जयाचे आत्मतोषी मन राहे

जयाचे आत्मतोषी मन राहे

“सर उद्या सुट्टी आहे का?” पिंकी म्हणाली.

“हो, उद्या जन्माष्टमीची सुट्टी आहे. शाळा भरणार नाही.” शाळेचा दरवाजा बंद करत मी म्हणालो.

“नको ना सर उद्या सुट्टी. या ना तुम्ही. आपण दहीहंडी करू.” धीरज म्हणाला.

“अरे, आपल्याकडे साहित्य नाही. तुमच्यासाठी खास ड्रेस नाहीत. कसली दहीहंडी? त्याच्यापेक्षा सुट्टी घेऊया.” असं बोलून मी गाडीकडे निघालो.

तेवढ्यात किरण म्हणाला,” तुम्ही फक्त या. आपण करू बरोबर.”

आता सगळ्यांचे चेहरे माझ्या उत्तराकडे लागलेले. मी क्षणभर विचार केला आणि म्हणालो, “ठीक आहे.”

माझा होकार ऐकताच पोरांना इतका आनंद झाला की त्यांनी आरोळ्या ठोकत घराच्या दिशेने पळ काढला.

दुसऱ्या दिवशी मी पण मुद्दाम काहीच घेऊन गेलो नाही. मला बघायचं होतं आता ही चिल्लर पार्टी नेमकं काय जुगाड करतेय ते. जाऊन बघतोय तर माझ्या स्वागताला सगळी मंडळी नटून-थटून हजर. प्रत्येकाचा चेहरा उत्साहाने ओसंडून वाहणारा. त्यांच्या सर्वांगाला जणू आनंदाचे भरते आले होते. त्यांचा उत्साह पाहून माझीही कळी खुलली.

“चला करुया सुरुवात. आपल्याला मडकं हवंय. मडकं घेऊन या कोणीतरी.” मी म्हणालो.

धीरज उठला. म्हणाला,”मी आणतो मडकं.”

धीरज मडकं आणायला गेला; पण रिकाम्या हातानेच परत आला.

“काय रे, मडकं नाही आणलं?” मी म्हणालो.

“आई देत नाही. ती सांगते दूध तापाया लागतं.” धीरजचा मूडच गेला होता.

मग मी पुन्हा प्रश्न मांडला, “आता कोण आणतं मडकं.?”

योगेश्वरी उठली, “मी आणते.”

पहिलीतली योगेश्वरी वर्गात फक्त शांत बसायची पण अशा काही ऍक्टिव्हिटी असल्या की तिला खूप आनंद व्हायचा. धावत धावत गेली अन् मडके घेऊन आली. आता प्रश्न राहिला गोपाळकाल्याचा. प्रत्येकाने आपापल्या घरून मुरमूरे आणले होते. एकदा मीच मुरमुरे आणले होते तेव्हा हीच चिमुरडी मुले म्हणाली होती, “कृष्णाचा गोपाळकाला सर्वांचा असतो. एकाचा नाही.” त्यामुळे त्यांनी ठरवूनच हरिनाम सप्ताहातल्याप्रमाणे आपापल्या घरून प्रसाद आणला होता.

मडके रंगवले. काला केला. मडके दोरीवर टांगले. एक टोक शाळेच्या खांबाला, दुसरे बेलाच्या झाडाला. मुलींनी पिरॅमिड केला. दहीहंडी फोडली. सगळ्या मुलांनी काला खाल्ला. सगळे एकदम खूश.

सगळ्या लेकरांचे चेहरे फुलासारखे फुललेले. प्रफुल्लित. सगळीच मुलं कृष्ण अन् सगळ्याच मुली राधा. सगळे नटलेले. शहरातल्यासारखी वेशभूषा नव्हतीच कोणाची. कारण त्यासाठीचं भाडं परवडणारं नव्हतं.

आवळ्याच्या झाडाचं पान डोक्यात खोचलेलं. तोच मोरपिसारा. माझ्यासाठी ते झाडाचं पान होतं पण त्यांच्यासाठी ते मोराचं पीस होतं. माझ्यासाठी त्यांनी नेसलेली ओढणी होती, फडकी होती. फाटकी, जीर्ण; पण त्यांच्यासाठीते कृष्णाचं पितांबर होतं. त्यांनी त्यांच्या हाताला,पायाला साध्या साध्या तगराच्या फुलांचे हार घातले होते. तेच त्यांचे अलंकार होते.

आपलं नेमकं उलट असतं. अमुक गोष्ट अशाच प्रकारची हवी या हट्टापायी सुखाचं रूपांतर आपण दुःखामध्ये करतो. सुखाचे सुख आपल्याला सुखाने अनुभवता येत नाही. ‘सुखेन सुखमश्नुते’ असं श्रुती सांगतात. तेच नेमकं साधत नाही. कितीही उत्तम गोष्ट साधली, उत्तम काहीतरी मिळालं तरीदेखील मन भरत नाही.

त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघून मी विचारात पडलो.wasteमधून best कसं कराव याचा वस्तूपाठच माझ्या विद्यार्थ्यांनी मला घालून दिला होता. अभावात सुद्धा व्यक्ती किती आनंदी असू शकते! कुठलंही साहित्य नसताना तरीही त्यांनी स्वतःला कृष्ण आणि राधेमध्ये रूपांतरित केलं होतं. माझे विद्यार्थी माझे गुरू बनले होते आणि मी त्यांचा विद्यार्थी.

आनंद हा आत्म्याचा स्वभाव आहे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, ‘जयाचे आत्मतोषी मन राहे’ ज्याचं मन तृप्त आहे तो कायम आनंदीच असतो. स्वत:च्या तृप्तीसाठी सागर जसा पावसाची वाट पाहत नाही, तसा आत्मतृप्त माणूस कायम आनंदीच असतो.

माणसाने कायम आनंदी असलं पाहिजे हाच श्रीकृष्णाचा सर्वांत महत्वाचा संदेश आहे. जो रडका, सुतकी चेहरा करून बसतो तो कृष्णाचा खरा भक्तच असू शकत नाही. कृष्णभक्त कसा असावा?’ संतुष्टं सततं योगी.’ याचा डेमोच दाखवला या मुलांनी.

आनंद हा व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतो. विचार करणाऱ्याच्या विचारपद्धती सापेक्ष असतो असंही म्हणता येईल. जो भाग अत्यंत दुर्गम, खायची मारामार आहे, तिथली माणसं जास्त आनंदी, जास्त आशावादी, हसतमुख, प्रेमळ, निस्वार्थ, निर्मळ पाहायला मिळतात. जो भाग सधन आहे, जिथे मोठमोठे बंगले आहेत, श्रीमंत लोक आहेत. ती लोक कायम कुठल्या ना कुठल्या चिंतेमध्ये ग्रस्त असलेले आपल्याला दिसतात. साधनांमुळे आनंद होत असेल तर आनंदी लोक हे श्रीमंताच्या वस्तीत जास्त सापडायला पाहिजेत; पण सार्वत्रिक अनुभव असा आहे की आनंदी माणसं गरीबाच्या झोपडीत जास्त दिसतात.

जेवढी साधनं कमी तेवढा व्याप कमी.साधन वाढली की व्याप वाढणार, व्याप वाढला की आनंद नष्ट होणार. जेवढा माणूस निसर्गाच्या जवळ, तेवढा तो अधिक आनंदी. जशी कृत्रीम साधनं वाढत जातात तसा माणूस कृत्रिम बनत जातो. हाच कृत्रिम प्रणाम त्याच्या जीवनातला आनंद हिरावून घेतो. आनंद परत मिळावा म्हणून तोच कृत्रिम माणूस आठवड्याला महिन्याला जंगलात सहली काढतो. चांगल्या जागेवर कचरा करून येतो.

आमचे तुकाराम महाराज म्हणतात, ‘आहे तुजपाशी| परी तू जागा चुकलाशी|’ आपला आनंद हा आपल्यातच आहे. आपण तो मात्र बाहेर शोधतो आहोत. मुलत: व्यक्ती आनंदस्वरूप आहे. माणसाचं अस्तित्व आनंदमय आहे पण त्या अस्तित्वामध्ये वैचारिक, भावनिक, भौतिक प्रदूषणाचे थेंब पडल्यामुळे ते नितळ राहत नाही. ते ढवळलं जातं. प्रदूषित होतं. आपला आनंद सुद्धा निर्भेळ न राहाता भेसळयुक्त होतो. जोपर्यंत प्रदूषण होत नाही तोपर्यंत मन कायम आनंदी असतं; कारण सदैव आनंदी असणं हाच मनाचा स्थायी स्वभाव आहे. त्याच्यावर भौतिक गोष्टींचा गोष्टींच्या असण्या नसण्याचा परिणाम होत नाही. भौतिक गोष्टी आज असतील उद्या नसतील; पण आपला आनंद मात्र चिरस्थयी असायला हवा.

‘Material things will come and go
Your bliss should be eternal.’हाच आमच्या बाळगोपाळांचा संदेश नव्हे का?

– रमेश वाघ, नाशिक
९९२१८ १६१८३

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “जयाचे आत्मतोषी मन राहे”

  1. रविंद्र कामठे

    अप्रतिमच विचार मांडलेत रमेश सर. खूप काही घेण्यासारखं आहे.

  2. Nagesh S Shewalkar

    बाळगोपाळांची तळमळ आणि त्यांनी घडवून आणलेला गोपाल काला खूप छान मांडणी केली आहे.

  3. Lalit mahajan

    आजची वास्तव परिस्थिति व अध्यात्म तसेच बालगोपाल व आनंद , मन व आत्मा ,गरिबीत समाधान असे विषय मनाला भाव तात वाघ सर खूप छान लेख वाचून गरिबाच्या झोपडीत असल्यासारखे वाटले खरच समाधान वाटले अजून लिहीत रहा

  4. Vinod s. Panchbhai

    व्व्व्वा ! सरजी खूपच अप्रतिम!
    मन चंगा तो कटौती मे गंगा !!

  5. Sanjay D. Gorade

    कथा उदाहरण म्हणून देत लेख संदेश पर खूप छान झाला आहे, जितक्या सुखसुविधा जास्त तितका आनंद कमी असतो, जितक्या सुविधा कमी तितका आनंद जास्त असतो, तो फक्त शोधता आला पाहिजे, मस्त रमेश सर

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा