काळ मोठा कठीण आलेला आहे. सत्वपरीक्षा घेणारा आहे. स्वयंशिस्त लावून घेण्याचा आणि कायमच असं राहण्याचा. खरं तर हीच छान संधी आहे कुटुंबाबरोबर राहण्याची, मी आहे तुमच्यासोबत घाबरू नका हे सांगण्याची. त्यासाठी आपण स्वत: सामाजिक शिस्तीचे पालन करायला हवं. काहीतरी वाचून वा पाहून घाबरून न जाता परिस्थितीला तोंड द्यायला शिकायला हवे. केवळ आलेले मेसेजेस फोरवर्ड करून हे भागणार नाही. मी माझ्या कुटुंबाचा हे महत्त्वाचे.
थोडक्यात ही संधी आहे तुम्हाला, कुटुंबांबरोबर राहण्याची आणि मुलावर संस्कार करण्याची. मुलांवर संस्कार म्हणजे शिस्तीने नव्हे, त्यांच्यात मिसळून. मुलांना विचार करायला शिकवा. त्यांना चांगल्या-वाईटाचा विचार करता यायला हवा. मनातले विचार त्यांना लिहायला सांगा. त्या योगे त्यांची विचारक्षमता वाढेल. विचारात सुसंगता येईल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्या बरोबरच लिहायची सवय होईल, त्यांच्या हस्ताक्षराकडेही लक्ष देता येईल. सुरुवातीला त्यांना मराठीत लिहायला सांगा. मग हिंदीतून आणि शेवटी इंग्रजीतून, त्या योगे त्यांचे भाषेवरील प्रभुत्व वाढेल. शब्दसंग्रह वाढेल.
मुलांना कविता वाचायला शिकवायला हवे. कवितेचा अर्थ समजायला हवा. वर्डस्वर्थची दैफोडील्स जशी त्यांना समजायला हवी तशी शिरवाडकरांची लढा पण समजायला हवी. ग.दी मा, बहिणाबाई ह्यांच्या कविता त्याना म्हणून दाखवा म्हणजे प्रतिभेचा आविष्कार कसा असतो ते समजेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना वाचून दाखवा, म्हणजे परिथितीशी कसे तोंड द्यायचे ते त्यांना समजेल. पसायदानाचा अर्थ समजावून सांगा म्हणजे त्यांना विश्वबंधुत्वाचा अर्थ समजेल. त्यांना द. मा. मिरासदार आणि पु. लंच्या विनोदातला फरक समजावून सांगा. त्यांच्या प्रतिभाशक्तीला खाद्य मिळेल. मुख्य म्हणजे त्यांना मनसोक्त हसू द्या, त्यांच्याबरोबर तुम्हीही हसा.
मुलांना कॅरम कसा खेळायचा हे शिकवा, बुद्धिबळातले डावपेच सांगा. मुख्य म्हणजे हरलो तरी नाराज व्हायचं नाही, डाव सोडून जायचं नाही हे त्यांना समजलं पाहिजे. लहानात लहान होऊन खेळा, अगदी छोट्याबरोबर सापशिडीही खेळा. बघा कशी गळ्यात पडतात पोरं ते!
मुलांना चित्रकला शिकवा. त्यांच्याबरोबर तुम्हीही चित्र काढा. आपल्याच चित्रावर मनमुराद हसा. मुलांना व्यक्तिचित्रण आणि व्यंगचित्र यातील फरक समजावून सांगा. पिकासो, हळदणकरांपासून शि.द फडणीसांच्या हसरी गॅलरीलरीपर्यंत अनेक चित्रकारांची चित्र त्यांना दाखवा. चित्रशैलीतील फरक त्यांना समजेल. मग द्या त्यांना कागद आणि ब्रश, रंग. खाणपिणं विसरून जातील आणि आठवणही नाही होणार टीव्ही, मोबाईल पाहाण्याची.
तुम्ही कधी नाटकात काम केलं असेल किंवा नसेल तरी एखादी भूमिका त्यांना करून दाखवा. त्यांनाही करायला लावा. संस्कृत श्लोक म्हणायला सांगा, त्याचा अर्थ तुम्ही समजावून सांगा. त्यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती वाढेल, पाठांतर होईल, शब्दोच्चार स्पष्ट होतील आणि मुख्य म्हणजे सभाधीटपणा येईल. अशा वातावरणात घरातले इतर सदस्यही नकळत सामील होतील आणि बघता बघता घराचं नंदनवन होईल. घरात आलेला तणाव कमी होईल.
कधी नाट्यवाचन, कधी कविता वाचन तर कधी मुलांना हवं त्या विषयावर बोलायला सांगा. चित्रकला, खेळ, संगीत, नृत्य या विषयी गप्पा मारुन त्यांना बोलत ठेवा. त्यांच्या त्यांच्यात स्पर्धा लावून वातावरण खेळत ठेवा. घरभर चैतन्य निर्माण होईल. मुलांना आवडेल त्या विषयाची वर्तमानपत्रातली कात्रण गोळा करायला सांगा, त्यामुळे त्यांचा वेळ तर जाईलच शिवाय त्यांची आवड सुद्धा लक्षात येईल. एखादेवेळी घरातले जुने फोटोंचे अल्बम्स काढा. मुलांना पूर्वीचे फोटो दाखवा, प्रसंग सांगा. नातेवाईकांची ओळख सांगा. भूतकाळात रममाण व्हा.
आपल्या वडिलांनी सांगितल तेच मुलांना सांगा. स्वच्छता पाळा. घरी आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा. पादत्राणे घरा बाहेर काढा. घरचं ताजं अन्न खा. अति थंडगार पदार्थ खाऊ नका. मित्र भेटल्यानंतर भारतीय पद्धतीने नमस्कार करा. हस्तांदोलन करू नका बस बाहेर जाताना मास्क जरूर वापरा आणि शक्यतो घरातच थांबा.
अशामुळे घरातली सगळीच मंडळी नकळत एकत्र येतील. मुलांना आईच्या कष्टांची जाणीवही करून द्या. तिला सगळ्यांनी मदत करायला सांगताना स्वतःही हातभार लावा. मुलींनाच काय मुलानाही स्वैपाकाचे प्राथमिक धडे द्यायला हरकत नाही. काळ बदलला आहे. आपल्या वागणुकीमुळे सगळ्या कुटुंबियांना आपुलकी वाटायला हवी असे वर्तन ज्येष्ठानीच करायला हवे. माझ्या आईवडिलाशी मी सगळ बोलायलाच हवं असं जेव्हा मुलांना वाटेल तेव्हा तुम्ही जिंकलात .यासाठी शिस्तीची आणि निरनिराळ्या शिबिरांची नाही तर तुमच्या सहभागाची आवश्यता आहे आणि आता ती संधी आलेली आहे. बाहेरच्या संकटाला धैर्याने तोंड देण्यासाठी शासनाच्या सूचना ऐका आणि इष्टापत्ती समजून छान कौटुंबिक वातावरण तयार करा.
सदानंद भणगे
९८९०६२५८८०
किती व्यवस्थिपणे व सविस्तरपणे आजची परिस्थिती हाताळण्याचे संयमीत उदाहरण म्हणजे भणगे सरांचा हा लेख. प्रत्येकाने वाचून आकलन करावा असाच आहे.
सुरेख मार्गदर्शन असे संयमाने घेतल्यास परिस्थिती कुशलपणे हाताळता येऊ शकते ही बीजे पुढील पिढित रुजवायची ही संधी आहे ..विचारपूर्वक प्रयत्न करायला हवा… प्रज्ञा करंदीकर बंगलूरु