परभणी जिल्ह्यातलं कडोली हे एक छोटंसं गाव. या गावात जन्मलेल्या नानाजी देशमुख यांचं शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झालं आणि गोळवलकर गुरुजींच्या सूचनेनुसार ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे संघप्रचारक म्हणून गेले. बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले. पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन करणार्या मराठमोळ्या नानाजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानानं गौरविण्यात आलं. 1999 ते 2005 या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशातील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी योगदान दिलं.
अणीबाणीनंतर 1977 साली बलरामपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती. नानाजी तुरूंगात बंदिस्त होते. नानाजींचे जवळचे स्नेही रामकृपाल शुक्ल म्हणतात, ‘अणीबाणीच्या काळात नानाजींनी भूमिगत राहून बरीच मोठी कामे केली. त्यावेळी एक अट होती की, जो नेता निवडणूक लढवून त्यात विजयी होईल त्याला जामीन मिळेल. त्यामुळे काही कार्यकर्ते तुरूंगात त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यांच्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह केला. सुरूवातीला त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला पण कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याची सर्व कारणे आणि पक्षाची इच्छा सांगितल्यावर त्यांना नकार देता आला नाही.’
काँग्रेसने बलरामपूर मतदारसंघात राजघराण्याला उमेदवारी देणार असे सांगून महाराणी राजलक्ष्मी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरूद्ध नानाजींनी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. निवडणुकीपूर्वी ते महाराणीच्या भेटीस गेले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ‘जनतेने आमचं मीठ खाल्लंय. ते आम्हालाच निवडून देतील. तुम्ही वेळ का घालवताय?’
त्यावर नानाजी म्हणाले, ‘जय-पराजय लोक ठरवतील. मी तुमच्याविरूद्ध निवडणूक लढवतोय पण मी खूप सामान्य आहे. तुम्ही महाराणी आहात. त्यामुळे ही लढाई सम नाही.’ हे ऐकताच विजयाची पूर्ण खातरी असलेल्या महाराणीने हसून त्यांच्या सहायकाला एक सूचना दिली. नानाजींना लगोलग एक पाकिट देण्यात आलं. त्यात महाराणींच्या विरूद्ध निवडणूक लढविण्यासाठीचा निधी म्हणून पन्नास हजार रूपये होते.
त्यावेळी नानाजी हे उपरे आहेत म्हणून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला उत्तर म्हणून नानाजींनी जाहीरपणे सांगितलं की, ‘माझा जन्म महाराष्ट्रातला आणि शिक्षण राजस्थानातलं असलं तरी आता इथून मी कुठेही जाणार नाही. बलरामपूर हेच माझं अंतिम स्टेशन असेल. यानंतर मी निवडणुकही लढवणार नाही. आपल्या सेवेसाठी मी कायम कटिबद्ध आहे.’
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
या निवडणुकीत त्यांचा विक्रमी मतांनी विजय झाला. या विजयानंतर ते पुन्हा राजवाड्यात गेले. त्यावेळी पराभवाने उद्वीग्न झालेल्या महाराणीने त्यांना विचारले, ‘निवडणुकीत तर तुम्ही माझा दणदणीत पराभव केला! मग आता अजून काय घ्यायला आलाय?’
हे ऐकताच नानाजी म्हणाले की, ‘हे महाराणी, मला आनंद वाटला की आपण आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे मला प्रश्न विचारला. मला आपल्याच जनतेने निवडून दिले आहे. त्यासाठी तुम्हीही मला मोठ्या मनानं सहकार्य केलंय. आता मी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे इथेच राहून आपल्या प्रजेची सेवा करू इच्छितो. त्यासाठी आपण मला एक झोपडी उपलब्ध करून द्यावी.’
नानाजी देशमुखांचे हे धाडस पाहून त्यांना पराभूत झालेल्या महाराणीकडून महाराजगंजची सगळी जमीन भेट म्हणून देण्यात आली.
या विजयानंतर इथल्या राजघराण्याने राजकारण सोडून दिलं. उत्तर प्रदेशात चौधरी चरणसिंग यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्यात नानाजींनी मोठं योगदान दिलं. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी चित्रकूटमध्ये गोशाळा स्थापन केली. महिलांच्या स्वयंरोजगाराला प्राधान्य दिलं. विज्ञान केंद्राची स्थापना करून शेतकर्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन केलं. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यातील शेतकर्यांना त्यांच्या कार्याचा मोठा लाभ झाला.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 19 मे 2024