शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास

Share this post on:

इ.स. सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत राजस्थानात (राजपुतान्यात) गुहिलोत (गहलोत) घराणे राज्य करीत होते.  या घराण्यात अत्यंत कर्तबगार व पराक्रमी राजे होऊन गेलेत.  पुढे या घराण्यात शिसोदिया व रावळ अशा दोन शाखा निर्माण झाल्या. बाप्पा रावळ हे प्रसिद्ध राजे ह्याच घराण्यात होऊन गेले.  पुढे दहा-बारा पिढ्या राजपुताण्यात यांनी सुखाने राज्य केले.

त्यानंतर पुढे रावळ घराण्यात लक्ष्मणसिंह नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याला एकूण आठ मुले होती परंतु त्याचे सात पुत्र युद्धात मारले गेले व एकच पुत्र वाचला. त्याचे नाव अजयसिंह असे होते. तोही अतिशय पराक्रमी निघाला. त्याला दोन मुले होती. थोरल्याचे नाव क्षमसिंह तर लहान्याचे नाव सज्जनसिंह होते मात्र वडिलांची गादी थोरला क्षमसिंहाकडे गेली.  लहान सज्जनसिंहाला वाटले आता आपण काय करावे? त्याने मात्र एक वेगळा मार्ग शोधला. तोही शूर व पराक्रमी होता.  आपण राजपुताण्याच्या बाहेर जाऊन दुसऱ्या एखाद्या प्रांतात आपल्या पराक्रमाला, शौर्याला काही वाव मिळतो का म्हणून पाहावे व तो जो काही प्रवास करत करत निघाला तर तो महाराष्ट्रात आला व त्याने मनात निश्चित ठरविले की आपण आपले नशीब महाराष्ट्रातच अजमावायचे. ‌‘माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असली की निश्चित मार्ग सापडतो’ आणि सुदैवाने सज्जनसिंह आपल्या पराक्रमाने यशस्वी होत गेला.

आत्ता या सज्जनसिंहाच्या पोटी दिलीपसिंह महाराणा, त्या दिलीपसिंह महाराणाच्या पोटी सिधोजी महाराणा व सिधोजी महाराणाच्या पोटी जो पुत्र जन्मास आला त्याचे नाव होते भैरोजी उर्फ भोसाजी महाराणा. ह्या भोसाजीच्या नावावरुनच पुढे या वंशाला ‌‘भोसले’ हे नाव पडले असावे असे इतिहासतज्ज्ञांना वाटते. (भोसाजी-भोसजी व पुढे त्याचे भोसले असे नामकरण झाले असावे.) पुढे यांच्या वंशात एकापेक्षा एक बलाढ्य, पराक्रमी व कर्तव्यदक्ष राजे होऊन गेलेत. बऱ्याच इतिहासकार व इतिहासतज्ज्ञांमध्ये ह्या ‌‘भोसले’ नाव पडण्यावरुन एकवाक्यता दिसते. भोसाजीनंतर पुढे ह्या घराण्यात बारा पराक्रमी राजे होऊन गेलेत ते असे.

1) देवराजजी  ​​2) उग्रसेन ​​3) शुभकृष्ण  ​4) रुपसिंह 5) भूपेंंद्रजी ​​6) धोपाजी ​​7) वरहतजी ​8) खेलोजी 9) परसोजी  ​​10) बाबाजी (वेरुळचे पाटील) ​11) मालोजी ​12) शहाजी.

अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची वंशावळ, प्रसिद्ध बखरकार ‌‘कृष्णाजी अनंत सभासद’ यांनी आपल्या ‌‘श्री शिवछत्रपतींचे चरित्र’ या पुस्तकातील परिशिष्टांमध्ये पहिल्याच परिशिष्टात ‌‘भोसले’ यांची वंशावळ दिली आहे व हीच वंशावळ डॉ. बाळकृष्ण मुजुमदार यांनीही ‌‘शिवाजी द ग्रेट’ या आपल्या इंग्रजी ग्रंथातही दिली आहे. ह्या वंशावळींना ‌‘राजस्थानी कागदपत्रांचा’ आधार आहे.

मालोजीराजे भोसले

आता मालोजीराजे भोसले यांच्यापासून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा उहापोह करणे उचित ठरेल. मालोजीराजे हे शिवाजी महाराजांचे आजोबा. मालोजीराजे यांचे भोसले घराणे वेरुळ गावात घृष्णेश्वर महादेव मंदिराजवळ (बारा ज्योतिर्लिंगापैकी एक) नांदत होते. हे दोन भाऊ होते. मोठे मालोजीराजे व लहान विठोजीराजे. दोन्ही अतिशय बलाढ्य, पराक्रमी होते. तलवार, घोडेस्वारी, दांडपट्टा, खडग, भाला चालविण्यात तरबेज. हे दोन्ही भाऊ शेती करत परंतु क्षत्रियांचे गुण जन्मतःच असल्यामुळे आपल्या छात्रधर्मास वाव मिळावा असे त्यांच्या मनात आले.

त्यावेळी सिंधखेड येथे लखुजीराजे जाधव नावाचे अतिशय पराक्रमी, तालेवार सरदार राहत असत. त्यांना म्हाळसाबाईराणी, गिरिजाराणी, यमुनाराणी आणि भागिरथीराणी अशा चार राण्या होत्या. म्हाळसाराणी या थोरल्या होत्या. त्या सुप्रसिद्ध अशा फलटणच्या निंबाळकर घराण्यातील बाजी घारराव नाईक यांच्या कन्या होत्या. त्यांना दत्ताजीराव, अचलोजी, बहादुरजी व राघोजी असे चार पुत्र आणि एक सुकुमार कन्या होती. तिचे नाव जिजाबाई असे होते. त्यावेळी लखुजीराजे प्रसिद्ध अशा निजामशहाचे प्रमुख सरदार म्हणून काम पाहत होते. ते पाच हजारी मनसबदार होते.

मालोजी व विठोजी हे दोन्ही भाऊ कामाच्या शोधार्थ सिंधखेड येथे लखुजीराजांकडे गेले व त्यांचे गुण पाहुन लखुजीराजांनी त्यांना आपले अंगरक्षक म्हणून ठेवून घेतले. आपल्या कर्तृत्वाने हळूहळू ते सैन्याच्या तुकडीचे प्रमुख झाले. पुढे यथावकाश ह्या दोन्ही बंधूचे विवाह झाले. मालोजींचा विवाह फलटणच्याच निंबाळकर घराण्यातील दुसरे मालोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या उमाबाई उर्फ दीपाबाई यांच्याशी झाला. उमाबाई ही अतिशय धार्मिक व सात्त्विक होती. पुढे विठोजीला एकूण आठ पुत्र झाले मात्र बरीच वर्षे लग्नाला होऊनही मालोजीला संतती होत नव्हती. म्हणून आता काय करावे? असा विचार त्यांच्या मनात येऊन ते दुःखी होत असत. त्यांची शंभूमहादेवांवर नितांत श्रद्धा होती.

अहिल्यानगरला (पूर्वीचे अहमदनगर) त्यावेळी एक प्रसिद्ध असा शहा-शरीफ नावाचा दर्गा होता. तो जागृत आणि नवसाला पावणारा दर्गा होता. त्या दांपत्यांनी दर्ग्याचे दर्शन घेऊन त्यास नवस केला आणि काय योग, उमाबाईसाहेबांना दिवस राहिले व त्यांच्यापोटी एक नररत्न जन्मास आले. विलक्षण तेजःपुंज पुत्र त्यांच्या पोटी जन्मास आला. नवसाला दर्गा पावल्यामुळे त्या पुत्राचे नाव शहाजी असे ठेवले व नंतर दोन वर्षांनी जो दुसरा पुत्र जन्मास आला त्याचे नाव शरीफ असे ठेवले. शहाजी आणि शरीफजी दोन्ही मुले सूर्य-चंद्रासारखी वाढू लागली. शहाजीराजांची जन्मतिथी निश्चित अशी इतिहासाला माहीत नाही कारण त्या काळात आक्रमकांनी सर्व कागदपत्रे जाळून टाकली होती. आक्रमक आपल्या घोड्यांना भूर्जपत्रे खाऊ घालत व काही सरंजाम वतनदार तर आपल्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे स्नानाचे पाणी तापविण्यासाठी उपयोगात आणीत परंतु तरी सुद्धा अनेक इतिहासतज्ज्ञांनी त्यांचा जन्म इ.स. 1594 ते इ.स. 1600 पर्यंत वेगवेगळ्या सालात बसविलेला आहे कारण आमचा इतिहास आक्रमकांनी, शत्रुंनी जाळून टाकला आहे.

मात्र शहाजीराजे पाच वर्षांचे असताना अचानक निजामशहाकडून मालोजीराजांना तातडीचे बोलावणे आले की ‌‘इंदापूरच्या मोहिमेवर जावयाचे आहे’. हातातील घास टाकून मालोजीराजे युद्धास गेले आणि गेले ते गेलेच; परत येऊ शकले नाहीत. इंदापूरच्या लढाईत ते 1605 साली मारले गेले.  उमाबाई सती जाण्यास निघाल्या  परंतु दिर विठोजीराजेंनी वहिणीसाहेबांना विनंती केली की, ‌‘थोरला पुत्र पाच वर्षाचा व लहान तीन वर्षाचा, पिता तर गेलेत परंतु मायेचे त्यांना आता तुम्हीच आहात. ह्या तेजस्वी, गुणी मुलांवर तुमच्याइतकी मायेची पाखर कोण घालू शकेल? त्यांच्यासाठी तरी आपण सती जाऊ नका!’ आणि दिराच्या विनंतीवरुन त्या सती गेल्या नाहीत!

मालोजीराजेंच्या घराण्याचे कुलदैवत शनीशिंगणापूर जवळचा शंभू महादेव आहे. हे देवस्थान एका डोंगरावर आहे. तेथे पाणी नव्हते. दरवर्षी लाखो भाविक दर्शनास येत, तसेच संत, योगीही येत. त्यांच्यासाठी मालोजीराजांनी एक मोठा तलाव बांधला.  तसेच घृष्णेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचा जिर्णोद्धार केला.  त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मालपुरा, परसपुरा, विठुपुरा व खेलपुरा असे चार पुरे वसविले. ह्या सामाजिक कार्यामुळे त्यांची खूप कीर्ती वाढली होती.

शहाजीराजे ः शहाजीराजे लहाणपणापासून अतिशय हुशार होते तसेच देखणेही होते. एकदा मालोजीराजे रंगपंचमीच्या सणासाठी सिंधखेड येथे गेले होते. बरोबर लहान शहाजी पण होते. लखुजीराजांच्या एका मांडीवर शहाजी व एका मांडीवर जिजाबाई बसले होते.  तेव्हा तेथे असलेले सर्व सरदार व सहकारी म्हणाले, ‌‘आहा हा! जोडा काय सुंदर शोभतो! यांचा विवाह झाला तर जोडपे शोभून दिसेल,’ असा बखरीत उल्लेख आहे.

शहाजीराजे-जिजाबाई विवाह (डिसेंबर, 1605) ः पुढे शहाजीराजांचा पराक्रम, कीर्ती निजामशहा, आदिलशहा यांच्या कानावर पडू लागली. साहजिकच लखुजीराजांच्या कानावर जातच होती. त्यांना मनोमन वाटू लागले की, शहाजीसारखा जावई असावाच असावा! आणि शहाजीस त्यांनी जावई करुन घेतले. विवाहसमयी शहाजीराजे अंदाजे दहा-बारा वर्षांचे आणि जिजाबाई सहा-सात वर्षांच्या असाव्यात. त्याकाळी बालवयातच लग्न होत. लखुजीराजे त्यावेळी निजामशहाचे प्रमुख सरदार होते.  त्यांनी शहाजी व आपली एकुलती एक कन्या जिजाबाई यांचा विवाह दौलताबाद येथे मोठ्या थाटामाटात केला. त्यावेळी दौलताबाद निजामांच्या राजधानीचे शहर होते.

शहाजीराजांच्या विवाहानंतर त्यांचे काका विठोजीराजे एक वर्षातच वारले. शहाजीराजांना पुणे-सुपे-इंदापूर आणि चाकणची जहागिरी वारसाहक्काने मिळाली होती.  पुढे शहाजीराजे पहिल्यांदा मोगलांच्या सेवेत गेले. तेथून आदिलशहाच्या सेवेत व त्यानंतर निजामशहाच्या सेवेमध्ये आले होते. त्यावेळी निजामशहाचा वजीर मलिक अंबर होता.

खंडागळे हत्ती प्रकरण ः एके दिवशी निजामशाही दरबारात मोगल आणि आदिलशाहीच्या संभाव्य हल्ल्याची रणनीती ठरविण्यासाठी दरबार भरला होता. मोगल व आदिलशहा यांच्यात ह्या हल्ल्याविषयी समझोता झाला होता. त्यामुळे दरबारात सर्वच सरदार जातीने हजर होते. ह्या दोघांच्या हल्ल्याविषयी बरीच उलटसुलट चर्चा होऊनही निर्णय न होताच दरबार संपला परंतु सर्व सरदार जमले असल्यामुळे प्रत्येक सरदाराचा त्या दिवशी बडेजाव, रुबाब वेगळाच होता. घरी परतण्यासाठी सरदारांची एकच लगबग सुरु झाली. कोणी सेवक, घोडे, पालख्या, कोणी हत्ती आपापल्या सरदारांजवळ आणीत होते. रस्त्यावर नोकर, भालदार, शिबंदी यांची गर्दी वाढतच होती. त्यामुळे रेटारेटी, धक्काबुक्की होत राहिल्यामुळे एकच गोंधळ व कल्लोळ उडाला.

आणि ह्या सर्व गोंधळामुळे खंडागळे सरदारांचा हत्ती बिथरला व तो मोठ्याने चित्कारत समोर येईल त्याला तुडवत व सोंडेने उचलून फेकू लागला. हत्तीचे ते हिंसक, रौद्र रुप पाहुन जो तो सैरावैरा पळू लागला. त्यातच हत्तीने लखुजी जाधव यांच्या काही सैन्यास तुडविले आणि हे त्यांचा पुत्र दत्ताजीरावाने पाहिल्यावर तो चिडला व त्या हत्तीवर त्याने तलवारीने हल्ला करण्यास सुरुवात केली. हे पाहुन शहाजीराजांचे दोघे चुलत भाऊ खेलोजी भोसले व संभाजी भोसले हेही पुढे येऊन ‌‘हत्तीला मारु नका, मारु नका’ असे दत्ताजीस सांगू लागले परंतु दत्ताजीने न ऐकता हत्तीची सोंड तलवारीने उडवली. चीऽऽचीऽऽ करीत हत्ती खाली कोसळला व तो मारला गेला. खंडागळे व जाधवांचे त्यावेळी सख्य होते. हत्ती मारला गेल्यामुळे हे दोन्ही भोसले बंधुंपैकी एक संभाजी, दत्ताजीशी भिडले. नातं-गोतं विसरुन एकमेकांवर हत्यार चालवू लागले. एक जिजाऊसाहेबांचा सख्खा भाऊ व दुसरा सख्खा चुलत दिर! काय म्हणावे ह्या नादानपणाला! आपण कोणासाठी व कशासाठी एकमेकांत लढत आहोत याचेही भान दोघांना उरले नाही. एकमेकांचे सैनिकही धावले व भयंकर लढाई पेटली. आपल्या सख्ख्या चुलत भावावर आपला सख्खा मेहुणा (शालक) तुटून पडलेला पाहून शहाजीराजे देखील सामील झाले व अकस्मात संभाजीच्या तलवारीचा एक घाव दत्ताजीवर बसला नि दत्ताजी धरणीवर कोसळला व गतप्राण झाला.  क्षणात होत्याचे नव्हते होऊन गेले. दत्ताजी ठार झाल्याची खबर बऱ्याच पुढे निघून गेलेले त्याचे पिता लखुजी जाधवांना कोण्या सैनिकाने जाऊन सांगितली. त्यांच्या मनात संताप, क्रोध दाटला व ते बेभान होऊन घटनास्थळी पोहोचले. समोर त्यांना दिसले ते प्रत्यक्ष आपले जावई शहाजीराजे! संतापाच्या भरात त्यांनी शहाजीराजांवरच तलवारीचा घाव केला. तो घाव त्यांच्या दंडावर बसला परंतु ते क्षणार्धात बेशुद्ध पडले. त्याचवेळी लखुजी जाधवांना संभाजीराजे समोर दिसले व त्यांना पाहताच चवताळून गेलेल्या लखुजीराजांनी आपल्या तलवारीने संभाजीराजांचा वेध घेतला व संभाजीराजे गतप्राण झाले. थोड्याच अंतराने दोन तरुण हकनाक जीवास मुकले. दोघेही सख्खे सोयरे!

झाल्या प्रकाराची खबर निजामशहा व त्याचा वजीर मलिक अंबर यांना कळाली. त्यांनी ह्या भांडणाचा ठपका लखुजीराजांवर ठेवला. त्यामुळे लखुजीराजे निराश व दुःखी झाले.  ह्या घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती जिजाऊसाहेबांना समजली. त्या तर ही वार्ता ऐकून जागच्याजागी गोठल्या, सुन्न झाल्या. एक सख्खा मोठा भाऊ व दुसरा सख्खा चुलत दिर! आणि अजून दुसरे दुःख म्हणजे पती शहाजीराजांना जपायचे की पित्याला जपायचे! आयुष्यभर जिजाऊसाहेबांवर अशीच संकटे येत गेली.

लखुजीराजे व त्यांच्या कुटुंबियांची निर्घृण हत्या ः एके दिवशी मुर्तजा निजामशहाच्या उपस्थितीत लखुजीराजांना खिलत देण्याचा कार्यक्रम दरबारात ठेवलेला होता. त्यासाठी लखुजीराजे, त्यांचे दोन पुत्र अचलोजीराजे व राघोजीराजे तसेच नातु यशवंतराव (दत्ताजीराजेंचा पुत्र) दरबाराकडे निघाले.  राजवाड्याजवळ येताच पहारेकऱ्यांनी त्यांना रोखले व हत्यारे दरबारात घेऊन न जाण्याविषयी बजावले. त्यांच्याजवळ फक्त कट्यारी राहू दिल्या. लखुजीराजे मुर्तजा निजामशहासमोर दरबारात गेले. तो तोऱ्यातच होता. पुढच्याच क्षणी तो सिंहासनावरुन उठला नि अंतःपुराकडे निघून गेला. त्याचक्षणी त्याचे सरदार फरहादखान, सफदरखान आणि मोतीखान हे सैनिकांसह तेथे पोहोचले. हे निजामशहाचेच पूर्वनियोजित कटकारस्थान होते आणि अचानक त्या तिन्ही सरदारांनी तलवारी व खडग्याने लखुजीराजे, त्याचे दोन पुत्र व नातु अशा चौघांवर जबरदस्त हल्ला करुन चारही जणांना कंठस्नान घातले. केवढे हे क्रौर्य व कपटनीती. ही वार्ता लगेच लखुजीराजांच्या गढीवर गेली. काय अवस्था झाली असेल उरलेल्या कुटुंबांची! परंतु दुःख व शोक करायलाही वेळ नव्हता!

तिकडे जिजाऊसाहेबांना ही संपूर्ण घटना कळाली तेव्हा त्यांना तीव्र वेदना झाल्या! त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला! केवढा मोठा घात! त्यांच्या स्त्रीहृदयाला पिळ पडला! शहाजीराजांनाही काय वाटले असेल? जरी सासऱ्यांशी दुर्दैवाने भांडण झाले होते परंतु शेवटी निकटचे व जीवाभावाचे घरातील नाते होते! तीनशे-साडे तीनशे वर्षांपासून ह्या यवनांचा असाच अत्याचार चालू होता. जिजाबाईसाहेबांच्या मनात चीड निर्माण होत होती. स्वराज्याचे स्वप्न जागृत होत होते! पुढे स्वातंत्र्याचा उषःकाल दिसत होता.

भातवडीची लढाई (इ.स.1624) ः

अहिल्यानगरजवळच्या भातवडीच्या युद्धाचे शहाजी महाराजांच्या जीवनात खूप महत्त्व आहे कारण ह्या युद्धात शहाजी महाराजांनी जो पराक्रम केला होता त्यामुळेच निजामशहाला मोठा विजय मिळाला होता व त्यांची सर्वत्र कीर्ती पसरली होती.  ही लढाई एका बाजूस निजामशहाचा वजीर मलिक अंबर आणि मुख्य सरदार शहाजीराजे व त्या दोघांच्या हाताखालील सैन्य आणि दुसऱ्या बाजुस आदिलशहा आणि मोगल हे एकत्र येऊन त्यांचे सरदार व सैन्य यांच्यात भातवडी येथे झाली.  या लढाईचे मुख्य कारण म्हणजे निजामशाही व आदिलशाही यांच्यातील पराकोटीची स्पर्धा आणि मोगलांची दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा हे होते. यावेळी निजामशहा व आदिलशहा यांच्यात विस्तवही जात नव्हता एवढे त्यांच्यात वितुष्ट आले होते व आदिलशहा दुसरा इब्राहिम याने असा विचार केला की आपल्याला मोगलांची मदत घेतल्याशिवाय हे युद्ध जिंकता येणार नाही म्हणून ते एकत्र आले होते.

ह्या युद्धाचीही नेमकी तिथी इतिहासाला माहीत नाही परंतु शके 1546, इ.स.1624च्या ऑक्टोबरपूर्वी झाली असावी अशी मराठी व फारशी ग्रंथामध्ये नोंद आढळते. ह्या युद्धात शहाजीराजांनी भातवडीच्या वर जवळच असलेल्या तलावाचे पाणी फोडून शत्रूसैन्यास हैराण करुन मोठ्या युक्तीने शत्रूस जेरीस आणून निजामशहास मोठा विजय मिळवून दिला मात्र त्यांचे लहान बंधू शरीफजी ह्या युद्धात धारातिर्थी पडले.  शहाजीराजांचे वर्चस्व वाढेल म्हणून वजीर मलिक अंबरने निजामशहाजवळ शहाजीराजांचा पराक्रम वर्णन न करता त्यांच्या चुलतभावाचे नाव सांगितले व बादशहानेही अंबरचे ऐकून त्या चुलत भावाचाच गौरव केला. शहाजीराजे खूप नाराज झाले.  पुढे आदिलशहाने शहाजीराजांना बरीच प्रलोभने दाखविली व ते त्यांच्याकडे गेले. त्याने त्यांना बढती देऊन ‌‘सरलष्कर’ केले मात्र थोड्याच दिवसात 1627 मध्ये दुसरा इब्राहिम मरण पावला.  त्याच्यानंतर त्याचा मुलगा अली आदिलशहा विजापुरचा बादशहा झाला. तो हिंदूंचा फारच द्वेष करीत असे. वडिलांप्रमाणे त्याच्याजवळ सहिष्णूता नव्हती. त्यामुळे येथेही आपल्या पराक्रमाचे चीज होणार नाही, निजामशाहीचा वजीर जो शहाजीराजांच्या विरोधातच वागत होता. तो मलिक अंबरही मृत्यू पावला होता.  त्यामुळे शहाजीराजे पुन्हा इ.स.1628 मध्ये निजामशाहीत आले.

मोगलांच्या दिल्ली तख्तावर आता शहाजहान बादशहा झाला होता. भातवडीच्या युद्धातील पराभव मोगल विसरले नव्हते म्हणून त्यांनी बदला घेण्यासाठी पुन्हा निजामशाहीशी युद्ध केले. यावेळी निजामशाही जवळजवळ मोडकळीस आलेली होती परंतु शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न केला. ह्याही वेळी मोगल व आदिलशहा एकत्र आले होते. तरी सुद्धा शहाजीराजांनी निजामशाही वंशातील एक लहान मुलगा मुर्तजा याला हाताशी धरुन निजामशाही वाचविण्यासाठी ह्या वारसदाराला अहिल्यानगर जिल्ह्यातील पेमगिरीच्या किल्ल्यावर राज्यारोहन करुन बादशहा केले. दोन्हीही शत्रू पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरले आहेत हे शहाजीराजांना कळून चुकल्यामुळे हा वारसदार सुरक्षित राहू शकत नाही म्हणून त्यांनी त्यास कोकणातील माहुली किल्ल्यावर आणले. हे कळल्यावर

दोन्ही शत्रूंनी संयुक्तपणे माहुली किल्ल्यास वेढा दिला व शहाजीराजांनी शेवटी त्यांच्याशी तह केला आणि इ.स.1636 मध्ये निजामशाही बुडाली.

तह पुढीप्रमाणे –

1) ​निजामशाही वारसाला शहाजीराजांनी मोगलांच्या स्वाधिन करावे.

2)​शहाजीराजांनी विजापूरकरांच्या नोकरीत जावे.

3)​मोगलांनी शहाजीराजांना आपल्या नोकरीत घेऊ नये.

4)​कोकणातील कल्याण-भिवंडी पर्यंतचा प्रदेश आदिलशहाच्या ताब्यात राहावा आणि त्याच्या उत्तरेकडील प्रदेशांवर मोगलांनी आपली सत्ता चालवावी, असा उभयतांमध्ये तह झाला. तहानंतर शहाजीराजे आदिलशहाकडे आले. त्यांना आदिलशहाने पंधरा हजारी मनसबदारी देऊन त्यांचा उचित मान ठेवला. शहाजीराजांचा उत्तर आयुष्यातील पंधरा वर्षांचा हा काळ बंगलोरमध्ये एखाद्या फर्जंदासारखा (राजपुत्र) गेला.  त्यांना ‌‘फर्जंद’ ही पदवीच दिली होती. पुढे शहाजीराजांच्या जीवनावर ‌‘जयराम पिंड्ये’ नावाचा बारा भाषांचा जाणकार कवी यांनी संस्कृत भाषेत ‌‘राधामाधव विलास चंपू’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात शहाजीराजांची थोरवी गाताना ते म्हणतात –

“जगदिश विरंचिकू पुछत है, कहो शिष्टी रची रखे कोन कहाँ?

कर जेरि कही जयराम विरंच्ये, तिरिलोक जहाँ के तहा ॥

ससि वो रवि पूरब पश्चिम लों, तुम सोय रहो सिरसिंधु महा |

अरु उत्तर दछन रछन को इत साहजु है, उत साहिज हाँ॥”

अर्थ – परमेश्वर ब्रह्मदेवाला विचारतात की, तू सृष्टी रचिलीस तिची राखण करण्यासाठी कोणास कोठे ठेविले ते सांग! तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की, पूर्वेचा रक्षण रवी (सूर्य) व पश्चिमेचा रक्षक चंद्र केला आहे. तसेच उत्तर दिशेचा लोकपाल शहाजहान पातशहा केला आहे व दक्षिण देशाचा रक्षक शहाजीराजांना केले आहे.

हा उतारा रमेश शिंदे लिखित ‘चपराक प्रकाशन’च्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र’ या पुस्तकातून घेतला आहे.

जगभरातील मराठी वाचकांसाठी अमेझॉन किंडलवर इ बुक उपलब्ध.

लिंक :

घरपोच मागण्यासाठी

लिंक : https://shop.chaprak.com/product/shri-chhatrapati-shivaji-maharaj-charitra/

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

10 Comments

  1. लेखक श्री रमेश शिंदे यांची लेखनशैली ओघवती, उत्कंठावर्धक आहे. या एकाच लेखातून पूर्ण पुस्तक वाचण्याची जिज्ञासा निर्माण झाली.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!