इंदापुरातील पाटील निवाडा

Share this post on:

इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हे 1980 आणि 1989 ला बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 1952 ते 1978 अशी 26 वर्षे ते इंदापूरचे आमदार होते. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन खात्याचे उपमंत्री म्हणून समावेश झाला. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात दूध सोसाट्यांचे जाळे निर्माण केले. सहकारी साखर कारखाना व कामगारांत त्यांनी यशस्वी चर्चा घडवून आणली. त्याला ‘पाटील निवाडा’ म्हणून मान्यता मिळाली.

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, शैक्षणिक संस्थांची उभारणी अशा कामांना त्यांनी प्रोत्साहन दिले. बावडा या गावात महाशिवरात्रीच्या दिवशी जन्म झाल्याने त्यांचे नाव ‘शंकर’ असे ठेवण्यात आले मात्र ते सर्वत्र भाऊ या विशेष नावानेच सुपरिचित होते.
1991 ला बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार खासदार झाले मात्र अवघ्या तीन महिन्यात त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवार निवडून आले. दीर्घ काळच्या राजकीय कारकिर्दीनंतर पराभव वाट्याला आल्याने शंकरराव पाटील यांनी 1995 साली राजकीय निवृत्ती घेतली. यानंतर राजकारणातून पाटील घराण्याचं वर्चस्व संपुष्टात आलं होतं. त्यामुळं शंकरभाऊंनी त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष म्हणून लढण्याची सूचना केली. त्यांच्याविरूद्ध काँगे्रसचा तगडा उमेदवार उभा असताना शरद पवारांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मदत केली. त्यानंतर 1995 ते 2009 पर्यंत हर्षवर्धन यांनी त्यांची कारकिर्द गाजवली. या दरम्यान 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी इथून मुरलीधर निंबाळकर यांना उमेदवारी दिली पण त्यांना त्यांचा प्रभाव सिद्ध करता आला नाही.
2004 साली इंदापूर येथील पतीत पावन संघटनेचे प्रदीप गारटकर शिवसेनेत गेले. ब्राह्मण उमेदवार असूनही त्यांनी चांगली लढत दिली. त्या निवडणुकीतही हर्षवर्धन यांनी विजयश्री प्राप्त केली. 2009 ला कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांचे निष्ठावान अनुयायी दत्तात्रेय भरणे यांना अपक्ष म्हणून इथून उभे करण्यात आले. ‘हर्षवर्धन यांचे काम चांगले आहे, त्यांना मदत करा’ म्हणून शरद पवारांनी भरणे यांना एबी फॉर्म दिला नसला तरी अजितदादांनी त्यांची ताकद भरणे यांच्या पाठिशी उभी केली.

 

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

हर्षवर्धन यांच्यासाठीची सांगता सभा पवारांची व्हायची. यावेळी त्यांच्या सांगता सभेला उपस्थित राहू नये, अशी विनंती अजित पवारांनी थोरल्या साहेबांना केली. हर्षवर्धन यांचा मात्र पवार साहेबांना आग्रह होता की, ‘तुम्ही माझ्या सांगता सभेला यायलाच हवं. तुम्ही आलात की माझा विजय पक्का.’ त्यामुळे कमालीची संदिग्धना निर्माण झाली. पवारांनी हा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आणि प्रचार सांगतेच्या आदल्या दिवशी त्यांनी निरोप दिला की ‘मी आघाडीचा धर्म पाळत तुमच्या सभेला येणार आहे.’ पवार आले आणि हर्षवर्धन 15 हजार मतांच्या फरकाने निवडून आले. 2014 ला सगळ्या पक्षांची फाटाफूट झाली. काँग्रेसमध्ये असलेल्या हर्षवर्धन यांच्या विरूद्ध दत्तात्रेय भरणे राष्ट्रवादीकडून उभे राहिले. पक्षाचा उमेदवार म्हणून भरणेंच्या सांगता सभेला पवार साहेब येतील असा अंदाज होता मात्र ते आले नाहीत. यावेळी पवारांनी या निवडणुकीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि भरणे निवडून आले. पुढे हर्षवर्धन यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे पवारांचा राग पुन्हा एकदा उफाळून आला. ऐनवेळी भाजपमध्ये गेल्याने हर्षवर्धन यांचा 25 हजार मतांनी पराभव झाला. यावेळी भरणे यांच्या प्रचारासाठी आलेल्या शरद पवारांनी एक विधान जाहीरपणे केले होते. ते म्हणाले, ‘मला कळलंय की आपल्यातीलच काही पाऊले वाकडी पडत आहेत. जी पाऊले वाकडी पडताहेत त्यांचे पाय काढल्याशिवाय मी राहणार नाही.’

-घनश्याम पाटील

दैनिक पुण्य नगरी, 18 मे 2024

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!