अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

प्रत्येकाच्या जीवनात कुणाची कुणावर ना कुणावर श्रद्धा असते, निष्ठा असते, भक्ती असते आणि त्यातून अशा श्रद्धेय व्यक्तिंची अधिकाधिक माहिती मिळवून ती वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक व्यक्ती आज समाजात आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही भुजबळ यांची आराध्यदैवत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. या दोघांच्या जीवनकार्याचा लेखकाचा सखोल अभ्यास आहे. केवळ अभ्यासच आहे असे नाही तर ते जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून या महामानवांच्या विचारांचा प्रसार करतात. म्हणूनच त्यांची निवड ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनात ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी होते हे त्यांच्या सखोल अभ्यासाचे द्योतक आहे. या व्याख्यानातून प्रेरणा घेतलेले लेखक भुजबळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता या शीर्षकाचे मराठी आणि इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले असून भरारी प्रकाशन, मुंबई यांनी ते प्रकाशित केले आहे.

लेखक देवेंद्र भुजबळ यांची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही अत्यंत निष्ठा आहे. त्यांच्या जीवनकार्याचा लेखकाने बारकाईने अभ्यास केला आहे त्याचे फलित म्हणजे या पुस्तकात त्यांचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कामगार कल्याणातील भरीव योगदान, ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अशा तीन माहितीपूर्ण आणि वाचनीय असे लेख आहेत. ह्या लेखांचीआणि लेखकाच्या लेखनीची महानता वाचकांच्या यावरून लक्षात येईल की, भुजबळ यांनी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता’ हा लेख मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू भाषांमध्ये प्रकाशित झाला आहे. ही फार मोठी गौरवाची बाब आहे. भुजबळ यांच्यासाठी सन्मानाची बाब म्हणजे त्यांची व्याख्याने भारतात तर झालीच आहेत पण थायलंड, नेपाळ, रशिया, आर्मेनिया, अझरबईझाण या देशातील संवाद सत्रांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे.

देवेंद्र भुजबळ यांनी ‘अभिमानाची लेणी’ या पुस्तकात सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच ‘राष्ट्रभक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सानेगुरुजींची शाळा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, बुद्ध वंदन,युगप्रवर्तक शाहू महाराज, उत्तम बंडू तुपे अशा महनीय व्यक्तिंची विविध क्षेत्रातील कामगिरीची माहिती वाचकांसमोर मांडली आहे.

‘जन गण मन’ या राष्ट्रगीताने घराघरात पोहोचलेले आणि मनामनामध्ये घर केलेले, ऐकणारांच्या शरीरात एक वेगळे स्फुल्लिंग चेतवणारे रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीची कृतज्ञता लेखक भुजबळ यांनी ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर’ या लेखातून प्रकट केली आहे. इंग्लंड येथे वकिलीची पदवी घेण्यासाठी गेलेले रवींद्रनाथ हे शिक्षण अर्धवट सोडून भारतात परततात आणि ‘चार भिंतीमधील शिक्षण माणसाला खरं घडवू शकत नाही’ या विचारातून खुल्या हवेतील शिक्षणाचा ध्यास घेऊन ‘शांतिनिकेतन’ ची स्थापना करुन शिक्षणाचा प्रसार करतात. नोबेल सर्वोच्च जागतिक पुरस्कार रवींद्रनाथांना प्रदान केल्या जातो त्यावेळी ते हा पुरस्कार प्राप्त करणारे आशिया खंडातील पहिले व्यक्ती ठरतात ही गोष्ट आम्हा भारतीयांची मान उंचावणारी आहे. दुसरीकडे ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ ही मानाची पदवी बहाल करून त्यांचा सन्मान केला असला तरीही पुढे जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून जेव्हा टागोर ती पदवी परत करतात त्यावेळी त्यांच्या देशाभिमानापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते अशा घटनांची माहिती लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत दिली आहे.

भारतात अनेकविध सामाजिक सुधारणेचे प्रणेते म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते अशी व्यक्ती म्हणजे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले! ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले’ या लेखामध्ये महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणांचा भुजबळ यांनी तन्मयतेने आढावा घेतलेला आहे. ‘मुलींच्या शिक्षणासाठी, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, मुलींसाठी स्थापन केलेली भारतातील पहिली शाळा, अस्पृश्यांसाठी सुरू केलेली पहिली शाळा, रात्र शाळेचा अभिनव प्रयोग’ अशा अनेक समाजोपयोगी आणि सामाजिक उद्धारासाठी महात्मा फुले यांनी केलेल्या कामांचे वर्णन लेखकाने कृतज्ञतापूर्वक केले आहे. एकेकाळी विधवा स्त्रियांना एक प्रकारचे शापित जीवन जगावे लागायचे. महात्मा फुले यांनी विधवांना विवाहाची परवानगी मिळावी म्हणून आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन विधवा विवाह घडवून आणल्याची नोंदही लेखकाने घेतली आहे. ‘सत्यशोधक समाज’ या ऐतिहासिक संस्थेची केलेली स्थापना असेल, स्वतःच्या राहत्या घरातील पाण्याचा हौद खुला करण्याची घटना असेल, खत फोडीचे बंड असेल, दारूची दुकाने बंद करण्यासाठी केलेला आग्रह असेल अशा अनेक घटनांचे वर्णन भुजबळ यांनी ओघवत्या भाषेत केले आहे.

भारतीय सामाजिक कार्यात योगदान देणारे एक उत्तुंग व्यक्तित्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे! देवेंद्र भुजबळ यांनी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार’ या शीर्षकाचा लेख या पुस्तकात समाविष्ट केला आहे. चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या अण्णांनी गाव सोडलं आणि जन्मगावापासून पायी चालत थेट मुंबई गाठली. मिळेल ते काम करीत पोटाची भूक भागवत असताना ते शाहिरी कलेकडे आकर्षित झाले आणि शाहिरीतून जन जागरण करताना अण्णाभाऊ साठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आंबेडकर चळवळीत मोलाचे योगदान देत असताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लक्षणीयरीत्या सहभाग घेतला. असे अण्णांची सामाजिक कार्य मांडत असताना भुजबळ यांच्या लेखणीला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रवासानेही भुरळ घातली आहे. त्यांची ‘फकिरा’ कादंबरी आणि रशिया या देशाला जाऊन आल्यानंतर लिहिलेले प्रवास वर्णन भारतीय भाषांसोबत परकीय सत्तावीस भाषांमध्ये अनुवादित झाले असल्याची नोंद लेखक मोठ्या अभिमानाने घेतात.

पांडुरंग सदाशिव साने अर्थात सानेगुरुजी! ‘श्यामची आई’ यापुस्तकाच्या रुपाने घराघरातील आबालवृद्धांच्या ह्रदयात वसलेल्या सानेगुरुजींनी शिक्षक म्हणून काम केलेली शाळा म्हणजे सांगली जिल्ह्यातील अमळनेर येथील शाळा! या शाळेतील विद्यार्थ्यांच्या चुकीला स्वतःची चूक समजून स्वतःलाच शिक्षा करुन घेणारे शिक्षक म्हणजे सानेगुरुजी! अशा अनेक विद्यार्थ्यांच्या चुकीसाठी स्वतःला शिक्षा करून घेतल्याचे लेखकाने रेखाटलेले अनेक प्रसंग वाचताना डोळे पाणवतात. सानेगुरुजी शिक्षक असलेली शाळा पाहावी, तेथील कार्य प्रत्यक्ष अनुभवावे या हेतूने लेखक देवेंद्र भुजबळ यांनी सहकुटुंब अमळनेर येथील शाळेला भेट दिली असल्याचे लेखक अभिमानाने नोंदवतात.

वृत्तपत्राच्या क्षेत्रात आदराने घेतले जाणारे एक प्रमुख नाव म्हणजे बाळशास्त्री जांभेकर! दर्पणकार म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या आणि जेमतेम वयाची विशी गाठलेल्या बाळशास्त्रींनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ यादिवशी प्रकाशित केले. बाळशास्त्रींचा नऊ भाषांचा अभ्यास केला होता. दर्पण हे वृत्तपत्र मराठीसोबतच बंगालीतही प्रकाशित होत असे. १८१२ साली कोकणातील देवगडजवळील पोंभुर्ले या गावी जन्म झालेले बाळशास्त्री वय वर्षे तेरा असताना मुंबई शहरी दाखल झाले. बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य लेखकाने मोठ्या तन्मयतेने साकारले आहे.

अभिमानाची लेणी या चरित्रात्मक पुस्तकात लेखक देवेन्द्र भुजबळ यांनी ‘बुद्धवंदन’ या शीर्षकाच्या लेखात गौतम बुद्ध यांच्या कार्याचा ओघवत्या भाषेत वेध घेतला आहे. त्यांनी केलेला गृहत्याग, शारीरिक यातनामय साधना पद्धती, गौतम बुद्धांनी सद्धम्माचा प्रचार करण्यासाठी सतत ४५ वर्षे केलेला पायी प्रवास अशा इतर अनेक घटनांचे वर्णन वाचताना डोळे अश्रू प्रसवतात. तसेच गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या विपसनेचे महत्व विषद करून ही उपासना स्वतः अनुभवली असल्याचे लेखक लिहितात त्यावेळी लेखक भुजबळ यांच्याबद्दलचा आदर दुणावतो.

भारतीय सामाजिक सुधारणेचे प्रणेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन चरित्र लेखकाने ‘युग प्रवर्तक शाहू महाराज’ या लेखकात मोठ्या मनोभावे लिहिले आहे. शाहू महाराज यांचे जीवन उणेपुरे अठ्ठेचाळीस वर्षांचे पण या अल्पायुषी जीवनात त्यांनी केलेले कार्य त्यांना अजरामर करते आहे. शाहू महाराजांच्या एकूणच जवळपास सर्व कामगिरींची, सुधारणेची माहिती भुजबळ यांनी अत्यंत तळमळीने लिहिली आहे.

‘तुकड्या म्हणे..’ या शब्दांनी आपल्या रचनेची सांगता करणारे, भजने, अभंग, ओव्या याद्वारे समाजजागृतीचे महान कार्य करणारे तुकडोजी महाराज यांचे चरित्र अत्यंत जिव्हाळ्याने लेखकाने आपल्या समोर ठेवले आहे. ते वाचनीय, मननीय, अनुकरणीय असेच आहे. ‘चले जाव’ या लढ्यात सहभागी झालेले, सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असणारे, जपान देशातील विश्व धर्म परिषदेत निमंत्रित असलेले संत तुकडोजी महाराज यांनी भूदान चळवळ, पानशेत धरण प्रकल्प, कोयना भुकंप, हिंदू-मुस्लिम दंगा यावेळीही बघ्याची भूमिका न घेता चोख भूमिका बजावली. १९६५ ला पाकसमवेत युद्ध सुरू असताना आपल्या सैनिकांमध्ये जोश, स्फूर्ती निर्माण करण्यासाठी सीमावर्ती भागात जाऊन त्यांची भेट घेणारे, ग्रामविकासाच्या संदर्भात ‘ग्रामगीता’ सारखा सार्वकालिक उपयुक्त ग्रंथ लिहणारे अशी तुकडोजी महाराज यांची नानाविध रुपे भुजबळ यांनी अतिशय अभ्यासपूर्णरीतीने रेखाटली आहेत.

उत्तम बंडू तुपे महाराष्ट्रातील एक थोर साहित्यिक! तुपे यांचा एकूण साहित्य प्रवास साध्या, सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचविण्याची फार मोठी कामगिरी लेखक देवेंद्र भुजबळ यांनी पार पाडली आहे.

एकंदरीत ‘अभिमानाची लेणी’ या ऑनलाईन लेखसंग्रहातील एकूणएक लेख त्या त्या चरित्र नायकाला न्याय देणारे, त्यांची कामगिरी ठळकपणे अधोरेखित करणारे असे आहेत. तसे पाहिले तर साहित्य क्षेत्रात जर कोणता विभाग जास्त अवघड असेल तर तो म्हणजे चरित्र लेखन! प्रत्येक चरित्र नायक हा समाजाचे श्रद्धास्थान असतो, समाजाच्या भावना त्या नायकाशी जोडलेल्या असतात म्हणून चरित्र लेखन करताना कल्पनेच्या भराऱ्या घेता येत नाहीत. वास्तवाशी नाळ ठेवून नायकाचे चरित्र उभे करावे लागते. ही अशी भूमिका लेखक देवेंद्र भुजबळ यांनी लीलया साधली आहे. त्यांची लेखनी वास्तवाशी कुठेही फारकत घेत नाही. साध्या, सरळ आणि रसाळ भाषेत लेखन हा त्यांचा भक्तीभाव अभिमानाची लेणी या पुस्तकात आढळून येतो. त्यांना भरभरून शुभेच्छा! श्री संजय सामंत, ई साहित्य प्रतिष्ठान ठाणे यांनी हे आकर्षक पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज केले आहे. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा!

नागेश सू. शेवाळकर
पुणे (९४२३१३९०७१)

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!”

  1. Jayant Kulkarni

    शेवाळकर सर ‘ अभिमानाची लेणी ‘ या पुस्तकाचे आपण केलेले परीक्षण अतिशय हृद्य आहे. पुस्तकात समावेश असलेल्या सगळ्या महान व्यक्तींची आपण जी थोडक्यात ओळख करून दिली आहे त्यामुळे पुस्तक सत्वर वाचण्यासाठी आम्ही वाचक म्हणून आसुसलेले आहोत. झलक इतकी छान असेल तर पूर्ण पुस्तक कसे असेल असा विचार आल्याने उत्कंठा वाढली आहे. लेखक श्री भुजबळ यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा!
    … जयंत कुलकर्णी

  2. Vinod s. Panchbhai

    व्व्व्वा! वाचताना खरोखरच पदोपदी “अभिमानाची लेणी” जाणवली.
    शेवाळकर सर उत्कृष्ट परीक्षण केलंय. अभिनंदन !

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा