कवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव !

‘आईचा मान कधी देवाला नाही’

नमस्कार मंडळी,

आज मला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेचे गाणं झालंय म्हणून खूप खूप आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय ही आपली ‘आई’ असते आणि म्हणूनच जगभरातील मातृशक्तीला माझे हे गीत मी आज समर्पित करून ‘आई’प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तिचे उपकार तर ह्या जन्मीच काय; पण कधीच फेडता येणार नाहीत! त्यामुळे तिच्या ऋणात राहणेच जास्त योग्य आहे असे मला वाटलं; म्हणून ‘मातृशक्ती’ला माझी ही ‘गीतांजली’ समर्पित करतो आहे.

माझ्या ह्या कवितेचे गाणे होणे म्हणजे एक फार मोठी कहाणी आहे. कोण कुठला महाडचा एक तरुण संगीतकार श्री. चेतन संजय सावंत, मला पंधरा दिवसांपूर्वी रात्री ११.३० वाजता फोन करतो आणि सांगतो की; ‘सर, मी तुमच्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील मलपृष्ठावरील कवितेला चाल लावली आहे. कृपया ती जरा ऐकाल का’?. खरं तर मी झोपायच्या तयारीत होतो. त्यात हा अनोळखी फोन! मी थोडीशी टाळाटाळ करायचा प्रयत्न करणार होतो पण चेतनचा निग्रह मला माझ्याच कवितेची चाल ऐकण्यासाठी उद्युक्त करत होता. त्याने फार आढेवेढे न घेता सरळ माझी कविता हळूच गुणगुणायला सुरवातच केली आणि मी एकदम भारावून गेलो.

बरोबर दीड-दोन वर्षापूर्वी, मी हीच चाल आमच्या सोसायटीत नवीन राहायला आलेल्या एका शेजाऱ्यांच्याकडून ऐकली होती. म्हणजे; ते एक पिक्चर काढणार होते व त्यात त्यांना माझी ही कविता खूप आवडली म्हणून तिचे ते गाणे करून चित्रपटात घेणार होते. त्यांनी माझ्याकडून “प्रांजळ” हा माझा काव्यसंग्रह त्यासाठी नेलाही होता व पंधराएक दिवसांत माझ्या कवितेला चाल लावून मला ऐकवलीही होती. ती ही दीड-दोन वर्षापूर्वी अशीच मध्यरात्री. त्यामुळे ती चाल माझ्या एकदम पक्की डोक्यात बसलेली होती. नेमकी तीच चाल, आज पुन्हा एकदा चेतनने ऐकवली आणि मी एकदम भानावर आलो व त्याला विचारले की;

“ही चाल मी या आधी ऐकलेली आहे. हा आवाज मला आठवतो आहे. कोणाचा आहे हा आवाज”? माझ्या प्रश्नांची सरबत्ती चेतनवर सुरूच होती. तो पुरता गांगरून गेला होता. मला म्हणाला की; “सर, हा आवाज माझाच आहे, मी एक उभरता संगीतकार आहे. महाडला असतो. माझी आजवर पाच-सहा गाणी रिलीज झाली आहेत! केतकी माटेगावकर, आर्या आंबेकर, सावनी रविंद्र, शरयू दाते, स्वप्नील बांदोडकर आणि संदीप उबाळे यांनी माझी गाणी गायली आहेत. तुम्ही हवे तर माझा प्रोफाईल बघू शकता. मागच्या वर्षी मला एका चित्रपट निर्मात्याने ह्या गाण्याविषयी विचारले होते. माझ्याकडून तातडीने चाल लावूनही घेतली होती. पुढे नंतर काय झाले काय माहीत पण व्यवहारात न बसल्यामुळे ते प्रकरण फार पुढे गेले नाही. मी ही त्यावेळेस नाद सोडून दिला होता.”

    “परंतु, सर, तुमची ही जी कविता आहे ना ती ‘आई’वर असल्यामुळे मला ती स्वस्थ बसू देत नव्हती. त्यात मला तुम्हाला संपर्क कसा करावा हेच सुचत नव्हते कारण मला जेव्हा कविता दिली होती, तेव्हा तुमच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील कवितेच्या फक्त शब्दांचा फोटो काढून पाठवण्यात आला होता. त्यात तुमचे नाव कुठेही नव्हते. त्यामुळे मला तुमचा शोध घ्यायला जरा वेळ लागला”.

चेतन हे सांगत होता आणि मी त्याचे हे प्रामाणिक बोलणे डोळे बंद करून ऐकत होतो. शेवटी त्याने मला जे सांगतिले ते ऐकून तर मी उडालोच. त्याने व त्याच्या मयूर कुंडेकर ह्या मित्राने (जे दोघे मिळून कविता आणि गाणी असा एक कार्यक्रम सादर करतात) गुगलवर जाऊन माझ्या कवितेच्या शब्दांवरून मला फेसबुकवर गाठले व त्यानंतर मला मेसेंजरद्वारे निरोप देऊन माझ्याशी प्रत्यक्ष बोलणे केले. चेतनच्या ह्या जिद्दीला मला खरोखर सलाम करावासा वाटला. त्याची माझ्या ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेबद्दलची तळमळ, तिला चालबद्ध करण्याची धडपड मला खूपच भावली. आम्ही जवळजवळ तासभर ह्या विषयावर बोलत होतो.

बोलता बोलता मी माझ्याच एक दोन कविता त्याला ऐकवल्या. त्यात ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ही कविताही होती. ती ऐकल्यावर तो एकदम खूशच झाला. मी माझ्या ह्या कवितेमधील प्रत्यके शब्दाचा अर्थ जेंव्हा त्याला समजावून सांगत होतो व मला अपेक्षित असलेला सामाजिक संदेश जो की “आई वडिलांची वृद्धापकाळात सेवा, सुश्रुषा करा, त्यांना अंतर देवू नका, त्यांच्याशी प्रेमाने वागा व त्यांना जपा, कारण मंदिरात देव नसून तो आपल्या आईच्या चरणी आहे हे लक्षात घ्या’ असे सांगत असतांना चेतन खूप भावूक झालेला मला जाणवत होते आणि तोही मला मध्ये मध्ये थांबवून माझ्या ह्या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा गाऊन दाखवत होता व मला अपेक्षित असलेला अर्थ त्याच्या चालीतून कसा प्रतिध्वनित होतोय ते मला पटवून देत होता. अर्थात मलाही, त्याने लावलेली चाल प्रथमदर्शनीच पटलेली होती, ते ही एक वर्षापूर्वीच!

आमचे हे सगळे बोलणे रात्रीच्या १२.३० वाजता चाललेलं होतं. सगळीकडे शांतता असल्यामुळे माझा आवाज जरा जास्तच येत होता. तरीच एकदा बायको (वंदना) वरच्या मजल्यावरून खाली येऊन सांगूनही गेली होती की; “जरा हळू बोल! खूप रात्र झाली आहे”! पण त्याचं काय आहे, आम्ही दोघेही म्हणजे मी आणि चेतन कवितेचे गाणं होतंय ह्या आनंदात सगळे काही विसरून गेलेलो होतो.

एक सांगतो चेतनने पायलट संगीत म्हणून गाण्याचा जो काही प्रयोग मला ऐकवला होता तोच मुळी खूप श्रवणीय होता. न राहवून मी त्या चालीच्या प्रेमात पडलो व त्याला आपण हे गाणे रेकॉर्ड करूयात असे आश्वासन दिले. हो पण चेतन पूर्ण तयारीनिशी माझ्याशी बोलत होता. त्याने मला सांगून टाकले की; “मला हे गाणे कुठल्याही परिस्थितीत करायचेच आहे, त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. मला माहिती आहे की तुमच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून तुम्हीं ही कविता यूट्यूबवर ऐकवलीही आहे. कृपया नाही म्हणू नका”! एक सांगतो चेतनच्या ह्या आग्रहाला नकार देण्याची माझ्यात तरी हिंमत नव्हती. त्यात ‘आई’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी चक्क व्यवहाराच्या गोष्टींवरच आलो.

माझे चेतनला एकच सांगणे होते की, कवितेला चाल तर अप्रतिम लागली आहे, फक्त गायक मात्र त्या तोडीचा हवा. थोडासा खर्च झाला तरी चालेल. माझे हे बोलणे ऐकून तर चेतन चाटच पडला. त्याने लगेचच सध्याचे तरुण व सुप्रसिध्द गायक श्री. संदीप उबाळे, जे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ह्या मालिकेच्या शीर्षकगीताचे पार्श्वगायक आहेत, त्यांचेच नाव सुचवले व उद्या सकाळी तुम्हाला काय ते सांगतो म्हणाला. मला दोन सेकंद काय बोलावे हेच सुचले नाही. मी त्याला एकंदरीत ह्या सगळ्याला किती खर्च येईल ते सांग म्हणालो! तर त्याचे गणित तयारच होते; “गायकाचे अमुक अमुक, रेकॉर्डिंग स्टुडिओचे तमुक तमुक व संगीत संयोजकांचे इतके होतील आणि मला म्हणजे त्याला स्वत:ला काहीच नको, फक्त महाड ते पुणे व परतीचा प्रवास खर्च द्या कारण हे गाणे व्हावे एवढेच माझे उद्दिष्ट आहे”. “काका तुम्हीं जर का एवढा खर्च करून हे गाणे रेकॉर्ड करायला तयार असाल तर मला खरच काही नको. मला त्यातच सर्व काही मिळाले.” मी त्याच्या ह्या बोलण्यावर तर एकदम भाळून गेलो. त्याचे म्हणणे होते की सर “हे गाणे जेंव्हा यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर रिलीज होईल तेंव्हा ते दंगा करेल, रसिकांना खूप भावेल ह्याची मला खात्री आहे. तेच माझ्यासाठी व माझ्या उर्वरित कारकिर्दीसाठी खूप आहे. ‘आई’चा आशीर्वाद हवाय बस, बाकी काही नको”. मी तर चेतनच्या ह्या बोलण्याने अवाकच झालो होतो. शेवटी माझ्या ह्या लाडक्या कवितेचे गाणे होणार होते हे माझ्यासाठी खूप होते. माझ्या ‘आई’ला हीच काय ती श्रद्धांजली होती ह्या भावनेत मी त्या रात्री सुखाने झोपी गेलो.

दुसरा दिवस उजाडला तेच मुळी चेतनच्या फोनने. त्याने संदीप उबाळे सरांची गाण्यासाठीची मान्यता मिळवली होती. त्यांना पायलट गाणे पाठवलेही होते व रेकॉर्डिंगसाठीचा दिवस आणि वेळ दोन्ही घेतलेही होते. कर्वेनगर येथील पंचम स्टुडिओ संदीप सरांच्या ओळखीचा असल्यामुळे त्यांच्या सोयीची रेकॉर्डिंगची तारीखही ठरली होती. हे सगळे इतके अनपेक्षित पण सुखदायक होते की माझे मलाच कळत नव्हते काय चालले आहे ते! मनातल्या मनात मी म्हटले की; “हाच काय तो ‘आई’चा आशीर्वाद असेल म्हणूनच तर सगळे योगायोग कसे फटाफट जुळून आले होते”.

माझी तब्बेत फारशी बरी नसल्यामुळे मी गेले काही दिवस थोडासा नरम होतो पण माझ्या ह्या कवितेचे गाणे होते आहे हे ऐकून माझे दुखणे कुठच्या कुठे पळून गेले होते.

शुभकार्याला उशीर नको म्हुणुन, सगळे सोपस्कर पूर्ण करून झाले. मंगळावर ८ सप्टेंबरला पंचम स्टुडिओत हे गाणे रेकॉर्डही झाली. संदीप उबाळे सरांचा त्यादिवशी टिपेला गेलेला तो सुमधुर व अत्यंत श्रवणीय असा आवाज अजूनही माझ्या कानात गुंजतो आहे. जवळजवळ ४ तास हे रेकॉर्डिंग चालू होते. त्यात स्टुडिओतील श्री. श्रेयस दांडेकर ह्या रेकॉर्डीग कलाकाराची कलाकुसर पाहून तर डोळ्याचं पारणं फिटलं होतं. चेतनसारख्या तरुण संगीतकाराकडून त्याला हव्या असेलेल्या सर्व ताना, जागा, आलाप, हरकती, गाण्याची चाल इत्यादी आपल्या गळ्यातून उतरवून देताना संदीपदादा कुठेही तसूभरही कमी पडू देत नव्हते. “एकदा नव्हे शंभर वेळा गाईन पण तुला जे हवे आहे तेच आले पाहिजे व मला रुचले पाहिजे” हा त्यांचा अट्टाहास त्यांची कलेप्रतीची श्रद्धा दाखवत होता. मी तर हे सगळे एका खुर्चीत बसून ऐकत होतो. निश:बद्ध झालो होतो. माझ्या आयुष्यातील पहिलाच अनुभव होता हा! एकप्रकारची समाधीच लागली होती माझी, स्टुडिओत. तरीही एकदोन वेळा संदीपदादा मला म्हणाले की; “कामठेसर तुमच्या कवितेला व त्यामधील भावनांना योग्य तो न्याय देतोय ना! तुम्हाला जर काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सुचवा”! त्यांच्या ह्या सौजन्याने मी तर वेडाच झालो होतो. त्यांना व चेतनला सांगितले की “तुमचे अगदी बरोबर चालले आहे. मला जे काही भाव अपेक्षित आहेत ते व जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते तुम्हीं तुमच्या गळ्यातून आणि चेतनने त्याच्या संगीतातून अतिशय योग्य पद्धतीने माडले आहे’.

मी एका गोष्टीमुळे अचंबित झालो होतो की चेतन तसा नवोदित संगीतकार आहे व संदीपदादा तसे बरेच मुरलेले कलाकार आहेत. तरी ते एक संगीतकार ह्या नात्याने चेतनने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत होते. माझ्यासाठी हा एक नवा आणि फार मोठा व खूप काही घेण्यासारखा असा अनुभव होता.

रेकॉर्डिंग अप्रतिम झाले होते. त्यानंतर मुंबईचे श्री. संतोष सहदेव मोहिते सरांनी ह्या पायलट गाण्यावर आणि संदीपदादांनी गायलेल्या गाण्यावर दोन तीन दिवसांत अतिशय उत्तम असे संस्कार करून त्यावर जो काही साज शृंगार चढवला आहे तो ऐकल्यावर तर कान तृप्त झाले होते. शेवटी शेवटी तर माझे डोळे इतके डबडबले होते की मला समोरचे काहीच दिसत नव्हते.

हे सगळे झाल्यावर श्री. जयेश पंडित ह्या मित्राने हे सगळे रेकॉर्डिंग एका दृकश्राव्य ध्वनिचित्रफीतीत समावून घेण्यासाठी मला खूप मोलाची मदत केली. त्यासाठी त्याच्या वडिलांनी व माझ्या राहुल गोडबोले ह्या मित्राने माझ्या कवितेतील भावनांवर आधारित अशी काही रेखाचित्रे चितारून आमच्या ह्या ध्वनिचित्रफीतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे हे मात्र नक्की.

माझ्या ह्या कवितेच्या प्रवासातून ते तिचे गाणे होईपर्यंतच्या प्रवासात मला ‘चपराक प्रकाशन’चे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांची व शुरयोद्ध वीर येसाजी कामठे प्रतिष्ठानची खूप मोलाची साथ लाभली आहे त्यासाठी त्यांचे आभार. माझी बायको वंदना, मुलगी पूर्वा आणि जावई मयुरेश व सृजय advertizingच्या जयेश पंडितची ओळख व भेट घडवून देण्यासाठी अमित बाचल ह्या मित्राची खूप मदत झाली आहे. गायक श्री. संदीप उबाळे, संगीत दिग्दर्शक श्री. चेतन संजय सावंत, संगीत संयोजक श्री. संतोष सहदेव मोहिते, रेकॉर्डिंग कलाकार श्री. श्रेयस दांडेकर, दृकश्राव्य कलाकर श्री. जयेश पंडित यांचे मन:पूर्वक खूप आभार. जयेशचे वडील चित्रकार श्री. बाळकृष्ण पंडित सरांचे आणि माझा चित्रकार मित्र श्री. राहुल गोडबोले यांचे त्यांनी माझ्या ह्या कवितेसाठी काढलेल्या तितक्याच बोलक्या व भावनात्मक चित्रकलेसाठी आभार नव्हे तर त्यांना साष्टांग दंडवत आहे. अजून एक घरचाच चित्रकार आहे तो म्हणजे आजीचा लाडका नातू व माझा पुतण्या कु. सुश्रुत किशोर कामठे ह्याने काढलेले आजीचे अप्रतिम असे चित्र. त्याच्या कलेचे कौतुक आजी तर नेहमीच करायची. त्याने आजीला चित्ररूपी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचे खूप कौतुक.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या माझ्या ह्या प्रयोगाला खूप जणांनी बहुमूल्य योगदान दिले आहे त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त न करता त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो

मंडळी ही तर सुरवात आहे असे मला बरेचजण सांगत होते. माझ्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमापोटी व माझ्याप्रती त्यांच्या असेलेल्या भावनेने मी मात्र पुरता हळवा झालो होतो. माझे मन मला सांगत होते की तू हे जे काही केलेस ते आजवरच्या तुझ्या आयुष्यात केलेली सर्वोत्तम कृती आहे. बघा ना ! एखाद्या गोष्टीचा योग जुळून यावा लागतो. २०१७ साली प्रकाशित झालेला “प्रांजळ” हा माझा काव्यसंग्रह. त्यामधील ह्या एका कवितेचे गाणे व्हायला आज साडेतीन वर्षे लागलीत! पण योग जुळून आल्यावर अक्षरश: साडेतीन दिवसांत ते शक्यही झाले, हे ही तितकेच आश्चर्यकारक आहे की नाही!

अतिशय नम्रपणे एक मात्र नक्की सांगतो की, ही जे काही घडते आहे, त्यात माझे काहीच श्रेय नाही. जे काही असेल ते नियतीचे किंवा कुठल्यातरी अदभूत शक्तीचे आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे.

स्वेच्छा निवृत्तीनंतरचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. अजून बरचं काही करायचं योजलं आहे ! बघू तब्बेतीच्या आणि नियतीच्या मनात काय काय आहे ते!

माझे हे गाणे आपण नक्की ऐकावे आणि आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय कळवावेत ही विनंती. हे गाणे ऐकण्यासाठी लिंक –

रविंद्र कामठे, पुणे
९८२२४०४३३०

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “कवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव !”

  1. रविंद्र कामठे

    घनश्याम गुरुजी खूप खूप धन्यवाद. आता हे गाणं जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.🌹🌹🙏🏻🙏🏻

  2. Sunil pande

    प्रत्येक मुलासाठी आई असते कविता .,समजायला जितकी सोपी तितकीच अवघड . ज्याला आई समजली त्याच्या आयुष्याचे आनंदाचे गाणे कधी होईल कळणार नाही . याचे सुंदर उदाहरण कामठे सर आपण आहात .

    पेरते व्हा असे म्हणतात ते काही खोटे नाही . पेरलेले आज ना उद्या उगवेलच . २०१७ साली लिहीलेल्या आपल्या कवितेचे सुंदर गाणं झालं . भाग्यवान आहात . यामागे आईचा आशीर्वाद आहेच . लिहित राहा . ही तर फक्त सुरूवात आहे . शुभेच्छा मनापासून . अभिनंदन .

  3. Vinod s. Panchbhai

    रविन्द्रजी भावस्पर्शी लेखन!
    आईवरील कवितेचं सुंदर सादरीकरण!

  4. सारंग

    सुंदर लेख.आईचा मान हा कधी देवाला नाही..सुंदर गीत.सादरीकरणही अप्रतिम!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा