बौद्ध साहित्य परिषद – भूमिका

बौद्ध साहित्य परिषद - भूमिका

महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर विविध साहित्य संस्था कार्यरत असून विविध साहित्य संमेलने होत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद इ. संस्था महाराष्ट्रात तर इंदूर, उज्जैन, बडोदा, अहमदाबाद, हैद्राबाद, गुलबर्गा, धारवाड, बंगळुरू, उत्तराखंड, गोवा, दिल्ली आदी शहरांतून, बृहन्महाराष्ट्रातून साहित्य संस्था कार्यरत आहेत. याशिवाय शासकीय पातळीवर म.रा.सा.संस्कृती मंडळ, भाषा समिती, प्रकाशन समिती कार्यरत आहेत. देशाच्या पातळीवर साहित्य अकादमीसारख्या साहित्य संस्था आहेत. मराठीसाठी तर अ.भा.म.साहित्य महामंडळ कार्यरत आहे.

या सर्व संस्थांकडे नजर टाकली तर आपले स्थान कुठे आहे? असा प्रश्‍न निर्माण होतो. आपली भाषा, साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान याबाबत या संस्था कोणता न्याय आपणास देतात? त्या सर्वसमावेशक भूमिका केव्हा घेणार आहेत? साहित्य, संस्कृती संवर्धनाबाबत या संस्था आपणास ‘अस्पृश्यच’ ठेवतात.

राज्य पातळीवर असो की देश पातळीवर पालीभाषा, साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान या बाबतीत किती योजना, किती कार्यक्रम उपरोक्त संस्थांकडून आखले जातात? राबवले जातात? भारतीय भाषा, साहित्य, संस्कृतीच्या परिघात आपले स्थान नेमके कुठे आहे? या संदर्भात बौद्ध मंडळी काही विचार करतील की नाही?

पाली भाषेतील भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान इंग्रजी, सिंहली, चिनी, नेपाळी, अरबी, उर्दू, संस्कृत, जपानी, ब्रह्मी आदी देशविदेशातील भाषा व साहित्यातून अनुवादीत, भाषांतरीत झाले आहे. विशेषत: भारतातील सर्व प्रादेशिक भाषांमधून हे तत्त्वज्ञान प्रसृत झाले आहे. या तत्त्वज्ञानाचा प्रभाव जगभरातील धर्म, साहित्य, संस्कृती आणि परिवर्तनाच्या चळवळीवर झाल्याचे दिसते. याचा शोध घेऊन मांडामांड करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपली स्वतंत्र साहित्य परिषद स्थापन करून समर्थपणे, निस्पृहपणे बौद्ध साहित्याचा शोध, निर्मिती आणि संवर्धन केले पाहिजे.

महाराष्ट्र शासनाने स्वतंत्रपणे महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती नेमली आहे पण या समितीला शासन कोणतीही सकारात्मक मदत करीत नाही. कासवगतीने काम व्हावे अशीच त्यांची सुप्त इच्छा दिसते. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंड करून उठेल हे मालकाच्या भूमिकेत वावरणार्‍या शासनाला माहीत आहे! म्हणून उपरोक्त महापुरुषांचे चरित्र, लेखन, भाषणे छापून ती ‘गुलामाला’ वाचायला द्यावीत असे शासनाला वाटत नाही. ते त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत! प्रा. दत्ता भगत यांनी शासनाला पत्र लिहून हाच ‘राजीनामा’ समजावा असे कळवले. ते पत्र शासनाने जनतेसाठी खुले करावे म्हणजे मी काय म्हणतो ते लोकांना अधिक चांगले कळेल.

साहित्याची बदलती परिभाषा :
बुद्ध, कबीर आणि फुले यांचे शिष्योत्तम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समाज आणि देशाच्या हितासाठी, प्रगतीसाठी आपले रक्त आटवले. विविधांगी चळवळी उभारल्या. त्याची गोड फळे आज आपण चाखत आहोत. विशेषत: त्यांचे राष्ट्रीय कार्य आज दखलपात्र झाले आहे. साहित्याच्या संदर्भात त्यांची स्वत:ची स्वतंत्र मते होती. वेळोवेळी त्यांनी ती नोंदवली आहेत. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘‘आपली लेखणी आपल्या प्रश्‍नापुरतीच बंदिस्त करू नका. तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचं, दलितांचं, दु:खितांचं फार मोठं जग आहे हे विसरू नका. त्यांचं दु:ख, त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यासाठी झटा. त्यातच खरी मानवता आहे.’’

डॉ. बाबासाहेबांच्या या आवाहनातच सर्व काही आलं. साहित्य, स्वरूप आणि प्रयोजन सांगून त्यांनी मूल्येही सांगितलेली आहेत. ते स्वत: उत्कृष्ट मराठी आणि इंग्रजी लेखक, संपादक, पत्रकार, समीक्षक, संशोधक आणि सुंदर अशा संविधानाचे शिल्पकार होते. त्यांच्या प्रेरणेनेच ‘मिलिंद’ महाविद्यालयाची आणि ‘नागसेन’वनाची निर्मिती झाली. हे महाविद्यालय केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे नव्हते तर परिवर्तनाच्या साहित्याचे, चळवळीचे ऊर्जाकेंद्र होते. साहित्य, संस्कृती आणि संस्काराचे केंद्र होते. महाविद्यालयात आलेले बौद्ध विद्यार्थी आणि अन्य उपेक्षित भटके, वंचित विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय ‘आधारकेंद्र’ होते. मिलिंद महाविद्यालयाची नियतकालिके, वार्षिकांक, विशेषांक, तत्कालीन दलित साहित्याची ‘गंगोत्री’ होत. त्या साहित्याला अपघाताने ‘दलित साहित्य’ म्हटले गेले. प्रा. ल. बा. रायमाने यांनी मिलिंद साहित्य, बौद्ध साहित्य म्हटले असते तर तेच नाव आज रुढ झाले असते!
(पहा आधारस्तंभ, ल. बा. रायमाने गौरवग्रंथ, लोकवाङमय प्रकाशन, 2012) डॉ. बाबासाहेबांनी धर्मांतरापूर्वी (1950) महाविद्यालयास ‘मिलिंद’ व परिसरास ‘नागसेनवन’ ही नावे दिली. यातून बौद्ध साहित्य, संस्कृती आणि तत्त्वज्ञान ध्वनित होत होते.

मिलिंद साहित्य सभा स्थापन करून साहित्य निर्मितीसाठी विशेष प्रयत्न त्याकाळी झाले. मिलिंदच्या नियतकालिकांतून आरंभी ‘कविता’ आणि त्यानंतर ‘स्वकथने’ मोठ्या प्रमाणावर आली. याला त्यावेळी दलित साहित्य म्हटले गेले. नंतर मात्र क्रमाने या साहित्य प्रवाहाचे नाव बदलत गेले. दलित साहित्य-आंबेडकरी साहित्य-आंबेडकरवादी साहित्य-प्रवर्तन साहित्य-परिवर्तन साहित्य-सम्यक साहित्य-समता साहित्य, प्रबुद्ध साहित्य-पुरोगामी साहित्य-फुले, शाहू, आंबेडकर साहित्य-बौद्ध साहित्य आदी नावे वापरली जात आहेत. अलीकडे एक बाब आपल्या नजरेतून सुटू शकली नाही. ते म्हणजे ‘दलित’ शब्द वापरणे सर्वजण मोठ्या कौशल्याने टाळत आहेत. गळ्यातील लोढणे किंवा दगड अलगद बाजूला काढावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. डॉ. बाबासाहेबांनी धर्मांतरापूर्वी बौद्ध साहित्य आणि संस्कृतीचा फार खोल व चिकित्सकपणे अभ्यास केला होता हे आपल्या लक्षात धर्मांतरानंतर काही वर्षांनी आले. 25 डिसेंबर 1954 ला त्यांनी देहू रोड येथे बांधलेल्या समाजमंदिरात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली व अतिशय मुलगामी विचार त्यावेळी मांडले. ‘मिलिंद’, ‘नागसेन’, ‘सिद्धार्थ’, ‘राजगृह’ ही नावे धर्मांतरापूर्वीचीच. आपली राजमुद्रा, आपला राष्ट्रध्वज, आपल्या देशाचे ब्रिदवाक्य, देशाचे नाव, राष्ट्रपती भवनातील पालिवचन या सर्व बाबी धर्मांतरापूर्वीच्याच! याचा अर्थ आपण ‘बौद्ध साहित्य’ या संज्ञेचा वापर उशिराच करीत आहोत असे म्हणावे लागेल. आज महाराष्ट्र आणि देशातील सर्व लेखक, समीक्षक आणि विचारवंत मंडळी आंबेडकर साहित्य-आंबेडकरवादी साहित्य असाच शब्द वापरत आहेत. ‘बौद्ध साहित्य’ असा शब्द वापरताना अनेकांना संकोच वाटत असावा. फार तुरळकपणे हा शब्द वापरला जात आहे.

‘बौद्ध साहित्य’ यातील ‘बौद्ध’ शब्द धार्मिक नाही. बौद्ध साहित्य, बौद्ध वाङ् मय, पाली साहित्य म्हणताना भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान व त्या तत्त्वज्ञानावर, विचारावर, सिद्धांतावर आधारित असलेले सर्व वाङ्मय किंवा साहित्य त्यात अनुत्सुत्य आहे. बुद्धाने केलेला उपदेश ‘त्रिपिटकात’ आहे. तो एक महान विशाल ग्रंथ आहे. डॉ. बाबासाहेबांनी अंतिम पर्वात पूर्ण केलेला पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रसिद्ध झालेला ‘भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म’ हा इंग्रजी, हिंदी, मराठी आणि बहुधा आता सर्व भारतीय भाषांत अनुवादीत झालेला महान असा ग्रंथ आहे. बुद्ध तत्त्वज्ञानाचा साररुप ग्रंथ म्हणून संपूर्ण विश्व त्याकडे पाहते आहे. भाषा, साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि रचनासौंदर्याच्या दृष्टिने हा ग्रंथ प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला आहे. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी या ग्रंथाचा प्रथम हिंदी अनुवाद केला व या ग्रंथाला ‘तळटीपा’ दिल्या. त्यामुळे समीक्षकांच्या व अभ्यासकांच्या शंका-कुशंकाना चोख उत्तर मिळाले.
(डॉ.बाबासाहेबांनी आपल्या मूळ इंग्रजी ग्रंथात सौंदर्याला बाधा नको म्हणून तळटीपा टाळल्या होत्या.)

भारतीय साहित्यात आणि साठोत्तरी मराठी साहित्यात बुद्ध, कबीर, रविदास, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम यांचे तत्त्वज्ञान कलात्मकरीत्या अथवा चिंतनात्मकरीत्या प्रवाहीपणाने आले आहे. अनेक कलाकृतींचे अधिष्ठान फुले-शाहू-आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान आहे. याबद्दल वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. हिंदी साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. तशी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. मराठी संत साहित्यावर, महानुभाव साहित्यावर बौद्ध साहित्याचा, तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे. याबद्दल संशोधनात्मक लेखन आता उपलब्ध झाले आहे. धम्मचक्र प्रवर्तनानंतर मोठ्या संख्येने ‘बौद्ध साहित्य’ निर्माण झाले आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता या पंचतत्त्वज्ञानावर हे साहित्य आधारलेले आहे. साहित्याचे हे नवे ‘पंचशील’ बौद्ध साहित्याचे अधिष्ठान आहे. भारतातील मोठ्या समूहाला या मूल्यांपासून वंचित ठेवल्याने हा समूह आता या मूल्यांचा आग्रहाने स्वीकार करतो आणि समदु:खी समूहांना ही मूल्ये स्वीकारण्यासाठी नम्र आग्रह धरतो आहे.

आता आपण या नव्या साहित्य प्रवाहास अन्य कोणतेही नामाभिधान देण्यापेक्षा थेट ‘बौद्ध साहित्य’ असेच म्हटले पाहिजे व जी संमेलने घेऊ त्या संमेलनालाही ‘बौद्ध साहित्य संमेलन’ असेच म्हटले पाहिजे. आजकाल आपली साहित्य संमेलने विविध नावांनी संपन्न होत आहेत. उदा. अ. भा. दलित साहित्य संमेलन, सत्यशोधक साहित्य संमेलन, संविधान साहित्य संमेलन, अ. भा. संत साहित्य संमेलन, बंधुता साहित्य संंमेलन, परिवर्तन साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर साहित्य संमेलन, समतावादी साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, कुणबी साहित्य संमेलन, ओ.बी.सी. साहित्य संमेलन, गुरु रविदास साहित्य संमेलन, गुणीजन साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, सावरकर साहित्य संमेलन, जल साहित्य संमेलन, कामगार साहित्य संमेलन, दुर्ग साहित्य संमेलन, सम्यक साहित्य संमेलन इत्यादी परिभाषा धारण करुन साहित्य संमेलने होत आहेत. (पूर्वी बौद्ध साहित्य संमेलने झाली.) मला वाटते काही संमेलनांचा अपवाद केला तर ती बुद्ध, कबीर, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे नाते सांगणारीच आहेत. मग एवढी विविध नावे वापरण्यापेक्षा आता आपण सर्वांनी मिळून व ठरवून बौद्ध साहित्य संमेलन हेच नाव वापरले पाहिजे. हा शब्द अधिक व्यापक आहे. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भाने नटलेला आहे. वरील सर्व साहित्य संमेलनांची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत हे निर्विवाद सत्य आहे पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध, कबीर आणि फुले यांचे शिष्योत्तम आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नसानसात बौद्ध साहित्य, संस्कृती भिनली होती. तत्त्ववेत्ता असलेल्या बुद्धावरील त्यांचे प्रेम आपण पाहिले आहे. अनुभवले आहे. भारतातील काही भोंदूंची प्रवृत्ती अशी आहे की आपण जे फळ खातो ते गोड आहे एवढेच सांगितले जाते पण ते कोणत्या झाडाचे आहे? हे मात्र सांगितले जात नाही. हा कृतघ्नपणा नव्हे काय? हा वृक्ष आपणास भरपूर प्राणवायू देतो, थंड सावली देतो एवढेच सांगितले जाते पण तो वृक्ष बोधिवृक्ष आहे हे मात्र लपवून ठेवले जाते. भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. सर्व तत्त्ववेत्त्यावर आहे, विचारवंतांवर आहे. (विस्तारभयास्तव ती यादी येथे देता येणार नाही.)

आपल्या जगण्याचे अधिष्ठानच मुळी बौद्धिक प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता असली पाहिजे. आज मात्र याचा अभाव दिसून येतो. आज संमेलने होताहेत. व्याख्याने होताहेत, प्रवचने दिली जात आहेत. त्यातील आशय, विचारसूत्र, यापूर्वीच आपल्या महापुरुषांनी सांगितलेली आहेत. त्यांचे नाव सांगायला आधुनिक महाभागांना संकोच वाटतो. आपली जबाबदारी म्हणूनच वाढली आहे. ज्या प्रज्ञासूर्याचे आपण वैचारिक वारसदार आहोत, त्याच्याशी इमान राखले पाहिजे. सूर्यफुलासारखे आपण ‘सूर्योन्मुख’ झालेच पाहिजे.

आपल्या सर्व महापुरुषांनी ‘माणूस’ श्रेष्ठ आहे हे आग्रहपूर्वक व निर्धारपूर्वक मांडले आहे. माणसाला दुय्यम स्थान देणारे कोणतेही तत्त्वज्ञान आपण झुरळासारखे झटकले पाहिजे. या पृथ्वीतलावरील कोणतीही व्यवस्था, कोणताही धर्म, कोणतेही तत्त्वज्ञान माणसांसाठी असावे, माणूस सर्वाआधी होता, त्यानेच सूर्याला सूर्य म्हटले, पृथ्वीला पृथ्वी म्हटले तोच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. आनंद आणि प्रबोधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हेच साहित्याचेे प्रयोजन असावे. अत्त दीप भव, सत्यमेव जयते, तमसो मा ज्योतिर्गमय हे साहित्याचे प्रयोजन असावे. अधिष्ठान असावे.

25 डिसेंबर 1954, 15 ऑगस्ट 1956 आणि 25-26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणांची नोंद जिज्ञासूंनी घ्यावी. ती मूळातून वाचावी. मुक्ता साळवेच्या निबंधातील प्रश्‍न आजही जिवंत वाटतात. ते पुन्हा पुन्हा वाचावेत. ‘शब्दची वाटू धन जनलोका’ हाच ध्यास बाळगावा. ‘तैवान’ची माणसं भारताकडे पाय करुन झोपत नाहीत. जपान कोणत्याही संकटातून पुन्हा उभा राहतो याचे कारण ‘तथागताचा’ प्रभाव.

तथागतांचा प्रभाव पाचशे वर्षानंतर जन्मलेल्या येशूवर आणि हजार वर्षानंतर जन्मलेल्या महंमद पैगंबरावर आहे. तिरुपती येथील बालाजी आणि पंढरपूर येथील विठ्ठल हे नि:शस्त्र देव आहेत. ते श्रमण संस्कृतीची प्रतिके असावीत. न्यूटनच्याही अगोदर बुद्धाने विज्ञानाचा पाया घातला. फ्राईडच्या अगोदर मनाचा सर्वांगाने विचार केला. खगोलशास्त्र आणि आयुर्वेद ही त्यांचीच देणगी होय. ईश्वर, दैव, आत्मा या बाबी नम्रपणे नाकारल्या.

एकेकाळी पाली ही ज्ञानभाषा होती. बुद्धाने तत्कालीन लोकभाषेत आपले विचार मांडले. त्या भाषेचे नाव कालांतराने पाली झाले असावे. त्या लोकभाषेतील ज्ञान जगातील सर्व लोकभाषेत गेले. विशेषत: इंग्रजीत. म्हणून आज इंग्रजीला ज्ञानभाषा म्हणतात. पालि साहित्य, संस्कृती आणि तत्त्वज्ञान ही आपली अभिमान वाटावी अशी परंपरा आहे. ती आपण जपलीच पाहिजे. त्याचे वहन केले पाहिजे. त्यासाठी आपण ‘बौद्ध साहित्य परिषद’ ही साहित्यसंस्था स्थापन केली आहे. बौद्ध साहित्य, संस्कृती आणि विचारांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. मद्रासचे रिपब्लिकन नेते एन. शिवराज म्हणाले होते, ‘जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर बलवान असतील.’ त्यांचे भाकित खरे ठरले आहे.

आज साहित्य संमेलने व साहित्य चळवळी थांबल्या आहेत. साहित्य निर्मिती, संशोधन आणि बौद्ध साहित्य संमेलने यासाठी आपले सक्रिय योगदान आवश्यक आहे. राहुल सांस्कृत्यायन आणि आनंद कौसल्यायन यांनी जी मेहनत घेतली, संशोधन केले आणि जे भाष्य केले ते आदर्शवत आणि मार्गदर्शक आहे. भारतीय आणि जागतिक पातळीवरील बौद्ध साहित्यिकांनी जी उंची गाठली आहे ती आपणासाठी भूषणावह आहे. ‘बौद्ध साहित्य’ म्हणजेच सगळ्या मानवजातीला भारताने दिलेली अमूल्य देणगी आहे. आपण या साहित्य प्रवाहाचे वारसदार आहोत याचे भान ठेवून हा प्रवाह गतीमान करु या.
– प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे
अंबेजोगाई
चलभाष : 9422720952

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा