“शब्द संभलकर बोलिए, शब्द को हाथ ना पांव।
एक शब्द करे भलाई , तो दुजा करे घाव ॥”
क्रांतिकारक संत कबीर महाराजांच्या वरील वचनाप्रमाणे शब्द हे किती मोठं प्रभावी ‘शस्त्र’ आहे हे आपण सगळेच अनुभवत असतो. शब्दानं शब्द वाढत गेला की त्याचं पर्यावसान भांडणात होणं हे ठरलेलंच असतं! तसंच सहानुभूती दर्शविणारे आपुलकीचे चार शब्द देखील एखाद्या वाट चुकलेल्या ‘मुसाफिराला’ दिशादर्शक ठरू शकतात!
शस्त्राचा आपण शब्दशः अर्थ घेतला तर पूर्वीच्या काळी युद्धात वापरल्या जाणाऱ्या तलवारी, भाले, कट्यारी इत्यादी धारदार शस्त्रं आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याची जागा आता ए.के.- ४७, ए.के.-५६ रायफली, निरनिराळ्या प्रकारच्या रिव्हॉल्वर्स तसंच विनाशकारी शक्तिशाली बाॅम्ब या आधुनिक शस्त्रांनी घेतली असल्याचं बघण्यात येतं! याशिवाय अत्याधुनिक क्षेपणास्त्रं, विविध प्रकारच्या तोफा इत्यादी शस्त्रास्त्रांचा सुद्धा यात समावेश होतो. अगदी पौराणिक काळात सुद्धा ‘ब्रह्यास्त्र’ या हुकमी अस्त्राचा वापर केल्याचं आपल्या वाचनात आलं आहे. तसंच धनुर्विद्येसाठी लागणारं महत्त्वाचं शस्त्र म्हणजे धनुष्यबाण! या धनुष्यबाणाचा वापर त्याकाळात खूप मोठ्या प्रमाणात केला जायचा.
रामायण किंवा महाभारत काळात धनुष्यबाण, गदा, खड्ग ( तलवार ), भाले, ढाली अशा विविध प्रकारच्या शस्त्रांचा उल्लेख आढळतो. यात योगेश्वर श्रीकृष्णाच्या हातातील बोटात विराजमान असलेल्या सुदर्शन चक्राचा येथे आवर्जून उल्लेख करावाच लागेल! महाभारत काळातील कुरूक्षेत्रावरील महायुद्ध असो किंवा रामायणकालीन राम – रावण युद्ध असो … यात खूप मोठ्या प्रमाणात धनुर्विद्येचा तसंच गदायुध्दाचा वापर करण्यात आला. प्रसंगी ‘ब्रह्यास्त्र’ही वापरण्यात आलं! त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धात बलाढ्य अमेरिकेनं जपान देशाच्या ‘हिरोशिमा’ आणि ‘नागासाकी’ या दोन शहरांवर शक्तिशाली अणुबाँब टाकून प्रचंड दहशत निर्माण केली. परिणामी दोन्ही शहरे बेचिराख होऊन खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. एका क्षणात अगदी होत्याचं नव्हतं झालं होतं!
याचाच अर्थ असा की शस्त्राचा अनुचित वापर झाला तर रक्तपात किंवा जीवितहानी हे ठरलेलंच असतं! अगदी साधं उदाहरण घ्यायचं झाल्यास आपल्या स्वयंपाक घरातील किरकोळ चाकूच बघा ना… त्याचा उपयोग आपण नेहमीच भाजी अथवा फळं चिरण्यासाठी करत असतो. मात्र दुर्दैवानं एखाद्या घरात अशी घटना घडून जाते… अगदी क्षुल्लक कारणावरून या साध्या चाकूचा वापर एखाद्याला जखमी करण्यात किंवा जीवे मारण्यासाठीही केला जातो!
सांगायचा मुद्दा असा की,
-
शस्त्र हे अत्यंत जपून वापरायचं साधन आहे हे आपण लक्षात ठेवायलाच हवं. आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा उपयोग करणं जसं आवश्यक आहे तसंच विनाकारण, गरज नसताना कुठल्याही प्रकारचं शस्त्र ‘परजणं’ हे निषेधार्हच आहे! मग ते शस्त्र कुठलं का असेना … साध्या ब्लेडचंच बघा, तिचा उपयोग पेन्सिल सोलण्यासाठी होतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र काळजीपूर्वक वापरलं नाही तर बोटांना इजा होऊ शकते. तसंच त्या ब्लेडचा उपयोग दाढी करताना केला आणि थोडी जरी चूक झाली तर जखमही होऊ शकते!
जगभरात मोठ्या प्रमाणात कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या वृत्तपत्र व्यवसायासाठी वापरण्यात येणारं शस्त्र म्हणजे लेखणी! एखाद्या सार्वभौम राष्ट्राची सत्ता उलथवून टाकण्याचं जबरदस्त सामर्थ्य या लेखणीमध्ये असतं हे कितीतरी वृत्तपत्राच्या संपादकीय लेखाद्वारे सिद्ध झालं आहे. तसंच साहित्य क्षेत्रातही या लेखणीच्या माध्यमातून विविध विषयांवर साहित्य निर्मिती सुरू असते. मग ती कुणाला भावते तर कुणालातरी खुपते सुद्धा! कुणाला मार्गदर्शक तर कुणासाठी प्रेरणादायी पण ठरते! त्याचप्रमाणे आपली जीभ हेही एक प्रकारचं दुधारी ‘शस्त्र’च आहे. ही जीभ जेव्हा बोलण्याचं काम करते तेव्हा मुखातून पडणारे श्लोक किंवा सुमधुर गाणी आपल्याला अतिशय श्रवणीय वाटतात. याउलट जर का याच जिभेनं आपला तोरा दाखवला तर तिच्याद्वारे होणारा शब्दांचा भडिमार कानांना असहनीय वाटणारच! मग न राहवून कुणाच्या तरी तोंडातून हे वाक्य बाहेर पडतंच … “तुझी जीभ आजकाल दुधारी शस्त्रासारखी चालते रे, जरा आवर घाल तिला!”
तर शस्त्र हे कुठलंही असू द्या … त्याचा वापर जपूनच करायला हवा. नाहीतर दुर्दैवानं आपण कल्पना करू शकणार नाही अशा दुर्धर प्रसंगाला सामोरं जाण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यानंतर केवळ पश्चात्ताप करणंच हाती उरतं. दुसरं काही नाही!!
“कुछ इसी तरह से रिश्तोंको हम निभाते रहे!
हर बार चोट खाकर भी ऐसेही मुस्कुराते रहे!!”
विनोद श्रा. पंचभाई
तपोवन सोसायटी, वारजे, पुणे.
भ्र.क्र. ९९२३७९७७२५आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
माऊली विविध प्रकारच्या शस्त्रांचे फारच सुंदर विश्लेषण करून आपण त्यांच्या वापराविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!
अप्रतिम रचना केली. पुढील दैदिप्यमान वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
भाई मार्गदर्शक पोस्ट आत्मचिंतन करायला हवे असे
खूप सुंदर विवेचन, ज्यांना शास्त्र कळले, त्यांना शस्त्राची काहीच गरज नाही, म्हणूनच भगवान श्रीकृष्णानी महाभारतात शस्त्र हातात घेणार नाही ही प्रतिज्ञा केली आणि शास्त्राच्या सहाय्याने धर्म विजय प्राप्त करुन दिला, शब्दात कारुण्य पण आहे आणि विररस ही त्यामुळे शस्त्रापेक्षा शब्दांची ताकत सदैव मोठीच
I agreed with your thoughts 👍👍👍
अगदी बरोबर!! – केदार
विनोदभाई खूपच छान
खूपचछान छान लेख आहे. शब्द जपून वापरले नाही, म्हणून महाभारत झाले. असे महाभारत घरोघरी होतात. फक्त प्रकार वेगळा असतो.शस्त्र आणि शब्द यांचा संबंध कसा असतो हे मार्मिक या साप्ताहिकचे मुखपृष्टावर फार चांगले लिहिले असते. नक्की काय आहे ते आठवत नाही.
तुमचा लेख आवडला आहे. धन्यवाद !!!
Right sir
What a article you have choose perfectly matched with now a day’s situation
Proud of you Bhai
खूपच छान लेख भाई
जेंव्हा शब्दच बनतात शस्त्र,
तेंव्हा निर्जीवच होतात अस्त्र…
रवींद्र कामठे
शस्त्र व शब्द याचा वापर योग्य प्रकारे झाला नाही तर महाभारत व रामायन कसे होते याचा परिणाम काय होतो हे चांगल्याप्रकारे मांडले आहे सुंदर लेख आहे
उपयुक्त मार्गदर्शन
शब्द आणि शस्त्र याबाबतचे सुंदर विश्लेषण आहे. आपण खूप सुरेख आपले मत मांडले आहे. शब्द असो किंवा शस्त्र यांचा वापर करण्यापूर्वी मला वाटतंय की माणसाची सद्सद्विवेकबुद्धी यांचा वापर केला तर रामायण ,महाभारत , नागासाकी व हिरोशिमा यावरील बॉम्ब हल्ले अशा घटना टाळू शकतो. विवेक बुद्धीच्या अभाव व शब्दांचा दुरुपयोग झाल्याने त्याचा परिणाम स्वरूप शस्त्राचा वापर होऊन गंभीर स्वरूपाचे अकराळ विक्राळ रूप उदयास येईल आणि मोठी हानी होण्याची शक्यता राहते. म्हणून दोन्ही शस्त्राचा वापर करताना बऱ्यावाईट गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे .यासाठी मनुष्याने चरित्रवान होणे फार महत्त्वाचे आहे .आपल्या चांगल्या संस्कृतीचा आणि शास्त्रशुद्ध शिक्षणाचा वापर समाजाला झाल्यास या प्रकारची हानी आपण टाळू शकतो किंवा कमी करू शकतो .
धन्यवाद.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने l
शब्दांचीच शास्त्रे यत्न करू l
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
शब्द वाटू धन जनलोका।
एक निराळाच विषय आपण हाताळला आहे भाई. शस्त्राचा वापर करावाच लागणार नाही अशी व्यवस्था निर्माण होण्याइतपत मानवजात कधी सुबुद्ध होईल असं वाटत नाही. पण किमान आपल्याकडून शस्त्राचा वापर प्रथम होणार नाही एवढे पथ्य जरी पाळले गेले तरी जग सुखी होईल. असो. विषयाची सुरेख मांडणी केल्याबद्दल अभिनंदन. अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे…👍👍
सर्व मान्यवरांचे मनापासून आभार!😊