जागतिक शांतता आणि भारत

जागतिक शांतता आणि भारत

अलीकडेच एक बातमी माझ्या वाचनात आली, ती पुढीलप्रमाणे,
‘भारत-चीन सीमेवर गोळीबार’
नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरावर चर्चा केल्या जात आहेत. अशातच दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी. मॉस्कोत भारत – चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

वास्तविक चीनला भारताची गरज आहे. व्यापारासाठी चीन भारतावर अवलंबून आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय जनमत चीनच्या विरोधात आहे. शांततेसाठी उच्चस्तरीय बैठका चालू आहेत. त्यामुळे सीमेवर लवकरच शांतता प्रस्थापित होईल अशी आपण आशा करूयात.

संपूर्ण जगभर दहशतवाद ही एक मोठी समस्या आहे. दहशतवाद थोपवण्यासाठी संबंधित देशांना लष्कर तसेच निमलष्करी दलाचा वापर करावा लागतो. खूप मोठा खर्च आणि मनुष्यबळ या ठिकाणी वापरावं लागतं. संपूर्ण जग सध्या कोविड महामारीने त्रस्त आहे. अशावेळी रुग्णांच्या सेवेसाठी खुपमोठे मनुष्यबळ आणि पैशांची गरज आहे. डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन यांची वानवा आहे. तेव्हा संरक्षणावरचा खर्च कमी करून तो या रुग्णांसाठी वापरणं महत्वाचं आहे. या दृष्टीने सध्या अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात बोलणी सुरू असणं हे आशादायक चित्र आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कासाठी तेथील महिला शांतताचर्चेत आज भाग घेत आहेत. ही देखील मोठी उपलब्धी मानवी लागेल. तालिबानी राजवटीत पुरुषांना सोबत घेतल्याशिवाय तेथील महिला बाहेर पडू शकत नव्हत्या! जग बदलते आहे. दक्षिण आफ्रिकेत आज काळे-गोरे एकत्र राहतात.

काही वर्षांपूर्वी श्रीलंकेत जाफना भागामध्ये एलटीटीईची दहशत होती. श्रीलंका सरकारने प्रयत्नपूर्वक तो दहशतवाद निपटून काढला. भारताने त्यावेळी श्रीलंकेत शांतिसेना पाठवली होती. दहशतवाद संपुष्टात आल्यानंतर आज जाफना शहर आणि परिसरात आमूलाग्र बदल झाला आहे. श्रीलंकेने शांततेचा स्वीकार केल्यामुळे हे घडू शकले!

कोणत्याही दोन देशांमधील तणाव टाळण्यासाठी, पर्यायाने होणारे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शांतता प्रस्थापित होण्याची गरज असते. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर बोलणीही चालू असतात. भारताच्या सीमा पुढीलप्रमाणे आहेत. भारताच्या दक्षिणेला तामिळनाडूजवळ श्रीलंका, पूर्वोत्तर राज्ये बंगाल ते त्रिपुरा यांनी वेढलेला बांगला देश, पूर्वेला म्यानमार, पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा चीनला भिडल्या आहेत, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश यांच्यामधील प्रदेशात भूतान, सिक्कीम व उत्तरांचल या राज्यांच्या मध्ये नेपाळची सीमा उत्तरप्रदेश व बिहार या राज्यांना लागते. उत्तरांचलपासून पुन्हा उत्तरेकडे लडाखपर्यंत चीनची सीमा आहे. काश्मीरमधील सियाचीन हिमनदीपासून ते गुजरात राज्यातील कच्छच्या रणापर्यंत पश्चिमेला पाकिस्तानची सीमा आहे.

जागतिक शांतता व स्वातंत्र्य यासाठी भारत कटिबद्ध आहे. आपल्या सीमेवर आपले सैनिक थंडी, वारा, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता चोवीस तास खडा पहारा देत असतात. ज्यामुळे सीमा सुरक्षित असतात. सामान्य माणूस आपलं आयुष्य सुखाने जगत असतो. अलिप्ततावाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मध्यवर्ती सूत्र आहे.

जगामध्ये आतापर्यंत दोन जागतिक महायुद्ध होऊन गेली. ज्यांचा उल्लेख पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध असा केला जातो. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसऱ्या महायुद्धात जास्त हानी झाली. उपलब्ध माहितीनुसार दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रे विरुद्ध अक्ष राष्ट्रे असं लढलं गेलं. दोस्त राष्ट्रांमध्ये सोव्हिएत संघ, अमेरिका, भारत, चीन, फ्रांस, पोलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, युगोस्लाव्हिया, नॉर्वे, बेलजीयम, चेकोस्लोवाकिया, फिलिपिन्स, ब्राझील व इतर विरुद्ध अक्ष राष्ट्रात जर्मनी, जपान, इटली, हंगेरी, रोमेनिया, बल्गेरिया, थायलंड, फिनलंड, इराक व इतर यांच्यामध्ये लढलं गेलं. परमाणू बॉम्बसारख्या आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांमुळे व युद्ध तंत्रांमुळे हे महायुद्ध विनाशकारी ठरलं. सन १९३९ ते सन १९४५ पर्यंत हे दुसरं महायुद्ध लढलं गेलं. जवळ जवळ ७० देशांच सैन्य यात सहभागी झालं होतं. या युद्धात सहा कोटीपेक्षा जास्त मनुष्य हानी झाली. मानवी इतिहासात ही सर्वात मोठी जीवितहानी आहे. जर्मनीने पोलंडवर हल्ला करून १९३९ मध्ये या दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली. १९४५ मध्ये सोव्हिएत सैन्याने आपल्यावरचा जर्मनीचा डाव उलटवून जर्मनांचा पाठलाग करत बर्लिनपर्यंत येऊन बर्लिन जिंकलं. याच सुमारास हिटलरने आत्महत्या केली. जर्मनीकडून झालेल्या वंश हत्येत साठ लाखांहून अधिक ‘ज्यू’ व्यक्तींचा बळी गेला. या दुसऱ्या महायुद्धातच ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या ‘हिरोशिमा’ शहरावर परमाणू बॉम्ब टाकला आणि तीनच दिवसांनी ९ ऑगस्टला ‘नागासाकी’ शहरावर पुन्हा परमाणू बॉम्ब टाकला आणि जपान शरण येईपर्यंत एक एक शहर बेचिराख करण्याची धमकीही दिली. या बॉम्ब हल्ल्यांमुळे जपान पूर्ण कोलमडून पडला आणि जपानने १५ ऑगस्ट १९४५ रोजी बिनशर्त शरणागती पत्करली. दुसरं महायुद्ध संपलं!

या महायुद्धात अंदाजे सहा कोटी वीस लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. म्हणजेच त्या वेळच्या लोकसंख्येच्या २.५% लोक मारले गेले. युरोप व आशिया खंडातील अनेक देश या युद्धात बेचिराख झाले. यातून बाहेर पडायला, सावरायला या देशांना पुढची अनेक दशके घालवावी लागली. जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर जे बॉम्बहल्ले झाले त्यात जागच्या जागी लाखो माणसे मारली गेली. शिवाय लाखो माणसे अपंग झाली, ज्यांनी जिवंतपणी मरणयातना भोगल्या. आजची अण्वस्त्रे ही त्या वेळच्या अण्वस्त्रांच्या हजारो पटीने जास्त मारक आणि विध्वंसक आहेत. म्हणून जग अण्वस्त्रमुक्त होणं गरजेचं आहे. जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने सर्व देशांनी याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. जर्मनी व जपानच्या हुकूमशहांची जगज्जेता होण्याची महत्वाकांक्षा दुसरे महायुद्ध होण्यासाठी कारणीभूत ठरली.

महाभारत कशामुळे घडलं? दुर्योधनाचा अहंकार व सत्तेची लालसा यामुळे. पांडवांचे राज्य शकुनी मामाच्या सल्ल्याने द्युताचा कपटी डाव खेळून दुर्योधनाने जिंकलं. पांडवांना वनवास घडवला. तोही पांडवांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. वनवास व अज्ञातवास संपवून पांडव परत आल्यानंतर त्यांनी आपलं राज्य परत मागितलं. स्वतः प्रभू श्रीकृष्णाने मध्यस्थी केली. अहंकारी आणि लालची दुर्योधनाने राज्य परत देण्यास नकार तर दिलाच पण शिष्टाई करायला गेलेल्या श्रीकृष्णाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने शिष्टाई केली. सर्वनाशी युद्धाचे दुष्परिणाम सांगितले पण दुर्योधन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. “सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन देखील मी पांडवांना मिळू देणार नाही” दुर्योधनाचा अहंकार बोलला. सर्वनाशापासून वाचवण्यासाठी गेलेल्या श्रीकृष्णाला “युद्ध अटळ आहे” हे सांगून परत यावं लागलं! आणि पुढे जो सर्वनाश झाला तो सर्वांना विदित आहेच.

असे दुर्योधन जगात सगळीकडे सर्वकाळात जन्माला येतच असतात!

तरीदेखील दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात झालेल्या भीषण मनुष्य व वित्तहानीचा विचार करून अशी विनाशकारी युद्ध टाळावीत हा विचार लोकशाही असलेल्या राष्ट्रांच्या नेत्यांच्या मनात येऊ लागला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रुझवेल्ट आणि ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांची अटलांटिक समुद्रात एका युद्धनौकेवर भेट झाली. त्यांनी अटलांटिक सनद जाहीर केली. ती युद्धकालीन सहकार्याची पहिली पायरी होती. युद्धानंतर कोणत्या तत्वांच्या आधारे जागतिक प्रश्न सोडवावेत हे ठरवणारा तो करार होता. त्याला २६ देशांनी १९४२ मध्ये मान्यता दिली होती.

शांततेसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रांना “संयुक्त राष्ट्र संघटना” (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन) हा शब्दप्रयोग अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी वापरला. १९४३ मध्ये अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया या देशांच्या नेत्यांची बैठक झाली. आंतरराष्ट्रीय संघटनेसंबंधी त्यामध्ये विचार होऊन डंबरटन ओक्स येथे या संघटनेचा आराखडा तयार करण्यात आला. १९४५ साली यालटा परिषदेत दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय परिषदेसंबंधी विचारविनिमय करण्यात आला. अखेर सनफ्रान्सिस्को येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली. या परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघटनेची सनद मान्य करण्यात आली व २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना झाली. शांततेसाठी सहजीवन हा उद्देश ठेऊन! श्रद्धा, विश्वास, परस्पर सहकार्य या तत्वावर संघटना उभी आहे. शांततेसाठी सहजीवन ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या तत्वांचा प्रत्यक्ष उपयोग व्हायला हवा. ज्यामुळे जग सर्वनाशापासून वाचेल!

आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता टिकवणं, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून आर्थिक आणि सामाजिक विकास, मानव अधिकारांचे संरक्षण वगैरे उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही संघटना अस्तित्वात आली.

राष्ट्रसंघाच्या अपयशातून दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धात जीवित व वित्तहानी झाली. भविष्यात तिसरं महायुद्ध होऊनये या जाणिवेतून संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. स्थापनेला आता पंचाहत्तर वर्षे उलटून गेली आहेत. सनदेतील उद्दिष्टे साध्य करण्यात संघटनेला काही अंशी अपयश आलं असलं तरी गेल्या सहा-सात दशकात तिसरं महायुद्ध टाळण्यात यश आलं आहे! परस्पर सहकार्य, सामूहिक चर्चा आणि शांततेच्या माध्यमातून राष्ट्रा-राष्ट्रांमधील प्रश्न सोडवण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ संयुक्त राष्ट्र संघटनेच्या रूपाने आंतरराष्ट्रीय समुदायाला मिळाले आहे.

शांततामय मार्गानी वाटाघाटी, चर्चेच्या माध्यमातून सर्वप्रकारच्या प्रश्नांची, वादांची, संघर्षाची सोडवणूक करण्यासाठी आजच्या अणूयुगात जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक व्यासपीठाचा समर्थपणे वापर करून घेणे हे मानवी कल्याणाच्या दृष्टीनेच नव्हे तर मानवी अस्तित्वाच्या दृष्टीने आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या स्थापनेपासून सुमारे शंभराहून अधिक लहान मोठे संघर्ष झाले असले तरी कोणत्याही संघर्षाने महायुद्धाचे रूप घेतलेले नाही. बरेच संघर्ष संयुक्त राष्ट्रसंघापुढे निर्णयासाठी चर्चेसाठी आले. त्यावर तोडगा काढण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न झाले. ज्या ठिकाणी संघर्ष चिघळले त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघटनेने आपली शांतिसेना पाठवली. संघर्ष करणाऱ्या पक्षांमध्ये शांती करार घडवून आणला. अशा राष्ट्रांमधील नागरिकांचे, त्यांच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी शांती सैनिकांनी मोलाचे योगदान दिले.

शांतिसैनिकांच्या मोहिमा सुरक्षा परिषदेच्या मान्यतेने आखल्या जातात. कोरिया, सुवेझ, कांगो, सायप्रस, नामीबिया, युगोस्लाव्हिया, बोसनिया, सिएरा लिओन या भागात शांतिसेनेने शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. अंतर्गत यादवीमुळे अनेक राष्ट्रे कोलमडून पडली आहेत. स्थानिक सरकारला या संघर्षाची यशस्वी उकल करता आली नाही. ज्यातून शांतिसेनेची गरज निर्माण झाली.

बर्लिन तसेच क्युबातील क्षेपणास्त्र पेच प्रसंग तसेच युरोप मधील ब्रिटन आणि फोकलंड पेचप्रसंग यात संयुक्त राष्ट्र संघटनेला काही करता आले नाही. त्याचप्रमाणे आशिया आणि आफ्रिकेतील संघर्षात संयुक्त राष्ट्र संघटनेला बाहेर ठेवण्यात आले. चीनचे तिबेटवरील आक्रमण, भारत-चीन तसेच रशिया-चीन सीमावाद, कंप्युचियामधील व्हिएतनामची कारवाई, चीनची व्हिएतनाम विरुद्ध कारवाई या सर्व घटनांमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेला सामील करून घेण्यात आले नाही.

साम्यवादी रशियाचे विघटन झाल्यानंतर जगात अमेरिका ही एकच महासत्ता राहिली. युगोस्लाव्हियाचे विघटन झाले. रशियामधून स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये वांशिक संघर्ष सुरू झाले. मानवी हक्काचा मुद्दा जागतिक मंचावर आला. अशा समस्या आणि संघर्षांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघटनेला शांतता निर्माण करण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.

१९९१ ते १९९५ या चार वर्षात शांतिसेनेच्या जास्तीत जास्त मोहिमा आखण्यात आल्या. यादवी आणि संघर्ष थांबवण्या बरोबरच राजकीय स्थैर्य निर्माण करण्यासाठी शांतिसेना प्रयत्न करते.

भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने महत्वाची भूमिका बजावली आहे. १९९८ पासून भारत अण्वस्त्र सज्ज देश असला तरी जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी भारत बांधील आहे. परस्पर सहकार्य आणि शांततामय सहजीवन यावर भारताचा विश्वास आहे. १९४५ पासून म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत भारत आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे संबंध हे सहकार्याचे, विश्वासाचे व आदराचे राहिले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेला अर्थसहाय्य देण्यापासून संघटनेच्या विविध समित्यांमध्ये भारताने आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच शांतता मोहिमेत भारत सहभागी झालेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेची उद्दिष्टे आणि भारतीय परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारी विचारसरणी समान आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेचं अधिवेशन पॅरिसला झालं होतं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची संयुक्त राष्ट्र संघटनेवरील पूर्ण श्रद्धा व निष्ठा जाहीर केली होती. भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांततापूर्ण कार्यात भारताचा महत्वपूर्ण सहभाग आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आवाहनानुसार भारतातर्फे शांतिसेना पाठवली जाते. कांगो, गाझापट्टी, लेबनान, मोझामबीक, सायप्रस, इथिओपिया, सुदान, सोमालिया, सिएरा लिएन, रवांडा, लायबेरिया, अंगोला, आयव्हरी कोस्ट आदी देशांमध्ये भारतीय शांतिसेनेने शांतता प्रस्थापित केली आहे. सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी भारतीय शांती सैनिक आणि सेनाधिकारी यांची प्रतिमा जगात आहे. १९५० पासून भारताचे सुमारे एकलाख साठहजार सैनिक व अधिकारी आजपर्यंत शांतता निर्मितीसाठी झटत आहेत. भारतीय शांती सैनिकांनी त्रेचाळीस मोहिमांमध्ये हे कार्य केले आहे. शंभर पेक्षा अधिक लोक या कार्यात शहीद झाले आहेत. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीमोहिमेचे नेतृत्व देखील केले आहे. २०१० मध्ये भारत हा शांतता निर्माण करण्याच्या कार्यात सहभाग घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश होता. भारतीय महिलांसह नऊशे चार पोलिसांनी लायबेरिया येथे उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय शांती सैनिकांना या कार्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून चौऱ्याहत्तर वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. परमवीर चक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र वगैरेंचा त्यात समावेश आहे.

भारताच्या शांतताप्रियतेविषयी लिहिताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख करणे नुसते आवश्यक नाही तर गरजेचे आहे. गौतम बुद्ध आणि महावीर यांची शांततेची आणि अहिंसेची परंपरा महात्मा गांधींच्या मुळे भारतात सुरू राहिली. या महात्म्याने भारतातच नाही तर संपूर्ण जगभर आपल्या सत्य, अहिंसा या विचारांची छाप पाडली आहे. भारतात बाबा आमटे, डॉ. अभय बंग, अनुताई वाघ, डॉ. प्रकाश आमटे, इत्यादी गांधी विचारांनी प्रेरित झाले आहेत. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचार सरणी, ‘कोणतेही काम हलके असत नाही’ हा संदेश, कामाप्रति समर्पित भाव, उच्च शिक्षित असूनही भौतिक सुखांच्या आहारी न जाता समाजासाठी , तळागाळातील लोकांसाठी कार्य करणं, ‘सत्याग्रह’ करून आंदोलन करणं, सत्य व अहिंसा लोकांच्या विचारात व आचरणात बिंबवणे यामुळेच देश विदेशात असलेली त्यांची ‘महात्मा’ ही प्रतिमा त्यांना जगभर पित्याची उपाधी आणि पालकत्व देऊन गेली.

मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, डेसमंड टूटू, अमेरिकन पर्यावरण वादी अल गोर, जॉन लेनन, अल्बर्ट आइन्स्टाइन, दलाई लामा, स्टीव्ह जॉब्ज, बराक ओबामा, पाकिस्तान ची शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला आदींना गांधी विचार प्रेरणादायी वाटतात. यामुळेच २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस जागतिक स्तरावर ‘अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो!

२१ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक शांतता दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जागतिक शांततेविषयी भारताची भूमिका मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!

गुजरातचे कवी नरसी मेहता यांचे गांधीजींना अतिप्रिय असलेले पुढील भजन विषयाला अनुसरून होईल असे वाटते.

वैष्णव जन तो तेने कहिये जे पीर पराई जाणे रे
परदु:खे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे ।।
सकल लोक माँ सहूने वंदे निंदा न करे केनी रे
वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेरी रे ।।
सम दृष्टीने तृष्णा त्यागी परस्त्री जेने मात रे
जिव्हा थकी असत्य न बोले पर धन नव झाले हाथ रे ।।
मोह माया व्यापे नही जेने दृढ वैराग्य जेना तन मा रे
राम नाम शुं ताली लागी सकल तिरथ तेना तन मा रे ।।
वण लोभी ने कपट रहित छे काम क्रोध निवाऱ्या रे भणे नर सैयो तेनु दरसन करता कुळ एको तेर ताऱ्या रे ।।

जयंत कुलकर्णी
दूरभाष : ८३७८०३८२३२

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “जागतिक शांतता आणि भारत”

  1. रमेश वाघ

    छान सर

  2. Vinod s. Panchbhai

    खूपच छान आणि सविस्तर आढावा घेतला माऊली! बरीचशी नवीन माहिती मिळाली या लेखाच्या माध्यमातून!
    अभिनंदन आणि शुभेच्छा!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा