आचार्य अत्रे यांचा शक्तिमान विनोद

आचार्य अत्रे यांचा शक्तिमान विनोद

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019

आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. त्यांना ‘विनोदपीठाचे तिसरे शंकराचार्य’ म्हटले गेले असले तरी कोल्हटकर, गडकरी यांच्या विनोदाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. पूर्वसुरींचे ऋण त्यांनी घेतले होते, जरूर घेतले होते! पण ते त्या छायेत कायम राहिले नाहीत. याचे उत्तर अत्रे यांनीच दिले आहे. ते स्वतःला ‘जीवनाचा यात्रेकरू’ म्हणत असत. ही त्यांची यात्रा जशी आयुष्यभर संपन्न झाली तशी या दोघांना करता आलेली नाही. याचे कारण होते प्रकृतीभिन्नता.

कोल्हटकर, गडकरी यांचा विनोद झुळझुळता होता. काही अंशाने खळखळताही होता. याउलट अत्रे यांचा विनोद साक्षात धबधबा होता. तो नुसता वाहत नव्हता तर अक्षरशः कोसळत होता. त्यामुळे या दोन शंकराचार्यांपेक्षा अत्रे पूर्णतः वेगळे ठरतात ते जीवनदृष्टीमुळे आणि जीवन समृद्धीमुळे. कल्पनेचे पंख लावून जीवन शोधायचे असते हे अत्रे यांना अमान्य होते. त्यांची जी निष्ठा वारकरी यात्रेकरूची होती ती संपूर्णतः वेगळी होती.

अत्रे हे फक्त अत्रेच होते. ते संपन्न जीवन जगलेले होते. त्यांनी अफाट जग पाहिलेले होते. अखंड वाचन केलेले होते. त्यांच्यातील ‘मधुकर’ हा सतत जागता ठेवून त्यांनी साहित्यातील रस चोखला होता आणि विशेष हे की तो त्यांनी नुसता लोकाना दिला नव्हता तर तो उधळला होता. गडकरी हे त्यांचे श्रद्धास्थान होते पण म्हणून ते गडकरी मार्गाने गेले वा संस्कारित झाले असे कुठेही घडलेले नाही.
अत्रे यांना श्रेष्ठ कादंबरीकार र. वा. दिघे यांचे व गडकरी यांचे संबंध माहीत होते. किंबहुना दोघात एक प्रकारचे ‘भावबंधन’ही होते. त्या दोघांच्या कविता एकमेकांवर अवलंबून राहिलेल्या आहेत. या ठिकाणी ‘तो’ विषय नसल्याने आम्ही त्याबाबत बोलत नाही. मात्र राम गणेश गडकरी यांनीच र. वा. दिघे यांना ‘बालकवी’ संबोधले होते आणि त्यांचे छायाचित्रं काढले होते. ते छायाचित्र वितरित करण्याचे काम थोर नाटककार व महाडचे रहिवासी अण्णासाहेब कारखानीस यांनी केले होते.

आचार्य अत्रे यांना हे ‘भावबंधन’ चांगले माहीत असल्याने आपला ‘अप्रकाशित गडकरी’ हा ग्रंथ त्यांनी खोपोलीतील विहारी भागात राहिलेल्या दिघ्यांना मोठ्या आदराने अपर्ण केला होता. याच दिघ्यांना घेऊन अत्रे खंडाळ्याला जात असतं. ही घटना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे.

अत्रे यांचे लेखन अफाट होते पण त्याचबरोबर त्यांचे वाचनही अफाट नव्हे ‘प्रचंड’ होते. खंडाळ्याकडे जाताना ते पनवेलला एस. टी. स्टँडकडे जात असत. बुक स्टॉल बघत असत आणि एक एक म्हणता गाडीभर पुस्तके खरेदी करीत असत. ही खरेदी इतकी मोठी असे की आचार्य अत्रे यांना आपला देह संकुचित करून घ्यावा लागे. अफाट वाचन इतके केले की तसे अन्य कुणीही केले नसेल. ते एकाच विषयाचे नसे. असंख्य विषय त्यांच्या मनात येत आणि ‘पुस्तके पार’ केली जात. अत्रे यांच्यासारखा वाचक आम्ही तरी दुसरा पाहिलेला नाही. अपवाद फक्त पांडुरंग शास्त्री यांचा सांगता येईल. इतरांनी जे वाचन केले ते त्यांच्या मनातील ‘शल्य वा शत्रुत्व’ सिद्ध करण्यासाठी. अशा वाचनाला त्यातून ‘तयार’ झालेल्या लेखनाला संशोधक, बुद्धिवादी, व सामाजिक हे लेबल पुढे लागलेले आहे. अत्रे यांनी जे जे वाचले ते ते स्मरणात ठेवले आणि त्याच्या आधारे अंतरंगी वसत असलेला विनोद फुलवला. विनोद ही देखील त्यांची जीवननिष्ठा होती. ती त्यांनी साहित्यातून सतत वाहती ठेवली होती.

यात्रेकरू म्हटला की तो थोडाच एका ठिकाणी थांबणार? नाही. तो चालत राहणार, पाहत राहणार, दिपून जाणार तर प्रसंगी दुःखीही होणार. अत्रे यात्रेकरू म्हणून ‘चालते’ राहिले. त्यांनी जीवन समृद्ध करून घेतले आणि जे जे मनात आले ते ते जनात मुक्तपणे पेरले. राखीवता त्यांना अमान्य होती. देत राहणे, सांगत राहणे, लोकप्रबोधन करणे हा त्यांच्या प्रकृतीचा ‘छंद’ होता. असा कधी कोल्हटकरांनी लावून घेतला नाही की गडकर्‍यांनीही नाही. हे दोघेही त्या त्यांच्या काळाला बांधले होते. अत्रे यांचे तसे नव्हते. त्यातून अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही की अत्रे हे उत्तम शिक्षक होते.

त्यांच्यातला हा शिक्षक, ते ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या त्या क्षेत्रात त्यांच्याबरोबर होता. तो त्यांनी जागता ठेवला आणि त्याच्याच माध्यमातून विविध क्षेत्रे काबीज केली. शिक्षकाचे अध्यापनात नाते असते ते व्याकरणाशी. ‘नियमबद्धता म्हणजे जर व्याकरण’ म्हटले तर त्याचे तंतोतन पालन आचार्य अत्रे यांनी केले आहे. याच अत्र्यांनी कुणी कधीही न सांगितलेले असे विनोदाचे व्याकरण सांगितले आहे.
विनोद आणि विनोदकार हे दोन विषय अत्र्यांच्या त्या प्रचंड देहात कायमचे ठाण मांडून बसलेले होते. म्हणूनच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांच्या विनोदावर तीन-तीन दिवस ते बोललेले आहेत आणि या दोन विषयावर त्यांनी लिहिलेही आही. विनोदविषयक गैरसमज दूर करूनच त्यांनी ‘व्याकरण’ प्रतिपादले आहे.

अत्रे म्हणतात, विनोदी माणूस हा फुलपाखरासारखा असतो. तो एका फुलावरून दुसर्‍या फुलावर जातो. कधी रस चाखतो, कधी चाखत नाही. विनोदी माणूस वरकरणी जीवनाचा विचार करीत नाही असे दिसले तरी तसे समजणे चुकीचे आहे.

विनोदाच्या व्याकरणामागेही एक शास्त्र आहे, एक भूमिका आहे, एक सिद्धांत आहे. विनोदाचे नियम ठरलेले आहेत. हसणे म्हणजे विनोद नव्हे. विनोदाचा आस्वाद घेता आला पाहिजे. विनोद हा स्वतः वाईट नाही पण त्याचे नातेवाईक फार आहेत. वात्रटपणा, गावंढळपणा, चावटपणा, पांचटपणा, ग्राम्यता, अश्लीलता, बीभत्सपणा असे एकापेक्षा एक इरसाल असे त्याचे नातेवाईक आहेत. त्यामुळे लोकांचे गैरसमज होतात. विनोद म्हणजे चावटपणा नव्हे; विनोद म्हणजे गंमत नव्हे. दुःखाने भरलेल्या या विश्वात मानवाला मिळालेल्या विनोदाच्या महान देणगीमुळे तो जगत असतो. हास्य ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे व त्यावरच विनोदाची इमारत उभारली गेली आहे. विसंगती, जीवनातील विसंगती, विकृती यांच्याकडे दयाबुद्धीने जो पाहतो तो विनोदी असतो… विनोदाचा विषय दुःख हा आहे.

वास्तववादी जगातील दुःखे हा विनोदाचा विषय होऊ शकतो. पूर्वी भोगलेली दुःखे नंतर विनोदाचे ‘भांडवल’ ठरते. रंगभूमीवर जसा एक नट येऊन गेल्यावर दुसरा नट प्रवेश करतो तसा जीवनाच्या रंगभूमीवर एका बाजूने दुःख गेल्यावर दुसर्‍या बाजूने विनोदाचा प्रवेश होतो.
विनोद समजायला मनुष्य एका विशिष्ठ परिस्थितीत पाहिजे. वाटेल त्या परिस्थितीत माणूस विनोद ग्रहण करू शकत नाही. त्यासाठी विशिष्ठ परिस्थितीशी समरस व्हावे लागते. हा विनोदाचा व्याकरणातील पहिला सिद्धांत आहे.

विनोद कळण्यासाठी खेळकरपणा पाहिजे. खेळकरपणा येण्यासाठी तरुणपणा पाहिजे. तरुणपण हे वयावर, केसांच्या रंगावर अवलंबून नाही. आयुष्याला विटलेली माणसे विनोद समजू शकत नाहीत. अपेक्षाभंगाने विनोद निर्माण होतो. मूर्खपणा हाही विनोदाला भांडवल पुरवतो. शाब्दिक विनोदापेक्षा कल्पनानिष्ठ विनोद जास्त श्रेष्ठ आहे. परिस्थिती व स्वभाव यामुळेही विनोद निर्माण होतो.
विनोद हे रोज मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, शास्त्र आहे. विनोद ही वाङ्मयातील अहिंसा व शिव्या ही वाङ्मयातील हिंसा होय… विनोदाच्या तत्त्वज्ञानाने समाजातील कितीतरी व्यंगांवर टीका करता येते.

विनोद हा एक सामाजिक रस असून तो सर्व समाजात उघड करून दाखविता येतो. विनोद हा माणसाचे दोष दाखवतो. माणसाच्या दोषांसकट असलेला चांगुलपणा मान्य करतो. सुख व दुःख यांच्यातील सुवर्णमध्य साधतो. उच्च विनोद हा समाजातील उच्च संस्कृतीचा निदर्शक असतो. तो हिंसेचे व द्वेषाचे उदात्तीकरण करतो आणि प्रतिपक्षाला शस्त्रांऐवजी शब्दांनी चीत करतो. विनोद हा मानवतेवर प्रेम करणारा, हसता हसता प्रेम देणारा श्रेष्ठ प्रकार आहे आणि तो समाजाचा मोठा उपकारकर्ता आहे.

आचार्य अत्रे यांनी सांगितलेले हे व्याकरण आहे. या व्याकरणात शुद्धपणा आहे. गढूळपणा घालविण्याची शक्ती आहे. आचार्य अत्रे याच ‘व्याकरणा’शी आयुष्यभर बांधले गेले होते. मुख्य म्हणजे विनोद निर्माता हा चांगला रसिक असावा लागतो. तो सौंदर्याचा चाहता तर हवाच पण त्याने सौंदर्य फुलवायचेही असते. ते फुलवण्यातून आनंदाची निर्मिती करायची असते. जीवन शुद्ध करून घ्यायचे असते. विनोद हा सामाजिक रस असल्यामुळेच तो समाजात अधिक खुलतो आणि फुलतोही. हेच ‘इंगित’ अत्रे यांनी नेमके ओळखले होते. म्हणूनच विनोदी काव्य (विडंबन), चित्रपट, नाटक आणि व्याख्यान यातून त्यांच्यातल्या यात्रेकरुने मनसोक्त फिरून घेतले आहे. त्यांची लोकप्रियता किंवा अत्रे म्हणजे विनोद ही तयार झालेली व्याख्या पाहिली तर अत्रे डोळसपणे, सौंदर्य वृत्तीने, बालकाच्या कुतूहलाने आणि फुलपाखराच्या गतीने जीवनाकडे पाहत होते. रसिक मनाबरोबर म्हणूनच त्यांनी मनाचे तारुण्य कायम टिकवले होते. लोक त्यावरच आसक्त झाले होते. साहजिकच त्यांचा विनोद प्रिय झाला. फक्त त्यांचाच विनोद तळागाळापर्यंत पोहोचला. ‘जाम हशिवनारा मानूस’ ही अत्रे यांची तयार झालेली प्रतिमा होती. ते केवळ मध्यमवर्गात घोटाळत बसले नाहीत की त्या जीवनाचा अर्थ शोधत राहिले नाहीत. जीवन ते घटाघटा प्यायले आणि ते पितानाच त्यांनी विसंगतीकडे, कुरुपतेकडे, मूर्खपणाकडे आणि छन्दिष्टपणाकडे लक्ष वेधले. त्याच त्यांच्या वेधण्यातून त्यांचे साहित्य जन्माला आले आणि व्याख्यानातही त्याचेच नेहमी ठळक असे रूप व सौंदर्य प्रत्ययाला आले. मुख्य म्हणजे अत्रे रसिक होते. त्याच भावनेने ते जगाकडे डोळसपणे पाहत गेले. त्यांची सारी साहित्यसंपदाच समाजप्रेमातून निर्माण झाली आहे. त्याचे कारण विनोद हा सामाजिक रस आहे हे फक्त त्यांनाच ओळखता आले होते.

जीवनाचा जयजयकार करणे हाच या वारकरी यात्रेकरूचा जीवनधर्म होता. त्याने महत्त्व दिले ते माणसाला, माणसाच्या भल्याबुर्‍या प्रवृत्तीला आणि अधिक करून संस्कृतीच्या प्रतिष्ठेला. या गोष्टींना जिथे बाध आला व बांध घातला गेला तिथे त्यांनी विनोदाची गदा हाणली आणि अपप्रवृत्तीने जगणार्‍यांचा चेंदामेंदा केला. विशेषतः राजकीय जीवनात त्यांनी या गदेला विलक्षण महत्त्व दिले होते. त्यांनी विनोद ही एक शक्ती मानून भल्याभल्यांची भंबेरी उडवून दिली होती; तर त्याच माध्यमातून त्यांनी कित्येकांना हास्यास्पदही बनवले होते. ते इतके की त्यांना तोंड काढायला जागाही उरली नव्हती. ‘मराठा,’ ‘नवयुग’ ही दोन पत्रे अत्र्यांच्या हाती या काळात होती. राजकीय जीवनात त्यांच्या विनोदाला खरेखुरे गदेचे रूप आले आणि विनोदात केवढी मोठी शक्ती असते याचा मराठी माणसालाही चांगला प्रत्यय आला.
अत्रे हे एकाचवेळी पत्रकार होते, नाटककार होते, वक्ते होते, समीक्षक होते, दिग्दर्शक होते, विनोदकार होते. ते काय नव्हते? सर्व काही होते. त्यांच्या एकाच व्यक्तिमत्वात ही सारी रूपे एकवटून राहिली होती. विशेष हे की या सर्वांचेच एकमेकांशी घनिष्ठ नातेही होते. किंबहुना अन्योन्य असा संबंधही होता. एकातून दुसरे व दुसर्‍यातून तिसरे असे रूपदर्शन देत होते.

नाटककार म्हणून त्यांची कामगिरी जितकी व जशी महत्त्वाची तशीच पत्रकार म्हणूनही होती. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अत्रे ही शक्ती बनून गेली होती. या सर्वांचा पाया जो होता तो म्हणजे त्यांची रसिक वृत्ती. ही वृत्ती व मनात कायम दाटलेली भक्ती यांचा मनोज्ञ संगम ठायी ठायी दिसून येत होता. एकाच वेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आपल्या सर्व ताकदीनिशी उतरलेले अत्रे पत्रकारिता करतानाच विनोदावर तीन-तीन दिवस व्याख्यानेही देत होते. कोल्हटकरांवरची ती भाषणे ऐकण्याचे आम्हाला भाग्य लाभलेले आहे. विनोदी वक्ते हे त्यांचे रूप यावेळी आगळे-वेगळे जाणवले. त्याबरोबरच त्यांचा हजरजबाबीपणाही प्रत्ययाला आला.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं व्यासपीठ. व्यासपीठावर फक्त मांडून ठेवलेले होते ते एक टेबल. त्यावर पाण्याने भरलेला तांब्या होता. टेवलाजवळच खुर्ची होती. समोर अनेक साहित्यिक दाटीवाटीने बसले होते तर एका कोचावर मामा वरेरकर, अनंत काणे अशी मंडळी बसली होती. विंगेमधून अत्रे यांचा तो बलदंड देह दिसताच टाळ्यांचा कडकडाट झाला. अत्रे यांनी सभोवार आपली दृष्टी फेकली आणि जवळची खुर्ची ओढली. ते बसलेही. समोर बसलेल्या मामांना काही राहवले नाही. ते मोठ्याने म्हणाले, ‘‘वा बाबुराव! चेअरमन झालात.’’

अत्रेच ते. व्यासपीठावरून अत्रे म्हणाले, ‘‘मामा, तुम्ही कोचमन झालात, म्हणून मी चेअरमन झालो.’’

मामा गप्पच बसून राहिले. प्रतिपक्षाला गारद करण्याची ही ताकद त्यांच्या सर्वांगी विनोदात होती.

अत्रे उत्कृष्ट कवी होते. काव्य कसे लिहावे याचे ‘शिक्षण’ त्यांनी दोन महान कवींना दिले आहे. त्यात आहेत ग. दि. माडगुळकर आणि शांता शेळके. संस्कृतप्रचुर अशी त्यांची रचना होती. अत्रे यांनी सोपे गीत कसे लिहावे हे या दोघांनाही शिकवले होते. मराठीवर त्यांचे अतोनात प्रेम होते. त्यामुळे काव्यातही सोपेपणाबरोबऱ मराठीपण कसे यावे याचे दिग्दर्शन केले होते.

विडंबन क्षेत्रात अत्रे यांनी जी कामगिरी केली तशी त्यानंतर कोणालाही फारशी साधलेली नाही पण या विडंबनामागेही त्यांची दृष्टी ही निर्मळ होती. विडंबन ही एक विरोधी भक्ती आहे म्हणून त्यांनी एकेकाळी चमत्कार दाखवलेला आहे. तो दाखवताना विडंबन म्हणजे विटंबना नव्हे हेही सिद्ध केले आहे.

त्यांनी लिहिलेली नाटके ही दोन प्रकारची आहेत. काही गंभीर आहेत तर काही खळाळत्या विनोदाची आहेत. एकात ओतप्रोत भरलेले दुःख आहे तर दुसर्‍यात जीवनातले कारुण्य, दुःख त्यांनी हसण्यावारी नेले आहे. या दोन्ही नाट्य प्रकारात त्यांच्यातला समाजसुधारक आणि समाजाला शिकवणारा शिक्षक एकमेकांच्या हातात हात घालून उभे असलेले दिसतात. ही नाट्यलेखनाची व त्यात विनोद पेरण्याची त्यांची शक्ती ही अपूर्व होती. ‘साष्टांग नमस्कार’ मधील सूत्र घेऊनच त्यांनी पुढल्या काळात ‘तो मी नव्हेच’ लिहिले आहे. कारुण्यातून फुलवलेला त्यांचा विनोद लखोबाच्या रूपाने त्यांनी उभा केला आहे. त्यांच्या विनोदात जात्याच ही शक्ती होती ती म्हणजे हसवता हसवता रसिक प्रेक्षकाला अंतर्मुख करणारी. ही त्यांची ‘खास रीत’ मराठीतल्या कोणत्याही नाटककारला साधलेली नाही.

मो. ग. रांगणेकर यांनी सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’चे दिग्दर्शन केले होते. पुढे मात्र ‘लेखक श्रेष्ठ की दिग्दर्शक?’ हा एक वाद उभा राहिला. दोघात दरी निर्माण झाली. रांगणेकरांनी दिग्दर्शक श्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी त्याच विषयावर नाटक लिहिले. अत्र्यांना शह देण्यासाठी ते त्यांचे लेखन होते. ‘पतित एकदा पतित का सदा’ हे भलेमोठे नाव घेतलेले नाटक. विशेष म्हणजे रांगणेकरांच्या ‘त्या’ नाटकाचे मोजून तीन प्रयोग झाले आणि नाटकच अस्तंगत पावले. आचार्य अत्रे यांचे ते नाटक आजही रंगभूमीवर ठामपणे उभे आहे, नव्हे त्याचे हजारो प्रयोगही झाले आहेत. इथे नाटककर म्हणून अत्रे यांची शक्ती सिद्धही झाली आहे.

त्यांच्या सर्वच कलानिर्मितीमागे त्यांच्यातला सौंदर्यवादी कलाकार ठामपणे उभा आहे. मराठी मातीवर अपार भक्ती ठेवणार्‍या अत्र्यांच्या मनात सौंदर्याची नदी ही दुथडी भरून वाहत होती. तिच आनंदाची कारंजे उडवीत होती. धो धो हसायला लावीत होती.

अत्रे यांच्या विनोदावर आम्ही एक ग्रंथ लिहिला. ‘अत्रे विनोद व तत्वज्ञान!’ अत्र्यांच्या विनोदामागे सौंदर्यवादी तत्त्वज्ञान कसे उभे होते हे सिद्ध केले आहे. आम्ही तो ग्रंथ अत्रेकन्या शिरीष पै यांना पाठविला. त्यांनी त्यावर सुंदर अभिप्रायही दिला. त्यांनी म्हटले, ‘‘अत्रे हे सौंदर्यवादी होते हा धागा आपण कुठेही सोडलेला नाही. आचार्य अत्रे यांना तुम्ही न्याय दिला आहात.’’

अनेकांना न्याय मिळवून देणारे असे अत्रे होते त्या अत्र्यांना न्याय देणारे आम्ही कोण? मात्र एक गोष्ट खरी की समजायला व लिहायला येऊ लागल्यापासून आम्ही कायमच अत्रे भक्त राहिलो आहोत.

काव्य, नाटक, चित्रपट, लेखन, वक्तृत्व या सर्वातून अत्रे यांचा विनोद फुलत होता पण त्या विनोदाचा त्यांनी जो दांडपट्टा बनवला तो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात. त्यांचा हा सर्वव्यापी विनोद एकाच वेळी वक्तृत्वातून व पत्रकारितेतून नुसता दुमदुमत होता. त्याचा प्रभाव एवढा मोठा होता की विरोधकांना त्या विनोदशक्तीचे प्रचंड हादरे बसत होते. व्यक्तीपेक्षा वृत्तीवर अत्रे यांनी यावेळी सारा भर दिला होता. महाराष्ट्रावर पंडित नेहरू, मोरारजी, ढेबर, हिरे, स. का. पाटील या सर्वांनीच मोठा अन्याय केला होता. तो काळ ‘नेहरू बोले दळ हले’ असा होता. नेहरूंना विरोध करण्याची कुणाचीच हिम्मत नव्हती. अगदी यशवंतराव चव्हाणांची सुद्धा! हे सर्व नेते नेहरूप्रेमाने आंधळे झाले होते. म्हणूनच त्यांची प्रत्येक उक्ती व कृती अत्रे यांनी कमालीची हास्यास्पद बनवून टाकली आणि सत्य सर्वांपुढे उभे केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विनोद ही शक्ती आहे याचा सर्वांनाच प्रत्यय आला. त्यातून इतर विनोदी लेखकांप्रमाणे अत्रे केवळ लिहिते नव्हते. ते एकाच वेळी लिहिते व बोलते होते. इतर लेखक लिखित विनोद निर्माण करीत आले पण वाचिक नव्हे. अत्रे हे लेखकाबरोबरच गर्दीवर झेप घेणारे विनोदी लेखक होते. त्यांचा विनोद ही एक प्रकारची भीमगदा होती.

आंदोलनाच्या काळात जनतेला प्रचाराचे वादळ हवे होते. अत्रे यांच्या रुपात वादळ झाले. नाट्य, काव्य, विनोद, विडंबन, वक्तृत्व, वादविवाद अशा विविध क्षेत्रातील गुणांची गदा बनवून अत्रे भीमाप्रमाणे उभे ठाकले. आचार्य अत्रे तुकारामाच्या रोखठोक भाषेचे भक्त होते. तुकोबाच्या रोखठोक भाषेत अत्र्यांनी नाट्य ओतले, विनोद मिसळला आणि पत्रकारितेची अपूर्वाई महाराष्ट्राला अर्पण केली.
अत्रे यांच्या विनोदी वक्तृत्वाचे काही नमुने –

1. मुरारजी, ढेबर, नेहरू यांचे पूर्वज कधी लढले होते काय? यांना इतिहास नाही. म्हणून महाराष्ट्रावर हे ऐतिहासिक सूड घेण्याचे कारस्थान करीत होते… वर त्यांनी लोकशाहीचे तंत्र आरंभले. दार कमिशनने हे केले. ज.ब.प. रिपोर्ट आला. त्यांनी तेच केले. सगळा त्यांचा डोळा मुंबई शहरावर. मुंबई म्हणे तुम्हाला द्यायची नाही. काय झाले? नाही. म्हणे जगाची मुंबई. असे काय? सगळीच गावे जगाची. दिल्ली, मद्रास, कलकत्ता जगाची. तुम्ही आम्ही जगाचे. (हशा) मुंबई म्हणे कास्मोपॉलिटन, सर्वांची आहे. आमची आई सर्वांच्या मालकीची आहे. चांगला धंदा आहे. (हशा)

2. भाऊसाहेब हिरे म्हणाले, महाराष्ट्रासाठी प्राण देऊ. यशवंतराव चव्हाण त्यावेळी लंगोट नेसत. हल्ली नेसतात की नाही मला माहीत नाही. (हशा). लंगोट दाखवून शड्डू ठोकला. महाराष्ट्रासाठी लढेन. आम्हाला खरेच वाटले. (हशा) आम्ही साधी महाराष्ट्राची माणसे. झाले. यानंतर हे आमचे शंकरराव देव. यांची आठवण झाली की हसावे की रडावे हे कळत नाही. (हशा) हल्ली कुठे आहेत? कोणी म्हणतात काशीला गेले! पण काशीचे स्वास्थ्य अजून कसे बिघडले नाही? (हशा)

3. एक ऑगस्टला नेहरू पुण्यात गेले होते. का गेले होते? लोकमान्यांचे पवित्र स्मरण करण्यासाठी गेले होते. कुठे? पुण्याच्या रेस ग्राउंडवर. काय जागा शोधून काढली? (हशा) त्या रेसग्राउंडवर लोकमान्य हयातीत गेले नव्हते. जर आपण असलो रामनवमी करता सोनापुरात तर? ती सगळी माणसे राम म्हणतील तेथे. (हशा). अरे, ही काय जागा आहे? (हशा). कोणत्या गोष्टी कुठे करायच्यात याच्या जागा ठरलेल्या आहेत (हशा). त्यांना कळले पाहिजे…

4. महाराष्ट्राचा नाश करण्यासाठी हे द्विभाषिक आमच्यावर लादले. जे लोकसभेमध्ये दोनशे एक्केचाळीस सभासद आहेत, त्यांचे कौतुक आपण करावे. आम्हाला लोकसत्तेने न्याय दिला असता तर आम्ही केले असते. आज लोकसभेमध्ये नुसते हात वर करून ठरविले (हशा). अरे, आम्हाला विचारा. ही काय लोकशाही आहे? आमचे राज्य कसे असावे हे आम्हाला न विचारता ठरवतात? नुसते हात वर करून? (हशा)

नेहरूंनी सांगितले, हात वर करा, केले वर. (हशा) नेहरूंनी सांगितले पाय वर करा, नेहरूंनी सांगितले वर करा तरी करतील. (हशा)… नेहरू म्हणतात, ‘ईश्वरी शक्तीने हे काम केले.’ मी विचारतो, तुमचा ईश्वरी शक्तीवर विश्वास कधी बसला? (हशा) तुम्ही नास्तिक आहात!

5. एकदा एका कर्‍हाडच्या आमदाराने मुंबईच्या असेम्ब्लीमध्ये ठराव आणला होता, की लोकमान्यांची आणि शिवाजी महाराजांची सुटी द्यावी. तेव्हा बाळासाहेब खेर म्हणाले, आमची कॉंग्रेसची व्याख्या आहे महापुरुषांची. या महापुरुषांच्या व्याख्येच्या चौकटीत टिळक आणि शिवाजी महाराज बसत नाहीत. (शेम शेम) मी म्हणतो, मग तुम्ही बसता काय? (हशा) मग तुमची जिवंतपणी सुटी देऊन टाका. (हशा)
आचार्य अत्रे यांचा विनोद हा असा ठणठणीत होता. तो दगडासारखा भिरकावला जात होता आणि अचूक ठिकाणी तो पाडत होता. योग्य तो परिणामही करीत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अत्र्यांची तोफ धडधडत होती, शत्रूंची दाणादाण करीत होती, मुडदे पाडीत होती. मुरारजीने जे मुडदे पाडले ते वेगळे होते. त्यात हिंस्त्रता होती, क्रूरता होती आणि महाराष्ट्राबद्दलचा द्वेष होता. अत्रे यांचा विनोद कमालीचा आक्रमक होता पण त्यामागे द्वेष नव्हता. होती ती भावी महाराष्ट्राची भक्ती. अत्रे भक्तीने आणि युक्तीने जगत होते आणि जगता जगता जागवित होते.

पंडित नेहरूंना तर त्यांनी कमालीचे हास्यास्पद बनवले होते ते मराठीच्या प्राणप्रिय लढ्यात! पण म्हणून त्यांच्या मनात नेहरुंबद्दल आकस नव्हता. त्यांच्या विडंबनात जी विरोधी भक्ती होती तीच नेहरूंच्या बाबतीतली होती. त्या काळात नेहरुंबद्दल बोलायची कुणाची हिंमत नव्हती. अत्र्यांनी ती दाखवली होती. इतकेच काय, तेच नेहरू दिवंगत होताच अत्रे यांनी ‘मराठा’तून सुंदरशी अग्रलेखमाला लिहिली आणि ‘सूर्यास्त’ म्हणून पुस्तक प्रसिद्ध केले.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशदायी ठरला त्यात अत्रे यांचा सिंहाचा वाटा होता पण त्याबरोबर अनेक पत्रकारांचाही होता. नेते, मराठी शाहीर – अमरशेख, आत्माराम पाटील इ. आणि मराठी निष्ठावंत जनता यांच्या सामर्थ्यातून तो लढा यशस्वी झाला होता. राज्यकर्त्यांच्या मतलबी वृत्तीचा फुगा अत्रे यांनी विनोद माध्यमातून तेव्हाच फोडला होता आणि विनोद हे एक लढण्याचे शस्त्र बनते हे पहिल्यांदाच सिद्ध केले होते. इतर वेळी विनोद रंजन करतो पण अत्रे यांनी लढ्यात रंजनापेक्षा अंजनावर भर दिला होता. विनोदालाच त्यांनी झुंजार बनवले होते. राज्यकर्त्यांच्या मतलबी, ढोंगी व विश्वासघातकी प्रवृत्तीवर अत्रे यांनी यावेळी विनोदी गदा हाणली होती.

समाजसुधारणा, समाजप्रबोधन हेही विनोदाचे कार्य असते हा धडा कोल्हटकरांनी प्रथम गिरवला होता पण त्यांच्या कितीतरी पुढे जाऊन अत्रे यांनी मराठी विनोद अधिक बळकट केला होता. व्यंगदर्शन घडवण्यात अत्र्यांची पद्धत जी काही खास होती ती साष्टांग नमस्काराबरोबरच बुवा तेथे बाया व तो मी नव्हेच मधून प्रत्ययकारी ठरली. चित्रपटातील विनोद, नाटकातील विनोद हा अत्रे यांनी समाजाला सहज पचेल असा लिहिला व मांडला पण मराठा, नवयुग व वक्तृत्व यातून पुढे जो विनोद निर्माण केला तो लढण्याचे एक प्रभावी शास्त्र म्हणून. अत्रे हे लढवय्ये होते ही गोष्ट त्यांच्या शक्तिमान विनोदानेच सिद्ध केली आहे. असा प्रभावी विनोद ह्यापूर्वी कुणी केला नाही की त्यानंतर कुणाला करता आला नाही. त्याचे कारण गेल्या हजार वर्षात तो झाला नव्हता हेच काय ते सांगता येते.

– डॉ. माधव पोतदार
ज्येष्ठ साहित्यिक, पुणे.
020-24375454
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा