विज्ञान हे शतकानुशतकांपासून सिद्धान्त, प्रयोग आणि निरीक्षण या निकषांवर उत्क्रांत झालेली प्रक्रिया आहे. गोल गोल फिरत वर जाणाऱ्या आणि न संपणाऱ्या जिन्यासारखी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. निसर्ग समजून घेताना एखादी नवी गोष्ट समजणे म्हणजेच या न संपणाऱ्या जिन्याची एखादी पायरी वर चढण्यासारखे आहे. जेव्हा अशा जिन्यावरील एखादी पायरी आपण चढतो, तेव्हा ज्ञानाच्या अभावामुळे माहितीच नसलेले नवे मुद्दे आणि प्रश्न आ वासून उभे राहतात, ज्यांना प्रश्न म्हणून हाताळण्यासाठी आपली पूर्वीची समज पुरेशी नसते. — डॉ. जयंत नारळीकर
विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणित विषयाचे विभागप्रमुख, प्राध्यापक होते. सुमतीताई ही त्यांची पत्नी! त्यांनी मुंबई विद्यापीठाची संस्कृतची पदवी प्राप्त केली होती. सोबतच इंग्रजी साहित्याची त्यांना आवड होती. अत्यंत शालीन, सुसंस्कृत व सुशिक्षित महिला म्हणून त्यांची ख्याती होती. त्या संस्कृत शिक्षिका होत्या. अशा उच्चशिक्षित दांपत्याच्या पोटी १९ जुलै १९३८ रोजी पुत्ररत्न जन्माला आले. मुलाचे नाव ‘जयंत’ ठेवण्यात आले. साधारणपणे जयंत नावाचा अर्थ ‘विजयी’, ‘ताऱ्यासारखा चमकणारा’, ‘आशावादी’ असा! नारळीकर पती-पत्नीला तेव्हा या नावाचा अर्थ माहीत असेलही, परंतु त्या नावाला अक्षरशः सार्थक करणारी, आकाशाशी नातं जोडणारी अद्वितीय अशी कामगिरी त्यांच्या पुत्राने केली आणि खरेच जणू आकाशाला गवसणी घातली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
जयंत लहानपणापासूनच अत्यंत हुशार, प्रतिभाशाली म्हणून ओळखले जात. प्राथमिक शिक्षण तसेच महाविद्यालयीन परीक्षेत त्यांचा नेहमी प्रथम क्रमांक असे. गणित त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. सोबत वाचनाचा छंद त्यांनी जोपासला होता. कदाचित या छंदातून भविष्यातील लेखकाची जडणघडण होत असावी. १९५९ या वर्षी जयंत बनारस हिंदू विद्यापीठाची बीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. जयंत यांचे पदवी अभ्यासक्रमात गणित व खगोलीय पदार्थ विज्ञान हे विशेष विषय होते. जयंत यांची बुद्धिमत्ता, ज्ञानलालसा लक्षात घेता जयंतने उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांचे मामा डॉक्टर वसंतराव हुजूरबाजार यांचीही तशीच इच्छा होती. त्याप्रमाणे जयंत इंग्लंडला गेले. तिथे त्यांना केंद्रीय विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. दोन वर्षांत ते एम.एस.सी. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.
केंब्रिज विद्यापीठात फेडरिक हॉईल हे प्राध्यापक होते. ते आकाशात वस्तूच्या स्थिती आणि गतीवर संशोधन करत होते. जयंत नारळीकर यांनी फेडरिक हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करण्याचा निश्चय केला. फेडरिक यांनीही जयंत यांना भरपूर मार्गदर्शन केले. १९६३ साली त्यांनी परिश्रमपूर्वक आपले ध्येय गाठताना केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केली. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, आकर्षक आकाशास्तव, वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण, सृष्टीची निर्मिती हे जयंत यांचे विषय होते.
गणित विषयाची ही ट्रायपोस ही अत्यंत कठीण परीक्षा ते उत्तीर्ण झाले. खगोलशास्त्रातील त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या संशोधनासाठी त्यांना प्रतिष्ठेचे लाभलेले टायसन पदक आणि स्मिथ पारितोषिक त्यांना बहाल करण्यात आले. सोबतच रॅंगलर ह्या पदवीने त्यांना गौरविण्यात आले.
डॉक्टर जयंत नारळीकर अनेक वर्षे परदेशात असले तरीही त्यांची नाळ आपल्या देशाशी जुळलेली होती. आपल्या देशाप्रती आपले काही कर्तव्य आहे, देशासाठी – देशबांधवांसाठी काहीतरी करावे हा विचार करून ते भारतात परतले. त्यांच्या शिक्षणाचा लाभ आपल्या संस्थेच्या माध्यमातून व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेवून १९७२ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
जयंत नारळीकर यांचा १९६६ साली मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी विवाह झाला. गीता, गिरिजा व लीलावती या त्यांच्या मुली! नारळीकरांना लहान मुलांविषयी विलक्षण जिव्हाळा, कौतुक! त्यांना मुलं नेहमी कधी कार्यक्रमांमध्ये तर कधी पत्र पाठवून नेहमी प्रश्न विचारत. त्यांच्या प्रश्नांना ते स्वतः उत्तरे देत. पत्र पाठविण्यासाठी ते स्वतःचा वेळ राखून ठेवत.
त्या संस्थेत संशोधन आणि अध्यापन या कार्याव्यतिरिक्त डॉक्टर विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. यासोबतच नारळीकर यांनी आणखी एक महत्त्वाचे कार्य केले. विद्यार्थ्यांना, लोकांना विज्ञान विशेषतः खगोल विज्ञानाची माहिती मिळावी, बोजड विषय सर्वांपर्यंत पोहोचावेत, हे विषय लोकप्रिय व्हावेत म्हणून त्यांनी ‘आकाशाची जडले नाते’ हे पुस्तक लिहून मराठी भाषेचे दालन समृद्ध केले. त्यानंतर विज्ञानाची गोडी वाढावी, विज्ञान सोप्या भाषेत वाचकांच्या हाती जावे, घरोघरी जावे म्हणून नारळीकरांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या. त्यांची साहित्य विषयक अनमोल, विज्ञाननिष्ठ कामगिरी विचारात घेऊन नाशिक येथे झालेल्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते साहित्य संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. तेव्हा संमेलन आयोजक अध्यक्षांसाठी असलेल्या एक लाख रुपयांचा धनादेश घेऊन त्यांच्या घरी गेले. तेव्हा विनम्रतेने तो धनादेश परत करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, “करोनाच्या काळात कार्यक्रमांवर असलेल्या बंधनांमुळे तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास करून कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने हा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत करत आहे. तो निधी तुम्ही इतर साहित्यिक उपक्रमांसाठी वापरा. ग्रामीण भागातील संस्थांना ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगा. त्यासाठी जरूर उपस्थित राहीन.”
कृष्णविवर, नौलखा हार, धूमकेतू या प्रसिद्ध कथांसह जयंत नारळीकर यांच्या कथासंग्रहात ‘ओ लास्ट विकल्प’, ‘उजव्या सोंडेचा गणेश’, ‘अहंकार’, ‘विषाणू’, ‘पुत्रवती भव’, ‘टाईम मशीनचा करिष्मा’, ‘ट्रॉयचा घोडा’, ‘स्फोटाची भेट’, ‘छुपा तारा’ इत्यादी अनेक कथांचा समावेश आहे.
जयंत नारळीकर यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये विज्ञान विषयक भरपूर लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या लेखांची संख्या अकराशेपेक्षा जास्त आहे. नारळीकर यांनी लिहिलेली विविध पुस्तके बंगाली, तेलगू, कन्नड, हिंदी, मल्याळम आणि गुजराती या भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. तसेच ग्रीक, इटालियन, रशियन, पोलिश, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश आणि चिनी इत्यादी परदेशी भाषांमध्येही त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. यावरून जयंत नारळीकर यांच्या लेखनाचे महत्त्व, उपयोगिता लक्षात यावी.
विशेष म्हणजे जयंत नारळीकर यांनी ‘चार नगरांतले माझे विश्व’, ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसं’, ‘समग्र जयंत नारळीकर’ ही आत्मचरित्रं लिहिली आहेत. नारळीकर यांनी लिहिलेल्या ‘चला जाऊ अवकाश सफरीला’ या विज्ञान कथांना मुलांवर अनोखी मोहिनी घातली होती. विद्यार्थ्यांमध्ये या कथा विशेष लोकप्रिय होत्या. ‘यक्षांची देणगी’ या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
नारळीकर यांनी मराठी वाचकांना विज्ञानकथेची गोडी लावली. नारळीकर म्हणाले, ‘विज्ञानाची गोळी कडू लागत असेल तर त्याला साखरेचं कोटिंग म्हणजे कथेचं रूप देणं चांगलं.’
नारळीकरांचे संशोधन, त्यांनी बजावलेली महत्त्वाची कामगिरी यामुळे त्यांच्याकडे विविध मानसन्मान चालत आले. यात भारत सरकारचे पद्मविभूषण, पद्मभूषण, बनारस हिंदू, रुरकी, कोलकाता आणि कल्याणी विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट, साहित्य अकादमी पुरस्कार, एम. पी. बिर्ला पुरस्कार, भटनागर पुरस्कार, फ्रेंच खगोलीय संस्थेचा प्रिक्स जान्सेन पुरस्कार, युनेस्कोचा कलिंग पुरस्कार, कॉस्मोलॉजी कमिशन ऑफ द इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या प्रतिष्ठित संस्थेचे, लंडनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहयोगी सदस्य, भारतातील तीन राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय सदस्य, थर्ड वर्ल्ड ॲकेडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य अशा बहुमानांचा समावेश आहे. जेमतेम सत्तावीस वर्षे वय असताना त्यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा सन्मान बहाल केला. असा बहुमान प्राप्त करणारे नारळीकर हे पहिले व्यक्ती ठरले.
डॉ. जयंत नारळीकर यांनी पुणे येथे स्थापन केलेल्या ‘आयुका‘ या विज्ञान संस्थेच्या माध्यमातून आज देशातील भावी संशोधक-शास्त्रज्ञांची जडणघडण होत आहे. हे फार महत्त्वाचे कार्य आहे.
लेखाचा शेवट करताना डॉ. नारळीकर यांचा महत्त्वाचा संदेश… “मला विज्ञानकथा सुचण्याचं कारण म्हणजे विज्ञानाची वैविध्यपूर्ण इतकी अनेकविध रूपं आहेत आणि ती रूपं न्याहाळणारा मी एक विद्यार्थी आहे. तसंच वास्तव कल्पनेपेक्षाही किती चित्तथरारक असू शकतं याचा विज्ञान आपल्याला जिवंत अनुभव देतं.” — जयंत नारळीकर
आज (दि. २० मे २०२५ रोजी)डॉ. जयंत नारळीकर यांनी शेवटचा श्वास घेतला. भावपूर्ण आदरांजली!
नागेश शेवाळकर, पुणे
(९४२३१३९०७१)
धन्यवाद, मा. संपादक महोदय, चपराक!
तत्काळ लेख प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
फारच छान लेख सर