भेदभाव नाही. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सर्व क्षेत्रात सर्व स्तरावर कार्यरत आहेत. देशाचे राष्ट्रपती पद एका स्त्री ने भूषवलं. देशाचं पंतप्रधान पद एका स्त्रीने भूषवलं आहे. विविध कंपन्यांच्या सीईओ महिला आहेत. बँकांचे अध्यक्षपद महिलांनी भूषवले आहे. बँक मॅनेजर, अधिकारी, कारकूनपदी महिला आहेत. शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, पोलीस, तसेच संरक्षण खात्यात देखील महिला आहेत. कलेक्टर, तहसीलदार म्हणून ही महिला काम करतात. ड्रायव्हर महिला आहेत. अगदी पेट्रोल पंपावर देखील महिला काम करतात! उत्तम खेळाडू म्हणून पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी नाव मिळवलं आहे व देशाचं नावही मोठं केलं आहे. थोडक्यात असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्यामध्ये महिला नाहीत! महिला ज्याप्रमाणे घराची मॅनेजमेंट उत्तम सांभाळतात अगदी त्याचप्रमाणे कार्यालयात देखील त्या आपल्या कामाचा ठसा उमटवतात!
असं सगळं असताना महिलांच्या बाबतीत भेदभाव का?
“स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे” असं आचार्य प्र. के.अत्रे यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं. हे विधान भारतीय स्त्रियांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडणारं आहे. भारतीय महिला ही त्यागाची मूर्ती आहे. एक पुरुष शिकला तर तो स्वतः शिक्षित होतो पण एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित किंवा सुसंस्कारित करते!
“यत्र नार्यस्तू पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:” असा मनुस्मृतीमध्ये उल्लेख आहे. अर्थात जिथे नारीची पूजा होते, तिला सन्मानाने वागवलं जातं ते ठिकाण देवांनाही आवडतं!
स्त्री शक्तीला माझा सलाम!
————————^————————^—————-
जयंत कुलकर्णी
फ्लॅट नंबर ३, बिल्डिंग ४ बी, तपोवन सोसायटी, जिजाई गार्डन जवळ, तपोधम रोड, वारजे,
पुणे – ४११०५८
मोबाईल : ८३७८०३८२३२
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
जयंतराव,
खूप छान लिहिले आहे.
आपण मांडलेले मुद्दे, घटना समाजात सर्वत्र आहेत.
मुलगा जन्माला घालण्यासाठी तरी स्त्री जगली पाहिजे किंबहूना त्यासाठी तरी अगोदर मुलगी जन्माला घालावी लागेल.
अत्यंत मार्मिकपणे विवेचन केले आहे.
जयंतराव
,खुप बाेध घेण्यासारखा लेख.दरवेळीप्रमाणेच सुुंदर लेखन
अभिनंदन…..
अतिशय समर्पक आणि प्रभोदनात्मक लेख..
जयंतराव फार छान लेख. अगदी वास्तववादी चित्र उभे केले आहे.
अतिशय सुंदर, समर्पक लेख