ऑपरेशन बिनविरोध

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’चा नारा देत असलेल्या भाजपाने मतदानप्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आणि निकाल लागण्याआधीच पहिला विजय मिळवला आहे. सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांच्याबाबत ही घटना घडली असून त्यांचा विजय जाहीर करण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे यंदाचा ‘देशातील पहिला विजेता उमेदवार’ म्हणून दलाल यांची नोंद घ्यावी लागेल.

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

त्याचे झाले असे की, येथील काँगे्रसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. प्रदेश काँगे्रसला अंधारात ठेवत त्यांनी त्यांच्या उमेदवारी नामांकन अर्जासोबत प्रस्तावक म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांऐवजी त्यांचे मेव्हणे जगदीया सावलिया आणि उद्योगातील भागीदार धु्रविन धामोलिया व रमेश पोलरा यांची नावे टाकली. काँग्रेसने इथून जो डमी उमेदवार दिला होता त्या सुरेश पडसाला यांचाही प्रस्तावक म्हणून कुंभाणी यांनी त्यांचे भाचे भौतिक कोलडिया यांचे नाव टाकण्याची काळजी घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस उमेदवाराचा आणि त्यांच्या डमीचा एकही प्रस्तावक उपस्थित राहिला नाही. दरम्यान इथून उमेदवारांचा ज्यांनी प्रस्ताव दिला होता त्या सर्वांनी ‘हा आमचा प्रस्ताव नसून आमचे बोगस हस्ताक्षर आहे,’ असे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ते सर्वजण गायब झाले. त्यामुळे कुंभाणी आणि पडसाला यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.
इथून बहुजन समाज पक्षाचे प्यारेलाल भारती आणि इतर चार अपक्षांनी अर्ज भरले होते. मुकेश दलाल यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक घेऊन त्या सर्वांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सांगितले. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत ही बैठक पार पडल्याने शेवटच्या दिवशी सर्वांनीच आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या ठिकाणी भाजपाचे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार उरले आहेत.

 

 

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

1984 सालापासून सूरतची जागा भाजप जिंकत आला आहे. यंदा 7 मे रोजी इथून मतदान होणार होते मात्र त्यापूर्वीच या सगळ्या घटना घडल्या. गुजरातमधून आजवर एकही खासदार बिनविरोध म्हणून निवडून आला नाही. यंदाच्या या नाट्यमय घडामोडींमुळे राजकारणाची पातळी कुठपर्यंत घसरली आहे ते दिसून येतेय. या क्षेत्रातील काही बौद्धिक चाणक्य या घडामोडीकडे भाजपची व्यूहनीती म्हणून बघत असले तरी लोकशाही व्यवस्थेची ही क्रूर चेष्ठा आहे. ‘ऑपरेशन बिनविरोध’ ही संकल्पना राबवून भविष्यात काहीही करून विरोधक शिल्लक ठेवायचे नाहीत, असे सूत्र राबवले जात आहे. यंदा देशात भाजपचा जो पहिला उमेदवार विजयी ठरला आहे त्याचे आडनाव दलाल असल्याने भाजपच्या ‘दलाली’ची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.
घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 1 मे 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा