धीर धरा रे…

धीर धरा रे...

तुम्ही बसने ऑफिसला निघाला आहात, रस्त्याने नेहमीप्रमाणे गर्दीचा महापूर ओसंडून वाहत आहे. नेमका चौकातला सिग्नल बंद पडला आहे. बसच्या दोन्ही बाजूने सायकल्स, बाईक्स, टेम्पो, रिक्षा पुढे पुढे घुसत होत्या. त्यातच एक ट्रक विरुध्द दिशेने घुसला आणि सर्व बाजुनी वाहतुकीची कोंडी झाली. कुणालाही थांबायला वेळ नाहीये. प्रत्येकाला पुढे जायची घाई आहे. या प्रकारामुळे वाहतुक पूर्ण थांबली आहे. बसमधील प्रवासी अगतिकपणे आजूबाजूला चाललेला गोंगाट व हॉर्नचे कर्कश आवाज सहन करत आहेत. कुणीही आपले वाहन मागे घ्यायला तयार नाही. तुम्ही हताश होऊन फक्त बघत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही.

दररोजच्या धकाधकीच्या शहरी आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाने असा प्रसंग अनुभवलेला असतो. कधी बाईकस्वार म्हणून तर कधी त्या बसमधील प्रवासी म्हणून असा प्रसंग प्रत्येकाने अनुभवलेला असतो. असा गोंधळ का होतो?

तुम्ही आपल्या फॅमिली सोबत हॉटेलमध्ये डिनरला गेला आहात. रविवार असल्यामुळे हॉटेलमध्ये खुपच गर्दी आहे. काही कारणाने वेटरने मागवलेले पदार्थ द्यायला उशिर केला आहे. तुम्हाला प्रचंड राग येतो व तुम्ही वेटरला नको त्या भाषेत झापता. हॉटेलमध्ये गोंधळ घालता. सगळे लोक हा तमाशा बघतात. डिनरची सगळी मजा जाते. एरवी शांत असलेले तुम्ही असे का वागता?

एका नामवंत कंपनीत नोकरीसाठी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावणे आले. मुलाखत अगदी व्यवस्थित पार पडली. येथे आपले काम नक्की होणार याची खात्री असताना सुध्दा काहीतरी गडबड होते आणि तुमचे सिलेक्शन होत नाही. खात्री असुनही काम झाले नाही म्हणून तुमची चिडचिड होते.

आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग येतात जेथे तुम्ही प्रमाणिकपणे प्रयत्न केलेले असतात पण आपल्याला हव्या त्या वेळी व हव्या त्या स्वरूपाचे रिझल्ट्स मिळत नाहीत. अशावेळी आपण आपले मनस्वास्थ हरवून बसतो.

शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की प्रयत्न करणे जरी आपल्या हातात असले तरी आपल्याला अपेक्षित असलेले वा हव्या तशा स्वरूपातले यश मिळणे तुमच्या हातात नव्हते! थोडा धीर धरला तर अपेक्षित असलेल्या मनासारख्या गोष्टी घडू शकतात. प्रत्येक वेळी घाई करून काहीच साध्य होणार नाही हे समजून घेणे आवश्यक आहे.

आजचा जमाना हा इंस्टंटचा आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचे रिझल्ट्स तात्काळ हवे असतात. आजकाल बटन दाबल्याबरोबर अनेक गोष्टी घडतात. बँकेत रांगेत उभे राहण्याचा काळ मागे पडला आहे. एटीएम मशिनसमोर उभे राहून बँकेचे सर्व व्यवहार होतात. सिनेमाची फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटे लाइनमधे उभे राहून काढायचा काळ कधीच संपलाय! हवी ती रो व हवी ती सीट पाहून इंटरनेटवर सिनेमाची तिकिटेच काय तर विमान प्रवासाची तिकिटे, रेल्वे व बस प्रवासासाठी आरक्षण करणे एका क्लिकवर सहज शक्य झाले आहे. हव्या त्या वस्तूंची घर बसल्या ऑर्डर देऊन घरपोच डिलिवरीने त्या मिळतात. सर्व गोष्टी इतक्या सहजपणे मिळू लागल्यामुळे तसेच त्यासाठी लागणारा पैसा लठ्ठ पगाराच्या आयटी वा तत्सम नोकरीमुळे/धंद्यांमुळे उपलब्ध आहे. एखाद्या गोष्टीची वाट पाहण्याची व त्या वाट पाहण्यातील आनंदाची सवयच उरली नाही. किंबहुना अशा परिस्थितीमुळे आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी धीराने घेणे वा कळ काढणे म्हणजे काय असते ते नव्या पिढीला माहीतच नाही! त्यामुळे ’धीर धरा रे धीरापोटी असती फळे रसाळ गोमटी’ वा ’सब्र का फल मीठा होता है!’ हे सगळे पचनी पडायलाच अवघड जात आहे. मिळणारी फळे कितीही रसाळ असली तरी त्यासाठी लागणारा धीर अंगी नसल्यामुळे खरी गोची झाली आहे! धीराने घेण्याएवढी सवड व वाट पाहण्याची आवड या दोन्ही गोष्टी अंगी नसल्यामुळे आयुष्यात हवे ते ताबडतोब न मिळाल्यास माणसे नको इतकी निराश होत आहेत. अगदी क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करत आहेत. वेड्यासारखी वागत आहेत, असे वागून नातेसंबंध व मैत्रीसंबंधात नको एवढी कटूता निर्माण होत आहे. नात्यात दुरावा होण्यापर्यंत ती ताणली जात आहेत.

सहनशीलता, धीर, वाट पाहण्याची तयारी किंवा आधुनिक भाषेतला पेशन्स माणसाच्या अंगी असायलाच हवा पण तो सध्या कुणाकडेच नाहीये.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ येइपर्यंत वाट पाहण्याला पर्याय नाही ही केवळ कल्पना नाही असे अनुभवाअंती वाटते. काही गोष्टी पराधीन असतात, काही निसर्गाच्या अधीन असतात तर काही गोष्टींसाठी प्रचलित कार्यप्रणाली प्रमाणे ठरलेली एक वेळ यावी लागते. कितीही उतावळेपणा केला तरी होणार्‍या गोष्टी सुयोग्य वेळीच घडतात, त्यामुळे धीर हा धरायलाच हवा! ही अपरिहार्यता प्रत्येकाने प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपण कितीही उतावीळ असलो तरी समोर येणारा रिझल्ट आपल्याला अपेक्षित असलेलाच असेल असे गृहीत धरणे चुकीचे ठरु शकते!!!

‘पुराणातली वांगी पुराणात’ असे आपण कितीही म्हणत असलो तरी हे तेव्हढेच खरे आहे की ‘वक्त से पहले और तकदीरसे जादा किसीको कुछ नही मिलता!’

प्रत्येकाने आयुष्यातील प्रत्येक बाबतीत धीराने घ्यायला हवे हे बोलायला ठिक आहे पण तसे वागणे तेव्हढे सोपे नाही हे वास्तव मला माहीत आहे. तरी पण मला असे वाटते की आपल्या दैनंदिन वागण्यात ही गरजेची असलेली सहनशीलता रुजवणेही तेव्हढेच आवश्यक आहे. पध्दतशीरपणे व अभ्यासपूर्ण केलेले प्रयत्न नक्कीच अशाप्रकारचे पेशन्स वाढवायला मदत करतील. शेवटी धीराने घेतले की यश मिळणारच आहे, तेव्हा जीवन सुखकर करण्यासाठी थोडा धीर हा धरायलाच हवा!
काय वाटते तुम्हाला?

-प्रल्हाद दुधाळ, पुणे
9423012020

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “धीर धरा रे…”

 1. Vinod s. Panchbhai

  सुंदर लेख!
  वक्त से पहले और तकदीर से ज्यादा किसीको कुछ नही मिलता !

  1. प्रल्हाद दुधाळ

   धन्यवाद

 2. प्रल्हाद दुधाळ

  माझ्या या लेखाला इथे स्थान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पाटील साहेब…

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा