निजात्मप्राप्ती साधावी!

निजात्मप्राप्ती साधावी!

Share this post on:

बालपणापासूनच माझ्या घरात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला रामरक्षा म्हणण्याची पद्धत होती. त्यातून मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळत असे. रोज कानी पडणार्‍या त्या सात्त्विक शब्दांमुळे वाणी शुद्ध होत असे. ही पद्धत वर्षानुवर्षे आमच्या घरात चालू होती.

ही परंपरा टिकवण्याचे सारे श्रेय जाते ते माझ्या प. पू. आदरणीय गुरूवर्य आणि संत एकनाथ महाराज यांचे तेरावे वंशज श्री. रावसाहेब महाराज गोसावी यांना. नात्याने जरी ते माझे वडील असले तरी देखील ते मला नेहमीच माझ्या गुरूस्थानी आहेत.

माझे गुरू म्हणजे भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा सागर. काही माणसं ही दिव्यासारखी असतात. स्वतःच्या तेजानं ते दुसर्‍यांचं आयुष्यही तेजस्वी बनवतात. असेच माझे गुरू. अत्यंत सर्जनशील, नम्र असणारे! वृत्तीनं शांत आणि निःस्वार्थ! ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार आणि संत एकनाथांचे तेरावे वंशज, संस्थान अधिपती म्हणून सार्‍या पैठणात त्यांची ख्याती आहे. नेहमी आनंदात असणारे, सर्वांना हसत-खेळत अध्यात्म सांगणारे जणू एक विद्यापीठच. त्यांच्या खेळकर वृत्तीने ते सार्‍यांची मने जिंकून घेत असत. सेवाभाव हा त्यांच्या नसानसात भिनलेला. घरी आलेला प्रत्येक अतिथी विन्मुख जाऊ नये याकरिता असणारा त्यांचा प्रयत्न आणि प्रत्येक जिवात्म्याबद्दल असणारे नितांत प्रेम हे त्यांचे स्वभावगुण! त्यांच्या सहवासात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सारेच आनंदून जायचे.

प्रत्येक माणसाच्या अंतरंगात एक गूढ सौंदर्य लपलेले असते. ते सौंदर्य प्रत्येकाला बघायला मिळतेच असे नाही. ते भाग्य मला लाभले. कुठल्याही प्रसंगी न डगमगता सामोरे जाण्याची त्यांची हातोटी होती. अत्यंत सामर्थ्यवान असे ते व्यक्तिमत्त्व.

टाळ-मृदुंगांच्या गजरात जेव्हा मंदिरामध्ये ते कीर्तनास उभे राहत त्यावेेळी कीर्तनास नेहमी गर्दी होत असे.

जन्मुनि केलेस काय मनूजा
जन्मुनि केलेस काय।
घडी घडी पळ पळ दिस जाती रे
तूच शोधुनि पहाय॥

असे ते अभंग गाताना नेहमी म्हणत. आमच्या घरात कीर्तन, प्रवचन, अभंग, भजन, भारूडे, गौळणी हे असे कार्यक्रम सतत सुरू असत. त्यामुळे साहजिकच समाजप्रबोधनाचे कार्यही त्यांच्या हातून होत होते. त्यांची शांत वृत्ती आणि धडाडीची निर्भयता सर्वांना आकर्षित करीत असे. कुठल्याही संकटांना ते अतिशय खंबीरपणे सोडवत असत. काम, क्रोध, द्वेष, मत्सर, स्वार्थ, संशय या त्यांच्या दृष्टिने अत्यंत निःसत्त्व असणार्‍या गोष्टी होत्या. परोपकार हा त्यांच्या जीवनात जगण्याचा जणू मूलमंत्रच होता. एक उत्तम पती, एक उत्तम पिता म्हणून तर ते योग्य होतेच पण एक व्यक्ती म्हणून त्यांना संपूर्ण पैठणमध्ये दुसरे नाथमहाराज असेच संबोधले जायचे. गावात काही समस्या असतील, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर लोक त्यांचा सल्ला जरूर घेत असत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ते आध्यात्मिक क्षेत्रात नसते तर नक्कीच एक उत्तम वकील किंवा सल्लागार झाले असते.

‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अगदी असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. जीवन जगताना रोजचा दिवस आनंदाने आणि समाधानाने भरलेला असावा असा त्यांचा आग्रह असे.

मुखी सद्गुरूचे नाम ।
हृदयी सद्गुरूचे प्रेम ॥
देही सद्गुरूचे कर्म ।
अविश्रम अहर्निशी ॥

एके दिवशी मी मात्र अत्यंत खचलेल्या अवस्थेत होते. त्यांनी ते ओळखले. मला जवळ बोलावले आणि विचारले, ‘‘बाळ काय झालेय तुला? कसली चिंता वाटतेय का?’’

मी उत्तरले, ‘‘बाबा या जगात किती वाईट गोष्टी घडत आहेत. या वाईट, निरर्थक गोष्टींपासून स्वतःला दूर कसे ठेवायचे? आजूबाजूला असणार्‍या वाईट प्रवृत्तींवर कशी मात करायची? या जगात तुमच्यासारखे आनंदी राहून निःस्वार्थ कसे जगता येईल मला?’’

त्यांनी उत्तर दिले,

‘‘फुल झाडावरच उगवते पण जोपर्यंत ते झाडावर आहे तोपर्यंत देवास वाहता येत नाही. देवाला वहायचे असेल तर ते झाडावरून तोडावे लागेल. तसेच मन हे संसारवृक्षावर असले तर देवाकडे जाणार नाही. त्यासाठी त्यास तेथून काढावे लागेल. श्री ज्ञानेश्‍वरमहाराज म्हणतात,
विषयांपासून हिरतले ।
गुरूवाक्ये मन धुतले।
मग आत्मस्वरूपी घातले ।
रोवोनिया ।

बहुतेक सुगंधी पुष्पेच देवास वाहिली जातात. तसे विवेक, वैराग्य, भक्ती यांनी सुगंधीत झालेले मनच देवास वाहिले जाते. झाड केवढेही मोठे झाले तरी त्यास फूल, फळे आले तरच त्याचे सार्थक. तसेच मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्यास विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान असेल तरच त्याच्या जीवनाचे सार्थक होते. म्हणूनच संतांनी सांगितल्याप्रमाणे वाचन, चिंतन, अध्यात्मश्रवण यामध्ये सुखी जीवन जगण्याचा मार्ग आहे. आलेल्या संकटांना तोंड देऊन धैर्याने लढण्याचा मार्ग आहे. संसार आणि परमार्थ या दोन्ही जीवनाच्या दोन बाजू आहेत. जीवनात सुख आणि दुःख हे येतच राहणार परंतु त्यातूनच सुखी जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी अध्यात्माइतके सखोल ज्ञान कोठेच मिळू शकणार नाही. म्हणून भक्ती, श्रवण आणि चिंतन करूनच आपल्याला शुद्ध चैतन्याकडे जाता येईल.’’

त्यांचे हे शब्द आजही माझ्या कानी पडले की, अंतरिक शक्ती असल्याची जाणीव मला होते. गृहस्थाश्रमात राहूनही परमार्थ साधता येतो ही नाथांची शिकवण आजही त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिली आहे. ते अतिशय कृतिशील आणि ज्ञानशील उपासना करणारे केंद्र आहेत. त्यांनी ही उपासना प्राणापलीकडे जपली आहे. श्रद्धेने, विश्‍वासाने पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत केली आहेत. मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे ही उपासना देताना ती जपण्याची संधी आपणास मिळाली यामध्ये स्वतःच्या जीवनाची धन्यता त्यांनी मानली आहे.

हाती वीणा घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीस आलिंगन घालताना ते सार्‍यांना सांगतात,
‘‘एका जनार्दनाची विनंती
येऊनि मनुष्य देहाप्रती ।
करूनि भगवत भक्ती
निजात्मप्राप्ती साधावी ॥


– सौख्यदा देशपांडे

पुणे
9021517287

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

3 Comments

  1. अतिशय सुंदर लेख.
    आदरणीय सद् गुरूंचं स्मरण!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!