साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019
दहावी व बारावीच्या निकालासोबतच नीट, सीईटी परीक्षांच्या धर्तीवर राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चर्चिले जाणारे लातूर काही काळापासून शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तीमुळे चर्चेत आले आहे. शेतरानात ऊस, सोयाबीन, तूर आणि गावात शिक्षण व शिकवण्या वगळता इथे कोणतेही पीक पिकत नाही. सततचा दुष्काळ व पाणीटंचाई, अवर्षणप्रवण परिस्थिती, नेहमीचीच गारपीट व दळणवळणाच्या सुविधांअभावी इथे उद्योग व्यवसाय चालू शकत नाहीत. त्यामुळे साखर कारखानदारी, डाळ व तेलबिया प्रक्रिया उद्योगावरच अर्थकारण अवलंबून होते. त्यात साधारणत: चार दशकांपूर्वी शैक्षणिक पॅटर्नची व एक दशकापूर्वी खाजगी क्लासेसचा पॅटर्न निर्माण झाला. तो रुजला व अल्पावधित ‘हा वेलु गगनावरी…’ जाऊन भिडला. हा व्यवसाय इतका बहरला की, ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्राचा आधी व्यवसाय आणि अल्पावधीत धंदा झाला. त्याचसोबत या क्षेत्रात गुन्हेगारीकरण कधी घुसले याचा सुज्ञ-सुजाण लातूरकरांना अंदाजही आला नाही. काय आहे लातूर पॅटर्न? कोणी घडवला व कोणी बिघडवला शिक्षणाचा पॅटर्न? कसा बदलत गेला हा पॅटर्न?
गेली चार दशकं लातूर हा विविध क्षेत्रातील पॅटर्नसाठी राज्यात नावाजला गेला. कधी शेती-सहकार, राजकीय तर कधी शैक्षणिक पॅटर्नसाठी राज्याला लातूरची दखल घ्यावी लागते. अलीकडच्या पाच-सात वर्षात गारपीट, दुष्काळ, अवर्षण, रेल्वेने पाणी पुरवठा आदी कारणांनी चर्चेत आलेले लातूर शैक्षणिक क्षेत्रातील वेगळ्या वाटेवरच्या पॅटर्नमुळे बदनाम होऊ लागले आहे. गुणवत्तेची खाण म्हणून ओळखला जाणारा हा पॅटर्न रक्तरंजित खेळाने चिंतेचा विषय झाला आहे. खाजगी क्लासेस चालकाची निर्घृण हत्या, खाजगी क्लासेस चालकाचे अपहरण, खंडणी वसुलीसाठी मारहाण आदी अनिष्ट प्रकारांनी कहर माजवला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून अविनाश चव्हाण यांच्या हत्येने या व्यवसायातील भीषण स्पर्धा, क्लासेस चालकांतला संघर्ष, आर्थिक उलाढाल, गुंडाच्या टोळ्या, राजकीय पक्ष व पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गल्लीबोळात उगवलेल्या संघटनाचे लागेबांधे, पोलीस व प्रशासनाची हतबलता, प्रोटेक्शन मनी व तदनुषंगिक विषय चव्हाट्यावर आले. इथे मर्यादित प्रमाणात किरकोळ स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनाही नेहमीच घडत. शिक्षणाच्या क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा असली तरी या व्यावसायिक स्पर्धेत एखाद्याचा जीव घेतला जाईल अशी परिस्थिती कधीच नव्हती व कोणी कल्पनाही केली नव्हती. शिक्षण क्षेत्र व्यवसाय न राहता त्याही पलीकडे जाऊन धंदा झाला आणि गुणवत्ता व शिक्षणाचा इस्कोट होऊन गेला.
चार दशकांचा ‘लातूर पॅटर्न’
माधुरी देशमुख, राहुल कासराळीकर, दयानंद देशपांडे, रवि मंत्री, योगेश्वरी देशमुख, मिनाक्षी नलबले, शीतल शेरे, अफसर शेख, सचिन हराळीकर यांच्यासह अनेक गुणवंतांनी राज्याच्या व मराठवाडा विभागाच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकावत लातूर जिल्हा शिक्षणाबाबत मागास नसल्याचे सिद्ध केले. यातून शाहू पॅटर्न, दयानंद पॅटर्न, उदगीर पॅटर्न, अहमदपूर पॅटर्न निर्माण झाले. हे पॅटर्न म्हणजेच आजचा ‘लातूर पॅटर्न’ होय. 1980 ते नंतरच्या काळात राज्य सरकार व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून गुणवत्ता यादीची संकल्पना रद्दबातल ठरवली जाईपर्यंत लातूरचा विद्यार्थी राज्यात पहिला आला नाही असे अपवादानेच घडले असेल. या यशाचा विविध पद्धतीने लाभ करून घेण्यासाठी संबंधित महाविद्यालय व शिक्षण संस्थाचे संचालक त्या-त्या वेळी मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय नेते बोलावून खूप मोठ्या प्रमाणात कौतुकसोहळा साजरा करीत. प्रसिद्धीच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेणे, त्याचबरोबर तुकडी वाढ, शिक्षक मान्यता मिळवणे, अनुदान, सवलती पदरात पाडून घेणे, निधी मागणे आदी डाव किंवा उद्देश त्यामागे असायचा; जे की कधी कोणापासून लपून राहिले नव्हते.‘लातूर पॅटर्न’ सामूहिक यश
आज राज्यात जो लातूर पॅटर्न ओळखला जातो, ते या जिल्ह्याच्या शिक्षणक्षेत्रात तळमळीने काम करतात अशा सर्वांचे यश आहे. यामध्ये माजी कुलगुरु व राजर्षि शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जे. एम. वाघमारे, माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे, दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कन्हैय्यालाल पुरोहित, बसवेश्वर महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य मधुकर सितानगरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. ना. य. डोळे, प्रभुदेव स्वामी, अहमदपूरच्या म. गांधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व्ही. व्ही. ढोबळे, उदगीरचे व्यंकटराव देशपांडे व दिगंबरराव होळीकर आदी विद्यार्थीप्रिय शिक्षकांचे शिक्षणाप्रति समर्पण भावनेतून केलेल्या प्रयत्नाचे फलित आहे. तर डॉ. जे. एम. वाघमारे हे खर्या अर्थाने ‘शाहू पॅटर्न’चे जनक मानावे लागतील. मात्र बहुजन समाजातील या समर्पित शिक्षकांना याचे कधीही श्रेय मिळू देण्यात आले नाही. उपरोक्त शिक्षकांच्या काळात शिकवणी लावणे अतिशय लज्जास्पद बाब होती व 20 वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यात फक्त अन् फक्त इंग्रजी व गणिताचे आणि ते सुद्धा फक्त इयत्ता दहावीचेच विद्यार्थी शिकवणी लावत असत. हेही प्रमाण अतिशय नगण्य होते. त्याचबरोबर खाजगी शिकवणीला वेगळी उंची व दर्जा होता. जालनापूरकर, राजपूत, मांडे, बायस आदी मोजक्या खाजगी क्लासेसमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना मासिक 20 ते 25 रुपये मोबदल्यात लाखमोलाचे दर्जेदार शिक्षण मिळे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अत्यंत आपुलकीने शिकवले व जिव्हाळ्याने वागवले जाई. एकेकाळी शाळा-महाविद्यालयांनी निर्माण केलेला शैक्षणिक पॅटर्न आज खाजगी शिकवणीच्या अजगराने पूर्णतः गिळंकृत केला आहे.राज्याच्या शिक्षण क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’चा गवगवा झाला आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेच्या ओढीमुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा लोंढा लातूरकडे वाहू लागला. मग शिक्षण संस्थानीही हात धुऊन घेणे साधले. आधीच गुणवंत असलेल्या निवडक विद्यार्थ्यांसाठी खास वर्ग, ज्यादा वर्ग नेमून जातीने मार्गदर्शन केले जाऊ लागले. एरवी नियमितपणे 6-7 तास भरणारे वर्ग 10-12 तासांवर गेले. त्यात गणित, रसायन, जीव व भौतिक शास्त्रासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. डॉक्टर व इंजीनिअर होण्याचा ध्यास आणि पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादापायी शाळा-महाविद्यालये कारखान्यात परिवर्तीत झाली आणि सुरु झाले पोपटपंची विद्यार्थ्यांचे उत्पादन.
स्थानिक शिक्षकांची मर्यादा लक्षात घेता महाविद्यालयांनी अव्वाच्या सव्वा मोबदला देऊन निमंत्रित प्राध्यापक बोलावण्याचा प्रघात पाडला. नेट-सेट, एमफिल, पीएचडीधारक व त्याहून अधिक शिक्षण घेतलेले प्राध्यापक इतर राज्यातून येऊ लागले. इथे क्लासेस घेण्यासाठी आलेल्या आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू भागातील ‘गेस्ट लेक्चरर्स’नी इथल्या विद्यार्थी व पालकांची गुणवत्तेबाबतची मानसिक दुर्बलता ओळखून स्थानिकांची मदत घेत इथेच ‘दुकान’ लावले. दहा वर्षापूर्वी 4 ते 5 हजार रुपये आकारले जाणारे शुल्क विषयाला 25 ते 30 हजारावर गेले. त्यामुळे इथले शिक्षण महाग झाले. त्याचे पूर्णतः व्यावसायीकरण झाले. इतकेच नव्हे तर गेल्या काही काळात शिक्षणाचे बाजारीकरण होऊन गेले. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मर्यादा राहिली नाही की वसूल केल्या जाणार्या पैशाला. या प्रकाराला कोणी कसलाही विरोध दर्शवला नाही. त्यातच गरीब गुणवंत विद्यार्थी आणि त्याचा पालकवर्ग भरडून निघतोय. इथं ज्ञान दानापेक्षा पैसा महत्त्वाचा होऊन शुद्ध धंदा मांडला.
जीवघेणी स्पर्धा
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडे वाढलेला ओढा व टक्केवारीची स्पर्धा यातून लातूर पॅटर्नचा जन्म झाला व अल्पावधीत त्याचा राज्यात गवगवा झाल्याने क्लासेसचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले. साधारणतः 15-16 वर्षापूर्वी किरकोळ स्वरुपात चालवल्या जाणार्या क्लासेसचे जाहिरातीच्या माध्यमातून मार्केटिंग करून पालक व विद्यार्थ्यांना आकर्षित केले गेले. यासाठी खास तरतूद केली जाऊ लागली. या व्यवसायातली मूळ गुंतवणूक ही बौद्धिक आहे व त्यातून मिळणारा पैसा प्रचंड स्वरूपाचा आहे. नेमकी हीच बाब हेरुन पैशाच्या जोरावर शिक्षणाचा काडीमात्र संबंध व गंध नसलेला घटक क्लासेसकडे वळला आणि त्यातून सुरु झाली ती जीवघेणी स्पर्धा. शिक्षणासारख्या ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात बाह्यघटक घुसल्याने मनी आणि मसल पॉवरच्या माध्यमातून परस्सरांवर कुरघोडी केली जाऊ लागली. बाहेरील राज्यातून उच्चशिक्षित बेरोजगार शिक्षक आणून त्यांना योग्य मोबदला देऊन राबवले जाऊ लागले. जिकडे अधिक विद्यार्थी ते क्लासेस उत्तम दर्जाचे असा समज व प्रसिद्धी झाल्याने या क्षेत्रात स्पर्धा वाढली. या जीवघेण्या स्पर्धेतून लातूर पॅटर्नने वेगळे वळण घेतले. व्यावसायिक स्पर्धा व आकसाच्या परिणामी अविनाश चव्हाण यांचा मुडदा पाडला गेला व या एकमेव घटनेने लातूर पॅटर्न व पवित्र शिक्षण क्षेत्रास काळिमा फासला गेला.मुळात मयत अविनाश चव्हाणचा पिंड शिक्षणाचा नव्हता. तो स्वतः नाममात्र शिकलेला होता. कॉलेजचे तोंडही त्याने कधी पाहिलेले नव्हते पण त्याने या व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केला. अर्थकारण ओळखले. कसलेही श्रम न घेता कमी गुंतवणूक व अधिक नफा कसा मिळवावा याचे सूत्र त्याला सापडले होते. परिणामी त्याला अवघ्या तीन वर्षात अफाट यश मिळाले जे त्याच्याच जिवावर बेतले. त्याचा एकेकाळच्या व्यावसायिक भागीदार व मित्रानेच त्याचा ‘गेम’ केला. तो होता चंदनकुमार छोटेलाल शर्मा. मूळच्या हरयाणवी चंदनकुमारने शाहू महाविद्यालयात काही काळ काम केले. नंतर त्याला महाविद्यालयाने काढून टाकले. बेकार झालेल्या चंदनकुमारने काही वर्षांपूर्वी कुमार मॅथ्स क्लासेस सुरु केले. त्याला यश मिळत नव्हते. नंतर त्याने अविनाश चव्हाणची मदत घेऊन चांगलेच बस्तान बसवले. अविनाशने आपले संघटन कौशल्य वापरून क्लासेसकडे विद्यार्थी आकर्षित करून व्यवसाय यशस्वी केला. मात्र थोड्याच दिवसात आर्थिक वाद निर्माण झाल्याने ते वेगळे झाले.
तोपर्यंत अविनाशला क्लासेसचा ‘धंदा’ चांगलाच अवगत झाला. शाहू महाविद्यालयाच्या मेहेरबानीने आणखी एक बेरोजगार झालेल्या प्राध्यापकाला अविनाशने गाठले व तीन वर्षापूर्वी स्टेप बाय स्टेप केमिस्ट्री क्लासेस सुरु केले. लगेच भौतिक शास्त्र व गणिताचेही असे एकूण पाच क्लासेस सुरु केले. याशिवाय नांदेड येथेही क्लासेसचा घाट घातला. त्याचा शुभारंभ अविनाशच्या खुनाच्या घटनेच्या दिवशीच व्हायचा होता पण तत्पूर्वीच त्याचा क्लासेसच्या संघर्षातून खून केला गेला. या खुनाने खाजगी शिकवण्याचे बाजारीकरण, त्याला आलेले धंदेवाईक स्वरूप, व्यावसायिक संघर्ष, गुंडगिरी, पक्ष संघटना व राजकीय हस्तक्षेप, मनी अँड मसल पॉवरची काळी बाजू उजेडात आली.
लातूर पॅटर्नची पैसे मोजून प्रसिद्धी केली जाण्यापूर्वी गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांबाबत आस्था, सेवा व समर्पण भावातून विशिष्ट विषयांचे खाजगी मार्गदर्शन वर्ग चालायचे. सुरुवातीला सगळे कसे छान सुरु होते. खाजगी क्लासेस शिक्षणाचेच काम करीत होत्या व शिकवणारे शिक्षक हे सेवानिवृत्त किंवा गुणावत्ताधारक सुशिक्षित बेरोजगार स्थानिक तरुण होते. क्लासेसच्या शुल्कासाठी कसलीही आडकाठी वा अडवणूक नसायची. अनेक विद्यार्थी मोफत शिकत असत. या व्यवसायात काही चाणाक्ष लोक उतरले. पुढे उपरे आले, त्यांनी स्थानिक संघटना व गल्लीत मोतेगिरी करणार्यांची मदत घेण्यास सुरुवात केली. त्यातून पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन आणि वर्चस्व गाजवण्याची स्पर्धा लागली. नेमकी ही बाब हेरुन शिकवणीच्या धंद्यात अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला. त्यांच्याकडून ही व्यवस्था अक्षरशत्रू वर्गाकडे गेली व त्यांनी आपली वेगळी प्रतिमा बनवली. क्लासेसच्या माध्यमातून खुळखुळू लागलेला पैसा इतर धंद्यासोबत देवधर्म, समाजकार्य, राजकारणात गुंतवून ‘मसीहा’ बनण्याचा सोपा मार्ग अवलंबला. त्यातून वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्नही होता आणि मग हळूहळू परिस्थिती बिघडत गेली. यात खरी गोची झाली ती काही सेवाभावी शिक्षकांची. मनी व मसल पॉवरच्या जोरावर त्यांचा आवाज बंद केला गेला किंवा त्यांनाच आपल्या दावणीला बांधले गेले. मग बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर व्यवस्था हवी तशी वाकवण्याची स्पर्धा वाढली.
अनेक क्लास संचालक आर्थिकरित्या भक्कम झाले. आपल्या आर्थिक साम्राज्याला कवचकुंडल मिळावे यासाठी त्यांनी राजकीय पाठबळ मिळवले. कुत्र्याच्या छत्रीसारख्या फोफावलेल्या संघटना व त्यांना छुपा पाठिंबा असलेले राजकारणी लोकांना फंडिग करु लागले. राजकारणीही आर्थिक लाभ व वाढत्या पाठिंब्याने सुखावले. यातूनच लातूरातील अनेक संघटना या क्लास चालकाच्या पैशांतून निर्माण झाल्या. त्या संघटना संरक्षण पुरवू लागल्या. यातून अनेकवेळा क्लासेसच्या परिसरात दगडफेक, हाणामारी आणि गाड्यांची तोडफोड नित्यनियमाची झाली. याची माहिती पोलिसांना मिळत होती. मात्र राजकीय हस्तक्षेप व पैशाच्या जोरावर मिटविण्यात आले.
क्लासेसचे अर्थकारण
अविनाश चव्हाण याच्या हत्येने संबंध महाराष्ट्रात खाजगी शिकवणी वर्गाचे अर्थकारण चर्चेत आले. प्रसिद्धीमाध्यमांनी आपल्या कुवतीप्रमाणे आकडे दिले. वार्षिक हजार-बाराशे कोटी रूपयांच्या उलाढालीवर जणू सर्वांचे एकमत झाले. लातूरसारख्या एका छोट्या शहरात अब्जावधी रूपयांची वार्षिक उलाढाल होत असेल तर का नाही या व्यवसायाची भुरळ पडणार? कोणत्याही अनैतिक आणि बदनाम धंद्यापेक्षा या व्यवसायात प्रचंड पैसा आणि सोबत सुरक्षितता, प्रसिद्धी, ग्लॅमर, समाजसेवक म्हणून मान्यता मिळवून देणार्या खाजगी शिकवणी व्यवसायाच्या प्रेमात सगळेच पडले.क्लासेस चालकाचे अपहरण, खंडणीसाठी बांधून मारहाण व अविनाश चव्हाण याच्या हत्या प्रकरणाने खाजगी शिकवणी वर्गाचे अर्थकारण, व्यावसायिक स्पर्धा व इतर सार्या काळ्या बाजू उजेडात आल्या. त्यानंतर आजपर्यंत डोळ्यावर कातडे ओढून झोपलेले लोक, शिक्षणप्रेमी जाणकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राज्यकर्ते बोलू लागले. एक मात्र खरे की, अविनाश चव्हाणच्या खुनामुळे लातूर पॅटर्न, महाविद्यालये व खाजगी क्लासेसकडून सामूहिकरित्या होणारी बेबंद लूट, अर्थकारण, गुंडगिरी, राजकीय वरदहस्त उघडे पडले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ते शुद्ध धंदा असा प्रवास असलेल्या ‘लातूर पॅटर्न’ला कायमचा काळा डाग लागला.
सावधानतेची घंटा
गतवर्षीच्या अविनाश चव्हाण खून प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. लातूरकरांसाठी धोक्याचा अलार्म वाजवला आहे. यातून या व्यवसायाशी निगडित सर्व घटकांनी सावध होणे आवश्यक आहे. नसता एकीकडे पाण्याअभावी मोडून पडलेली शेती व त्या नैराश्यातून वाढत चाललेल्या आत्महत्या आणि दुसरीकडे अपप्रवृत्तीच्या शिरकावाने लातूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा भक्कम आधार बनलेली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि सुसंस्कृत, सभ्य लातूरकरांची वेगळी ओळख या जिल्ह्याला परवडणारे नाही.– विजयकुमार स्वामी
ज्येष्ठ पत्रकार, लातूर.
9822732929
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019