‘छोरा गंगा किनारे वाला’ अशी ओळख असलेेले ‘बिग बी’ अमिताभ बच्चन हे राजकारणात होते आणि एका अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन लाख मतांनी विजयी झाले होते. ही गोष्ट आहे 1984 सालची. त्यावेळी अमिताभ यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले होते आणि ‘सुपरस्टार’ म्हणून त्यांना अफाट लोकप्रियताही मिळाली होती. राजीव गांधी यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. या मैत्रीचा आधार घेत राजीवजींनी त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घातली. उत्तर भारतात त्यावेळी काँग्रेसचे पानिपत झालेले असल्याने काँग्रेसतर्फे ही खेळी करण्यात आली. राजीव गांधी यांचा हट्ट मोडता न आल्याने अमिताभ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. त्यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांचा दोन लाख मतांच्या फरकाने पराभव करून दणदणीत विजय मिळवला.
अलाहाबाद हा बहुगुणा यांचा बालेकिल्ला मानला जायचा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक विकासकामे केली होती. त्याउलट अमिताभ हे राजकारणात पूर्णतः नवखे होते. सामाजिक क्षेत्रातही त्यावेळी त्यांचं काहीच काम नव्हतं. त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल, असाच प्रारंभी सर्वांचा अंदाज होता. हा अंदाज मतदारांनी मोडीत काढला आणि त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला लोकसभेवर पाठवलं. अमिताभ यांची लोकप्रियता आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे मिळालेली सहानुभूती यामुळे हा विजय मिळाल्याचं सांगितलं जातं.
निवडणूक प्रचारादरम्यान एकदा बहुगुणा आणि अमिताभ यांच्या रॅली समोरासमोर आल्या. आता ‘आधी कोण पुढे जाणार?’ म्हणून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय म्हणून पोलीस प्रशासन चिंतेत असतानाच अमिताभ त्यांच्या प्रचाराच्या गाडीतून खाली उतरले. बहुगुणा यांच्या जवळ जात त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि विजयासाठी आशीर्वाद मागितले. बहुगुणा यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. हा सुसंस्कृतपणा मतदारांना अधिक भावला.
अमिताभ यांच्या पाठीशी तरूणाई होती. तेव्हाचे तरूण त्यांच्या प्रचारसभात न बोलावता सक्रिय असायचे. मतमोजणीच्या वेळी अनेक मतपत्रिकांवर लिपिस्टीकच्या खुणा होत्या. अमिताभच्या चाहत्या तरूणींनी मतपत्रिकांवर चुंबन देत मतदान केले होते. त्यांच्या ओठांचे निशाण अमिताभ यांच्यावरील प्रेम आणि सदिच्छा दाखवत होते. खरंतर उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या चोवीस तास आधी या मतदारसंघातून अमिताभ यांचे नाव पुढे आले आणि राजीव गांधी यांनी आग्रहाने त्यांना उभे केले.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
या कालावधीत अमिताभ चित्रिकरणात व्यग्र होते. राजकीय कामांना आणि खासदारकीच्या त्यांच्या भूमिकेला त्यांना न्याय देता येत नव्हता. त्यामुळे 1987 साली राजीनामा देत त्यांनी राजकीय संन्यास घेतला. त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर त्यांच्या पत्नी जया बच्चन या मात्र 2004 सालापासून राज्यसभेवर खासदार आहेत.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 30 एप्रिल 2024