देवभक्ती अन् देशभक्तीने समाजजीवन घडवू या
यास्तव सारे एकमुखाने राष्ट्रमंत्र हा गर्जू या
जय जय रघुवीर समर्थ ॥ (धृ.) ॥
भ्रष्टाचारे देश पोखरे, अत्याचारे देश बरबटे
सामर्थ्यानिशी चला झुंजूया रामराज्य हे घडवू या
जय जय रघुवीर समर्थ… (1)
बिळे बुजविण्या घुसखोरांची समाजघातक दुष्ट शक्तींची
बुभुःकारे नभ दुमदुमण्या पुन्हा प्रेरणा घेऊ या
जय जय रघुवीर समर्थ… (2)
दूर अयोध्या, दूर शरयू ती, समीप आमच्या जांब नंदिनी
शुद्ध शुचिते आपण करूया अयोध्येसम जांब ही नगरी
जय जय रघुवीर समर्थ… (3)
समर्थ भूमी दुर्लक्षित ही तसेच भक्ते उपेक्षित ही
समर्थ विचारे विश्व भारण्या शक्ती, स्फूर्ति येथून घेऊ या
जय जय रघुवीर समर्थ ॥ (4)
गीतरचना – डॉ. जगदीश मार्तंडराव करमळकर आणि सूर्यकांत रघुनाथराव कुलकर्णी
राग – केदार
स्वरसाज – सौ. कीर्ती देवेंद्र कस्तुरे व सहकारी.
सात-आठ-नऊ डिसेंबर 2019 ला जांब समर्थ येथे समर्थ महासंगम संपन्न झाला. त्यासाठी जवळजवळ वर्षभर कार्यकर्त्यांच्या बैठका होत होत्या. जांब, जालना, औरंगाबाद आदी ठिकाणी बैठका घेत असताना एक विचार समोर आला तो म्हणजे महासंगमास उपस्थित राहणार्या रामभक्तांना महासंगमाच्या निमित्ताने एखादे प्रेरणागीत देण्याचा. अध्यक्ष डॉ. करमळकर कायम विचारणा करायचे की, ‘‘झाले का गीत?, ‘‘जमतंय का गीत?’’
शब्द कसे जवळ असायचे पण जुळणी मनासारखी होत नव्हती. पाच-सहा महिने विचार चालू होता. अचानक डॉ. करमळकरांचा फोन आला. ‘‘हॅलो, मला गीताचा आरंभ सुचलाय तो ऐका…’’ आणि त्यांनी सुरात ‘‘देवभक्ती अन् देशभक्तीने समाजजीवन घडवू या’’ म्हणून दाखवले आणि काय आश्चर्य क्षणात सगळे खिळे जुळू लागले. देवभक्ती, देशभक्ती आणि समाजजीवन हे तीन शब्द मला प्रेरणा देते झाले.
क्षणात डोळ्यासमोर समर्थांचं जीवनकार्य उभं राहिलं. देवभक्ती तर होतीच पण जळजळीत देशभक्तीही होती. महाराष्ट्र धर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा, बुडाला औरंग्या, देणे ईश्वराचे असे अनेक प्रेरणा देणार्या समर्थांच्या ओव्यातील शब्दपुंजके घोंगावू लागले आणि सध्याची भारतातील विस्कळीत परिस्थिती समोर नाचू लागली.
भ्रष्टाचार, अत्याचार, स्त्रियांवरील बलात्कार, पाकिस्तान-बांगलादेशकडून काही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेऊन होणारी घुसखोरी, त्यांच्याकडून होणारी दुष्ट कृत्ये दूर करण्यासाठी हनुमंतासारखा बुभुःकार करणेच आवश्यक आहे. म्हणून श्रीराम, हनुमंत आणि यांचाच जप करणारे श्रीसमर्थ यांचीच पे्ररणा घेणे आवश्यक आहे.
जांब समर्थ येथील भूमीही अयोध्येइतकीच पवित्र आहे, हे समजून घेतले पाहिजे. म्हणून अयोध्या व तेथील नदी शरयू असली तरी जांब येथील नंदीनी नदीही पवित्र आहे हे सर्व समर्थभक्तांनी मनात बिंबवून घेतलं पाहिजे. म्हणून ‘‘शुद्ध शुचिते आपण करूया, अयोध्यासम जांब ही नगरी.’’
मुळात जांब, समर्थ, समर्थांचे विचार, समर्थ भक्तांकडूनच उपेक्षित आहेत असं मला वाटतं. एवढा मोठा संत, सर्व समाजाला आचरणाचे परखड उपदेश करणारा, देशाविषयी, स्वधर्माविषयी क्षणोक्षणी सातत्याने जागृती करणारा उपेक्षित रहावा हे या देशाचे केवढे दुर्भाग्य? पूर्वी समर्थांची वाणी खेड्यापाड्यातून शहरापर्यंत असलेल्या शाळांच्या भिंतीवर विराजमान असायची. पहिले ते चौथीपर्यंतच लहान वयातच मुलामुलींवर सुसंस्कृत आचरणाचा संस्कार करायची. मनाचे श्लोक मुलांना पाठ असायचे पण आता समर्थभक्त म्हणवणार्यांच्या घरातूनही ना हे धडे शिकवले जात आहेत ना संस्काराचे पाढे गिरवले जात आहेत. शाळेच्या भिंतीवरून समर्थांचे धडे केव्हा पुसले गेले हे समाजाला समजलेच नाही. का या समर्थ विचारांचा एवढा दुःस्वास? का त्यांच्या विचारांना नष्ट करत आहात?
‘नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे’ हा एक समर्थ विचार फक्त रूजला असता तर भारतात भ्रष्टाचार माजला नसता पण आपण हे चांगले विचार नष्ट होताना बघतो आहोत व आपल्याला काय त्याचे असा विचार करून असहाय्यपणे बसलो आहोत. म्हणून शेवटी समर्थ भूमी दुर्लक्षितही तशीच उपेक्षितही. दुर्लक्ष पण हे पापच पण उपेक्षितपण हे अधम पाप. या उपेक्षेला, त्यांच्या विचारांना नष्ट होताना दिसत असूनही दुर्लक्ष करणारा समर्थ भक्तच जबाबदार ना? असो!
ही झाली गीतरचनेची पार्श्वभूमी पण हे गीत सादर करण्याची अफलातून किमया केली ती सौ. कीर्ती कस्तुरे यांनी. एम. ए. (संगीत) व संगीत अलंकार असलेल्या कीर्तीताईंनी अक्षरशः एका रात्रीतून या गीताला सुरावट दिली. सौ. कीर्तीताई या दिलीपराव कस्तुरे यांच्या स्नुषा. पुण्यात संगीताचे क्लासेस घेतात तसेच एसएनडीटी व गांधर्व महाविद्यालय या संस्थांत संगीताचे अध्यापन करतात. आम्ही प्रथम म्हणत असलेली तोडकी-मोडकी चाल देऊन हे गीत त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि एका रात्रीत त्या व त्यांच्या शिष्यांनी त्याचे केले ‘एक अभिप्रेत असलेले प्रेरणागीत.’ तीनही दिवस हे प्रेरणागीत प्रत्येक उपस्थितांच्या कानावर रंजत होते, ओठांवर गुंजत होते आणि अंतःकरणावर ठसत होते.
जय जय रघुवीर समर्थ ।
– सूर्यकांत कुलकर्णी
9420704801
सुरेख गीत देवभक्ती आणि देशभक्तीने कल्पनाच सुंदर मिलाप