नाशिक येथील युवा पत्रकार आणि वक्ते किरण सोनार यांचा ‘हजार धागे सुखाचे’ हा वेगळ्या धाटणीचा कथासंग्रह लवकरच ‘चपराक प्रकाशन’कडून प्रकाशित होत आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांच्या सदिच्छा लाभल्या आहेत. त्यांच्या या भावना खास आपल्यासाठी… किरण सोनार यांच्या कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतील यासाठी विजयाताईंच्या या शब्दांशिवाय आणखी कोणतं परिमाण हवं?
किरण सोनार या तरुण लेखकाजवळ एक सुंदर मन आहे, ज्यात कळवळा आहे, कणव आहे, सुंदरतेची अनोखी आस आहे आणि मनाच्या गाभार्यात शिवशंकराचं पुण्यशील अधिष्ठान आहे; जे माणूसपण असोशीनं जपतं आणि ते किरणच्या कथांमधन झिरपतं.
हे तो कळवळ्याची जाती
अन् माणुसपणाची शेती
याची शब्दांवरी प्रीती
त्याचे कौतुक वाटे किती ।
असं किरणच्या कथांबद्दल म्हणावं वाटतं.
‘अनमोल श्वास’ ही मला सर्वात आवडलेली कथा. ‘स्वामी’ हा कथानायक छोटा शाळकरी मुलगा आहे. त्याच्या छोट्याशा जगात एक ‘पपी’ त्याला हवी आहे. एक चिमणुलं कुत्र्याचं पिल्लू. आता मुलांना खाऊ, खेळणी, पुस्तकं अशा गोष्टी पालक सहजी आणून देतात हो! पण एक जिवंत कुत्र्याचं पिल्लू आणून द्यायचं म्हणजे त्याचं सारंच करावं लागणार ना! खाणं, पिणं, शी-शू, झोपणं, फिरवून आणणं! एक का काम? आणि हे सारं काम आपल्यावर पडणार म्हणून आईचा तीव्र विरोध! वडील नि स्वामी हतबल! मग वडील मध्यममार्ग काढतात. कुत्र्याचं पिल्लू घरात नव्हे, घराबाहेर पाळू! अन् तो पपी आणण्यासाठी बाबांबरोबर दुकानात जातो. पिलू पंधरा हजार रुपये किंमतीचं असतं पण एक लंगडं पिलू तो निवडतो. ‘‘हे मी तुला कमी किंमतीला देईन’’ दुकानदार म्हणतो…
इथंच ही कथा एक उंच झोका घेते. स्वामी म्हणतो, ‘‘का बाबा?’’
‘‘तो तुझ्याबरोबर खेळू शकणार नाही!’’
स्वामी मग खुर्चीत बसतो नि दोन्ही पायातले शूज काढतो. सॉक्स काढतो. डावा पाय गुडघ्यापासून…! ‘‘मला तरीही माझे वडील कुठं कमी लेखतात?’’ आपण मात्र वाचता वाचता ‘स्वामी’चे होऊन जातो.
जिंकलास बाबा किरण…!
‘पोरका बाप’ ही अशीच अस्वस्थ करणारी कथा आहे. कथानायक अण्णा फेरफटका मारण्याच्या आवडत्या उद्योगाला जात असत. रोज झाडामाडांना मित्रासारखं भेटत. दोन झाडांमधला कचरा काढत. रोज सायंकाळचा हा नियमच जणु! फेरफटका मारुन ओट्यावर बसले असता त्यांना दिसलं की एक माणूस झाडाला चापट्या मारीत आहे. वेडाबिडा आहे का? अण्णांना वाटलं. त्यांनी विचारलंच!
तो प्रतिप्रश्न करीत म्हणाला, ‘‘तुम्ही कोण मला विचारणारे?’’
अण्णा पोलीस बोलावतात पण हा इन्कार करतो. तसंही झाडाला मारलं म्हणून पोलीस कैद करीत नाहीत. फार तर जाब विचारतील! खरं ना? मग काय करणार असेल? अण्णांना अखेर उत्तर मिळतं. पुत्रवियोग! गाडी झाडावर आपटून प्राणोत्क्रमण! त्याच झाडाखाली फुलं ठेवणारा बाप आपलं हृदय चिरीत जातो.
शोकात्मिका हृदयास अधिक भिडतात म्हणून त्यांचं आकर्षण किरणला वाटतं का? तसं नाही. देवदुर्लभ असं करुणामयी मन त्याला लाभलं आहे. सर्जनाची शक्ती देवानंच दिली आहे. ‘सरसोती’ ज्याचे हृदयी त्यास काय कमी राजेहो? म्हणून तर कथाबीजांचं वाण अस्सल आहे. मी मनापासून वाचल्या त्याच्या कथा. किरण दुःखाची उकल हळूवारपणे करतो.
कथाबीजं अस्सल असली की शब्दांची उसनवार भलावण करावी लागत नाही. थोडक्या शब्दात कथा मांडणं ही एक अवघड कला आहे. किरणला त्यात अभिनंदनीय यश लाभलं आहे.
किरण, महाविद्यालयातून आपल्या कथा कथनाद्वारे सादर करा. अनेकांना लेखनप्रेरणा मिळेल. लेखनाच्या शब्दांच्या साम्राज्यात अनेकानेक विषय आपली वाट पाहत आहेत. केवळ वयाच्या अधिकारानं आपणास आशीर्वाद देते. आपल्या पुस्तकास उदंड वाचक मिळोत ही मनापासून शुभेच्छा!
आपली
विजया वाड
मनाला भिडणाऱ्या कथा आणि विजयाताई यांची प्रस्तावना। छान योग जुळून आला
धन्यवाद!
संवेदनशील , सह्रुदयी अन तळमळीचे लेखक ….आपल्या ”कथा ‘ प्रवासास अनेक हार्दिक शुभेच्छा ???
धन्यवाद! कथासंग्रह जरूर वाचा.
खूपच छान मस्त.
धन्यवाद!
किरण सर , तुमचे पुस्तक लवकर आमच्या भेटीला आणा. आम्ही आतुरतेने वाट पहातोय
घरकोंडी (लॉकडाऊन) संपल्या संपल्या वाचायला मिळेल.