अटलजी आणि निवडणूक

भाजपाला खर्‍याअर्थी उभारी देण्यात ज्या सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू नेत्यांचं नाव घेतलं जातं त्यात अटलबिहारी वाजपेयी सर्वोच्च स्थानी आहेत. थोडीथोडकी नव्हे तर 52 वर्षे ते संसदीय राजकारणात सक्रिय होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस आणि पंडित नेहरू यांचा जादूई करिष्मा होता. त्यामुळे दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या विरूद्ध निवडणूक लढवणं हे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं होतं. 1957 साली वयाच्या 33व्या वर्षी जनसंघाने त्यांना उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून तिकीट दिलं.

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

या निवडणुकीत त्यांच्याकडे ना पैसा होता, ना कार्येंकर्ते. पक्षाने प्रचारासाठी दिलेली एक जीप आणि दुसरी जीप भाड्याने घेतलेली या साधनांसह ते निवडणुकीला सामोरे गेले. काहीही झाले तरी शर्थीचे प्रयत्न करायचे, या निश्चयाने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. व्यासपीठ, माईक अशा गोष्टी त्यांच्या नशिबात नव्हत्या. त्यामुळे उपस्थितांपैकी सगळ्यात शेवटी असलेल्या श्रोत्यालाही आवाज ऐकू जावा म्हणून जोरजोरात बोलावे लागायचे. खाण्या-पिण्याची आबाळ असायची. उन्हाचे चटके बसायचे. मोठ्याने बोलून बोलून घसा बसायचा; मात्र या आणि अशा कशाचीही पर्वा त्यांनी केली नाही. जय-पराजय या पुढे जाऊन आपली, आपल्या पक्षाची भूमिका मतदारापर्यंत पोहोचवता येते, याचंच त्यांना समाधान असायचं. निवडणूक ही त्या दृष्टिने त्यांना संधी वाटायची. म्हणूनच ते अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करायचे. त्यांच्या बोलण्यात तात्त्विकतेबरोबरच साहित्याचा गंध असायचा.
मतदानाच्या दिवशी त्यांच्याबाबत एक आक्रित घडलं. मतदानकेंद्राकडं निघालेले असताना एका जंगलात त्यांची जीप बंद पडली. ती दुरूस्त करून मतदानकेंद्रात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. मतदानाची वेळ संपून गेली. त्यांना स्वतःलाच स्वतःसाठी मतदान करता आलं नाही. आपला पराभव अटळ आहे, असं अटलजींना वाटत होतं. या निवडणुकीचा निकाल लागला आणि ते विजयी ठरले. जनसंघाच्या जेमतेम चार जागा निवडून आल्या. अटलजींच्या या विजयाने पुढे तेव्हाचा जनसंघ अर्थात आजच्या भाजपाचे चित्रच बदलले.
यापूर्वी 1952 साली लखनऊमध्ये एक पोटनिवडणुक झाली होती. नेहरूंनी त्यांच्या धाकट्या बहिणीला, विजयालक्ष्मी पंडित यांना सोव्हिएत युनियनमध्ये भारताच्या राजदूत म्हणून पाठवले होते. त्यामुळे याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत अटलजींनी निवडणूक लढवावी, असा आदेश दीनदयाळजींनी दिला. यावर अटलजी म्हणायचे, ‘मला कोणत्याच निवडणुकीचा अनुभव नसताना दीनदयाळजींच्या आदेशामुळे थेट लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागले.’ त्यावेळी अटलजींचं वय होतं अवघं 31 वर्षांचं. अटलजी सायकलवरच सगळीकडे फिरायचे. पक्षाच्या भूमिकेवर श्रद्धा असणारे काही निष्ठावान कार्यकर्ते हेच त्यांचं भांडवल. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या निवडणुकीत त्यांच्याच कुटुंबातील अलीगढच्या शिवराजवतींना उमेदवारी दिली. मोतीलाल नेहरू यांचे पुतणे किशनलाल यांच्या त्या पत्नी.
थोडक्यात ही निवडणूक थेट पंतप्रधानांच्या विरूद्ध होती. उमेदवाराविषयी वाईट बोलावं असं काहीच नव्हतं. तरीही अटलजींनी प्रचारसभा दणाणून सोडल्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेतील त्रुटी त्यांनी मतदारांसमोर मांडल्या. नेहरूंनी पाकिस्तानबाबत घेतलेली मवाळ भूमिका, चीनने केलेली घुसखोरी अशा प्रत्येक मुद्यांवर अटलजी बेफाम होऊन तुटून पडायचे. वयाच्या 31व्या वर्षी राष्ट्रीय प्रश्नांविषयी त्यांना कमालीची जाण होती.
या निवडणुकीत अटलजींनी त्यांच्या मित्रपरिवाराकडून मिळवलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाली. त्यांचा दणदणीत पराभव झाला पण एव्हाना अटलबिहारी वाजपेयी हे रसायन नेमके काय आहे हे मतदारांच्या लक्षात आले. त्यामुळे अवघ्या दोन वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बाजी मारली आणि पुढे देशाचे पंतप्रधान म्हणूनही कारकिर्द गाजवली.
– घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 29 एप्रिल 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा