स्त्री लिखित आत्मचरित्रांचा प्रवास

Share this post on:

म. ज्योतिबा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. एक ऐतिहासिक घटना म्हणूनच याचं वर्णन करावं लागेल कारण स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती न समजण्याचा तो काळ. त्यामुळे तिचं जगणं, समस्या, तिचे विचार, तिची मतं याविषयी जाणून घेण्याची ना कुणाला उत्सुकता होती, ना माध्यम! शिक्षणाच्या निमित्तानं तिच्या बंद जगाची दारं किलकिली झाली. 1916 मध्ये महर्षी कर्वेनी स्वतंत्र स्त्री विद्यापीठाची स्थापना केली आणि तिचं क्षितीज विस्तारू लागलं.
स्त्री-पुरुष असमानतेच्या काळात एक व्यक्ती म्हणून तिला वास्तवाचं भान येत गेलं. बाहेरच्या परिघातल्या घटनांचे पडसाद माजघरात उमटू लागले. त्यांचा वेध घेताना त्यांचे अनेक कंगोरे तिला टोचू लागले आणि मनाच्या अंतरंगात उठणारे वादळ कागदावर उतरू लागले. 1850 ते 1950 या शतकात अनेक स्त्रिया स्वत:बद्दल लिहू लागल्या. त्या काळातले स्त्रीचे सामाजिक स्थान, कौटुंबीक जीवनातील सहभाग आणि तिनं अनुभवलेले जग, याचा ढोबळमानानं घेतलेला वेध दिसून येतो. महत्त्वाचे प्रसंग, व्यक्ती, तर कधी सहजीवनाची वर्णनं या आत्मचरित्रातून दिसून येतात.
‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या सुविद्य पत्नी रमाबाई रानडे यांचं आत्मचरित्र मराठीतलं आधुनिक काळातलं पहिलं स्त्री लिखित आत्मचरित्र मानलं जातं. ते वर्ष होतं 1910. त्या नंतर 1950 हा टप्पा मानला तर साधारण 15 स्त्रियांनी आत्मचरित्रं लिहिली. लेखनशैली किंवा वा़ङ्मयीन मूल्य या पेक्षा त्याकडे ऐतिहासिक, सामाजिक दस्तावेज म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. आपली कोंडी, घुसमट याबद्दल सुरुवातीच्या काळात काहीशा दडपणाखाली लिहिणार्‍या स्त्रिया हळूहळू धीट होत गेल्या. बदलत्या समाजकारणामुळे त्यांच्या जगण्यात जो मोकळेपणा येऊ लागला तो लिखाणातून प्रतिबिंबित झाला.
1950-75 या काळातल्या आत्मचरित्रात काही नवीन क्षेत्रात स्त्रीचा प्रवेश, मिळवलेलं यश आणि त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास बघायला मिळतो. तरीही सहजीवन, संसारचित्र यावर जास्त भर आहेच मात्र कला, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अशा नानाविध क्षेत्रात स्त्रियांचा वाढलेला सहभाग कळण्यासाठी ही आत्मचरित्रं महत्त्वाची आहेत. 1975 नंतर मात्र स्त्रियांच्या आत्मचरित्रात लक्षणीय फरक पडत गेला. आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा स्वत:च मांडलेला लेखाजोखा, हे लक्षात घेऊन जीवनातील सुसंवादाबरोबरच स्पष्ट विसंवाद, चुका, काही अस्पर्श विषय यावर निर्भीडपणे लिहिण्याचं धाडस काही आत्मचरित्रात दिसून येतं. थोडक्यात 1910 पासून आजपर्यंत स्त्रियांचा संघर्ष, सामाजिक, वैयक्तिक अनुभव आणि भावनिक उलथापालथ यात कालानुरूप बदललेल्या गोष्टींचा इतिहास बर्‍याच अंशी या प्रवासात बघायला मिळतो.
सुरुवातीला पांढरपेशा मध्यमवर्गीय समाजातील स्त्रियाच आत्मकथनं लिहीत होत्या. त्यात बदल होत गेल्या 100 वर्षात दलित, वंचित, भटक्या जमातीतील, कष्टकरी, पिडीत, समलैंगिक, बारमध्ये नृत्य करणार्‍या अशा विविध क्षेत्रात, सामाजिक चळवळीत, पोलीस खात्यात काम करणार्‍याही लिहित्या झालेल्या दिसतात. अभिनेत्री, गायिका, नृत्यांगना, चित्रकार, प्रसिद्ध व्यक्तिंच्या पत्नी अशा जवळपास 200 पेक्षा जास्त स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रं प्रकाशित झालेली आहेत.
मराठी वाङ्मयकोशातील व्याख्येनुसार आत्मचरित्र या साहित्यप्रकारात लेखक आपल्या गतजीवनाबद्दल निवेदन करतो. मूल्यगर्भ दृष्टीने घेतलेला आत्मशोध ही आत्मचरित्राची मूलभूत गरज असते. वर्तमानकाळाच्या विशिष्ट टप्प्यावरून भूतकाळाचा वेध घेत जीवनकथेची रचना करणे, स्वजीवनविषयक विशिष्ट भूमिकेतून घटना प्रसंग इत्यादी घटितांची निवड करणे, स्वजीवनाशी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे निगडित असलेल्या व्यक्तिंचे चित्रण करणे आणि अर्थातच गतजीवनाचे निवेदन करणे हे आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या संकेतव्यूहामधील महत्त्वाचे घटक आहेत.
बर्‍याच स्त्रियांची आत्मकथने या कसोटीवर उतरणारी नाहीत. ‘मान सांगावा जनात, अपमान ठेवावा मनात’ या विचारानं किंवा घरातल्यांची निंदा कशी करायची? किंवा आपली मुलंबाळं वाचतील त्यांना काय वाटेल? किंवा लैंगिक गोष्टींचा संकोच अशा निरनिराळ्या कारणांनी आपल्या गतआयुष्यातल्या निवडक, चाळणी लावलेल्या प्रसंगांचं लेखन केलेलं दिसतं. काहींनी आयुष्यातल्या एखाद्याच भागावर लक्ष केंद्रित करून लिहिलंय.
आपल्या आजारपणावर पद्मजा फाटक यांचं ‘हसरी किडनी’, नीता गद्रे यांचं ‘एका श्वासाचं अंतर’, पतीला आपल्या यकृताचा काही भाग दान करणार्‍या कल्पना जावडेकर यांचं ‘रुपेरी किनार’, पोलीस खात्यातल्या अनुभवांवरचं कुसुम देव यांचं ‘ड्यूटी फर्स्ट’ किरण बेदी ‘आय डेयर’, मीरा बोरवणकर यांचं ‘माझ्या आयुष्याची पानं’, वास्तूशी निगडित आठवणी ज्योती सोमण यांचं ‘क्वेटा टेरेस’, ज्योतिष क्षेत्रातल्या आठवणी, वसुधा वाघ यांचं ‘सारीपाट’, सेन्सॉर विभागात काम करतानाचे अनुभव, अपर्णा मोहिले यांचं ‘सेन्सॉर, जीवनसार आणि मी’, नाट्य-चित्रपट क्षेत्रातले अनुभव सोनाली कुलकर्णी ‘सो कूल’, अमृता सुभाष ‘एक उलट, एक सुलट’, आकाशवाणीच्या नोकरीतले अनुभव लीलावती भागवत यांचं ‘वाट वळणावळणाची’, तुरुंगातील आठवणी सरोजिनी देशपांडे ‘कालपक्ष’, संस्थात्मक कार्याची ओळख करून देणारं अचला जोशी यांचं ‘आश्रम नावाचं घर’ या त्यांच्या आयुष्यातल्याच आठवणी असल्या, त्या केंद्रबिंदू भोवती फिरणारे अनुभव असले तरी त्यात कुटुंबीय आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तिंचे उल्लेख असतातच! तरीही या लेखनाला संपूर्णपणे आत्मचरित्र म्हणता येत नाही.
कदाचित त्यांच्या आयुष्यात त्यांना हेच अनुभव सर्वात महत्त्वाचे, सांगायलाच हवेत असे वाटतात. तुलनेनं बाकी कमी महत्त्वाचं वाटत असावं किंवा सांगण्याची उर्मी तर आहे, तिला वाट करून देताना आपला खाजगीपणा जपत एवढंच सांगण्याची मर्यादा घालून घेतलेली असावी. तरीही हे मर्यादित अनुभव सुद्धा पुष्कळ काही सांगून जातात.
बदलत्या काळाचे संदर्भ, रूढी-परंपरांचा जाच, व्यक्त करण्याची भाषा, दोन वाक्यांमध्ये लपलेले अर्थ, (उदा. क्वेटा टेरेसमध्ये ज्योती सोमण यांचं एक वाक्य आहे, या सर्व काळात धुणं धुवायच्या मोरीतला तो धुणं धुवायचा दगड मी आजही विसरू शकत नाही कारण तो माझा जीवाभावाचा पाषाणमित्र होता.) स्त्रियांचे स्वत:विषयीचे तसंच समाजाविषयीचे आकलन यातून कळत-नकळत व्यक्त होतं.
आत्मचरित्र हा स्त्री मनाचा जणू आरसा! स्त्रीची अनेक रूपं, मुलगी-पत्नी-सून-आई-सासू या सार्‍या नात्यातले गुंते या लेखनातून मांडले गेलेत. अगदी सुरुवातीच्या काळातल्या आत्मचरित्रातून सर्वात जास्त मांडले गेलेत ते प्रापंचिक अनुभव. त्या काळात बायका शिकल्या त्या मुख्यत्वे त्यांच्या पतीनं शिकवलं म्हणून! पण हे पती लोक आपल्या बायकोला शिकवण्यात पुरोगामित्व दाखवत असले तरी बायकोवर चिडणं, प्रसंगी तिच्यावर हात उगारणं असा नवरेपणाचा हक्क बजावायला मागेपुढे बघत नसत.
लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’ मध्ये त्यांनी एक प्रसंग लिहिला आहे, टिळकांनी व्याकरणाचे मोठे ग्रंथ आपल्या 6/7 वर्षांच्या बायकोपुढे ठेवत विचारलं, ‘‘शब्द म्हणजे काय?’’ लहानग्या लक्ष्मीला हसू आलं. ती म्हणाली, ‘‘शब्द म्हणजे शब्द.’’ तिला हसताना बघून टिळक इतके चिडले की त्या संतापाच्या भरात त्यांनी पुस्तकं फाडून टाकली आणि त्या ढिगार्‍याला काडी लावली.
काशीबाई कानिटकर या मराठीतल्या आद्य कादंबरीकार. 1903 मध्ये त्यांची ‘रंगराव’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. काशी लहानपणी दांडगोबा असल्यानं तिला शाळेत पाठवलं नव्हतं. खरंतर तिच्या आईला लिहिता वाचता येत असलं तरी तिनं काशीला शाळेत घातलं नव्हतं. लग्नानंतर त्यांनी त्यांच्या पतींना एका स्नेह्याशी बोलताना ऐकलं की, ‘या शिकल्या तर आमचा संसार नीट होईल. नाहीतर कठीण आहे.’ या वाक्यानं त्यांच्यात शिक्षणाची प्रेरणा निर्माण केली.
त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनीही एक प्रसंग लिहिला आहे. तिकडची शिकवण्याची पद्धत म्हणजे एखादे मोठेसे पुस्तक आपण वाचत असायचे, जो भाग आवडला असेल तो मला वाच म्हणायचे. तो मला वाचता आला नाही की संतापून पुस्तक परत घ्यायचे व दगडास काय बोध होणार? असं म्हणून आपल्या कामास निघून जायचे.
स्त्री जशी शिकली, वेगवेगळ्या क्षेत्रात तिचा वावर सुरु झाला तसे तिचे अनुभवविश्व विस्तारत गेलं आणि मग ते ते विषय आत्मचरित्रात येत गेले. चित्रपटसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींनी आत्मचरित्रं लिहिली. 1940 च्या दशकातल्या लोकप्रिय अभिनेत्री लीला चिटणीस यांनी काळाची पावलं ओळखून चरित्र भूमिका साकारायला सुरुवात केली आणि त्यामुळे 50 वर्षांहून अधिक काळ त्या या क्षेत्रात पाय रोवून उभ्या होत्या. त्यांचं ‘चंदेरी दुनियेत’ हे आत्मचरित्र एका दीर्घ काळाचा चित्रपट सृष्टीचा प्रवास दाखवतं.
याच काळात याच क्षेत्रात कार्यरत अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान. अतिशय लोकप्रिय अभिनेत्री, शिवाय अत्यंत बंडखोर. त्यांच्या ‘स्नेहांकिता’ या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या पतीला घटस्फोट मागितल्याची माहिती मिळते. घटस्फोट हाच खळबळजनक वाटण्याच्या काळात आणि जणू काही फक्त पुरुषाला बायको नको वाटू शकते असे मानण्याच्या काळात एका स्त्रीनं संसार मोडण्याची मागणी करणं काळाच्या पुढचं म्हटलं पाहिजे.
मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ मिळण्याची किमया पहिल्यांदा घडली ती ‘श्यामची आई’ या चित्रपटाला. त्यातली आई म्हणजे वनमाला. देखणी, शिक्षित, उच्चभ्रू समाजात जन्मलेली वनमाला लग्नानंतर आपल्या पतीला सोडून अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईला आली. प्रचंड यश, नावलौकिक, पैसा सगळं मिळवलं. आचार्य अत्रे यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले पण एकेक करत पैसा, यश, प्रेम सगळं उताराला लागलं आणि आयुष्याच्या अखेरीस बहिणीच्या आश्रयाला येऊन राहावं लागलं. ही सारी कहाणी त्यांनी ‘परतीचा प्रवास’ या आत्मचरित्रात सांगितली आहे.
हंसा वाडकर यांचं ‘सांगते ऐका’, शांता हुबळीकर यांचं ‘कशाला उद्याची बात’ या आत्मचरित्रांनी अक्षरश: खळबळ उडवून टाकली होती. अशिक्षित, गरिबीमुळे पैसा कमावण्यासाठी त्या या मोहमयी दुनियेत आल्या. पैसा, नाव कमावलं पण त्यांचा पैसा ओरबाडून घेतला गेला. शांताबाईंची अखेर तर पुण्याच्या पर्वती पायथ्याशी असलेल्या एका वृद्धाश्रमात एकाकी अवस्थेत झाली.
या आत्मचरित्रांमुळे चित्रपट क्षेत्राला ‘मोहमयी दुनिया’ का म्हटलं जातं ते शब्दश: कळतं.
सीमा देव यांचं ‘सुवासिनी’, मधु कांबीकर यांचं ‘मधुरंग’ अशा अनेक अभिनेत्रींना लिहावं वाटलं. ‘सय’ हे दिग्दर्शिका सई परांजपे यांचं आत्मचरित्र. ज्या काळात सर्वसामान्य लोकाना काही शे रुपये पगार मिळे, त्या काळात या अभिनेत्री काही हजारात कमावत असत. गाड्या, नोकरांचा लवाजमा, मोठे बंगले असा थाट असे.
दुर्गाबाई भागवत यांचं ‘मी दुर्गा खोटे’ आणि त्यांच्या नाट्य दिग्दर्शिका सूनबाई विजया मेहता यांचं ‘झिम्मा’ अशी सासवा सुनांची आत्मचरित्रं हा दुर्मीळ योग असावा. दोघींकडे दीर्घ अनुभवाचा खजिना होता जो त्यांनी मुक्तपणे वाचकांकडे सोपवला आहे.
रुपेरी पडदा प्रत्येकाला मोहवणारा. अभिनेत्रींच्या अभिनयाइतकीच त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलची उत्सुकता, त्यांचं आत्मकथन वाचायला भाग पाडते. संगीत रंगभूमी गाजवलेल्या ज्योत्स्ना भोळे यांचं ‘तुमची ज्योत्स्ना’, नृत्यांगना रोहिणी भाटे यांचं ‘लहेजा’ नावं तरी किती घ्यायची! या प्रत्येक कथनात त्या काळातली कलेसाठीची साधना, कला पारखण्याची वृत्ती, संघर्ष, यश असा एकूण काळाचा पट नजरेसमोर उभा राहतो.
स्त्री लिखित आत्मचरित्र वाचताना लक्ष्मीबाई टिळक (स्मृतीचित्र) यांच्यासारख्या गृहिणी, विधवा स्त्रियांनी शिक्षण घेऊन लिहिलेली पार्वतीबाई आठवले यांचं ‘ही माझी कहाणी’, मथुताई आठल्ये यांचं ‘मागे वळून’ अभिनेत्री, नृत्य-नाट्य-संगीत क्षेत्रातल्या कलावंत, प्रोतिमा बेदी (टाईमपास) सारखी मॉडेल, उर्मिला पवार (आयदान), नलिनी लढके (सत्यशोधकांची वारस) जनाबाई गिर्‍हे, सुनिता आरळीकर (हिरकणीचे बिर्‍हाड) सारख्या दलित, अनुसूचित, भटक्या समाजातील स्त्रियांनी आत्मचरित्रं लिहिली. त्यातले अनुभव मनाला सुन्न करणारे. सुनिता या मूळच्या चर्मकार समाजातल्या. (हा त्यांच्याच पुस्तकातला शब्द) जन्मत:च आईचा मृत्यू, जन्मदात्या वडिलांना ह्या मुलीला कोण वाढवणार ही चिंता, मग त्यांनी एका खड्ड्यात हिला पुरून टाकली. वडिलांच्या पाठोपाठ येत असलेल्या आजोबानं ते बघितलं आणि त्यांनी तिला वाढवलं. ते दारिद्य्र, उपासमार, शिक्षणासाठीचा अपार संघर्ष आणि पुढे दिलीप अरळीकर यांच्याशी आंतरजातीय विवाह, पतीमुळे सामाजिक चळवळीत सहभाग, अणिबाणीत तुरुंगवास, उच्चशिक्षित मुलं आणि लाभलेलं स्थैर्य, नकारात्मक्तेतून सकारात्मकतेकडे प्रवास ही सगळी कथनं जगण्याच्या अतिशय अस्पर्श वाटा दाखवतात.
सामाजिक कामात आयुष्य वेचणार्‍या स्त्रियांनी आपल्या कार्याबद्दल लिहिलं. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं ‘मी वनवासी’ मेहरुन्निसा दलवाई यांनी ‘मी भरून पावले आहे’ या त्यांच्या आत्मचरित्रात पती हमीद दलवाई यांच्या मृत्युनंतरही मुस्लीम समाजातील समाजसुधारणा चळवळी विशेषत: मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांवरचा त्यांचा लढा याची माहिती मिळते. सीमा साखरे (संग्राम), कमल भागवत (न संपलेली वाट) ऐन तारुण्यात अपंगत्व आलेलं असताना त्यातून स्वत: उभं राहात अपंगांसाठी संस्था उभारणी आणि अपंगांच्या हक्कांबद्दलचा लढा याविषयीचे अनुभव नसीमा हुरजूक यांच्या ‘चाकाची खुर्ची’मध्ये वाचायला मिळतात.
वैशाली परदेशी नाईक या गवंडीकाम करणार्‍या भटक्या जमातीतल्या मुलीचं लग्न कुठली चौकशी न करता मुंबईतल्या मुलाशी करून दिलं गेलं. नवरा एच. आय. व्ही. ग्रस्त. अर्थातच हिला त्याची लागण झालीच. अवघ्या 23 व्या वर्षी वैधव्य. एच.आय.व्हीमुळे डोक्यावर मृत्युची टांगती तलवार. त्याही परिस्थितीत ही शिकली आणि पुढे एच.आय.व्ही.ग्रस्त रुग्णांसाठी समुपदेशनाचं काम करते. तिचं आत्मकथन ‘उभी राहिलेच विलक्षण जिद्दीचा प्रवास.’
स्त्रियांच्या राजकारणातील सहभागाविषयी सांगणारी आत्मचरित्रं तुलनेनं कमी असली तरी महत्त्वाची आहेत. कॉ. डांगे यांच्या पत्नी उषा डांगे यांचं ‘पण ऐकतं कोण?’, पार्वतीबाई भोर यांचं ‘एका रणरागिणीची हकीकत’, सुनिता आरळीकर यांच्या ‘हिरकणीचे बिर्‍हाड’मध्ये त्यांच्या राजकीय सहभागाचे उल्लेख महत्त्वाचा ऐवज आहेत. त्यांना आणि त्यांच्या पतींना अणिबाणीत तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा त्यांना 3 वर्ष आणि 3 महिने अशी दोन लहान मुलं होती. मुलं सुद्धा त्यांच्याच बराकीत. त्यांच्या सोबत तुरुंगात असणार्‍या अहिल्याबाई रांगणेकर, मृणाल गोरे आदींमुळे तो काळ कसा सुसह्य झाला हे त्यांनी लिहिलं आहे. याच अणिबाणीत राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या सुशीला महाजन यांच्या 2 तरुण मुलींना पण तुरुंगवास झाला होता. त्यांच्या ‘डाव मांडियेला’ या आत्मचरित्रात त्यावेळच्या मन:स्थितीचे वर्णन केलेलं आहे. कमल भागवत यांचं ‘न संपलेली वाट’ या कथनात त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं विस्तृत वर्णन येतं.
यमुनाबाई खाडिलकर या नवाकाळ कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या सूनबाई. ‘पटावरची प्यादी’ या पुस्तकात त्यांच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील सहभागाबद्दलचं तपशीलवार वर्णन येतं. याशिवाय अनेकींनी आपल्या संघर्षाच्या कहाण्यांना शब्दरूप दिलं आहे. बारबाला म्हणून बारमध्ये नृत्य करणार्‍या वैशाली हळदणकर हिची जीवनकहाणी, लहान वयात भूक भागवण्यासाठी आलेले अनुभव, प्रेमात पडून लग्न केल्यानंतर नवर्‍याचं आजारपण आणि त्यामुळे बारमध्ये करावं लागणारं काम, मुलाकडूनच बलात्काराचा प्रसंग अशा असंख्य विदारक अनुभवांनी भरलेली आहे.
लक्ष्मीनारायण त्रिवेदी या लिंगबदल केलेल्या व्यक्तीचं ‘मी हिजडा, मी लक्ष्मी’ हे आत्मचरित्र असंच समाजाची अत्यंत वेगळी बाजू दाखवणारं. आज ही लक्ष्मी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्या समाजाचे प्रश्न मांडते.
‘होय मी स्त्री आहे’ हे ही लिंगबदल केलेल्या मनोबी बंदोपाध्याय या मूळच्या पुरुषानं स्त्री रूपात बदल केलेल्या स्त्रीचं आत्मचरित्र. अतिशय हुशार आणि बंडखोर. मूळ पुरुष देह असताना तो महाविद्यालयात प्राध्यापक होता. त्याचं पी. एच. डी. सुरु करतानाचं नाव पुरुषाचं आणि ती पूर्ण झाली तेव्हा त्याचं स्त्री मध्ये परिवर्तन झालेलं. यावर अनेकांनी आक्षेप घेऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची नोकरीची वरिष्ठता कमी भरत होती आणि तिला वरची पदं मिळू नयेत म्हणून हा उपदव्याप केला जात होता. अखेर ती कायदेशीर लढाई जिंकली आणि प्राचार्य बनली. हे आत्मकथन विलक्षण प्रत्ययकारी असून जगणं किती पातळ्यांवर असू शकतं याचं भान देतं.
‘फिरुनी नवी जन्मेन मी’ हे अरुणिमा सिन्हा यांचं आत्मचरित्र वाचताना सुन्न व्हायला होतं. पोलीस भरतीसाठी रेल्वेतून निघालेली ही तरुणी. रात्री चोरांशी झटापट करते आणि ते तिला उचलून रेल्वेतून बाहेर फेकून देतात. रात्रभर ती रुळांवर. अंगावरून धडधडती ट्रेन जाऊनही ही जिवंत. दिवस उजाडताच आजूबाजूचे ग्रामस्थ तिला दवाखान्यात भरती करतात. तिच्यावर उपचार सुरु होतात, तिचे पाय कापावे लागतात तरी ही तिथेच विचारते, ‘‘मी परत कशी उभी राहू शकेन?’’ तिच्या जिद्दीची ही अद्भुत कहाणी. कृत्रिम पायानं ती नुसती चालत नाही तर एव्हरेस्ट सर करते. भारत सरकारकडून या कामगिरीबद्दल तिला पद्मश्री प्रदान केलं गेलंय. थक्क करून सोडणारं हे विलक्षण कथन.
प्रसिद्ध व्यक्तिंच्या पत्नींनी आत्मचरित्र लिहिली. यात लेखक, समाजसुधारक, राजकीय नेते आदी अनेक नावं आहेत. सुप्रसिद्ध लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या पत्नी रागिणी पुंडलिक यांचं ‘साथ संगत’, प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी कमल पाध्ये यांचं ‘बंध-अनुबंध’, कवी मंगेश पाडगावकर यांच्या पत्नी यशोदा पाडगावकर यांचं ‘कुणास्तव’, कुणीतरी रणजीत देसाई यांच्या घटस्फोटीत पत्नी माधवी देसाई यांचं ‘नाच गं घुमा’, बाबा आमटे यांच्या पत्नी साधना आमटे यांचं ‘समिधा’, पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई यांचं ‘आहे मनोहर तरी’ अशी अनेक नावं. यापैकी साधनाताई बाबांच्या कुष्ठरोग निवारण कार्यात प्रत्यक्ष सहभागी होत्या. सुनीताबाई, कमलताई स्वत: उत्तम लेखिका होत्या तरीही त्यांची मुख्य ओळख ही प्रसिद्ध व्यक्तिची पत्नी अशीच राहिली आणि म्हणून त्यांच्या आत्मचरित्रांकडे प्रसिद्ध व्यक्तिच्या पत्नीनं लिहिलेलं अशाच नजरेनं पाहिलं गेलं. मुख्यत्वे ही आत्मचरित्रं दोन बाजूंना झुकलेली आढळतात. ‘मास्तरांची सावली’ या आत्मकथनात ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्याविषयीचा भक्तीभाव आढळतो. काहींनी पतीच्या मोठेपणात स्वत:ला समर्पित करून टाकलंय तर यशोदाबाईंनी आपल्या मनस्वी, भावनाप्रधान कविता लिहिणार्‍या कवीचा तो गुण बायकोबाबत दिसत नसल्याची उदाहरणं दिली आहेत. अनेकींनी आपली वैवाहिक आयुष्यातली घुसमट लेखनातून व्यक्त केली आहे. ‘आहे मनोहर तरी’मध्ये सुनीताबाई पु. लं च्या स्वभावातल्या दोषांबद्दल स्पष्टपणे बोलतात, त्या बरोबर त्यांच्या काही खाजगी गोष्टीही उघडपणे सांगतात.
प्रसिद्ध व्यक्तिंच्या पत्नीनंही लिहिलं आणि त्यांच्या प्रेयसीनं, असंही उदाहरण म्हणजे आचार्य अत्रे यांच्या पत्नी सुधाताई अत्रे आणि प्रेयसी वनमाला अशी दोघींची आत्मचरित्रं प्रकाशित झाली आहेत. सोबतकार ग. वा. बेहेरे आणि आनंदीबाई विजापुरे यांच्यात प्रेमसंबंध होते. जवळपास 12 वर्ष हे नातं टिकलं, पुढे त्याच्यातला विसंवाद वाढून त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर आनंदीबाईंनी ‘अजुनी चालतेची वाट’ नावानं आपलं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं. त्या असं काही लिहीत आहेत हे कळल्यावर ग. वा. बेहेरे यांनी ‘माझ्याविषयी खाजगी गोष्टी सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, अशा काहीशा पद्धतीचं पत्र आनंदीबाईंना पाठवलं. आनंदीबाईंनी तेही आपल्या पुस्तकात प्रसिद्ध करून टाकलं.
एकंदरीत जवळच्या माणसाविषयी लिहिणं ही अवघड बाब अनेकींनी निभावली आहे.
स्त्री लिखित आत्मचरित्रांचा अभ्यास ही सोपी गोष्ट नाही, कारण नुसती 200 पुस्तकं वाचली इतकं ते सहज नाही. या 100 वर्षांच्या काळाचा मागोवा यात घेतला गेलाय. नवर्‍याचा उल्लेख स्वत: असा करण्यापासून यात बदल होत गेलेत. काळ बदलला, परिस्थिती बदलत गेली. पूर्वी 100 माणसांचा रोजचा स्वयंपाक, तर काही मध्ये चांगल्या आर्थिक गटातल्या घरच्या सुनांना सुद्धा लोणचं, मुरांबे मिळत नसण्याचे आणि मग दोघी चौघी सुना मिळून लपूनछपून शिंक्यावरच्या बरण्यातून ते कसं मिळवायच्या हेही उल्लेख आले, भाषा बदलली. एका डॉक्टरच्या लेखनात मजेशीर वाक्यरचना सापडली. त्यांच्याकडे येऊन स्त्रिया सांगत, संसाराला त्रास होतो. मग या सल्ला देत, अगं चालायचंच, मोठ्यांशी जुळवून घ्यावं, भांड्याला भांडं लागलं की आवाज यायचाच वगैरे. त्या बायका विचित्र नजरेनं बघत. शेवटी यांना कळलं की संसाराला त्रास म्हणजे शरीर संबंधांना त्रास होणं.
शांताबाई कांबळे या दलित स्त्रीचं वाचताना चकित व्हायला होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शिक्षण घेतलं, नोकरी मिळून स्वयंपूर्ण झाल्या. पतीनं दुसरं लग्न केल्याचं कळताच ‘माज्या जल्माची चित्तरकथा’मध्ये त्या पतीला सांगतात, ‘आता मी घरी यायची नाही. तिच्या सोबतच तुम्ही संसार करा.’ 1940 च्या दशकात ही तडफ!
दोन इयत्ता शिकलेल्या पार्वतीबाई भोर यांच्या ‘एका रणरागिणीची हकीकत’मध्ये त्या म्हणतात, ‘जन्मतारीख माहीत नाही. लग्न तारीख आठवत नाही. मी काळात असून काळाला चिकटले नाही. अळवाचं पान आणि त्यावरच्या पाण्याच्या थेंबासारखं आहे हे. रंगपंचमीच्या जवळपासचा मुहूर्त होता, त्या दिवसानं माझ्या आयुष्यात कुठले रंग आणले माहीत नाही. एका धुण्यात चांगल्या पातळाचं भूत व्हावं तसं स्त्रीचं आयुष्य.’ दुसरी इयत्ता शिकलेली सामान्य बाई आपलं जगणं मांडू बघते हे नवलाचं वाटतं.
या आत्मचरित्रातून शिक्षणासाठीचा संघर्ष, स्त्रियांचं सामाजिक भान, रूढी परंपरांचा काच, स्त्री दुसर्‍या स्त्री शी कशी वागते, तिचं सहजीवन, आंतरजातीय/ आंतर धर्मीय विवाह झाल्यामुळे स्त्रीच्या आयुष्यात घडणारे बदल, तिच्यावरची बंधनं, समाजाकडून होणारी अवहेलना, कुचेष्टा, त्याला तिचं खंबीरपणे सामोरं जाणं, नवर्‍याच्या बदलीमुळे तिचा स्थान बदल, भाषा, विचार करण्याची बदलत गेलेली पद्धत यासारखं खूप काही कळत जातं.
या आत्मचरित्रांच्या अर्पणपत्रिका सुद्धा खूप काही सांगून जातात. संसारी स्त्रियांनी आत्मकथनं लिहिली आणि ती आपल्या आई-वडील-पती अशा कुटुंबातल्या व्यक्तिंना अर्पण केली. सामाजिक काम करणार्‍यांनी त्यांच्या सहकार्‍यांना, पूर्वीच्या काळात बालविधवा झालेल्या आणि नंतर शिकून कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांनी त्यांना मदत केलेल्यांना पुस्तक अर्पण केलंय. ‘मी हिजडा मी लक्ष्मी’, खरंतर अशा वेगळ्या लैंगिकतेच्या व्यक्तिंच्या नशिबी अवहेलना ठरलेली, घरचे सुद्धा त्यांना स्वीकारत नाहीत, असं असताना ही अर्पणपत्रिका अशी,
‘माझ्या मम्मी पप्पांना,
ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, समोरच्याच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलण्याचा विश्वास दिला.’
आशा अपराध यांच्या ‘भोगिले जे दु:ख मी’ची अर्पणपत्रिका,
‘माझ्या आयुष्याच्या खडतर वाटचालीत माझ्याशी जात-धर्म-लिंगभेदाच्या पलीकडलं नातं जोडून जे पाथेय समाजानं मला दिलं, त्या प्रेमळ हातांना.’
अतिशय हृद्य अर्पणपत्रिका ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांच्या ‘संवादू-अनुवादूची’,
‘आमच्या न जन्मलेल्या अपत्यास…’
स्त्री लिखित आत्मचरित्रांचा अभ्यास केल्यानंतर शीर्षक, भाषा, आशय, वेगळेपणा, मांडणी, अर्पणपत्रिका… सगळ्याच बाबतीत किती सांगावं असं होऊन जातंय. हे साहित्यातलं एक अद्भुत दालन आहे, त्यात डोकावून बघणं हा समृद्ध करणारा अनुभव आहे, हे निश्चित.
*

(प्रमोदिनी वडके-कवळे, संगीता पुराणिक आणि नीलिमा बोरवणकर या तिघींनी आकाशवाणीवर या विषयावर चार महिने दर आठवड्यात एक याप्रमाणे सुमारे 8 तासांचा कार्यक्रम सादर केला. सध्या याच विषयावर ‘ती ची कहाणी’ हा दीड तासाचा रंगमंचीय कार्यक्रम त्या सादर करतात.)
*

आत्मचरित्र म्हणजे स्वत;च्या आयुष्याचा स्वत:च मांडलेला लेखाजोखा, हे लक्षात घेऊन जीवनातील सुसंवादाबरोबरच स्पष्ट विसंवाद, चुका, काही अस्पर्श विषय यावर निर्भीडपणे लिहिण्याचं धाडस काही आत्मचरित्रात दिसून येतं.
थोडक्यात 1910 पासून आजपर्यंत स्त्रियांचा संघर्ष, सामाजिक, वैयक्तिक अनुभव, आणि भावनिक उलथापालथ यात कालानुरूप बदललेल्या गोष्टींचा इतिहास बर्‍याच अंशी या प्रवासात बघायला मिळतो.
अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत स्त्रियांचं वेगळं जगणं, गायिका, नृत्यांगना, खेळाडू, पोलीस, तसंच भविष्यवेध, ‘हॉर्स रेसिंग’सारखी वेगळी क्षेत्रं गाजवणार्‍या स्त्रिया, यांच्याबद्दल जाणून घेता-घेता जणू त्या आमच्या मैत्रिणी झाल्या. त्याच बरोबर लोकप्रिय जोडीदाराबरोबर यशस्वी संसार करताना एकीकडे स्व त:च्या व्यक्तिमत्त्वातलंही वैशिष्ट्य जपणार्‍या काही तेजस्विनी, उदा. द्यायची तर सुनीता देशपांडे, यशोदा पाडगावकर, साधना आमटे, माधवी देसाई, कमल पाध्ये आमचे डोळे दिपवून गेल्या.
मागच्या काळातल्या आत्मचरित्रातली त्यांच्या पदरी आलेल्या संघर्षाची धार आज ऐकताना कदाचित बोथट वाटू शकेल, यातला पदर हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरते आहे कारण हल्ली एखादी 80 ची स्त्री सहजपणे सोयीसाठी पंजाबी पोशाख वापरते, पण तेव्हाच्या एखाद्या 16 वर्षाच्या तरुणीनं नऊवारीऐवजी पाचवारी साडी नेसणं ही सुद्धा मोठी क्रांती असायची. अशा पार्श्वभूमीवरचे अनेक निर्णय घेताना, त्या निर्णयांचे परिणाम त्यांनी कसे सोसले असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

– नीलिमा बोरवणकर

‘साहित्य चपराक’ फेब्रुवारी २०२५

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

18 Comments

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!