दूरदृष्टी असलेला ‘भाजपचा लक्ष्मण’

भारतीय राजकारणात ‘तत्त्वज्ञानी शासक’ अशी ज्यांची ओळख होती ते मराठी नेते म्हणजे प्रमोद महाजन. श्रीराम मंदिर निर्माणासाठी अटलजी आणि अडवाणींनी देशभर जी रथयात्रा काढली त्याची संकल्पना प्रमोदजींची होती. भाजप आणि शिवसेनेची युती ही सुद्धा त्यांचीच देण! संघप्रचारक ते भाजपा नेते अशी ओळख असलेल्या प्रमोद महाजन यांचे योगदान फक्त भाजपाच्या वाढीसाठी नव्हते तर देशाच्या हितासाठीही होते. भारतीय लोकशाही आघाडीसाठी पहिले पूर्ण मुदतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले.

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

1983 मध्ये चंद्रशेखर यांनी राम मंदिरासाठी पदयात्रा काढली होती. असाच काहीसा प्रयोग आपणही करावा असे अडवाणींना वाटत होते. प्रमोदजींनी त्यांना सांगितले की, ‘पदयात्रेत खूप वेळ जाईल आणि संपूर्ण देश कव्हर होणार नाही. त्यापेक्षा आपण रथयात्रा काढूया.’ ही कल्पना अडवाणीजींना आवडली आणि या रथयात्रेचे नियोजन केले गेले. अटलजींनी तर प्रमोद महाजन यांचा ‘भाजपाचे लक्ष्मण’ म्हणून गौरव केला होता.
वाजपेयींच्या तेरा दिवसाच्या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. 1998 ला पुन्हा भाजपचे सरकार आले पण त्या निवडणुकीत महाजनांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले आणि माहिती आणि प्रसारण मंत्री केले. त्यावेळी रिलायंसला फायदेशीर ठरतील असे निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
अटलबिहारी वाजपेयी यांची पंतप्रधान म्हणून लोकप्रियता असतानाचा एक छान किस्सा आहे. ती 2004 ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होती. ‘इंडिया शायनिंग’ ही प्रमोद महाजन यांची कल्पना होती. त्याचे जोरदार मार्केटिंग सुरू होते. त्यावेळी महाजन खान्देश दौर्‍यावर होते. नंदुरबारच्या जागेवरून एकनाथ खडसे आणि प्रमोद महाजन यांच्यात खडाजंगी सुरू होती. ‘अटलजींच्या प्रतिमेमुळे यंदा नंदुरबारची जागा सहज येईल’ असे खडसेंचे म्हणणे होते. ‘यावेळीही ही जागा आपल्याकडे येणार नाही,’ असे महाजन सांगत होते. त्यावरून खडसे आणि महाजन या दोघांत शर्यत लागली. ही शर्यत लावताना महाजन म्हणाले होते, ‘नंदुरबारची जागा जेव्हा भाजप जिंकेल त्यावेळी देश भाजपमय झालेला असेल आणि केंद्रात आपले बहुमताचे सरकार असेल.’

 

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

2014 साली ही किमया घडली. डॉ. हिना गावित यांच्या रूपाने नंदुरबारची जागा भाजपने जिंकली. 2019 लाही ती कायम राखली. देशभर भाजपमय वातावरण झाले. 2004 ला महाजनांनी भाकित केल्याप्रमाणे 2014 ला नंदुरबारची जागा जिंकली आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे बहुमताचे सरकार केंद्रात आले. हे चित्र पाहण्यासाठी मात्र प्रमोदजी आपल्यात नाहीत. त्यांची दूरदृष्टी काय होती याचा अंदाज येण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.
राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करायची क्षमता असलेल्या या नेत्याची त्यांच्याच भावाने गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या दोन निवडणुकीत जसा मोदींचा झंजावात होता तसेच वातावरण त्या काळात प्रमोद महाजन यांनी निर्माण केले होते. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, असे अनेकांचे स्वप्न त्यांच्या रूपाने पूर्णत्वास गेले असते, मात्र नियतीला हे मान्य नसावे. आजच्या भाजपच्या यशाची मुहूर्तमेढ मात्र या मराठी नेत्याने रोवली होती, हे सत्य कोणीही नाकारणार नाही.
– घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 17 मे 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा