सरीवर सरी – श्रद्धा बेलसरे-खारकर

सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांचे हे नवे सदर या अंकापासून देत आहोत. बेलसरे यांचे ‘मोरपंखी’, ‘आजकाल’ आणि ‘फाईल व इतर कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘टिकली तर टिकली’ हा ललितलेखसंग्रह आणि ‘सोयरे’ हा व्यक्तिचित्रणाचा संग्रह प्रकाशित आहे. त्यांचे ‘डबल बेल’ हे एस.टी.मधील अभिनव उपक्रमाचे अनुभवकथनही प्रकाशित आहे. त्यांनी अनेक मान्यवर वृत्तपत्रांसाठी सदर लेखन केले असून त्यांना ‘कवी कट्टी’, ‘पद्मश्री विखे पाटील’, दूरदर्शनचा ‘हिरकणी’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या आठ मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे अनुभवांचे संचित मोठे आहे. ‘प्रशासनातील मानवी चेहरा’ अशी त्यांची थोडक्यात ओळख करून देता येईल. माहिती, मनोरंजन आणि ज्ञान देणारे हे सदर आपणास नक्की आवडेल. याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हास जरूर कळवा.

– संपादक

लहानपण म्हटले की मनात अनेक आठवणी पिंगा घालतात. सूरपारंब्या खेळाव्या तसे या टोकापासून त्या टोकापर्यंत जातात. सुरुवात माझ्या जन्मापासून करूयात. माझा जन्म जालना जिल्ह्यातील ‘परतूर’ या गावी झाला. वडील पंचायत समितीमध्ये नोकरीला होते. एक मोठी बहीण होती. माझ्या आईला आम्ही ‘माई’ म्हणत असू. तिची तब्येत फार नाजूक होती. सातव्या महिन्यातच माझा जन्म झाला. माझी आजी म्हणजे ‘मोठीआई’ आणि आईची मावशी ‘द्वारकामावशी’ बाळंतपण करण्यासाठी आल्या होत्या. माझा जन्म झाला पण मी काही रडले नाही. आजीने थापट्या मारल्या पण हुं नाही की चू नाही! आजीला वाटले अपुऱ्या दिवसाची मुलगी आहे. मेलेली निपजली असेल! असे समजून आजीने त्या बाळाला दुपट्यात घालून उचलले आणि माईला सांगितले, “बाळ मेलेलंच झालंय.”
आई रडू लागली.
त्यावर आजी म्हणाली, “रडतेस कशाला? पोरगी तर होती! जाऊ दे! तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे.”
थोड्या वेळाने द्वारकामावशीला दुपटे हलते आहे असे वाटले. तिने ते आजीला सांगितले.
आजी म्हणाली, “द्वारके, तुला भास होत आहेत. कामाला लाग.”
बिचारी द्वारकामावशी ठार बहिरी होती पण तिची नजर तीक्ष्ण होती. तिने बाळाला उचलले. बाळाच्या छातीला हात लावून बघितले. बाळात धुगधुगी होती! अशाप्रकारे जन्म झाल्यावर काही तासांनी मला दूध-पाणी मिळाले. सात महिन्याची असल्याने तब्येत नाजूक पण मी चिवट होते. जणू आयुष्याच्या पहिल्या दिवसापासूनच रडायचे नाही हा संस्कार मला मिळाला होता.
मग आम्ही जिंतूरला आलो. ते माझे आजोळ होते. मामाच्या वाड्यात आम्ही राहत होतो. एका भल्या मोठ्या ओसरीला मधून एक दार होते. माझ्या वडिलांना राग आला की मला सरळ दार उघडून मामाकडे टाकून देत असत, अशी आठवण माझी उषामामी मला सांगत असे. मी पाच वर्षाची होईपर्यंत मला बोलता येत नव्हते. आधीच मुलगी तीही काळी आणि आता मुकी. माईला माझी खूप काळजी वाटत होती. एका दुपारी एक साधू भिक्षा मागायला आला. ‘माई भिक्षा वाढा’ त्याने पुकारले. माझ्या आजीने भांडेभर पीठ आणून त्याच्या झोळीत टाकले. मी जवळपास कुठेतरी खेळत होते.
मला बघून साधू म्हणाला, “माई ये कौन है?”
त्यावर आजी उत्तरली, “मेरी पोती है, बाबा!”
त्यावर साधू म्हणाले, “ये लडकी बहुत भाग्यवान हैं. आपका नाम रोशन करेगी.”
त्यावर माझी आजी म्हणाली, “बाबा ये लडकी तो गुंगी है. बोल भी नही सकती. हमारा नाम क्या रोशन करेगी?”
साधूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “चिंता मत करो. ये लडकी कलसे बोलेगी.” आणि दुसऱ्या दिवसापासून मी खरोखरच बोलू लागले. जरा जास्तच बोलू लागले.
काही दिवसांनी आम्ही हरीबाईच्या वाड्यात राहायला गेलो. उंच जोत्यावर वाडा होता. हरीबाई आणि तिचा मुलगा गोविंदबाळ असे दोघेच राहत होते. त्यांच्या माडीवरती आम्ही राहत असू. तिथे माझ्या वडिलांनी कबुतर पाळले होते. दिवसभर कबुतर इकडेतिकडे फिरत असे. रात्री त्याला टोपलीखाली झाकून ठेवत असू. माझे आईवडील आजूबाजूच्या लोकात फार लोकप्रिय होते. तिथली एक आठवण आहे. माझे वडील दर रविवारी सकाळी ज्यांचे दात किडले आहेत त्यांची कीड काढून देत असत. त्याचा मोठा जामानिमा असे त्यांचा. एका मोठ्या माठाला वरून गोल बशीच्या आकाराचे छिद्र पाडले जाई. दुसरीकडे खालच्या बाजूने तीन इंच जागा सोडून एक छोटा चौकोन केला जाई. ज्याचे दात दुखत असतील. तो माणूस तोंड उघडून माठावर ठेवत असे. माठाच्या खाली मोठ्या परातीत पाणी असे. मग दादा एक लोखंडी उचटणे गरम करत. त्यावर कांद्यांचे बी टाकले जायचे. ते बी जळायचे. त्याच्यातून धूर निघे. तो धूर माठाच्या खालच्या भागात केलेल्या चौकोनी छिद्रात उचटणे टाकून दिला जाई. असे दोन/तीन वेळा केल्यावर दातात जी कीड असेल ती पडून जाई. हे सगळे बघायला आम्हाला गंमत वाटायची. दर रविवारी चार-पाच लोक तरी या कामासाठी येत असत.
आमचा जो घरमालक होता त्याचे नाव गोविंदबाळ होते. त्याचे बस स्टँडवर कॅन्टीन होते. तो आम्हाला खूप आवडायचा. माझी बहीण गोरीपान होती आणि मी काळी होते. माझे वडील मला रागाने काळी म्हणत. त्याचा गोविंदबाळला राग येत असे. तो मग मला गंमतीने ‘जांभळी’ म्हणत असे.
दादा रागावले  की गोविंदबाळ मला म्हणे, “घाबरू नकोस, खारकरचे घर आपण उन्हात बांधू.”
मला त्याचा फार दिलासा वाटत असे. तो संध्याकाळी घरी येई. आम्ही बहिणी त्याची वाट बघत असू. तो दिसताच त्याच्या हाताला लटकत असू. त्याच्या हातात सामानाच्या जड पिशव्या असत. घरी आल्यावर तो चिल्लर असलेली पिशवी उपडी करत असे आणि आम्हाला पैसे मोजायला सांगत असे. आम्ही एक पैसा, दोन पैसे, पाच पैसे असे वेगवेगळे करून त्याचे ढीग करत असू. या कामाबद्दल दररोज आम्हाला एक पेढा मिळे. त्या पेढ्यासाठी जीव आसुसून जायचा. इतका छान पेढा परत कधी खाल्ला नाही. मग कधीतरी आम्ही घर बदलले आणि त्याची साथ सुटली. पुढे वडिलांच्या बदल्या होत गेल्या. गावे मागे सुटत गेली. दरम्यान मी माहिती आणि जनसंपर्क खात्यात नोकरीला लागले होते. त्यात 1991ला माझी बदली झाली आणि मराठवाडा कायमचा सुटला. कुमार केतकर दिव्य मराठीचे संपादक झाले आणि मग मी ‘सोयरे’ हे सदर लिहायला सुरुवात केली. त्या सदराच्या निमित्ताने अनेक स्मृती जागृत झाल्या. गोविंदबाळवर एक लेख लिहिला आणि अचानक काही दिवसांनी मला गोविंदबाळचा फोन आला. मला तो धक्काच होता! बरोबर 50 वर्षांनी आम्ही बोलत होतो.  दिव्य मराठीचा लेख  त्याच्या एका नातेवाईकाने छत्रपती संभाजीनगरला वाचला आणि त्याने फोन करून सांगितले, “पेपरला एक लेख आला आहे. बहुतेक तो तुमचाच असावा.”
ते म्हणाले, “नाही रे बाबा, आमच्यावर कशाला कोण लेख लिहिणार?” पण त्याने पेपर मागवून घेतला. मग माझा शोध सुरू झाला. माझ्या दिल्लीच्या भावाकडून माझा नंबर मिळवला आणि आमचे बोलणे झाले. मग मी त्याला भेटायला मुद्दाम जिंतूरला गेले होते.
आमच्या शेजारी वडिलांचे एक साहेब राहत होते. त्यांचा एक गोरागोबरा मुलगा होता. तो माझ्याच वयाचा होता. कसे कोण जाणे पण आम्हाला दाढीच्या ब्लेडचे पत्ते खेळायची सवय लागली. वडिलांचा एक पत्र्याचा दाढीचा डबा होता. त्यात दाढीच्या साबणाचा एक गोल डबा, खोरे, तुरटीचा खडा आणि ब्रश असे. भारत ब्लेड असत. त्या चोरून आम्ही खेळायचो. त्याच्या वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुलाला रागावले. मुलाने माझे नाव सांगितले. वडील मला रागावले. मी लगेच मामाकडे गेले. तिथे आमची 8/10 भावंडांची फौज होती. सगळ्यांनी मिळून त्या मुलाला मारायचे ठरवले. तो शाळेतून येत होता. आमची फौज आडवी आली आणि त्याला बदडले. पुन्हा माझी तक्रार झाली. मी मामाच्या वाड्यावर फरार झाले. पुढे त्यांची बदली झाली आणि तो विषय संपला. आम्हा भावंडांची मोठी टोळी होती. आम्हाला कुणी त्रास दिला तर आम्ही टोळधाडीसारखे शत्रूवर तुटून पडत असू.
मामाचा गाव असल्याने माझ्या वडिलांना सगळे खारकर म्हणत. ‘खारकर आले, खारकर गेले,’ असाच उल्लेख असे. त्यांचे ऐकून मी आणि बहीणही वडिलांना ‘खारकर’ म्हणू लागलो आणि आईला ‘माई’ म्हणत होतो कारण सगळे गाव आईला ‘माई’ म्हणत असे. हळूहळू आमची टिंगल होऊ लागली. संध्याकाळी वडील येताना दिसताच आम्ही, “माई, खारकर आले” असे म्हणायचो. पोरं आमची नक्कल करू लागली. मग एक दिवस गोविंदबाळ म्हणाला, “माई पोरींना वडिलांना ‘दादा’ म्हणायला सांग.”
माई म्हणाली, “तसेच सांगितले आहे.”

बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा

मग आम्ही वडिलांना प्रयत्नपूर्वक ‘दादा’ म्हणू लागलो. हे आठवूनही आज हसू येते पण त्याकाळी असेच असायचे. माझ्या मोठ्या मामीला सगळेजण ‘वहिनी’ म्हणत. त्यांची मुले त्यांना ‘वहिनी’ म्हणू लागली. ते वडिलांना चक्क ‘काका’ म्हणतात. असो.
आमच्या घराजवळ एक भोयाचे दुकान होते. सकाळी-सकाळी भोई तिथे फुटाणे, शेंगादाणे वाळूत घालून भाजत असे. त्याची आडवे कुंकू लावलेली पत्नी गरम फुटाणे मोठा पाट्यावर वरवंट्याने हलक्या हाताने वाटायची. वाटलेले दाणे मोठ्या सुपातून पाखडायची. सालपटांचा कचरा पाखडून पिवळ्या धमक दाळव्याचा डोंगर उभा करायची. आम्हाला ती रसरसती भट्टी, वाळूमध्ये तडतडणाऱ्या लाह्या-फुटाणे बघायला खूप मौज वाटायची. दर शुक्रवारी देवीच्या प्रसादासाठी फुटाणे आणावे लागत. आम्ही त्यामुळे शुक्रवारची वाट बघत असायचो. शेजारीच एक पोलीस रहात होते. ते मध्यम वयाचे होते. खाकी चड्डी आणि शर्ट, डोक्यावर टोपी असा त्यांचा पोशाख असे. ते दिसताच आम्ही मुले त्यांना “पोलीसमामा, जयहिंद!” असे म्हणत असू. तेही ‘जयहिंद’ म्हणत. त्यावेळी माझे आंबेजोगाईचे श्रीधरकाका डी. एड. करण्यासाठी वर्षभर औरंगाबादला गेले होते. तेव्हा मनोरमाकाकू आमच्या घरी राहिली. ती आमच्या खूप छान वेण्या घालून देत असे. आम्हा दोघी बहिणींचे केस खूप जाड आणि लांब होते. त्याच्या वेण्या घालणे म्हणजे तासाभराचा कार्यक्रम होऊन जाई. मनोरमा काकू केसांना तेल लावून वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालायची. संध्याकाळी गुलबक्षीच्या फुलांचे गजरे करून द्यायची. आमचे लाड करायची. तिला शिवणकाम चांगले येई. माझी आई आणि ती इतक्या एकोप्याने राहत की त्या दोघी बहिणीच आहेत असे वाटे. सणावाराला, मामांकडे माईबरोबर काकूलाही मानाने बोलावणे असे. ती जुन्या कपड्यांच्या छान पिशव्या करून देत असे. आम्हा दोघी बहिणींना ती खूप आवडत होती.
उन्हाळा सुरू झाला आणि पत्र्याचे घर! त्यामुळे माईला खूप त्रास होऊ लागला. तिला काखमांजरी झाल्या. त्यामुळे नाईलाजाने हे घर आम्हाला सोडावे लागले. घर सोडताना गोविंदबाळला सोडायचे या दु:खात आम्ही दोघी बहिणी सासरी जाणाऱ्या मुलीप्रमाणे रडत होतो. शेवटी गोविंदबाळने आम्हाला नवीन घरी आणून सोडले. हे नवे घर म्हणजे तुकाराम वाणी यांचा वाडा होता. तीन-चार खोल्यांचे घर आणि प्रशस्त दगडी अंगण होते. त्यांचे किराणा दुकान होते. त्यांना सगळेजण ‘तुकाराममामा’ असे म्हणत. त्यांची मुलगी विमल माझ्या वर्गात होती. या घरात आल्यावर मला शाळेत पहिलीत घालण्यात आले. सरकारी शाळा होती. एका जुन्या वाड्यात आमची शाळा भरत असे. सारवलेल्या जमिनीवर विद्यार्थी बसत. बाईंना बसण्यासाठी एक लाकडी खुर्ची होती. आमची शाळा मुलींची होती. प्रत्येक मुलगी स्वत:ला बसण्यासाठी तरट किंवा पोते घरूनच घेऊन यायची. माझ्यासाठी माईने एका तरटाच्या चौकोनावर रंगीत लोकरीने भरतकाम केले होते. त्यामुळे माझे आसन शाळेत उठून दिसायचे. त्याला मी फार जपायची. अजूनही ते आसन मला लख्ख आठवते. शाळेत जाताना पाटी-पेन्सिल ठेवण्यासाठी टॉवेलच्या कपड्याची पिशवी असायची. त्यावर रंगीत दोऱ्यांनी भरतकाम केले जायचे. मग दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हाला टॉवेलचे कपडे आणि रंगीत धागे आणून देत असत. आम्ही शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे जाऊन विविध प्रकारच्या वीण शिकून येत असू.
शाळेच्या पहिल्या दिवसाची माझ्याकडे एक फार चांगली आठवण आहे. माझी बहिण गोरीपान होती आणि मी काळी! त्यावेळी आमच्या भास्करमामाने ‘परछाई’ नावाचा सिनेमा पाहिला होता. त्यामुळे तो मला ‘छाया’ म्हणायचा. छाया हेच नाव मला पडले होते. माझ्या प्रवेशासाठी माई आणि मी शाळेत गेलो. त्यावेळेस बाईंनी मला, “नाव काय तुझे?” असे विचारले. मी छाया असे सांगितले. त्यावर माई म्हणाली, “हिचे नाव छाया नाही तर जयश्री आहे. तुम्ही जयश्री वासुदेव खारकर असे लिहा.” बाईंनी तसेच नाव लिहिले.
त्यावेळी माझे नाव का बदलले हे मला काही समजले नाही. तेव्हा मला माईने सांगितले, “तू कुणाचीही छाया नाहीस तर आयुष्यावर जय मिळवणारी जयश्री आहेस.” त्याचा फारसा अर्थ मला समजला नाही तरी ते फार भारी वाटले! शाळा संपल्यावर मी धावत मामाच्या घरी गेले आणि ‘माझे नाव जयश्री आहे.’ असे ज्याला त्याला सांगू लागले. आपल्याला फार काही मोठे मिळाले आहे असे मला वाटत होते! अशाप्रकारे आत्मविश्वास माझ्या आईने मला दिला आणि पुढची जगण्याची वाट सुकर करून दिली. आज 60 वर्षानंतर मागे वळून बघताना माझी कमी शिकलेली आई किती दूरदृष्टीची आणि विचारशील होती हे लक्षात येते आणि तिच्याबद्दलचा अभिमान दाटून येतो.
माझी माई गोरीपान, खोल डोळे, कमरेपर्यंत जाड, मऊशार केस, किरकोळ शरीरयष्टी अशी होती. तिचे राहणीमान अत्यंत नीटनेटके होते. झोपेतून उठल्यावर सकाळीसुद्धा तिचे केस विस्कटलेले नसत. ती एका गर्भश्रीमंत देशपांडे-जिंतूरकर घराण्यातून आली होती. त्यांचा मोठा वाडा, शेतीवाडी, आमराया होत्या. पंचक्रोशीत त्यांचे चांगले नाव होते. तिचे वडील, माझे आजोबा, वकील होते. त्यामानाने खारकर हे नोकरवर्गीय होते. त्यावेळी मराठवाड्यात त्यांना ‘उपरे’ समजले जाई. ज्यांचे पांढरीवर घर नाही आणि काळीवर शेत नाही त्या लोकांना उपरे म्हणत. वडिलांच्या पगारात माई तिचा संसार अत्यंत टुकीने करत असे. आपला स्वाभिमान जपत असे. ती अत्यंत हजरजबाबी होती. तिला लोक ‘वकीलसाहेब’ असे म्हणत. कुठल्याही प्रश्नावर ती तर्कशुद्ध पद्धतीने तोडगा काढत असे. दिसायला माई साधी आणि मायाळू वाटायची पण आई म्हणून तिचा आमच्यावर फार धाक होता. तिच्या नजरेतच एक जरब होती. माई अतिशय शिस्तप्रिय होती. प्रत्येक गोष्ट जागच्याजागीच ठेवली पाहिजे यावर तिचा कटाक्ष असे. मामांकडे एखाद्या वेळी जेवायला मुलांना बोलावले नाही तर ‘मामाकडे यायचे नाही’ असे आम्हाला बजावून ती आमच्या दोघींसाठी घरी स्वयंपाक करायची. तिचा आदेश मोडण्याची आमची प्राज्ञा नव्हती. काही चुकले तर माई एक वेगळीच शिक्षा करायची. ती तोंडाने कधी रागवायची नाही. हाताने मारायचीही नाही पण माईची शिक्षा जबरी असे. बहीण माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठी होती. आमची अनेकदा भांडणे होत. माईने ‘पुरे’ म्हटल्यावर वाद थांबायलाच पाहिजे पण त्यानंतर जर तोंडातून दोन-चार शब्द गेले तर आम्हाला भिंतीकडे बघण्याची शिक्षा होई. म्हणजे एकाच खोलीत आम्हा दोघी बहिणींना वेगवेगळ्या भिंतीकडे तोंड करून बसवले जाई. तासभर दोघींनी एकमेकीशी बोलायचे नाही आणि जागचे उठायचे नाही अशी ताकीद असे. हे सांगून ती बाहेर निघून जाई. आम्हाला समजायचे माई घरात नाहीये पण तिचा धाक इतका होता की आम्ही चकार शब्द न काढता शिक्षा संपण्याची वाट बघत असू!
तिला अनेक कथा गोष्टी कविता मुखोद्गत असत. दररोज संध्याकाळी ‘शुभंकरोती’ म्हटल्यावर पाढे म्हणावे लागत. घरातील सर्व मोठ्यांच्या पाया पडल्यावर माई आम्हाला एखादी गोष्ट सांगत असे. कधी कधी ती एखादे कोडे किंवा उखाणा घालायची. माझ्या आजोळी तिला ‘माईआत्या’ म्हणत. माईआत्या सर्व भाच्यात अतिशय लोकप्रिय होती. ती बोलताना अनेक समर्पक म्हणींचा वापर करे.
माझ्या आजोळी मोठा चौसोपी वाडा होता. मला पाच मामा होते. मोठे मामा कलेक्टर तर दुसरे तहसीलदार, तिसरे हैदराबादला शिक्षक आणि चौथे मामा शेती करायचे. पाचवे मामा जिंतूरला वकील होते. एक मावशी होती ती वैजापूरला असायची. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील फार लवकर वारले. आजी होती. तिला आम्ही मोठीआई म्हणत असू. मोठीआई दिसायला फार देखणी होती. गोरीपान, मोठे डोळे, मध्यम शरीरयष्टी होती. ती ‘गंगाभागीरथी’ होती. ती कायम लाल रंगाचे आलवण नेसायची. क्वचित प्रसंगी लग्न कार्यात ती स्वच्छ पांढरे लुगडे नेसायची. ती फार धोरणी होती. दोन सावत्र मुले आणि तीन स्वत:ची मुले शिवाय दोन मुलींचा संसार तिने व्यवस्थित चालवला. अवघ्या 30व्या वर्षी तिला वैधव्य आले होते. घरी गडगंज संपत्ती होती, वाडे आणि शेतीवाडी होती. ती तिने मोठ्या धोरणीपणे सांभाळली. मोठीआई फार सुगरण होती. खूप वेगवेगळे पदार्थ मोठ्या निगुतीने करायची. ती स्वेटर छान विणायची. मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायची.  आम्हाला रांगोळी काढायला शिकवायची. तिच्यासाठी ओसरीवर मोठे देवघर बांधले होते. ती दरवर्षी पारिजातकाची लक्ष फुले वाहण्याचा संकल्प करायची. अंगणात मोठे पारिजातकाचे झाड होते. आम्ही मुले पहाटे हातात दुरड्या, तबक जे मिळेल ते घेऊन अंगणात पळायचो. शुभ्र केशरी दांड्याची नाजूक फुले गोळा करून ओसरीवर यायचो. शंभर-शंभर फुलांचा एक एक गठ्ठा करायचो. आजी फार शिकली नव्हती पण तिचा हिशोब पक्का होता. ती खडूने भिंतीवर खुणेच्या रेषा काढायची.  फुले गोळा करून करून हात केशरी व्हायचे. खूप सुंदर दिवस होते.
इतके कष्ट केल्यावर आजी हातावर खडीसाखरेचा खडा ठेवायची. तो फार गोड लागायचा. मोठ्या आईच्या दोन गोष्टी लक्षात आहेत. ती सोवळी होती त्यामुळे एकदाच जेवायची. रात्री ती फराळाचा एखादा पदार्थ खायची. पोहे, उपमा किंवा साबुदाणा खिचडी. आम्ही 10-12 नातवंड तुडुंब जेवलेलो असायचो पण रात्री ती फराळाला बसली की सगळे तिच्याभोवती गोळा व्हायचो. ती मग आम्हा प्रत्येकाला एकेक घास द्यायची. त्या घासाचे फार अप्रूप वाटायचे. मला तिची न आवडणारी गोष्ट म्हणजे माझी रक्तचंदनाची बाहुली. दोन बहिणीत मिळून एकमेव बाहुली होती. ती रविवारी मला त्या बाहुलीला सहाणेवर घासायला लावायची. त्याचे जे गंध निघायचे त्याने ती ताटामध्ये आदित्य राणूबाईचे चित्र काढायची. बाहुलीला घासताना मला रडू यायचे. तिला उभे राहण्यासाठी एक पट्टी होती. मी ती पटटी घासायला लागले की ती म्हणायची, “पट्टी घासायची नाही. बाईने ताठ मानेने उभे रहायला हवे. मागचा भाग घास.” जणू काही माझ्याच अंगातून रक्त येते आहे असे मला वाटे.
मी तिला म्हणायची, “देवघरात दुसरे सहाणेचे खोड आहे ते उगाळू का?”
त्यावर ती म्हणायची, “सूर्याला फक रक्तचंदन चालते.”
मी मूक निषेध म्हणून पाय आपटत अंगणात निघून जायची. हे सगळे असे असले तरीही माझे एकूण बालपण समृद्ध होते.

– श्रद्धा बेलसरे-खारकर

( माजी माहिती संचालक, महाराष्ट्र राज्य )

‘साहित्य चपराक’ मासिक एप्रिल २०२४

साहित्य चपराक मासिकाचा सभासद होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Sahitya Chaprak Membership

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा