अमरावती येथे डॉ. श्रीधर भट आणि त्यांची पत्नी शांताबाई यांचे वास्तव्य होते. 15 एप्रिल 1932 रोजी या दांपत्याच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे रामनवमी! मोठ्या आनंदाने बारसे साजरे झाले. मुलाचे नाव सुरेश ठेवण्यात आले. श्रीधर भट हे कान, नाक, घसातज्ज्ञ होते. अमरावती येथील त्यांच्या वसाहतीत अनेक जाती-धर्माचे लोक राहत होते. त्यातही ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम कुटुंबीय अधिक होते त्यामुळे साहजिकच डॉक्टरांना मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून बोलावे लागे. शांताबाईंनी घरकामासोबत सामाजिक कामांचा छंद जोपासला होता. शांताबाईंच्या कविता वाचनाच्या छंदातून सुरेशला लहानपणापासूनच काव्याविषयी आवड निर्माण झाली.
सुरेश भट लहान असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. सुरेशला पोलिओने गाठले आणि त्यांचा एक पाय कायमचा निकामी झाला. त्यामुळे त्यांना मैदानात जाऊन खेळायला जमत नसे परंतु इच्छाशक्ती असेल तर एक मार्ग बंद झाला तरीही अन्य मार्ग खुणावतात. सुरेशचेही तसेच झाले. आईमुळे त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. आई हार्मोनियम वाजवत असल्यामुळे सुरेशला त्याच्या शारीरिक व्यंगाची जाणीव होऊ नये, घरात बसल्या बसल्या त्याने वेगळे काही छंद जोपासावेत म्हणून बाजाची पेटी आणून दिली. वडील श्रीधर ह्यांनाही संगीताची आवड असल्यामुळे घरी एक ग्रामोफोन होता. सुरेशला लागलेला संगीताचा छंद पाहून डॉक्टर नेहमीच नवनवीन ध्वनिमुद्रिका घेऊन येत. सुरेशची आवड पाहून त्याचा शाळेच्या बँडपथकात प्रवेश झाला. पथकात ते बासरी वाजवू लागले. ते पाहून श्रीधरपंतांनी चिरंजीवाला सखोल संगीत शिक्षण मिळावे म्हणून प्रल्हादबुवांची सांगीतिक शिकवणी लावली. व्यंगाला सामर्थ्य मानणाऱ्या सुरेश भटांनी एक पाय निशक्त झाला तरीही हार न मानता नियमित व्यायाम करून इतर शारीरिक अवयवांना शक्ती प्रदान केली, मजबुती दिली. दंड-बैठका, डबलबार सातत्याने करत असल्यामुळे त्यांच्या शरीरात नवा जोम, नवस्फूर्ती निर्माण झाली. सुरेश कबड्डी आणि व्हॉलीबॉल यासारखे खेळही खेळत असत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते सायकल चालवायला शिकले.
अमरावतीचे जुने जाणते लोक सांगतात की, 1965 यावर्षी अमरावती येथे रेल्वे पूल झाला. त्यावेळी तो पूल चढताना सायकल आणि रिक्षावाले उतरुन तो पूल चढायचे. त्याचवेळी सुरेश नावाचा तरुण भावाला डबल सीट बसवून तो पूल ओलांडून जात असे. एवढ्यावरच थांबतील ते सुरेश भट कसले? त्यांनी नेमबाजी, भालाफेक, तलवारबाजी यातही प्रावीण्य मिळविले. गुलेर, आकाशदिवे, पतंग अशा वस्तू तयार करण्याची त्यांना गोडी लागली होती.
सुरेश भट यांचे शिक्षण अमरावती येथे झाले. बारा वर्षे वय असताना सुरेश भट यांनी कविता लिहायला सुरुवात केली. दोन-अडीच वर्षात अनेक कविता लिहून झाल्या परंतु का कोण जाणे वैतागून त्यांनी पन्नास-साठ कविता लिहिलेली वही एका विहिरीत टाकून दिली. मॅट्रिक झाल्यानंतर नवीन दृष्टी प्राप्त झाल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा काव्यलेखनाला सुरुवात केली. त्यांनी विदर्भ महाविद्यालय अमरावती येथे प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयातील मराठी विषयाचे शिक्षक आणि प्रतिभासंपन्न कवी भ. श्री. पंडीत यांचे मार्गदर्शन सुरेश भट यांना मिळाले. त्याच काळात भट कुसुमाग्रज, केशवसुत आणि तांबे यांच्या लेखनाने प्रभावित झाले. दरम्यान एका कविसंमेलनात सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितांची वही हरवली.
काव्य लिहिता लिहिता सुरेश भट उर्दू गझलांकडे आकर्षित झाले. ते गझलांचा विविध मार्गांनी अभ्यास करु लागले, उर्दू भाषकांशी उर्दूतून संभाषण करु लागले. रात्री उशिरापर्यंत जागून मुशियारे ऐकू लागले. त्यांनी 1954 या वर्षी पहिली मराठी गझल लिहिली… ‘का मैफलीत गाऊ?’ हीच ती गझल ज्यामुळे एक गझलकार जन्माला आला… सुरेश भट! सोबतच त्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली. या साऱ्या गोष्टींचा अभ्यासावर परिणाम झाला. महाविद्यालयात शिकत असताना केलेल्या रचना ते मित्रांना ऐकवून दाखवत. तेही कुठे? तर रस्त्यावर असलेल्या चहाच्या टपरीवर!
बी.ए.च्या परीक्षेत त्यांना दोन वेळा अपयश आले परंतु त्यांनी प्रयत्न सोडला नाही आणि 1955 यावर्षी ते बी.ए. झाले. बी.ए. झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यात सुरेश भट यांनी शिक्षकाची नोकरी सुरु केली.
त्यांनी अनेक कविता, गझल, शेर लिहिले. त्यांची एक रचना महाराष्ट्रदिन, स्वातंत्र्यदिन आणि मराठी राजभाषादिनी सर्वत्र ऐकू येते. ते गीत म्हणजे…
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
भट नव्याने लिहिणाऱ्यांना उपदेश करत,
फुकाचे काय शब्दांना मिळे
दिव्यत्व सत्याचे?
घराची राखरांगोळी कपाळी
लावतो आम्ही
किती समर्पक शब्दात शब्दांशी इमान राखणाऱ्या लेखकांविषयीच्या ह्या भावना हृदयाला स्पर्श करतात. अशीच एक रचना आईला समर्पित केलेली आहे. ती अशी…
गीत तुझे मी आई, गाईन
शब्दोशब्दी अमृत ओतुन
भावफुलांना पायी उधळुन
मम प्रतिभेचे झिजवुनि चंदन
आयुष्याचा कापुर जाळुन
तुझे सारखे करीन पूजन
काय शब्दांची योजना आहे, प्रतिभेचा यापेक्षा उत्तुंग आविष्कार दुसरा कोणता असू शकेल? प्रतिमांचा चपखल उपयोग मनाला भावतो. मातृभूमीला वंदन करणारी, तिचे गोडवे गाणारी रचना अशीच वाचनीय आणि गेय आहे. ही रचना आपण सारेच अधूनमधून नक्कीच गात असतो…
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे|
आणीन आरतीला हे चंद्र, सूर्य, तारे|
ही कविता, हे शब्द ओठावर न आलेला माणूस शोधून सापडणार नाही….
एक फार मोठा योगायोग त्यांच्या जीवनात घडून आला. सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितांची वही एका व्यक्तिला सापडली. त्यातील कविता वाचून एक अनमोल खजिना सापडला असल्याच्या भावनेतून त्या व्यक्तिने सुरेश भट यांचा शोध घेतला. दोघांची भेट झाली आणि भटांच्या त्या काव्यांना सुंदर अशा चाली लावणारी ती व्यक्ती होती… पंडित हृदयनाथ मंगेशकर! नंतर भटांच्या कविता, गझला पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गजांनी गायल्या आहेत. हरवलेले योग्य व्यक्तिच्या हाती सापडले की त्याचे असे सोने होते.
सुरेश भट यांनी लिहिलेल्या गझला, कविता या सर्वांची नोंद इथे घेणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यांची एक हळुवारपणा जोपासणारी रचना ही रसिकांच्या ओठावर घोळत असते. कवी म्हणतात,
चल ऊठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली…
होळीनिमित्त जी गाणी विविध माध्यमातून ऐकवली जातात त्यातील एक नटखट, खोडकर गीत म्हणजे…
आज गोकुळात रंग खेळतो हरी,
जरा जपून जा घरी…
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी
राधिके,जरा जपून जा तुझ्या घरी
सुरेश भट यांनी गझल हा काव्यप्रकार स्वतःसाठी कधी मर्यादित ठेवला नाही तर अधिकाधिक कवींनी ह्या प्रकारच्या रचना कराव्यात अशी त्यांची तळमळ होती. गझला लिहिणाऱ्यांना ते सातत्याने मार्गदर्शन करीत. गझल लिहायची कशी, ते तंत्र कोणते, व्याकरणाच्या दृष्टीने प्रत्येकाची गझल शुद्ध असावी, सक्षम असावी या तळमळीने त्यांनी ‘गझलेची बाराखडी’ हे पुस्तक लिहून प्रकाशित केले आणि अनेक लिहित्या हातांना बळ देण्यासाठी ती पुस्तिका स्वखर्चाने पाठवून दिली.
सुरेश भट यांचे लग्न 1964 यावर्षी पुष्पा मेंहदळे यांच्याशी झाले. त्या मुळच्या पुण्याच्या पण अमरावती जिल्ह्यातील माधाळ या गावी शिक्षिका होत्या. विशाखा, हर्षवर्धन आणि चित्तरंजन ही त्यांची संतती परंतु दुर्दैवाने हर्षवर्धन या मुलाचा एका अपघातात मृत्यू झाला आणि भट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
भटांच्या लेखनातून एक अजरामर गीत जन्मले.
‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजुनही चांदरात आहे…’
लेखनाला सुरुवात केल्यानंतर कालांतराने त्यांनी आपल्या शारीरिक परिस्थितीला अनुसरून केलेली रचना वाचताना काळीज हेलावून जाते. त्यांचा हा निराशाजनक सूर नव्हता. जगण्याची, लिहिण्याची, वाचण्याची दांडगी प्रबळ इच्छाशक्ती यामुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले.
‘राहिले रे अजून श्वास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?
सोबतीला जरी तुझी छाया
मी करू पांगळा प्रवास किती?’
‘कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते.’
‘हे बघा, आता मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नये. लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावं…’ हे वाक्य म्हणजे एक संदेशच आहे. यातील ‘राहवत नाही’ ह्या शब्दांमध्ये फार मोठा गहन अर्थ सामावला आहे. कोणताही विषय सुचला, एखादी घटना लक्षात आली की लगेच लिहायला बसू नये. अगोदर त्यावर चिंतन, मनन करावे. हे करत असताना एक वेळ अशी येते की, एक प्रकारची अस्वस्थता येते. भटांच्या शब्दात ‘राहवत नाही’ आणि मग लेखन सुरू करावे एक मस्त कलाकृती जन्मते.
सुरेश भट ह्यांचे एक वैशिष्ट्य होते. ते नास्तिक होते. कदाचित याच विचारसरणीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ते आकर्षित झाले आणि त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल म्हणतात…
जाळले गेलो तरी
सोडले नाही तुला
कापले गेलो तरी
तोडले नाही तुला
ही तुला उद्ध्वस्त
झालेल्या घरांची वंदना
असे म्हणतात की, अनेक साहित्यिक द्रष्टे असतात. केवळ वर्तमानातच नव्हे तर भविष्यातही उपयुक्त, मार्गदर्शक ठरू शकेल अशा अजरामर साहित्याची निर्मिती ते करतात. अशा साहित्यिकांमध्ये सुरेश भट हे एक ठळक नाव!
‘उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’
मित्रांनो, अनेकदा असे होते की, आता सारं कसं व्यवस्थित सुरू झाले आहे, आता आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे असे वाटत असतानाच अचानक नैसर्गिक, सामाजिक असे एखादे संकट येऊन कोसळते की, होत्याचे नव्हते होऊन जाते. सारे कुटुंब अस्ताव्यस्त होते. अशा व्यक्तिंना धीर यावा, संकटाचा सामना खंबीरपणे करताना नव्याने पुन्हा संसार उभारता यावा म्हणून सुरेश भट या गीताची रचना करतात. या गीताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गीत ‘सिंहासन’ या चित्रपटात आशा भोसले यांनी गायले आहे. गेली काही वर्षे आपण जे राजकारण विशेषतः महाराष्ट्रात अनुभवत आहोत कदाचित त्याची स्क्रिप्ट आपणास या चित्रपटातील कथेत सापडते. म्हणून साहित्यिक भविष्यवेत्ते असतात असे म्हणतात. अरुण साधू यांनी लिहिलेल्या या कथेवर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 1979 साली प्रदर्शित झाला होता.
अशा हरहुन्नरी आणि साहित्य, लेखनाला सर्वस्व मानणाऱ्या, मातृभाषेचे पांग फेडण्याची आस मनी बाळगून असलेल्या सुरेश भट यांचा 14 मार्च 2003 कर्करोगाने मृत्यू झाला.
– नागेश सू. शेवाळकर
‘साहित्य चपराक’ मासिक एप्रिल २०२४
‘साहित्य चपराक’ मासिकाचा सभासद होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chaprak.com/vp/sahitya-chaprak-membership/
धन्यवाद, घनश्यामजी!