सद्गुरू… सौख्याचा सागरू!

सद्गुरू... सौख्याचा सागरू!

एखादं बाळ जन्माला आल्यावर जेव्हा त्याच्या पाठीत बळ येतं, तेव्हा ते पालथं पडतं. मग काही दिवसांनी त्याच्या हातात बळ आलं की ते रांगायला लागतं… आणि कालांतरानं त्या बाळाच्या पायात बळ येतं तेव्हा ते चालायला शिकतं. त्यावेळी ते बाळ आपलं पहिलं पाऊल आपल्या आईच्या साक्षीनं टाकतं!

मग जसजसं बाळ मोठं होतं, तसतसं ते जास्तीत जास्त वेळ आपल्या आईच्या सानिध्यातच आपलं बालपण उपभोगत असतं. त्यावेळी त्या नकळत्या वयात त्याच्यावर संस्कार रुजले जातात. नंतर काही वर्षानं तो जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी आपल्या आईला विसरू शकत नाही कारण जीवनातील पहिला गुरू त्याच्यासाठी त्याची प्रिय आईच असते.

आयुष्य जगताना प्रत्येकालाच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कधी कधी आपलं जीवन विलक्षण गुंतागुंतीचं होऊन जातं. अशावेळी मग आपल्या आईवडिलांची आपल्याला प्रकर्षानं आठवण येते. त्यांनी वेळोवेळी केलेलं मोलाचं मार्गदर्शन, आपल्यावर रूजवलेले संस्कार आपल्याला आठवतात कारण तेच आपले ‘खरे गुरू’ असतात. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या आईवडिलांनी केलेलं मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरत असतं. आपल्या एकंदरीत आयुष्यातील त्यांचं योगदान हे इतरांपेक्षा खूपच मोठं असतं. म्हणूनच त्यांची तुलना आपण इतर क्षेत्रातील गुरूंसोबत कधीही करू शकत नाही.

काही लोक म्हणतात, शाळेत शिकवणारे शिक्षक हेच आपले पहिले गुरू असतात. मात्र मला तरी वैयक्तिकरित्या हे मान्य नाही, हे मी येथे नम्रपणे नमूद करतो! कारण कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता शिकवणारे ‘गुरू’ आजतरी या भूतलावर सापडणार नाहीत. याउलट आपले आईवडिल अगदी निस्वार्थ भावनेनं आपल्याला आयुष्याचे प्राथमिक धडे देत असतात. आपल्यावर योग्य ते संस्कार करताना, वाढत्या वयानुसार मार्गदर्शन करताना आपल्या मुलांचा उत्कर्ष व्हावा हेच आईवडिलांना अभिप्रेत असतं. आपल्या मुलांनी त्यांचं ध्येय साध्य करावं म्हणून आईबाबा अतोनात कष्ट घेत असतात. मुलांच्या जडणघडणीसाठीच त्यांचा सगळा आटापिटा असतो. एकप्रकारचा ध्यास घेऊनच ते आपलं दायित्व पार पाडत असतात. आपण जरी कमी शिकलो तरी आपल्या मुलांनी शिक्षणाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करावीत हीच आईवडिलांची आंतरिक इच्छा असते. त्यासाठी, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी ते आपला फाटका संसार कमालीचा नेटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आई आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सकारात्मकतेनं सामोरं जाऊन, वेळप्रसंगी काटकसर करत, येणारी परिस्थिती अनुकूल कशी करता येईल हे शिकवते तर वडील आपल्या मुलांना व्यवहारज्ञानाचे धडे देतात. येणार्‍या प्रसंगांना धीटपणे, निर्भयपणे कसं सामोरं जावं हे शिकवतात.

दादा! आमचे आदरणीय वडील, आमचे पूजनीय सद्गुरू! अत्यंत बिकट परिस्थितीत जीवनाच्या सारीपाटावरील वेगवेगळ्या सोंगट्या यशस्वीपणे आणि धिरोदात्तपणे शुन्यातून निर्माण केलेलं विश्व त्यांनी समृद्ध केलं! दुर्दैवानं अगदी नकळत्या वयातच ते पितृछत्राला पारखे झाले! त्यामुळे बालवयापासून त्यांनी आपल्या आईसोबत छोटी-मोठी कामं केली. प्रसंगी हमाली करत आईच्या संसारात मदत केली. ‘हातावरचं पोट’ अशी अवस्था असल्यानं काबाडकष्ट म्हणजेच जीवन हेच जणू त्यांच्या जगण्याचं समीकरण होऊन गेलं. त्यामुळं दुर्दैवानं त्यांचं शिक्षण अपुरं राहिलं! काही दिवसांनी मात्र त्यांच्या सुदैवानं किशोरवयापासूनच त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अनमोल सहवास लाभला. ‘अरे कशाला रिकामा फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ!’ आणि ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे!’ या राष्ट्रसंतांच्या भजनांनी त्यावेळी दादांवर मोहिनी घातली आणि ते त्यांचेच होऊन गेले. राष्ट्रसंतांना मनोमनी आपल्या ह्रदयात गुरुस्थानी बसवलं! मग दिवसभर काबाडकष्ट करून आईला मदत करणं आणि रात्री महाराजांच्या भजन, प्रवचनाला आवर्जून हजेरी लावणं असा त्यांचा दिनक्रमच ठरुन गेला.

ज्यावेळी राष्ट्रसंतांचा बाहेरगावी दौरा असायचा तेव्हा अतिशय आतूर होऊन दादा त्यांची वाट बघायचे. त्यांची भजनं ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसलेले असायचे. अशातच एकदा अमरावती जिल्ह्याचा दौरा आटोपून राष्ट्रसंत नागपूरला परत येत असल्याची बातमी दादांना मिळाली. मग केव्हा एकदा महाराजांचं दर्शन घेतो अशी त्यांची अवस्था झाली! त्यादिवशी रात्री नागपूरच्या महाल विभागातील अयाचित मंदिराजवळच्या पटांगणात राष्ट्रसंतांचे भजन, कीर्तन होणार होते. मात्र बातमी ऐकल्यापासून दादांना धीर धरवेना. त्यांना वाटलं, आपण दुपारीच जावं… महाराज प्रवास करून थकले असणार, त्यांची अनुमती घेऊन त्यांचे पाय चेपून द्यावे असंही दादांना मनोमन वाटलं! मग काय! कानात वारु शिरल्याप्रमाणं त्यांनी धूम ठोकली आणि पोहोचले थेट अयाचित वाड्याजवळ! तेथे पोहचताच राष्ट्रसंतांची प्रतीक्षा करत असलेले काही लोक त्यांना दिसले. थोड्या वेळातच मोजक्या सहकार्‍यांसह राष्ट्रसंत वाड्याच्या प्रवेशद्वाराकडे येताना सगळ्यांना दिसले. शेजारीच उभे असलेले दादा लगेच प्रवेशद्वाराजवळ गेले. त्यांची अन् राष्ट्रसंतांची नजरानजर झाली. चालताचालता वाड्यात शिरताना त्यांनी दादांच्या खांद्यावर अचानक हात ठेवला आणि म्हणाले,

‘‘अरे तुला माझे पाय चेपायचे होते ना! मग चल लवकर…’’

महाराजांचं बोलणं कानावर पडताच दादा आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडं बघतच राहिले अन् डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. मग त्यादिवशी दादांची आंतरिक इच्छा पूर्ण झाली. त्यांना कृतकत्य झाल्याचं मनस्वी समाधान लाभलं! (हा प्रसंग स्वतः दादा तल्लीन होऊन सांगायचे.)

अयाचित मंदिराशेजारच्या चौकात एक नवीनच दारूचा गुत्ता सुरू झाला होता. तेथे दिवसभर गर्दी व्हायला लागली. सरळ, साध्या लोकांना सुद्धा दारुचं आकर्षण वाटायला लागलं. एकंदरीत जनजीवन विस्कळीत होऊ लागलं. त्यामुळे तो गुत्ता बंद व्हावा म्हणून समाजप्रबोधनाच्या भावनेतून आयोजकांनी रात्री राष्ट्रसंतांचं भजन-कीर्तन आयोजित केलं होतं. अंधार पडू लागताच अयाचित मंदिरालगतच्या पटांगणात श्रोते व प्रेक्षकांची गर्दी जमू लागली. दादा आणि त्यांच्या मित्रांनी वेळेआधीच पुढील जागा पटकावली होती. अगदी वेळेवर राष्ट्रसंत आपल्या सहकार्‍यासह मंचावर स्थानापन्न झाले अन् इतका वेळ गोंधळ करत असलेले श्रोते एकदम शांत झाले. आता महाराजांच्या मुखातून निघणारे शब्द कधी एकदा कानावर पडतात अशी त्यांची अवस्था झाली होती! मग आपल्या प्रिय खंजेरीवर थाप देऊन राष्ट्रसंतांनी भजनाला सुरूवात केली… घडी घडी मनी तुझे नाम जपावे रे… तेथे उपस्थित श्रोते शब्द न् शब्द आपल्या कानात साठवत डोलू लागले. दादा आणि त्यांचे मित्र सुद्धा तल्लीन होऊन भजन ऐकत होते. भजन संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपल्या खड्या आवाजात अत्यंत मौलिक समाजप्रबोधन करून राष्ट्रसंतांनी पुढील भजनाला सुरूवात केली,
‘‘व्यसने सगळी सोडून द्या ना… सरळपणाचे जीवन जगा ना..!’’ मंत्रमुग्ध होऊन श्रोते डोलू लागले. काहींच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहू लागले, दादांचीही अवस्था वेगळी नव्हती! या भजनाचा समाजमनावर असा काही परिणाम झाला… दारूच्या गुत्त्यावर जाणार्‍यांपैकी बरेचसे राष्ट्रसंतांच्या पाया पडायला मंचाजवळ गर्दी करु लागले. तेव्हा त्यांना हाताच्या इशार्‍यानंच महाराजांनी थांबवलं. मग सर्वांना तिथं प्रतिज्ञा घ्यायला लावली, ‘‘आजपासून कधीही दारूला शिवणार नाही. कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही!’’ त्यानंतर त्यांनी उपस्थित श्रोत्यांना उद्देशून निक्षून सांगितलं,

‘‘पाया त्यांनीच पडावं, ज्यांनी आपल्या कर्माला चुकावं. बंधूंनो, आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे केलं तर कुणाच्याही पाया पडायची गरज भासणार नाही!’’

आपल्या कर्मावर, मेहनतीवर असलेला विश्वास आणि राष्ट्रसंतांवरील अढळ श्रध्दा असल्यानं दादांच्या लग्न समारंभाला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद द्यायला राष्ट्रसंत आवर्जून उपस्थित होते असं दादा मोठ्या अभिमानानं सांगायचे. महाराजांच्या गुरूपरंपरेचा वारसा लाभल्यानं दादांनी राष्ट्रसंतांचं लेखन साहित्य गावागावात जाऊन वाटप करणं सुरू केलं. वेळप्रसंगी स्वतःजवळची रोख रक्कम खर्च करून उत्साहानं त्यांनी हे मोलाचं कार्य केलं. ‘ग्रामगीता’ या राष्ट्रसंतांच्या अतिशय प्रेरक व अमूल्य ग्रंथाच्या असंख्य प्रती दादांनी स्वखर्चाने छापून महाराजांच्या ग्रामजयंती आणि पुण्यतिथी महोत्सवात भाविकांना भेट स्वरूपात वाटल्या. पुण्यतिथी महोत्सव हिवाळ्यात येत असल्यानं गुरूकुंज मोझरी येथे जाऊन दादांनी अनेक गरजूंना वूलनचे स्वेटरही पुरवले. त्याचप्रमाणे सामुदायिक प्रार्थनेची पत्रकं छापून, लॅमिनेशन करून असंख्य लोकांना ते सहर्ष देत असत. घरी आलेली कुठलीही व्यक्ती, मग ती ओळखीची असो की अनोळखी असो, कधीही रिकाम्या हातानं परत गेली नाही… अगदी प्राणी, पक्षी सुद्धा!

दादा म्हणजे आमच्यासाठी संस्काराचं चालतं बोलतं विद्यापीठच… अजूनही ते सदैव आमच्या आसपास असल्याचंच जाणवतं! कितीतरी वेळा याची अनुभूती आणि प्रचिती आलेली आहे. जीवनात कुठल्याही प्रकारचा बिकट प्रसंग आला तरी तो सहज निभावून जाणारच हा दृढ विश्वास आहे… तो दादांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळं आणि बहुमोल संस्कारामुळंच!

आज इतक्या दिवसानंतर, वर्षांनंतर सुद्धा दादांची आठवण स्मृतिपटलावर कायमच ताजी आहे. त्यांनी आमच्यासाठी घेतलेले अपार कष्ट, प्रतिकूल परिस्थितीत तसेच आजारी अवस्थेतही कुटुंबासाठी सोसलेल्या हालअपेष्टांना खरंतर तोडच नाही. त्यांचं एक अतिशय आवडतं गाणं होतं, ‘मदर इंडिया’ या सिनेमातलं… ‘दुनिया मे हम आये है तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहर पीना ही पडेगा।’

दादांचं कर्ममय आदर्श जीवन, सतत हसतमुख असणं, सदा शांत, निर्मळ स्वभाव आम्हा सगळ्यांसाठी नित्य प्रेरणादायी ठरत आहे यात तिळमात्र शंका नाही. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ‘जीवन शिक्षण’ या अध्यायातून आम्ही विद्यार्थी जीवनात काही ना काहीतरी आत्मसात करावं हीच त्यांची सुरूवातीपासूनची तळमळ होती! या ‘जीवन शिक्षण’मधील …
मुलात एखादा तरी असावा गुण,
ज्याने पोट भरेल त्यात निपुण।
न ये संसारामाजी अडचण।
कोणत्याही परी॥
मुलगी बहु शिकली शाळेमाझारी,
परि स्वयंपाक करता न ये घरी।
काय करावी विद्याचातुरी।
कामाविण लंगडी ती॥
जीवनाचे प्रत्येक अंग।
शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग।
काम करावयाची चांग।
लाज नसावी विद्यार्थ्या॥

यासारख्या स्वावलंबनाचा पुरस्कार करणार्‍या आणि सदैव प्रेरित करणार्‍या ओव्या आपल्या सर्वांसाठीच अनुकरणीय आहेत.

आमच्या दादांनी आयुष्यभर खर्‍याअर्थाने कर्मयोगाला प्राधान्य दिले. कधीही ते स्वस्थ बसले नाहीत. सतत कुठल्या ना कुठल्या कामात ते व्यग्र असायचे. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. त्यांनी केलेल्या अनुपम कार्याची, त्यांच्या दातृत्वाची, त्यांच्या त्यागाची, त्यांच्या निर्मोही जीवनाची कुणीही बरोबरी करू शकणार नाही. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सतत कार्यरत राहण्याचा मनापासून संकल्प केलेला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निस्वार्थ आणि प्रामाणिक प्रयत्न करणे हीच या गुरूपौर्णिमेच्या पवित्र पर्वात दादांसाठी खरी आदरांजली ठरेल! दादांच्या निर्मळ आणि पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

वंदनीय राष्ट्रसंतांच्या प्रेरणादायी स्मृतीस विनम्र अभिवादन!
॥ सद्गुरू नाथ महाराज की जय॥

-विनोद श्रा. पंचभाई
पुणे
9923797725

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “सद्गुरू… सौख्याचा सागरू!”

  1. Vinod s.Panchbhai

    खूपच छान… धन्यवाद!
    जय गुरू….।

  2. Vishnu Ganpatrao Bhoyar

    नमस्कार, मी आपला दादा यांच्या बाबतचा लेख वाचला,खुबच सुंदर आहे, आणी खरे प्रथम गुरु हे आई वडीच यात तिलभर शंका नाही.दादांंना गुरुपोरणिमा करीता आदरांजली व विनम्र अभिवादन!!
    आपला
    विष्णु गणपतराव भोयर
    बुटीबोरी ,नागपुर

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा