दरवळ वाचकांना सुगंधित करणारा

दरवळ वाचकांना सुगंधित करणारा


‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील यांच्या ‘दरवळ’ या नव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी प्रस्तावना लिहिलीय. ही मर्मग्रही प्रस्तावना खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.

संवाद म्हणजे माणसाच्या रंगहीन व्यक्तिमत्त्वाला सुगंध देणारी सामाजिक देणगी आहे किंवा दुसर्‍या शब्दात बोलायचे झाले तर साद नसलेल्या माणसाच्या जीवनाला मिळालेला तो दागिना आहे, नव्हे ती देणगी आहे. ही देणगीही पुन्हा सप्तसुरांची असते. तृप्त करणारी असते. माणसाचं अस्तित्व, माणसाचं व्यक्तित्व, माणसाचं कर्तृत्व आणि माणसाचं वक्तृत्व संवादातून सिद्ध होते. संवादामध्ये समाजाच्या हृदयाला स्पर्श करता येतो. माणसं जोडणं किंवा माणसं ‘तोडणं’ हे केवळ संवादच करू शकतात. मग तो संवाद पुस्तकाच्या माध्यमातून झालेला असो किंवा दुसर्‍या एखाद्या कलेच्या द्वारे झालेला असो. त्यातही लेखक आणि वाचक हे एकाच पातळीवर येणे रसास्वादाच्या दृष्टिने आवश्यक असते. आपण त्या लेखकाचा ग्रंथ वाचत नसून त्याच्याशी आपण संवाद साधतो आहोत याचा एक अनामिक आनंद वाचकाला त्यातून लाभत असतो. त्यातही एखादा लेखक एकाचवेळी पत्रकार, संपादक, प्रकाशक असेल तर त्या दोहोंच्या संवादात अंतराय निर्माण होण्याची शक्यता असते. या दोघांमध्ये एक अदृश्य स्वरुपाची भिंत निर्माण झालेली असते. जागतिक राजकारणाचा सखोल आणि सर्वांगीण अभ्यास असलेल्या एखाद्या संपादकाने लिहिलेला व्यासंगपूर्ण लेख सर्वसामान्य वाचकांशी संवाद साधेलच असे नाही आणि तो संवाद त्याच्या रक्तामध्ये एकरूप होईल याविषयी देखील शंका वाटते. या पार्श्वभूमीवर श्री. घनश्याम पाटील यांचा ‘दरवळ’ हा ग्रंथ वाचकाच्या डोक्यावरून न जाता अंत:करणात झिरपतो आणि झिरपता झिरपता तो वाचकांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक बनतो हे विशेष म्हणावे लागेल. संवाद हा घटक वाचक आणि लेखक यांना जोडणारा, फुलांनी माखलेला आनंदमार्ग आहे असे मला मनापासून वाटते.

हा संवाद साधणारा ग्रंथ आणखी एका कारणाने वाचकांशी मैत्री करतो. ते कारण म्हणजे वाचकांबरोबर लेखकाने केलेला संवाद हा खाजगी स्वरूपाचा नाही अथवा कौटुंबिक अडीअडचणी सांगणारा नाही. ‘साहेबानं आज माझी चांगलीच खरडपट्टी केली’, ‘अंगणात वाळत घातलेला माझा टॉवेल कोणीतरी चोरून नेला’, ‘नव्या सेवेमुळे मिळणारे पैसे बायकोला मंगळसूत्रासाठी द्यावे लागतील’, ‘नव्या फॅशनचे मंगळसूत्र मला द्या’ असा तिचा रोज धोशा असतो, ‘आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी काल तिने मला गार चहाच दिला’, ‘एका विवाहसोहळ्यामध्ये वेड्यासारखं जेवल्यामुळे दोन दिवस झाले पोटदुखीचा त्रास सुरु झाला’ अशाप्रकारचे तात्कालिक, निरर्थक संवाद या संग्रहात नाहीत. असले संवाद म्हणजे ईश्वराने दिलेल्या आयुष्यातील एक दिवस वाया घालवण्यासारखा असतो. याउलट या ग्रंथात समाजजीवनाला शुद्ध आणि श्रीमंत करणार्‍या गोष्टींवर विवेचन आहे. इथे सामाजिक दोषांवर भाष्य आहे. मूल्यांच्या झालेल्या पडझडीवर विवेचन आहे. चंगळवादाची शिकार बनलेल्या दिशाहीन समाजजीवनाचे दर्शन घडविले आहे. समाजात परंपरेने चालत आलेल्या आणि नव्याने निर्माण झालेल्या प्रथापरंपरांवर भाष्य आहे. समाजजीवनावर होणारे अत्याचार आणि तिची गुलामगिरी येथे लेखकाने पोटतिडकीने सांगितली आहे. आजच्या साहित्य व्यवहारातील गुण-अवगुण यांचा स्वानुभव त्यांनी सांगितला आहे. जाती-पातीचा राजकीय सत्तेसाठी केला जाणारा गैरवापर आणि आजच्या राजकारणाला आलेले स्वार्थी आणि विकृत स्वरूप आणि महापुरुषांकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन अशा जिव्हाळ्याच्या सार्वत्रिक बाबींबर लेखकाने संवाद साधलेला आहे. त्यामुळे हा संवाद एकाचवेळी तीन गोष्टी सांगतो. तो तुम्हाला माहिती सांगतो. तो तुमच्या ज्ञानात भर घालतो आणि तो तुम्हाला जगण्यासाठी लागणारे शहाणपणही देतो. शहाणपण तुम्हाला जीवनातल्या अनुभवातून मिळते. रक्ताळलेल्या पावलांनी काटेरी वाटेवरून केलेल्या प्रवासातूनही मिळते. संवादातून साधलेला हा आणखी एक फायदा म्हणावा लागेल.

या लेखकाने वाचकांशी केलेला हा संवाद आणखी एका गोष्टीतून अधिक प्रभावी नि परिणामकारक वाटला. ती गोष्ट म्हणजे लेखकाने स्वत:ची सांगितलेली जीवन-कहाणी. ज्याच्या घरात दारिद्य्राची श्रीमंती ओसंडून वाहते आहे, ज्याच्याकडे पोट भरायला उपयोगी नसलेली जिराईत जमीन आहे, ज्यांचा भूतकाळ काळोखात लपलेला, ज्यांचा वर्तमान हा वंचना, विवेचना आणि भडकलेल्या भुकेने धगधगणारा आणि ज्याच्या माथ्यावर जन्मापासून मृत्युपर्यंत कर्जाने सोबत केलेली अशा घरातील मुलगा शाळा नावाच्या नक्षत्राकडे झेपावतो ही खरोखर तशी अपवादात्मक गोष्ट आहे. हे शिक्षण घेतानासुद्धा त्याने म्हणजे घनश्याम पाटलांनी कष्ट केले; तेही अपवादात्मक म्हणावे लागतील. शाळेला जाता-येता त्यांनी आठ-दहा किलोमीटरची पायपीट केलेली आहे. पुढे शिक्षणासाठी त्यांनी वृत्तपत्रे वाटपाचे काम केले आहे. पुण्यात येऊन ‘संध्या’ दैनिकात अग्रलेख लिहिले. पडेल ती कामे केली. त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे वाद-विवादही झाले आणि अशा अवस्थेत पायांना भूमीचा आधार आणि वरती आभाळाचे छत्र एवढ्या दोनच गोष्टी हक्काच्या असताना वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी संपादक, मालक, मुद्रक नि प्रकाशक म्हणून पुण्यामध्ये प्रारंभ केला, हे क्षणभर अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

‘दरवळ’ विकत घेण्यासाठी चपराक पुस्तकालयाला भेट द्या.

जिद्द, ध्यास आणि परिश्रम या तीन गोष्टींचा सुरेख आविष्कार म्हणजे त्यांचे ‘चपराक’ म्हणावे लागेल. संकटे माणसाला मोठी करतात. दारिद्य्र माणसाला लढण्याची प्रेरणा देते आणि परिश्रम माणसासमोर यशोमंदिर उभे करते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. खेड्यातील मुलांना ऊर्जा देणारे हे आत्मकथन आहे. या आत्मकथनातील संवादामुळे या ग्रंथाला अधिकच गोडी निर्माण झालेली आहे. या त्यांच्या लेखांमध्ये चिंतन आहे. अनुभवकथन आहे. समाज-निरीक्षण आहे. समाजाच्या विकृतीकरणाचे चित्रण आहे आणि समाजशिक्षणाची भूमिकाही एकरूप झालेली आहे. आजच्या दिशाहीन आणि गोंधळलेल्या समाजाचे समग्र दर्शन या ग्रंथातील अनेक लेखांतून आपणाला घडते. त्यातील काही बाबींचा थोडासा विस्ताराने परिचय व्हावा असे वाटते, म्हणून हे विवेचन.

काही अपवाद सोडले तर जवळजवळ सार्‍याच लेखांचा प्राणभूत घटक आहे परिपूर्ण आणि कृतार्थ जीवनाचा ध्यास! ही कृतार्थता व परिपूर्णता कशी प्राप्त होते त्याचेही लेखकाने विवेचन केलेले आहे. पाश्चात्य जीवनशैलीचे आंधळे अनुकरण आणि शरीरालाच सर्वस्व मानणारी चंगळवादी मनोवृत्ती यांचा समाजाने केलेला तृप्त अनुभव म्हणजे परिपूर्ण जीवन अशी धारणा झालेली आहे. पाश्चात्य जीवनशैली भौतिक सुखाला सर्वसुख मानते. आपली जीवनशैली या भौतिक सुखाला सात्त्विक वा आध्यात्मिक अधिष्ठान द्यायला सांगते. पाश्चात्य जीवनशैली शरीरसुखाला सर्वस्व मानते तर आपली जीवनशैली इंद्रियावर अंकुश ठेवायला सांगते. पाश्‍चात्य जीवनशैली देहसमाधानावर उभी आहे तर आपली जीवनशैली आत्मिक आनंदावर उभी आहे. पाश्चात्य जीवनशैली फक्त उद्याचा विचार करते तर आपली जीवनशैली युगाचा विचार करते. आपली जीवनपद्धती निसर्गाला चैतन्याचे प्रतीक मानते, तिची पूजा करते तर पाश्चात्य संस्कृती निसर्गाला स्वसुखाचे साधन मानते. पैसा टाकला की ती गोष्ट मिळते यावर पाश्चात्य जीवनशैली उभी आहे. आपली जीवनशैली नात्यांच्या रेशमी धाग्यांनी बांधलेली आहे. चौदा-सोळा वर्षे वयाच्या मुली, ज्यांचा ओठ पिळल्यावर दूध निघेल अशा मुली 50 हजारापासून विकल्या गेल्या अशी गेल्याच आठवड्यात बातमी आलेली होती. आंधळेपणा आणि प्रगतीची खोटी धारणा यामुळे इथला आमचा समाज, भौतिक सुखाने ‘सजला’ असला तरी आतून तो कुजत चालला आहे.

जगणे म्हणजे सोन्याच्या ताटात अमृताचा घास खाणे नव्हे. अंगावर दहा पंधरा किलो सोने घालणे म्हणजे कृतार्थ जीवन नव्हे किंवा दोन कोटींच्या गाडीतून भटकणे म्हणजे कृतार्थ जीवन नव्हे. किंवा चार-सहा बेडरूमचा महाल असणे म्हणजे परिपूर्ण नि कृतार्थ जीवन नव्हे. ज्याचा श्वास दुसर्‍या गरिबांसाठी अस्वस्थ होतो, ज्याचा घास भुकेल्या जिवाच्या मुखात जातो, ज्याचे वस्त्र, वस्त्र नसलेल्या अनाथाच्या शरीरावर पांघरले जाते, ज्याचा ध्यास सत्तेपेक्षा सेवेकडे अधिक झुकलेला आहे अशा उपेक्षितांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणारा माणूस हा परिपूर्ण जीवन जगतो, कृतार्थ जीवन जगत असतो. यासाठीच श्रीमान पु. ल. देशपांडे यांनी एक मार्मिक विधान केलेलं आहे. ते म्हणतात, ‘‘फ्रेंच संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे, तर आपली संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे.’’

स्वत: घनश्याम पाटलांनासुद्धा चिरंतन मूल्यांची होणारी उपेक्षा, जगण्याची हरवलेली दिशा, जीवनध्येयाचा एक असणारा निश्चित दृष्टिकोन, स्त्रीविषयक असणारी पारंपरिक जुनाट कल्पना, देशभक्तीचे बदललेले स्वरूप, समाजात जातीयतेचा केला जाणारा स्वार्थी वापर अशा बर्‍याच जिव्हाळ्याच्या विषयांवर त्यांनी वाचकांशी संवाद साधलेला आहे. राजकारणामधील तर सारी ‘आधुनिक’ सामर्थ्ये त्यांनी सोदाहरण सांगितली आहेत. आजचा राजकारणी पूर्वीच्या तत्त्वनिष्ठ राष्ट्रभक्ताच्या सावलीजवळही उभा राहू शकणार नाही असे मला वाटते. या अशा लहान-मोठ्या जीवनाला गिळून टाकणार्‍या किंवा नासवून टाकणार्‍या गोष्टींचा नि:पात कसा करायचा हा आजचा खरा प्रश्न आहे.

या निमित्ताने वरून ‘सुरूप’ असलेल्या पण आतून ‘कुरूप’ असणार्‍या समाजाच्या काही अपप्रवृत्ती मला सांगाव्याशा वाटतात. आपला समाज कितीही शिकला आणि सुधारला तरी त्याच्या अस्तित्वाला दंश करणार्‍या पाच गोष्टी आजही कमी झालेल्या नाहीत. या पाच गोष्टी म्हणजे 1) अहंकार, 2) अनाचार, 3) अत्याचार, 4) भ्रष्टाचार आणि पाचवी गोष्ट म्हणजे स्वार्थाचार! भ्रष्टाचार आणि स्वार्थाचार यात मी फरक करतो. एखाद्या शेतकर्‍याकडून सातबाराचा उतारा घेण्यासाठी जेव्हा एखादा तलाठी पाच-पन्नास रुपये घेतो तो स्वार्थाचार झाला पण एखाद्या बँकेला खोट्या कागदपत्रांधारे अधिकारी आणि राजकारणी-व्यापारी-उद्योजक चार-दोन हजार कोटींना फसवितात त्याला भ्रष्टाचार म्हणावा लागेल. हा भ्रष्टाचार अगदी महाभारतापासून चालत आलेला आहे. या पाच अवगुणांपोटी अहंकार सज्जन माणसालाही शूद्र समजतो. स्वत:ला समाजाचा नायक समजतो. अनाचार मानवी मूल्यांचे अपहरण करतो. अत्याचार शरीराला तृप्त करण्यासाठी धडपडतो. भ्रष्टाचार सुखोपभोगाला स्वामी बनण्यासाठी धडपडतो आणि स्वार्थाचार कष्टाविना पैसा मिळविण्यासाठी वापरला जातो. या पाच गोष्टी माणसाला तृप्त आणि मनपसंत आयुष्य जगण्यासाठी गरजेच्या आहेत अशी सामान्य माणसाची धारणा झालेली आहे आणि चंगळवादामुळे ती जगण्याचा अपरिहार्य घटक झालेली आहे. आजकाल आत्मप्रेमामुळे स्वत:विषयीच्या कल्पनाही पार बदलून गेल्या आहेत. आश्रितांचे चार नमस्कार, लाचारांचे चार हार आणि देशाचे नेतृत्व करणारा कर्तबगार नेता असे मजकूर असलेले चार फोटो लावले की हा देशाचा नेता म्हणून मोकळा होतो. तुंबलेली गटारे याला स्वच्छ करून घेता येत नाहीत तरीही त्याला (ओठावर शिवी ठेवून) नमस्कार घालावा लागतो. सारांश असा की समाजाचा सर्वांगीण विकास करणारी कोणतीही गोष्ट न करता नेत्याला नमस्कार आणि कार्यकर्त्यांना नाश्ता दिला की याचे समाजकार्य पुरे होते.

वरती उल्लेख केलेले जे चार-पाच अवगुण (खरे तर त्या विकृतीच आहेत) त्यांचे व्यवहारातले दर्शन कसे घडते त्या सार्‍यांचा सोदाहरण आणि विस्तृत परिचय करून देण्याऐवजी या सार्‍या अवगुणांना एकच शब्द वापरतो तो म्हणजे ‘गुलाम’ हा! आपण सारे पैशाचे गुलाम झालो आहोत. आपण सत्ताधीशांचे गुलाम झालेलो आहोत. त्यांचे खोटे-नाटे व्यवहार करणार्‍या कार्यकर्त्यांचे गुलाम झालो आहोत. आपणाला आपले मतदान करताना गुलाम रहावे लागते. आपण रक्ताला चटावलेल्या इंद्रियांचे गुलाम झालो आहोत. दुष्काळ आणि महापूर यांच्या गुलामीचा तर अंदाजच येत नाही. सावकाराची गुलामगिरी तर संसार उद्ध्वस्त करणारी असते. आपण वेगाचे गुलाम झालो आहोत आणि ‘आपण गुलाम झालो आहोत’ ही भावनाही शेवटी आपल्याला गुलाम करीत असते. स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिकांची आजची ही स्थिती आहे. घटनेने आपणाला स्वातंत्र्य दिलेले आहे. भोगासक्त वृत्तीने ते आपण टाकून दिलेले आहे.

श्री. घनश्याम पाटील यांनी काही लेखात जाती आणि धर्माविषयी अतिशय मर्मभेदक आणि तितकेच मार्मिक लेखन केलेले आहे. ते मला विशेष महत्त्वाचे वाटले. आजकाल तर धर्माने सत्तेला सल्ला देणे सुरु केले आहे. माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यावर निर्बंध घातले आहेत. परधर्मियांचा द्वेष हे राष्ट्रभक्तीचे लक्षण मानले जाते आहे. पारंपरिक, वर्णश्रेष्ठ समाजविघातक बाबींना प्रतिष्ठा मिळू लागली आहे. चारित्र्य आणि सद्गुणांवरून माणूस ओळखण्याऐवजी तो धर्मावरून ओळखला जातो आहे. वैदिक आचार-धर्माला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली आहे. आपापल्या जातीच्या संघटना करून राजकारण खेळले जात आहे. त्यातून जातीजातींमध्ये द्वेष निर्माण होऊ लागला आहे. धर्माचे हे विषद्ग्ध रूप विशद करताना स्वत: लेखकानेही एक-दोन ठिकाणी फार चांगली व्याख्या केलेली आहे. एका लेखात ते लिहितात, ‘दुर्बलांना निरपेक्ष भावनेने जो सबळ करतो, म्हणजे मदत करतो तो खरा धार्मिक होय’. दुसर्‍या एका लेखात ते विवेकानंदांचा दाखला देतात, ‘आत्मानुभूती व आत्मसाक्षात्कार म्हणजे धर्म!’ त्यापुढे ते लिहितात, ‘स्वत:च्या क्षमतांची ओळख होणे म्हणजे धर्म!’ पण ही गोष्ट आज दुर्मीळ झाली आहे. उलट अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या आणि अर्थशून्य असलेल्या कर्मकांडालाच आपला समाज धर्म मानतो आहे. खेड्यातील निरक्षर माणसांना धर्माचे हे ठेकेदार ‘हाच धर्म’ म्हणून या कर्मकांडातून श्रमाविना विलासी जीवन जगत आहेत. कर्मकांड वगळून जो शाश्‍वत विचार करतो तो खरा धर्म होय! पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की धर्मग्रंथांची अर्थशून्य पोपटपंची करणे म्हणजे धर्म नव्हे. मनामध्ये स्वार्थ, वासना आणि भोगलालसा ठेवून तीर्थस्थानी स्नान करून प्रदक्षिणा करणे म्हणजे धर्म नव्हे. ओठावर नामस्मरण आणि पोटामध्ये स्त्री-चिंतन असे दुटप्पी आचरण म्हणजे धर्म नव्हे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशातून हजार-पाचशे रुपयांची देणगी म्हणजे धर्म नव्हे. अंगावर भगवी वस्त्रे परिधान करून पंचेन्द्रीयांचे गुलाम होणे म्हणजे धर्म नव्हे. मठ-मंदिरांची संस्थाने करून त्यावर अधिसत्ता गाजवणे म्हणजे धर्म नव्हे. अर्धा तास देवपूजा करून नंतरच्या वेळात दिलेल्या कर्जासाठी गरिबाचे घर लुटणे म्हणजे धर्म नव्हे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालायच्या आणि तरुण वयातील भक्त स्त्रीच्या गळ्याला मिठी मारणे म्हणजे धर्म नव्हे. देवदर्शनासाठी आलेल्या भक्ताला देणगी म्हणून मोठी रक्कम मागायची आणि देवाचा प्रसाद म्हणून भक्तानेच दिलेला बिनपाण्याचा नारळ प्रसाद म्हणून द्यायचा याला ‘भक्ती धर्म’ म्हणत नाहीत. खरा धर्म माणसातले चैतन्य बघायला शिकवतो. माणसाला माणसाशी जोडतो. खरा धर्म प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा संगम साधतो. तो चिरंतन मूल्यांची उपासना करण्याची प्रेरणा देतो. माणसाचा विशुद्ध आणि उन्नत करणारा, शाश्‍वत स्वरूपाचा, कायम प्रवाही नि काळाबरोबर चालणारा विचार म्हणजे खरा धर्म! खरा धर्म भोगाचे त्यागात रुपांतर करतो. विकृतीचे संस्कृतीत रुपांतर करतो. आसक्तीचे विरक्तीत रुपांतर करतो आणि माणसामध्ये असलेल्या पशुत्वाला देवत्वाचे रूप देतो. चराचरात चैतन्य व्यापून उरलेले आहे याचा साक्षात्कार याच खर्‍या धार्मिकाला होत असतो आणि मुख्य म्हणजे धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही याचे विस्मरण होता कामा नये. हे विस्मरण पुन्हा कर्मकांडाने गढूळ झालेल्या धार्मिक आचरणाकडे नेते. याच स्वरूपाचे एक वचन गौतम बुद्धांनी ‘धम्मपद’मध्ये नोंदविले आहे. ते म्हणतात, ‘‘ज्याचे अंत:करण स्वच्छ नाही, जो मनाने निर्मळ नाही, राग-द्वेषादी विकारापासून जो मुक्त नाही अशा माणसाने जरी भगवी वस्त्रे अंगावर घातली तरी तो ती घालण्यास लायक नाही.’’

सारांश म्हणून मी असे म्हणेन की आजच्या गोंधळलेल्या काळात धर्म आणि अधर्म यातला फरक स्पष्ट करण्यासाठी श्री. घनश्याम पाटील यांनी जे लेखन केले आहे ते तरुण पिढीने वाचले पाहिजे; नव्हे ते आचरणात आणले पाहिजे असे मला वाटते.

या ग्रंथात श्री. घनश्याम पाटलांनी स्त्री जीवनाशी निगडित तीन-चार लेख समाविष्ट केले आहेत. त्या लेखांतून काही नव्या समस्या उपस्थित केल्या आहेत. काही वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा त्याच मांडलेल्या आहेत. त्यांनी नोंदविलेले एक मत असे की, स्त्री आणि पुरुष यात समानता असली पाहिजे. दोघांमध्ये कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही. तिलाही सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. तिच्या इच्छेनुसार तिला शिक्षण घेता आले पाहिजे आणि तिच्या इच्छेप्रमाणे प्रेमविवाह करता आला पाहिजे. त्यांच्या मते घरात अनेक पुरुष आपल्या पत्नीवर हुकमत गाजवीत असतात. बाहेर मात्र स्वातंत्र्य आणि समतेवर बोलत असतात. त्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची सूचना अशी की, शहरामध्ये अनेक संघटना असतात. त्या सर्वांची एकच संघटना झाली तर प्रश्न सुटायला मदत होईल. शासनालाही दडपण येईल. त्यांनी सांगितलेली तिसरी क्रांतिकारी सूचना अशी की समाजात सर्रास प्रेमविवाह झाले पाहिजेत. त्याशिवाय जातीपातीची काटेरी झुडपे नष्ट होणार नाहीत! तसेच जाहिरातीमध्ये स्त्री शरीराचा वापर उचित वाटत नाही. आपली चैन, मौज भागवण्यासाठी महानगरात प्रौढ वा वृद्धाबरोबर बायकोप्रमाणे राहतात हेही त्यांना खटकते. एखाद्या हरामखोराने त्या बाईला म्हणजे तात्पुरत्या पत्नीला वेश्यागृहात विकले तर या बाईचे कसे हाल होतील? कसले आयुष्य जगावे लागेल? याचा विचार या तरुण मुलींनी करायला हवा. तसेच प्रेम आणि लग्न याच्या संकल्पना अलीकडे बदलत जाणार्‍या आहेत. नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने त्यांची मैत्री होते, प्रेमाच्या दिशेने वाटचाल होते पण विविध कारणांनी वासना आणि प्रेम यातला फरक त्यांना कळत नाही. त्याचा फटका त्यांनाही बसतो आणि त्यांच्या कुटुंबांनाही बसतो, याचाही विचार समाजाने करावा असे श्री. पाटील यांना वाटते. शेवटी त्यांनी ‘आई ही देवी आहे, तिला देवीचा दर्जा दिला पाहिजे’ असा एक शाश्‍वत विचार सांगितला आहे. माझ्या मते तर ईश्वरी शक्तीचे सगुण रूप म्हणजे आई. नाहीतरी आपल्या संस्कृतीने मानवी जीवनाला पूर्णत्व देणारी शक्ती मानलेलीच आहे. आदिशक्तीचे निकोप, निष्कलंक, निरामय, शुभदाई सगुण रूप म्हणजे स्त्री होय. ती मानवी जीवनाला आकार देते, मूल्यांना साकार करते, संस्कृतीला श्रीमंत करते, श्रमाला प्रतिष्ठा देते आणि माणसाला माणूसपण देते. सर्जन, संगोपन, संरक्षण आणि जगण्यासाठी लागणारी डोळस जाणीव स्त्रीशिवाय पूर्णच होत नाही. मग ती व्यक्तीची असो अथवा समाजाची असो. म्हणून आपण तिला सृजनाची देवता मानतो. संस्कृतीची आदिशक्ती मानतो. कर्तृत्वाची प्रेरक शक्ती मानतो आणि सेवेचे प्रतीक मानतो. येशू ख्रिस्ताचे एक वचन आहे. तो म्हणतो, ‘‘परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली.’’ स्वामी विवेकानंदांनी आणि साने गुरुजींनी दिला देवता मानले आहे. विवेकानंदांनी म्हटले आहे की, ‘‘जिथे तिचा सन्मान होत नाही तो देश कधीच मोठा होऊ शकत नाही.’’

आता अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याचा वेगळा विचार, शरीरसुखाला आलेले प्राधान्य, चिरंतन मूल्यांची होणारी उपेक्षा, तात्कालिक सुखाची चटक आणि जीवनातील श्रेयस-प्रेयसाचा बदलेला क्रम या बाबी ज्यांना मोलाच्या वाटतात त्यांनी मुक्त कामाचार करायला हरकत नाही. मात्र ज्ञानेश्वरांच्या भाषेत डोळे दिपविणारे तुमचे सौंदर्य कालातंराने सुकेलेल्या पडवळासारखे होईल तेव्हा तुमच्याकडे बघणार कोण आणि खायला देणार कोण? गौतम बुद्धाने एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘‘कामसुख हे एखाद्या चिखलासारखे आहे. त्यातून बाहेर पडणे शक्य नाही.’’ म्हणून स्त्रीच्या कर्तृत्वाला सारे आकाश मोकळे करून देणे आणि त्यासाठी तिला आपण ते पुरविणे यातूनच समाजात समता नांदेल. स्त्री कर्तृत्वाला बहर येईल.

या ग्रंथात काही राजकीय स्थितीची चर्चा केलेली आहे. आजचे राजकारण देशहिताचा दीर्घकालीन विचार करून सचोटीने अंमलबजावणी करणारे नाही. आज प्रत्येक जातीचे राजकीय पक्ष निर्माण झाले आहेत. त्या जातीच्या उद्धारापेक्षाही यांना स्वत:ची प्रगती हवी आहे. पूर्वी सचोटी, त्याग, देशप्रेम, रयतप्रेम, प्रबोधन विचार, साधी राहणी याला महत्त्व दिले जात होते. आता ज्याच्याकडे उदंड स्वरुपाची ‘मनीपॉवर’ आहे, विरोधकांना यमसदनाला पाठविणारी ‘मॅनपॉवर’ आहे आणि आपल्या विरोधात काम करणार्‍या कार्यकर्त्यांची हाडे मोडणारी ‘मसलपॉवर’ आहे तोच राजकारणात येऊ शकतो, टिकाव धरू शकतो. त्यात पुन्हा कार्यकर्त्यांना मानधन, कार्यकर्त्यांना पार्ट्या, मतदारांना पैसे, प्रसिद्धीसाठी येणारा अफाट खर्च या गोष्टी आजच्या राजकारणाचे अध:पतन करणार्‍या आहेत. जॉर्ज बर्नाड शॉने एक विधान केले होते. तो म्हणतो, ‘‘समाजातली बदमाशगिरी करण्याची सारी क्षेत्रे संपली की माणसे राजकारणात येतात.’’ हे विधान आजच्या राजकारणाला लागू पडते. अशा या नासलेल्या राजकारणावर लेखन करण्यात अर्थ काय आणि केले तरी ते कोणी वाचणार नाही.

समारोप म्हणून मी असे म्हणेन, घनश्याम पाटलांचा हा ग्रंथ शाश्वत मूल्यांचा आग्रह धरणारा, शाश्वत समतेचा पुरस्कार करणारा, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा, वाचकांचे वाचन वाढविणारा आणि मातीत राबणार्‍या शेतकर्‍यांपासून ते मातीमोल आयुष्य जगणार्‍या माणसांची नोंद करणारा, सदाचार, सद्भाव, मैत्र, प्रेम, पुस्तकप्रेम, कारुण्य, उदारता, जिव्हाळा आणि अभिजात साहित्यप्रेम यांचा उत्कृष्ट नमुना आहे. तो या एकाच ग्रंथात एकजीव झाला आहे. म्हणून तो प्रत्येकाने जिवाभावाने वाचला पाहिजे.

‘दरवळ’ विकत घेण्यासाठी चपराक पुस्तकालयाला भेट द्या.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “दरवळ वाचकांना सुगंधित करणारा”

  1. Parag kulkarni

    खूप छान लिहिले आहे

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा