माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे. आपल्या बालमनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो.
नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी 12 जानेवारी 2021 ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहाने वाचले. एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा ते वाचल्यावरच माझे समाधान झाले. रमेश वाघ हे स्वत: उत्तम कीर्तनकार तर आहेतच परंतु ते एक नामवंत शिक्षक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत ह्याचे प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येत होते.
ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबाकाका, नरहरी सोनार, सेना न्हावी, चोखामेळा, एकनाथ, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्या दहा संतांचे अतिशय थोडक्यात व सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेतले चरित्र मनाचा ठाव घेऊन जाते.
आपल्या लहानपणापासून आपल्यावर ह्या संताचे चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने कानावर पडलेले आहेच परंतु सध्याच्या धावपळीच्या जगात आणि आपल्या कार्यबाहुल्याच्या नादात आपल्या ह्या संताचे सुविचार, त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान, जीवनाशी जोडलेला सकारात्मक दृष्टीकोन याचा विसर पडलेला आहे हे आपसूकच जाणवले. मुळात आपल्या ह्या महान संताचे चरित्र व त्यांच्या संदर्भातील काही घडामोडी व गोष्टी आपल्याला ह्या आधुनिक काळातही किती संयुक्तिक वाटतात आणि एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा देऊन जातात हेही तितकेच खरे आहे.
लेखक रमेश वाघ यांनी गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे झालेल्या घरकोंडीचा इतका उत्तम फायदा उठवून आपल्याला पुन्हा एकदा ह्या संताच्या प्रेमातच पाडले आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही. सध्याच्या तरुण पिढीला तर ह्या संतचरित्रांचा आयुष्यातल्या सध्याच्या कठीण समयी अडचणींवर मात करायला फायदेशीरच ठरणार आहे. दहाही संतांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सहन केलेल्या सामाजिक व आर्थिक विवंचनेतून साकारलेले त्यांचे उज्ज्वल जीवन व त्यांचा त्याग, त्यांची साधना व तपस्या, त्यांचा संयम, त्यांची सचोटी मनावर कोरले जातात.
शालेय जीवनात आपण ह्यातील काही संतांचे साहित्य अभ्यासक्रमात अतिशय थोडक्यात वाचलेले आहे; परंतु त्याचा आपल्या मनावर एवढा परिणाम होत नाही जेवढा आपल्या कळत्या वयात जर आपण हे असे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’सारखी साहित्य संपदा वाचलीत तर होईल, असे मला वाटते! मला खातरी आहे आणि विश्वास आहे की रमेश वाघ यांचे हे संत चरित्र आपल्याला आयुष्यात कुठल्याही वयात एक वैचारिक बैठक देण्यात नक्कीच यशस्वी होईल.
हे संतचरित्र वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की लेखकाने कुठेही स्वत:च्या विचारांचा व मतांचा पगडा आपल्या लेखनावर होऊन दिलेला नाही. काही काही आख्यायिका तसेच चमत्कारांचा उल्लेख त्या त्या संताच्या चरित्रात आवर्जून केलेला आहे. मला एका गोष्टीचे फारच कौतुक वाटले ते याचे की आत्ताच्या ह्या आधुनिक विचारसरणीच्या जगात आपल्या ह्या थोर संतांची महती पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजासमोर ठेवून एकप्रकारे समाज प्रबोधनाचेच कार्य लेखकाने व प्रकाशकाने केले आहे असे म्हणावेसे वाटते.
मुळात संपादक व प्रकाशक घनश्याम पाटील हे स्वत: संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून हे शिवधनुष्य अतिशय जबाबदारीने उचलले गेले आहे हे नक्की. घनश्याम पाटील सरांची एक खासियत आहे, ती म्हणजे ते नवनवीन लेखकास लिहिण्यास उद्युक्त करतात व नुसते तसे करून थांबत नाहीत तर त्यांचे साहित्य प्रकाशित करण्याचे धाडसही करतात.
आणि हो! साहित्य नुसते प्रकाशित करत नाहीत तर ते ‘चपराक’च्या माध्यमातून समाजातील सर्व थरातील वाचक वर्गापर्यंत पोहोचवतात.
‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे पुस्तक आपल्या संग्रही असावे असेच आहे. तसेच ते नुसते संग्रही न ठेवता घरातील प्रत्येकाने एकदा का होईना जरूर वाचायला हवे असेच आहे. तुम्हाला तुमच्या जीवनाला आकार देऊन सकारात्मक दृष्टीकोन द्यायचा असेल ते हे पुस्तक एकदा वाचाच!
घनश्याम पाटील सर आणि रमेश वाघ सरांचे मन:पूर्वक अभिनंदन. तसेच विषयाला साजेसे असे मुखपृष्ठ साकारल्याबद्दल संतोष घोंगडे सरांचे विशेष कौतुक व आभार.
‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’
प्रकाशक – ‘चपराक प्रकाशन’, पुणे.
लेखक – रमेश वाघ, नाशिक.
मूल्य – रु. 125/-
हे पुस्तक www.chaprak.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-रवींद्र कामठे
पुणे
9421218528
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
अप्रतिम परीक्षण सर, मनःपूर्वक धन्यवाद