चपराक दिवाळी अंक 2020
अॅडव्होकेट परिणीती संझगिरीच्या युक्तिवादाने कोर्टात एकदम शांतता पसरली. सुमारे अर्धा तास तळमळून, अस्खलित, न अडखळता त्या जे बोलत होत्या त्यांच्या शब्दाशब्दागणिक प्रत्येकजण भावनिक होत होता. जजसाहेब तर चष्मा काढून ऐकतच राहिले. कुरूक्षेत्रावरच्या महाभारतातल्या धर्मयुद्धात अर्जुनाचे बाण जसे सपासप येऊन शत्रुपक्षाच्या हृदयात घुसत असतील तसा एक एक शब्द ऐकणार्याच्या मनाला लागत होता. अनेक स्त्रियांचे डोळे आपोआप भरून येत होते. एक वेगळाच खटला आज उभा राहिला होता.
जजसाहेब, काय चूक होती माझी? काय पाप केलं होतं मी? म्हणून जन्माला आल्यापासून मला हे सहन करावं लागत आहे…? माझ्यावर अन्याय करणार्यांला कठोर शासन व्हायला नको का? माझ्या ममावर, आईला मी ममा म्हणते, जो अन्याय त्यानं केला तो सार्या स्त्री जातीवरच होणारा अन्याय आहे. त्या अपराध्याला असंच सोडून द्यायचं का? त्याची एक मनमानी आमच्या मायलेकीचंच नाही तर सबंध घराचं स्वास्थ्य देखील उद्ध्वस्त करून गेली. कायमचं.
पंचवीस वर्षे उलटून गेली त्या घटनेला. आनंदानं नाचणारी, बागडणारी मुलगी होती परी, माझी ममा! कॉलेजमध्ये नाटकात काम करणारी, भाषण करून कॉलेजचं नाव मोठं करणारी. परीकथेतील राजकुमाराची वाट पाहणारी स्वप्नाळू डोळ्याची मुग्धा… आईवडिलांच्या लाडाकोडात वाढलेली. भलेही ते श्रीमंत नव्हते पण तिची प्रत्येक इच्छा मात्र पुरी करू शकत होते. प्रत्येक वाढदिवसाला आईनं बनवलेला केक आणि बाबांची गिफ्ट ठरलेली. तिचं अस्तित्व म्हणजे घरभर चैतन्य… चौथ्या वाढदिवसाला तीनचाकी सायकल तर पाचव्या वाढदिवसाला सिंथसायझर. घरभर कपड्यांचा ढीग आणि चपला, सॅन्डलस्चा पसारा. आजीआजोबांची तर लाडाची पहिली नात. बाहेर गेलं की बाहुलीचा हट्ट, बाहुल्याच बाहुल्या आजीनं जपून ठेवलेल्या! लाकडी ठकीपासून आईनं आणलेल्या अनेक ड्रेस बदलणार्या बार्बीपर्यंत. परी बोलायची सगळ्यांशी… कॉलनीतली सगळी मुलं जमायची. घराचं गोकुळ करून टाकायची. भावलाभावलीच्या लग्नाचा थाट उडायचा. भातुकलीचा खेळ रंगायचा… स्वप्नं सुरु व्हायची भावी आयुष्याची… खोटी खोटी भांडणं. आईबाबांचं समजावणं तेही खोटं खोटंच. या सार्या आनंदात बालपण बहरून गेलं. हातावरच्या फोडासारखं सगळे जपत होते. जणू दुःख, वेदना तिला माहीतच नव्हत्या. घरातली राजकन्याच होती ना ती. शाळेमध्ये कायम सगळ्या शिक्षकांची लाडकी. दहावीला बेस्ट स्टुडंटचा मान, शाळेच्या मासिकात फोटो, स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी… स्वर्ग दोन बोटं उरला होता तेव्हा. पहाट झाली की पक्ष्यांच्या किलबिलाटानं जसं वातावरण प्रफुल्लित होतं तसं घर वाटायचं ती घरी असली की.
कॉलेजमध्ये गेल्यावर तर परीला पंख फुटले. काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं. आईचा पाठिंबा होता, वडिलांच मार्गदर्शन होतं. यशाची कमान चढत जात होती. आज काय वादविवाद स्पर्धेत जळगावला प्रथम तर उद्या काय काव्य वाचनासाठी नाशिकला जायचं… पूर्वी खेळण्यांनी नि आता बक्षिसांनी, ट्रॉफीजनी घर भरलं होतं. तिची हुशारी तिच्या व्यक्तिमत्वात भर घालायची. अनेक मुलं गळ टाकून बसली होती पण घरच्या संस्काराचे बांध पक्के होते. आईवडिलांना माहीत होतं मुलगी वेडंवाकडं पाऊल टाकणं शक्यच नाही. ती घरच्यांना विचारल्याशिवाय काहीही करणार नाही आणि तिलाही त्याची जाण होती. एक दाट कुरळ्या केसांचा, प्रेमळ नजरेचा तरुण तिलाही आवडला होता. तिच्या मतांशी जुळणारा होता, अडचण कुठंच नव्हती. आईवडिलांना विचारलं असतं तर त्यांनीही परवानगी दिली असती पण तसं करणंही तिला जमलं नाही.
शिक्षण पूर्ण होतानाच वडिलांनी स्थळ पहायला सुरुवात केली. कुणी नापसंत करावं असं तिच्यात काही नव्हतंच. पहिल्याच स्थळाकडून होकार आला. घरचे बर्यापैकी श्रीमंत होते. एकुलता एक मुलगा. वडिलांच्या व्यवसायात होता. शिक्षण जास्त झालेलं नव्हतं. आई म्हणत होती निदान तिच्यापेक्षा जास्त शिकलेला, तोलामोलाचा मुलगा पहा पण मुलाच्या घरच्यांनी खूपच जोर धरला आणि लग्न जमलं. इतकं झटपट झालं की कुणाला समजलंच नाही परी सासरी चाललीय म्हणून…
लग्नाचा मोठा थाट उडवून दिला बाबांनी. एकुलत्या एक लाडक्या पोरीचं लग्न… सासरच्यांनी जे मागितलं त्याच्या दुप्पट दिलं. मुलीलाच काय तिच्या सासूलाही दागिने केले… जावयाबरोबर सासरेबुवांनाही सूट शिवला. सासूबाईंना पैठण्या घेतल्या. मात्र लग्नसोहळा पार पडेपर्यंत उत्साहात वावरणारे बाबा परी सासरी निघताच घळघळा रडू लागले. त्यांना अश्रुधारा सावरताच आल्या नाहीत. त्यांना दिसत होती बालपणापासूनची परीची रूपं, बक्षीस नाही मिळालं म्हणून फुरंगटून बसणारी परी, झोपताना गोष्ट सांगा म्हणून हट्ट करणारी परी, पाऊस आला की घाबरून मिठी मारणारी परी, पहिल्यांदा शाळेचा युनिफॉर्म घालून जाणारी परी, बघता बघता बापाला सोडून निघाली होती सासरी…
आईवडिलांना घर सुनंसुनं भासू लागलं. तिची रूम रिकामी झाली. बाबांना दररोज तिच्या लहानपणापासूनच्या गमतीजमती, रुसवे-फुगवे आठवायला लागले. शोकेसमधली भातुकलीची भांडी पोरकी दिसू लागली. आईला सगळीकडं परीचे भास होऊ लागले. ती हाक मारतेय असं वाटून ती ओ देऊ लागली. तिचं घरभर नाचणं, हसणं, बागडणं दिसू लागलं. आई रागवून म्हणायची, ‘‘कशाला इतक्या लवकर धाडली पोरीला सासरी? राहिली असती पोर आपल्याजवळ…’’
बाबा समजूत काढायचे. मुलीचं सासर हेच तिचं खरं घर. जगरहाटीच आहे ती. काही दिवसातच दोघांना सवय झाली. आपली लाडकी लेक आनंदात सासरी गेली ह्यातच त्यांना समाधान वाटत होतं.
परी सासरी गेली. तिचा आवाज निदान फोनवर तरी ऐकायला मिळावा म्हणून बाबा फोन करीत पण परी कधीच फोनवर यायची नाही. बाबा वैतागायचे, तशी आई म्हणायची, ‘‘अहो, नवीन लग्न झालंय त्यांचं, स्वर्गसुखात डुंबत असतील राजाराणी… आपली कुठून आठवण येणार?’’
दोघंही हसायचे पण वाटत असायचं पोरीचा आवाज ऐकावा, तिच्या सासरच्या गमती जमती ऐकाव्यात.
पहिल्या सणासाठी ती घरी आली. आईबाबा वाटच पाहत होते. अगोदरच सुंदर असणारी आपली लेक आता बहरलेल्या आम्रवृक्षासारखी दिसत असणार म्हणून ती दारात दिसेपर्यंत ते तिच्या वाटेकडे डोळे लावून वाट बघत होते. लेक आली आणि आईबाबांचे चेहरे खर्रकन् उतरले. पोरगी होत्याची नव्हती झाली होती. सगळी रया गेली होती. गळ्याची हाडं दिसत होती. डोळ्याखाली काळी वर्तुळं जमा झाली होती. चेहर्यावर पहिल्यांदा माहेरी येण्याचा उत्साह वाटत नव्हता.
आईनं जवळ घेतलं. पोरीला दिवस गेले होते. आईनं वडिलांची समजूत घातली, ‘‘अहो आता परी आई होणार आहे. काही जणींचे डोहाळे कडक असतात.’’
‘‘इतक्या लवकर? काही दिवस हिंडून फिरून घेते आजची तरुण पिढी. संसार असतोच पुढे जन्मभर.’’
‘‘हे पहा, मुलीच्या सासरच्या बाबतीत माहेरच्यांनी लक्ष घालायचं नसतं. आपण होतोय ना आजीआजोबा?’’
बाबा हसले खरं पण परी हसली नाही. बाबांचं काळीज हाललं. काहीतरी गडबड आहे हे त्यांना जाणवलं. दोन-तीन वेळा त्यांनी परीला विचारायचा प्रयत्न केला पण त्यांचा धीरच झाला नाही. सणवार पार पडले पण परी नेहमीसारखी हसत नव्हती. तिला तिच्या मैत्रीणींनाही भेटावसं वाटत नव्हतं.
आपली पोरगी काही न सांगता सहन करणारी आहे हे त्यांना माहीत होतं. म्हणूनच जास्त काळजी वाटत होती.
आई त्यांना समजून सांगत होती, ‘‘अहो माहेरात लाडाकोडात वाढलेल्या पोरीची सासरी गेल्यावर भूमिका बदलते. संसारात पडल्यावर असंच होणार. आगगाडी सुद्धा रूळ बदलताना खडखड करतेच ना…’’
बाबा कसनुसं हसत पण त्यांना ते पटत नव्हतं. पोरीचा सासरी छळ तर होत नसेल ना? ह्या धास्तीनं त्यांना चैन पडत नव्हती. काहीतरी बिनसलंय ह्याची जाणीव दोघांना होत होती. मुली माहेरी आल्या की खूश होऊन सारखं आमच्या घरी असं, आमच्या घरी तसं, ह्यांना हे आवडतं, ते नाही आवडत अशा गप्पा मारतात. एरवी शाळा, कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टी सांगणारी परी आता मात्र गप्प होती. एक प्रकारचा तणाव जाणवत होता पण कोणीच काही बोललं नाही. सण होताच परी पुन्हा सासरी गेली.
काही दिवसानंतर बाबांनी फोन करून परीला बाळंतपणासाठी माहेरी पाठवण्याची विनंती केली. सासर्यांनी फोन घेतला. रुक्ष आवाजात ते म्हणाले, ‘‘घेऊन जा आणि परत पाठवू नका!’’
बाबांच्या हृदयात धस्स झालं. शंकेची पाल चुकचुकली होती. शंका खरी ठरली. त्यांनी जावईबापूंना फोन केला. काय झालं ते तरी सांगा म्हणून विनवणी केली. ज्या माणसाचे शब्द सगळे जण झेलत असत, ज्यांनी कधी कुणापुढे हात पसरले नव्हते ते भरल्या डोळ्यांनी जावयाला कारण विचारू लागले तेव्हा तो एवढंच म्हणाला,
‘‘तुमची मुलगी मला आवडत नाही.’’
कुणीतरी घणाचे घाव छातीवर घालतंय, त्याचवेळी उकळता लोखंडाचा रस कानात ओततंय असं त्यांना वाटत होतं. माझी मुलगी सगळ्या घराला जिवंतपणा देणारी, चैतन्य देणारी परी… तिची अशी निर्भत्सना. उन्मळून पडलेले बाबा तडक गेले आणि परीला घेऊन घरी आले.
तिथं त्यांना कोणी पाणीही विचारलं नाही. आले तशीच गाडी माघारी फिरवली.
प्रचंड अपमानास्पद वाटलं बाबांना. त्यापेक्षाही परीला आपल्या बाबांची केविलवाणी अवस्था पाहवेना.
परी घरी आली. पोरीचं पहिलं बाळंतपण करायचं म्हटल की आयांना केवढा उत्साह असतो, कौतुक असतं, आनंद असतो पण सगळं असूनही घरावर एक प्रकारचं उदासीचं सावट पसरलं होतं. बाबाही उसना उत्साह आणून लेकीला धीर देत होते.
‘‘परी, तू काही काळजी करू नकोस, हे घर कायमचं तुझंच आहे. एक अनुभव वाईट आला म्हणून काय झालं?’’
ती नुसतीच खिन्न हसायची. जणू आत्मविश्वासच गमावून बसली होती.
परीला मुलगी झाली. आईबाबांना आजीआजोबा झाल्याचा प्रचंड आनंद झाला. परीच्या बाहुलीला कुठं ठेवू आणि कुठं नको असं त्यांना झालं. त्यांनी आनंदानं तिच्या सासरी फोन केला. नात झाल्याच्या आनंदात ते सारं विसरून जातील आणि परीला न्यायला येतील, नातीला पहायला येतील अशी एक वेडी आशा मनाशी घेऊन ते भरभरून बोलले. ‘‘जावईबापू अहो आईचा रंग आणि तुमचे डोळे घेऊन आलीय लेक तुमची, कधी येताय भेटायला?’’
‘‘तुमची मुलगी आणि तिची मुलगी ह्यांचा आमचा काहीही संबंध नाही. घटस्फोटासाठी कोर्टाच्या फेर्या मारण्यात आम्हाला रस नाही आणि वेळही नाही. किती लाख हवेत ते कळवणे. तुम्हीही घरंदाज आहात, कोर्टकचेर्या करू नयेत असं वाटतं. लवकर कळवणे.’’
हे ऐकताच आईचा धीर खचला. परी काहीच बोलत नव्हती आणि तिला असं बाबांना बघवत नव्हतं. एक हसतं खेळतं घर उदास झालं. नवीन आलेल्या बाळाचं कौतुकच कोणाला भरभरून करता येत नव्हतं. ते निरागस बाळ मात्र सगळ्यांकडे बघून दिलखुलास हसत होतं. त्याला जगाचे टक्के टोणपे माहीत नव्हते.
परीच्या वडिलांचे दोन मित्र तिच्या सासरी जाऊन आले. ‘‘नक्की काय झालं सांगा, आपण मार्ग काढू, मुलीला अशा अवस्थेत सोडू नका, नातीचा विचार करा. तिनं पुढं काय करायचं, विचार करा’’ म्हणून विनवणी करू लागले.
त्या दोन मित्रांना घरातही न घेता सांगण्यात आलं, ‘‘आम्हाला ती मुलगी आवडत नाही. वाटेल तेवढे पैसे मागा आणि मोकळे व्हा. तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी किती पैसे लागतील ते आत्ताच मागून घ्या…’’
त्या मित्रांबरोबरच घटस्फोटाची रेव्हेन्यू तिकीटासहित कागदपत्र पाठवली. त्यावरची रकमेची जागा मोकळी सोडली होती.
‘‘ह्या एफेडेव्हिटवर तिची आणि तिच्या वडिलांची संमतीची सही करून पाठवा, हवी तेवढी रक्कम एकदाच टाका आणि यापुढं कधीही कोणीही आम्हाला भेटायला येऊ नका.’’
अतिशय रुक्ष भाषेत कुठेही सून, नात, बाबा असे आपुलकीचे शब्द न वापरता त्यांनी मित्रांना निरोप दिला.
परीच्या वडिलांनी एकही पैसा न मागता त्या कागदपत्रांवर सह्या करून पाठवून दिली. परी कायमची माहेरी आली.
आईवडिलांची अवस्था द्विधा झाली. नातीच्या जन्माचा आनंद मानावा की तिचा पिता हिरावल्याचं दुःख करावं हे त्यांना समजेना. त्याहूनही परीकडं त्यांना पहावेना. तिची समजून काढायला त्यांच्याकडं शब्दच नव्हते.
आईच्या वेदना तर वेगळ्याच होत्या. कौतुकानं आसपासच्या बायकांना बोलवायची भीती वाटायला लागली. कधी कधी हा समाज खूप भीतीदायक वाटतो. एखाद्या जोडप्याला दोन-तीन वर्षात मूल नाही झालं तर शंभर जण चौकशी करतील, सल्ले देतील पण मूल झाल्याचं कळताच भेटणं, बोलणं पण बंद करतील. लग्न झालेली मुलगी एखादा महिना जास्त माहेरी थांबली की चौकशा सुरु. मुलीच्या काळजीपेक्षा अशा हितचिंतकांचीच जास्त भीती त्यांना वाटू लागली. बघता बघता सगळ्या घराचा समाजाशी संपर्कच कमी होऊ लागला.
या सगळ्यात परीच्या मनाच्या वेदना तर कुणाला समजण्या पलीकडच्या होत्या. आपण कोणाला नकोसं वाटण्याची भावना कोणत्याही मरणप्राय आजारापेक्षा जास्त यातनामय असते. त्या छोट्या बाळाला या वेदना समजू द्यायच्या नव्हत्या, आता त्याच्यासाठी जगणं भाग होतं.
प्रचंड उत्साहात बारसं होण्याचा योग त्या बाळाच्या नशिबात नव्हता. बारसं होत असताना आईबाबांना आठवत होतं परीचं बारसं आणि घरातलं ते मंगलमय वातावरण.
माय लॉर्ड, ते बाळ म्हणजे मी परिणीती. ममानं कोणत्या उद्देशानं हे नाव ठेवलं माहीत नाही पण मी ती परिणीती, पहिल्यांदा मला जेव्हा हे समजलं असेल तेव्हा किती उद्ध्वस्त झाले असेल कल्पना करा. एकांतात जाऊन प्रचंड किंचाळून रडावंसं वाटलं होतं मला. आज पंचवीस वर्षानंतर ममाच्या वतीनं मी त्या माणसावर केस दाखल करतेय ज्यानं माझ्या ममाला सोडून दिलं त्याच्यावर. फसवणुकीबद्दल नाही, घटस्फोटाबद्दल नाही तर चक्क बलात्काराबद्दल. माय लॉर्ड, जर त्या माणसाला माझी आई आवडत नव्हती तर माझा जन्म झालाच कसा? ती बळजबरी असेल ना? तो बलात्कारच म्हणायचा. मग त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी.
गेली पंचवीस वर्ष मी भोगतेय शिक्षा या माणसाच्या एककल्लीपणाची. वयाच्या तिसर्या वर्षापासून मी सहन करतेय लोकांच्या सहानुभूतीच्या त्रासदायक नजरा. शाळेत नाव घालताना हेडमिस्ट्रेसनं लाख प्रश्न विचारले. एका प्रतिष्ठित शाळेनं तर आईवडील एकत्र नाहीत त्याचा इतर पालकांवर परिणाम होईल म्हणून प्रवेशही नाकारला. कोणतं नाव लावायचं? वडिलांच की आईच्या वडिलांचं? त्या बापाचं? ज्यानं मला तिरस्कारातून जन्म दिला त्याचं? त्या बापाचं ज्यानं माझं तोंडही पाहिलं नाही त्याचं? पोटचा गोळा म्हणून ज्याला कधी मला भेटावंसं पण वाटलं नाही त्याचं? वर्गातल्या मुली हसायच्या आणि आपापसात कुजबुजायच्या,
‘‘हिच्या वडिलांनी हिच्या आईला सोडून दिलंय!’’
माझा काय दोष सांगा… मी इतर सामान्य मुलींसारखी नाही? मला दोन तोंड आहेत की चार पाय आहेत म्हणून तुम्ही माझ्याकडं असे पाहता? ती वेगळी नजर कायम मला जाळत असते. खाली मान घालून चाललं तरी ती जाणवते. त्याच्या कृतघ्नपणाची शिक्षा ममा जन्मभर भोगतेय, मलाही भोगावी लागतेय… का? मला न्याय हवा आहे. त्याला शिक्षा देऊन.
ममाला नोकरी शोधतानाही खूप त्रास झाला. कायम आईवडिलांच्या आधारावर जगणं तिलाही मान्य नव्हतं. नोकरीच्या ठिकाणच्या विखारी नजरा तिला समजत असायच्या. खोटी सहानभूती दाखवणारे अनेक जण जवळ येऊ पाहत होते. काही घाबरत घाबरत तर काही निर्लज्जपणे अधिकार दाखवत. नवर्यानं सोडलेली बाई म्हणजे जणू सगळ्या समाजाची मालमत्ता असते.
एका निर्मळ झुळझुळ वाहणार्या नदीचं एका डबक्यात रुपांतर झालं होतं. केवळ एका मस्तवाल माणसाच्या मनमानी निर्णयानं. मानसिक आयुष्यच उद्ध्वस्थ झालं तिचं. त्या नंतरही वडिलांनी एक स्थळ आणलं होतं. तो मुलगा तिला तिच्या मुलीसह स्वीकारायला तयार झाला होता पण परीच बाबांना म्हणाली,
‘‘माझं मन मेलंय बाबा, आता माझ्यासाठी कुणाला कशाला तडजोड करायला लावता? तुम्हाला मी जड झालेय का?’’
बाबांनी तिला घट्ट हृदयाशी धरलं आणि दोघं मनसोक्त रडले. हे सारं, दाराच्या पडद्याआड उभी राहून छोटी परिणीती पाहत होती. तिचं डोळे पुसायचं ते वयही नव्हतं जजसाहेब.
पुढं घरात लग्नाचा विषय कधीच निघाला नाही आणि ममानंही कधी अश्रूप्रदर्शन केलं नाही. नाही… तिचे अश्रूच आटले होते.
अनेकांचं आयुष्य होरपळून टाकणार्याला शिक्षा नको का व्हायला?
नुसतं मानसिकच नाही तर घराचं सगळं स्वास्थ्यच बिघडलं. पुराच्या तडाख्यात एखादा सुंदर बंगला दुभंगून जावा तसं आम्हा सगळ्यांचं मनःस्वास्थ्य बिघडून गेलं होतं एका निर्णयानं. आजीचं हसणं बंद झालं. तिला बाहेर जाण्याची भीती वाटायला लागली. रक्तदाबासारखा आजार जडला. दर महिन्याला डॉक्टर आणि महिन्याची औषधं ह्यांचा खर्च वाढू लागला. आजोबा नुसतंच वर्तमानपत्र समोर घेऊन बसत. त्यांना समोरचं काही वाचताच येत नव्हतं. मात्र तिघंही परिणीतीचं मन जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत.
वाढदिवसाच्या दिवशी आजोबांनी सायकल आणली. खूप आनंद झाला पण रात्री सगळे झोपल्यावर पांघरूणाच्या आत ढसढसा रडून घेतलं मी… केक कापताना सगळेजण टाळ्या वाजवत म्हणत होते हॅपी बर्थडे टू यु परिणीती. मी आठवत होते माझ्या बाबांना ज्यांच्या जवळ मला हट्ट करायचा होता, ज्यांच्या मिठीत बसून मला त्यांना केकचा घास भरवायचा होता. मला त्यांच्याकडून हवं होतं गिफ्ट.
असं म्हणतात वडिलांचं मुलीवर जास्त प्रेम असतं म्हणे… कसं असेल बरं ते? माझी मैत्रीण सांगायची मला, अगं मी आजारी पडले की आई लगेच डॉक्टरांकडं घेऊन जाते पण बाबा मात्र रात्र रात्र माझ्या उशाशी बसून माझ्या डोक्यावर हात ठेऊन जागत राहतात. नाहीतर रात्रभर घरात फेर्या मारत राहतात. ममा सांगते, तिचं लग्न झालं तेव्हा आजोबाच खूप रडत होते म्हणे. याला म्हणतात का वडिलांची माया? वर्गात एकदा निबंध लिहायला सांगितला, माझे बाबा… मुलींनी खूप छान छान निबंध लिहिले. मला एक शब्दही लिहिता आला नाही. मॅडम खूप रागावल्या. त्यांना कळल्यावर त्यांनी मला जवळ बोलवलं. ते मला खूप इन्सलटींग वाटलं…
शाळेत पेरेन्टस मिटिंगला आईच का नेहमी येते, एकदा वडिलांना घेऊन ये असं टीचरनी म्हटल्यावर सगळा वर्ग हसला होता. आईला कुणीच घाबरत नाही. बाबांचा हात धरून येणार्या मुली अशा थाटात येतात जणू राजकुमारीच…
फादर्स डे ला दरवर्षी मुली खूप छान छान ग्रीटिंग्ज करतात. एकमेकींना दाखवतात. स्कूल टीचर प्रत्येक मुलीला समोर येऊन वडिलांबद्दल चार वाक्यं बोलायला सांगतात. मुली भरभरून वडिलांचं कौतुक करतात. कुणी म्हणतं माझे बाबा डॉक्टर आहेत, दिवसभर बाहेर असतात पण रात्री मला जवळ घेतल्याशिवाय जेवण घेत नाहीत. कुणी म्हणतं माझे बाबा खूप लांब असतात पण रोज संध्याकाळी फोनवर माझ्याशी बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. केवढा आधार असेल ना मुलींना वडिलांचा? मी फादर्स डेला दरवर्षी काहीतरी कारण काढून गैरहजर रहायला सुरुवात केली. कुणाच्या नाही पण आई आणि आजोबांच्या ते लक्षात यायचं मात्र ते त्या दिवशी मला कधीच काही म्हणत नसत. ममा पण वडिलांना कधी हॅपी फादर्स डे म्हणू शकली नाही. फादर कधीच हॅपी दिसले नाहीत की दिलखुलास हसले नाहीत. ममाचं, आजीआजोबांचं हास्य, माझं बालपण हिरावून घेण्याचा काय अधिकार होता त्या माणसाला?
या एका घटनेमुळं आनंदी प्रसंगाचं सुख लुटताच आलं नाही. परिणीती अकाली प्रौढ झाली. मानसिक अवस्थेचा परिणाम तिच्या शरीरावरही झाला. कृश आणि खुरटलेल्यासारखी दिसयला लागली. बागेतल्या गुलाबाला काही दिवस पाणी नाही मिळालं की जसं ते निस्तेज दिसायला लागतं तशी ती दिसत असे. बाहेर हिंडताना देखील खाली मान घालून पाठीत वाकून एखाद्या अपराध्यासारखी ती चालत असे.
जजसाहेब, पूर्वी सासुरवास करताना सासवा सुनेला चक्क गरम पळीनं चटके देत. तो दाह काही काळ टिकत असे. या माणसानं आम्हा दोघींना लांबूनच डागण्या दिल्या आहेत. त्याचा दाह कायम जाणवत रहातो. किती उदाहरणं सांगायची?
एकदा शाळा सुटल्यावर खूप पाऊस येत होता. सगळी मुलं घरी गेली. आम्ही दोघी मैत्रिणीच थांबलो होतो. ममाला ऑफिसमध्ये अचानक थांबावं लागलं. आजोबा आजारी होते. मैत्रिणीचे वडील कार घेऊन आले. त्यांनी ज्या प्रेमानं पाहिलं ना मैत्रिणीकडं, त्या क्षणी एकटेपणाची खूप जाणीव झाली मला. जणू समोर उधाणलेला अथांग सागर आहे आणि किनार्यावर मी एकटी उभी आहे, घनगंभीर गाज हृदयात धडकी मारत आहे… मैत्रीण म्हणाली, ‘‘चल आम्ही सोडतो तुला घरी.’’
वडिलांनी लगेच गाडी वळवली. खरंच मुलीचा केवढा अधिकार असतो ना वडिलांवर… आणि वडिलांचा केवढा आधार वाटत असेल मुलांनाही.
परीक्षा संपल्यानंतर आम्ही काही मुली पालकांबरोबर सिनेमाला गेलो होतो. रात्री उशिरा सिनेमा संपल्यानंतर सगळे जण म्हणाले, चला आईस्क्रीम खायला जाऊ. ममा घाबरली. म्हणाली, नको, रात्री आपल्या भागात खूप अंधार असतो.
मी मैत्रिणीला सांगितलं तशी ती म्हणाली, चालेल, मी जाते. माझ्या बरोबर माझे बाबा आहेत… सिनेमा पाहिल्याचा आनंद क्षणात नाहीसा झाला माझा. जजसाहेब, माझे वडील जर हयातच नसते तर मी आठवणींनी रडून तरी घेतलं असतं पण परिस्थिती तशीही नाही. सगळ्या जगानं आमची हेटाळणी करावी असं आम्हाला सोडून दिलं होतं. परीक्षा झाली की पुस्तक रद्दीत टाकावं तसं.
या वीस पंचवीस वर्षात आमच्या जखमांवर खपली धरत आली असतानाच ममा आणि आजोबांना आता एका यक्ष प्रश्नानं ग्रासलंय, माझं लग्न कसं होणार? कारण मी पण आजोबांच्या संस्कारातच वाढलेय आणि ममाला असा अनुभव आल्यानंतर मी ताकच काय पाणी पण फुंकून प्यायला शिकलेय. पुरुष या जातीवरचा विश्वासच उडालाय माझा. ममाला तर सगळ्या जगाची भीती वाटायला लागलीय आणि आजोबांचं खूप वय झालंय. तुझ्या लग्नासाठीच जीव अडकलाय असं निर्वाणीचं ते बोलायला लागले आहेत. अशा परिस्थितीत कुणा मुलाकडील लोकानी विचारलं, आईचा घटस्फोट का झाला? तर आजोबा तर उद्ध्वस्थच होतील.
हजारो वर्षापूर्वी महाभारत घडलं. कुरुक्षेत्रावर कपटकारस्थान झालं. कौरवांनी पांडवांना लाक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केला. कपटानं शकुनीनं डाव टाकला द्यूताचा. कपटानं अभिमन्यूला मारलं. कपटानं पांडवानी काय केलं, भीष्माचार्य वध, कृपाचार्य मृत्यू, कर्ण, दुर्योधन मृत्यू सुद्धा कपटानंच… फरक एवढाच श्रीकृष्णानं दुष्टांचा नायनाट होण्यासाठी, सुराज्य येण्यासाठी कपटाचा नव्हे तर कमजोरीचा फायदा घेतला पण कुरुक्षेत्रावर दिसली ती कपटनीती आणि विध्वंसच. दोन्हीकडील गुरुतुल्य, बलवान योद्धे मारले गेले. आम्ही आज त्याच कुरुक्षेत्रावर आहोत. तसंच कपट करतायत लोक एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी आणि मारले जातायत निष्पाप. त्या काळी निदान श्रीकृष्ण धावून आला द्रौपदीच्या मदतीला. आता आमच्यासारख्या अबलांना वाचवायला श्रीकृष्ण येणार नाही. कारण आता प्रत्यक्ष वस्त्रहरण होतच नाही तर अप्रत्यक्षपणे होत असतं. जसं आमच्या बाबतीत झालं. घरोघरी होत असेल.
जजसाहेब, काळ कितीही बदलला तरी सुधारणा ही फक्त इतरांना सल्ले देण्यासाठीच असते. स्वतःच्या घरात लग्नाचा विषय निघाला की अगदी प्रेमविवाह करणारा, तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणेन, घरदार सोडेन म्हणणारा प्रियकरही म्हणतो, आईवडील म्हणतील तसंच करावं लागेल. घटस्फोटीत बाईची मुलगी आम्हाला सून म्हणून नको, असं कोणी म्हटलं की जखमेवरची खपली निघून घळघळा रक्त वहायला लागेल.
तशा ठेचा नेहमीच लागतात. ममानं कधी चांगला ड्रेस घातला की लोक आश्चर्यानं पाहतात. तिला लग्नसमारंभात जायचीही भीती वाटते. ती एकटी पडते. तिच्या मैत्रिणी नवर्यांना घेऊन नखशिखांत नटून तोर्यात मिरवत असतात. तिला हळदी-कुंकुवालाही सहजासहजी बोलवत नाहीत. स्वतःच्या बाबतीत असं घडतंय असं जाणवून पहा आणि किती तडफड होते ते अनुभवा…
हे सारं आम्ही भोगतोय ते कुणा एका एककल्ली माणसाच्या अविचारामुळे. खून करून जीवन संपवून टाकणार्याला फाशीची शिक्षा होते पण एखाद्याला मानसिक क्लेश देऊन जन्मभर मरणयातना देणार्याला काहीच शिक्षा नाही?
जजसाहेब, आरोपीचे वकील म्हणतील गुन्हा सिद्ध व्हायला पुरावा लागतो. आम्ही दोघी जणी, आमची ही अवस्था आणि ह्या आयुष्य पोखरून टाकणार्या मानसिक वेदना हे पुरावे कमी का आहेत? आज या खटल्याच्या निमित्तानं मनातला ज्वालामुखीचा असा उद्रेक झाला, त्याच्या झळा तुम्हाला लागल्या असतील तरच आमची व्यथा समजू शकेल. असे गुन्हे करणार्यांना शासन झालं पाहिजे. कायद्याचा कीस काढून माझे वकीलमित्र हा खटला उभाच राहू शकत नाही इथून सुरूवात करतील, पळवाटा काढून खटला निकालातही काढतील, कोर्टात भावभावनांना किंमत नसते. ठोस पुरावाच सारं सिद्ध करतो, असंही सांगतील पण त्या निमित्तानं समाजापुढं हा विषय येईल, त्यावर चर्चा होतील आणि पुढं कोणी असं काही करताना विचारपूर्वक पावलं टाकतील. असं घडलं तरी ते नसे थोडके.
अॅडव्होकेट परिणीती संझगिरी शांतपणे आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. सगळ्या सभागृहात गंभीर शांतता पसरली. जजसाहेब स्वतःच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या अवस्थेतच ते सेशन संपलं. सुन्न वातावरणात एकमेकाशी एकही शब्द न बोलता प्रत्येकजण बाहेर बाहेर पडू लागला.
टीप : कथानक, प्रसंग, घटना पूर्णपणे काल्पनिक. कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा.
सदानंद भणगे
पसायदान, कलानगर सोसायटी,
गुलमोहर रोड,सावेडी,अहमदनगर 414003
9890625880
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.