सर्जकांच्या मुक्तीसाठी हाक
तुझ्या जाती, धर्मातला शेतकरी कंगाल,
माझ्याही जाती, धर्मातला शेतकरीच कंगाल.
माझ्या जाती, धर्मातली नारी गुलाम,
तुझ्याही जाती, धर्मातली नारीच गुलाम.
हा योगायोग आहे का?
की आहे कट कारस्थान?
शेतकरी आणि स्त्री यात सर्जकतेचे साम्य आहे.
ते समजून घे.
शेतकरी करतोय आत्महत्या
स्त्रीची होते भ्रूणहत्या
शेतकरी राबतो रानात
स्त्री कष्टतेय घरात आणि रानातही!
शेतकरर्याला सरकारी कायदे करतात गुलाम
स्त्री धार्मिक जातीय परंपरांनी खचलेली!
मित्रा,
जाती-धर्माच्या संघर्षाचे ओझे घेऊन कुठे भरकटतोस?
अरे, सगळ्या जाती-धर्मात छळले जाते सर्जकांना.
सर्जकांना गुलाम करणारीच व्यवस्था उभी केली जाते.
हा संघर्ष
ना जाती-जातींचा आहे,
ना धर्मा-धर्माचा आहे,
हा संघर्ष
ना मालक-मजुराचा आहे,
हा संघर्ष,
सर्जक-बांडगुळांचा आहे.
हे ध्यानात घे.
बांडगुळांनी गुलाम केलंय सर्जकांना!
चल, नवी सुरुवात करू.
शेतकरी आणि स्त्रियांच्या गुलामीच्या बेड्या तोडू.
एक घाव माझा, एक घाव तुझा…
(19 मार्च : किसानपुत्रांचा उपवास)
अमर हबीब,
किसानपुत्र आंदोलन
8411909909