सावरकर समजून घ्या…!

सावरकर समजून घ्या...!

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019

16 जून 2019 रोजी स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या 31 व्या अखिल भारतीय स्वा. सावरकर साहित्य संमेलनात राष्ट्रीय निरूपणकार आणि वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केलेल्या भाषणाचा हा सारांश खास ‘चपराक’च्या
वाचकांसाठी

.

आलेल्या सर्व सावरकर प्रेमींचे मी मनापासून स्वागत करतो.
काल एक परिचित भेटले. ‘‘सावरकर संमेलन हे गांधी सभागृहात असणे हे वेगळेपण आहे ना?’’ असे सहज म्हणाले.

त्यांना म्हटले, ‘‘अहो, पण ते के. सी. गांधी सभागृहात आहे, एम. के. गांधी सभागृहात नव्हे! सध्या आपल्याला मिळालेले पंतप्रधान मुखात गांधी ठेवून सावरकर पथावरून मार्गक्रमणा करीत आहेत याला वेगळेपणा म्हणतात.’’ यावर हसून ते निघाले. अस्तु.
भारतीय राजकारणात अकारण अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व बनवून टीका केलेले लोकोत्तर व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय. रस्त्यातून हत्ती चालत असताना कुत्रे भुंकतात हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. ‘हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार’ अशासारख्या ओळी वाचलेल्या असतात. तथापि ते का भुंकतात ते समजून घेणे महत्त्वाचे ठरते. हत्ती चालताना साहजिकच त्या विशालकाय देहाकडे लक्ष जाणे स्वाभाविक असते. त्यामुळे लोकांचे लक्ष तिथे वेधले जाते. अशावेळी कुत्र्यांना असे वाटते की आम्ही पण इथे आहोत मग आमच्याकडे का बघितले जात नाही? या मत्सरापोटी लक्ष वेधून घेण्यासाठी ते भुंकत राहतात. त्यामुळे हत्तीचे काहीच बिघडत नाही आणि कुत्र्यांना कदाचित पेकाटात एखादी लाथ बसू शकते. सावरकर विरोधकांचे काहीसे तसे झालेले दिसते. त्यामुळे एका आक्षेपाला उत्तर दिले की त्यांचे दुसरा एखादा आक्षेप घेणे हा प्रकार चालू राहतो. यात त्यांना सावरकर समजून घ्यायचे नसतात तर आपणही ‘हुश्शार’ आहोत इतकेच दाखवायचा एक केविलवाणा प्रयत्न करायचा असतो. सध्या राजस्थानमधील कॉंग्रेसी सरकारने त्यांच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकातून सावरकरांच्या नावाआधी असलेली ‘वीर’ ही उपाधी हटवली. ही केविलवाणी आणि हास्यास्पद धडपड पाहून एक कथा आठवली.
एकदा एका गावठी डुकराने सिंहाला द्वंद्वाचे आव्हान दिले. त्याच्या वल्गना ऐकून कंटाळलेल्या सिंहाने डुकराचे आव्हान स्वीकारले. द्वंद्वापूर्वी डुक्कर गटारात लोळून, अंगाला मलमूत्र झोडपून द्वंद्वयुद्ध करण्यास गेले. डुकराच्या अंगाची दुर्गंधी असह्य होऊन व त्याच्यावर प्रहार केल्यास त्याची घाण आपल्याही अंगाला लागण्याच्या भीतीने काही क्षणातच सिंहाने पळ काढला. गावठी डुक्कर विजयोन्मादाने डुरकू लागले. त्यावर सिंह हसून लांबच राहून म्हणाला, ‘‘जा डुकरा जा. जगाला ओरडून सांग की मी सिंहाला सामन्यात पराजित केले! पण विद्वानांना माहीत असते सिंह हाच डुकरापेक्षा बलवान असतो.’’
गच्छ सूकर भद्रं ते वद सिंहो मया हृतः्।
पण्डिता एव जानन्ति सिंह सूकरयोर्बलम्॥
या टीकाकारांमुळे एक गोष्ट मात्र झाली, अनेकजण सावरकर वाचू लागले. मुळातून आपण ज्यावेळी पुस्तक वाचू लागतो त्यावेळी अनेक गोष्टी कळू लागतात. जळमटे झटकली जातात आणि आपण उत्तरे द्यायला सिद्ध होतो. मात्र यात एक धोका नेहमी संभवतो. जेवढे आपल्याला आवडते वा पटते तेवढेच केवळ वाचले आणि प्रचारले जाते. तसे न होता आपण जेव्हा समग्र वाचायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला एखादे व्यक्तिमत्व नीट उलगडत जाते.
यापुढे काही गोष्टी मांडतो आहे त्यातून अन्य अर्थ न काढता नीट समजून घेतल्यात तर पुढे अधिक फायदा होईल.
अप्रियस्यापी पथ्यस्य परिणामः सुखावहः।
वक्ता श्रोता च यत्रास्ति रमन्ते तत्र संपदः॥
अप्रिय पण हितकर बोलण्याचा परिणाम सुखावह ठरतो. ज्या ठिकाणी असे बोलणारा वक्ता आणि ते ऐकून त्याचे पालन करणारे श्रोते असतात त्या ठिकाणी ऐश्वर्य म्हणजे यश-कीर्ती, सुख, समृद्धी आणि आरोग्य यांचा वास असतो.
सावरकरांचे संपूर्ण जीवन संघर्षमय असल्याचे सतत जाणवत राहते. आज त्यांच्या आत्मार्पणाला अर्धशतकाहून अधिक काळ लोटला तरी समर्थक आणि विरोधकांचे त्यांच्याबद्दलचे आकर्षण कमी होत नाही. हिंदुत्त्वनिष्ठ म्हणविणार्‍या लोकात दोन गट आहेत. एक हिंदुत्त्वनिष्ठ आणि दुसरा हिंदुधर्मनिष्ठ. यात दुसर्‍या गटाचे लोक अत्यल्प आहेत. पहिल्या गटात जहाल आणि मवाळ असे दोन गट दिसतात. त्यात मवाळांना ‘सर्वांचे योग्य’ असे वाटत राहते तर जहालांपैकी कित्येकांना हिंदू धर्म वा धर्मतत्त्व अथवा इतिहासग्रंथ आदिंबद्दल विचारले तर अभ्यास नसल्याने त्यांची पंचाईत होते. त्यांच्यातही दोन गट दिसतात. एक हिंदू महासभावादी म्हणवणारे तर दुसरा गट हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाद्यांचा दिसतो. हिंदू महासभावाद्यांतही दोन गट दिसतात. एक सावरकरभक्त असलेला तर दुसरा नथुरामवादी गट होय. यापैकी अनेक नथुरामवाद्यांना आजही सावरकरांना गांधीहत्येबाबत सर्व काही ठाऊक होते आणि जणू त्यांची मूकसंमती होती असेही वाटते. यात आपण सावरकरांवर किती गंभीर आरोप लादून अन्याय करतोय हे त्यांच्या गावीही नसते. हे सर्व पाहिल्यावर आजही सावरकरांवर एकाप्रकारे अन्यायच सुरु आहे असे वाटते. यातही कित्येकदा काही सावरकरवाद्यांकडून परंपरावाद्यांवर अकारण टीकेची झोड उठवली जाते असेही दिसते. जर दोन्ही गटांचे लक्ष्य ‘प्रबळ हिंदू’ हे एकच असेल तर थोडाफार न पटणारा भाग सोडून देण्याइतका समन्वय आपण दाखवू शकत नाही का? याचा आज विचार करायला हवा. त्यातून काहीजण सावरकरांची विज्ञाननिष्ठा मांडून जणू ते नास्तिक होते असे दाखवायला जातात. त्यांनी ‘धर्म आणि सावरकर’ हा आमचे ज्येष्ठ स्नेही दुर्गेशजी परुळकर यांचा येत्या काही महिन्यात प्रकाशित होणारा ग्रंथ नक्की वाचावा. आम्ही त्यातील अनेक भाग आधीच वाचला आहे हे येथे स्पष्ट करतो. विज्ञानवादाची पूर्वअट नास्तिकता ही असते का याचाही विचार करायला हरकत नसावी.
सावरकरांच्या बुद्धीवादाबद्दलही काहीजण विचारतात. त्यांना आमचे सावरकर अभ्यासक असलेले मित्र चंद्रशेखर साने यांच्या शब्दात उत्तर देतो. अत्यंत विचारपूर्वक असे हे विश्‍लेषण आहे. ते म्हणतात, दीवार या गाजलेल्या हिंदी सिनेमामध्ये, देवळात देवदर्शनाला जाण्याचे तर दूरच पण केवळ देवळातला प्रसाद खाण्यासही नकार देणारा नास्तिक अमिताभ बच्चन, 786 नंबरच्या बिल्ल्यावर मात्र श्रद्धा ठेवतो, त्या बिल्ल्यामुळेच अनेकदा संकटातून वाचतो आणि शेवटी बिल्ला हातून हरवल्याने मरतो.
संपूर्ण हिंदू वातावरणात वाढलेला हिरो ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ या ओळी पुढे ‘अल्ला अल्ला इन्कार तेरा’ सहजपणे म्हणतो आणि 80 टक्के हिंदुंना यातील विसंगती वर्षानुवर्षे खटकत नाहीत.
अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
धार्मिक हिंदू मानसिकता अशी भोळीभाबडी असल्याने सावरकरांच्या बुद्धिवादाचा जास्त प्रसार करण्याच्या भानगडीत मी पडत नाही. त्यासाठी ही योग्य वेळ आहे असे मला वाटत नाही.
माझ्या मताने श्रद्धा ही माणसाची गरज आहे. जर हिंदू श्रद्धा नष्ट केल्या तर निर्माण होणारा, होणारी पोकळी वरील अमिताभ बच्चनच्या उदाहरणातील घटनेप्रमाणे अन्य धर्मियांच्या श्रद्धा भरून काढतील.
त्यामुळे जोपर्यंत हिंदू या मानसिकतेतून बाहेर येत नाही तोपर्यंत निरुपद्रवी श्रद्धांना दुर्लक्षित करणे हाच हिंदुत्त्ववाद्यांचा मार्ग असला पाहिजे. सावरकरवादातील आधी हिंदूसंघटन, हिंदुबंधुत्व अर्थात हिंदुराष्ट्रवाद आणि नंतर व्यक्तीसापेक्ष बुद्धिवाद हा माझा मी निवडलेला क्रम आहे.
दुसरा भाग म्हणजे श्रद्धावान राहणे, बुद्धिवादी होणे किंवा नास्तिक होणे वा आस्तिक असणे हे सर्व माणसाच्या वैयक्तिक निवडीचे विषय आहेत. त्यात जास्त ढवळाढवळ करायला मला स्वतःला आवडत नाही. मी स्वतः फारसा श्रद्धावान नसल्याने मला एक प्रकारची मानसिक पोकळी जाणवत राहते. श्रद्धाहीन अवस्थेशी झुंजणे हे प्रत्येकाच्या क्षमतेवर अवलंबून असते. म्हणून मी हा विषय वैयक्तिक पात्रापात्रतेवर सोडून देतो.
हानिकारक असलेल्या विकृत श्रद्धांसाठी मात्र कायद्याचा पुरेपूर, योग्य तो वापर केला गेलाच पाहिजे पण उगाचच रोज उठून हिंदुंच्या देव-देवता, साधी सोपी निसर्गाला अनुकूल अशी व्रतवैकल्ये, चांगले कालसुसंगत अर्थ काढता येतील अशा पुराणकथा यांच्यावर हल्ले चढवत बसायचे आणि स्वतःच्या बुद्धिवादाची शेखी मिरवायची यात मला कसलाही रस नाही.
सानेंचे म्हणणे जाणून घेतले तर सावरकर मांडताना काय काळजी घ्यायला हवी ते पुरेसे स्पष्ट होते.
अधिक स्पष्ट होण्यासाठी श्रद्धेचे तीन प्रकार समजून घेऊ. सात्विक, राजस आणि तामसी असे तीन प्रकार श्रद्धेत मोडतात. पहिल्या प्रकारात परोपकार, स्वार्थत्याग हे अनुस्यूत आहेत. याचे उत्तर कोणत्याही बुद्धिवादाने देता येणार नाही. भूक असूनही जेव्हा मी माझ्या ताटातील अर्धी पोळी अन्य भुकेल्या व्यक्तीला देतो तेव्हा एक पुण्यकारक समाधानाची भावना माझ्या मनात नकळत निर्माण होते, ही सात्विक श्रद्धा होय. खरे तर माझ्या मिळकतीतून प्राप्त झालेली ती पोळी मीच खाणे आणि त्यायोगे माझे पोट भरणे हे बुद्धिवादाच्या दृष्टिने योग्य असेल पण तरीही एका अनावर श्रद्धेमुळे मी ती दुसर्‍याला देतो हा विचार आपल्या धर्मात सांगितला आहे. लोकासाठी धर्मशाळा अथवा पाणपोया बांधणे हे अधिक पुण्यकारक मानले गेले आहे. ही सात्विक श्रद्धा आजही असल्यामुळे मानवी जीवनाचा गाडा सुरु आहे.
दुसरी श्रद्धा म्हणजे राजस श्रद्धा होय! यामध्ये स्वतःला प्रत्यक्षपणे हानी पोचण्याची शक्यताही असते. उदाहरणार्थ देशासाठी सीमेवर जाऊन लढणे! किंवा देशासाठी, देश स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास पत्करणे. यात कठोर शिक्षा मिळणे, हौतात्म्य आदी गोष्टी ज्या व्यक्तिशः हानिकारक ठरतील हे बिुद्धवादाने माहीत असते पण तरीही त्या सामाजिक आणि सामूहिक उपयोगाच्या असल्याने उपकारकही आहेत. त्यांना राजस श्रद्धा असे म्हणता येईल. ब्रिटिशांशी सर्वस्व पणाला लावून जे सशस्त्र क्रांतिकारक किंवा अहिंसक देशभक्त लढले त्यांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आयुष्याचा होम केला ती राजस श्रद्धा होय. तीसुद्धा जगन्मान्य अशी उपकारक श्रद्धा आहे.
तिसरी श्रद्धा म्हणजे तामसी श्रद्धा! ही स्वतःला किंवा इतरांच्या जिवाला हानिकारक आणि कार्यकारणभावाचाही अभाव असलेली अशी असते. जी दुसर्‍यांचा बळी घेते, पशूंचा बळी घेते, स्वतःलाही कधी कधी हानी करून घेते, चाकू मारून घेते किंवा हानिकारक पद्धतीने नवस फेडणे स्वतःला किंवा अन्य कोणाला दुखापत होईल असे वर्तन करणे या सर्वांचा यात समावेश आहे. अशा विकृत श्रद्धांविरुद्ध समाजाची खरी लढाई असते किंवा असली पाहिजे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हिंदू जनमानसात सर्वमान्य न होण्याचे कारण त्यांचा प्रखर बुद्धिवाद आहे असा सर्वसाधारणपणेएक समज आहे. तो काही प्रमाणात सत्य मानला तरी ते अर्धसत्य समजायला हवे. खरे तर त्यांचे ‘जशास तसे’ अथवा ‘सूडाचे कठोरतम तत्त्वज्ञान’ हिंदू मनाला चटकन पटत नाहीत हे कारण आहे. सूड आणि द्वेष हे दोन व्यक्तिगत स्तरावर दुर्गुण असून राष्ट्रीय स्तरावर सद्गुण आहेत याची विस्मृती आपणाला झाली आहे. आपण नेमके उलट करतो. व्यक्तिगत पातळीवर कुणाचा तरी द्वेष करणे वा कुणाला तरी धडा शिकवायला उद्युक्त होणे या गोष्टी आपण करीत असतो. तथापि राष्ट्राचा अपमान झाल्यामुळे आपल्या जाणीवा पेटून उठत नाहीत. तशा असत्या तर फाळणीच्या काळातील जखमांचा प्रतिशोध घेतला गेला असता. दुबळेपणाला जगात स्थान नसते. एकदा तुम्ही जगाच्या दृष्टिने सबल ठरलात की शांतीचे जपमाळ तुमच्या हाती शोभून दिसेल हेच सावरकरांचे सांगणे होते. ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ यावर त्यांचा विश्वास होता. ही टर्म जरी निसर्गानुकुलतेसाठी उपयोगात आणली गेली असली तरी सावरकर तिचा उपयोग राष्ट्रसबलतेसाठी करीत होते. दुबळेपणाला जगात स्थान नसते ही गोष्ट ते ओळखून होते. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर ते सहा सोनेरी पाने या ग्रंथांपर्यंत ते सतत आपली निष्ठा प्रतिपादित होते.
त्यांनी आपली बुद्धिवादी मते अति तीव्रपणे न मांडता आणि जनसामान्यांच्या मनातील श्रद्धांना धक्का न लावता मांडली असती तर कदाचित त्यांच्याबद्दलचे जे अपसमज विरोधक पसरवू पाहत आहेत त्याला आपसूक आळा बसला असता असे वाटते. आगीचे अथवा कडाडणार्‍या विजेचे आकर्षण वाटले म्हणून कोणी त्यांची गळाभेट घ्यायला जात नसते. कारण तसे करू जाता आपणच जळून जाऊ याची एक नैसर्गिक जाणीव सामान्य मानवाला असते. अर्थात लोकप्रियतेची चिंता न करता एखाद्या नेत्याने आपली तीव्र मते स्पष्ट शब्दात मांडणे ही गोष्ट अभिनंदनीय आहे यात शंकाच नाही. तथापि अनुयायी मिळविण्याच्या दृष्टिने विचार करू जाता अनुकरणीय नाही असे म्हणावे लागेल. हे एक कारण त्यांच्यावर सतत होणार्‍या टीकेत दडले आहे हे येथे लक्षात घ्यावे लागेल. बहुमान्यता अथवा सर्वमान्यता मिळणे सोपे नसते.
सावरकर हे शक्तीपूजक होते तर सर्वसामान्य हिंदू हा शांतिपूजक असतो. त्याला सुडाचे वा जशास तसे उत्तर देण्याचे तत्त्वज्ञान नकोसे वाटते. दया, क्षमा, शांती, संतत्वहे त्याला अधिक जवळचे वाटते. इतिहासातील वीर पुरुषांच्या पराक्रमाच्या गाथांमध्ये तो रमतो पण आज तशी वेळ आली तर संघर्षापेक्षा सहकार्य करायला हात पुढे करेल अशी स्थिती आहे.
तथापि संपूर्ण शक्तीप्रधान अथवा संपूर्ण शांतीप्रधान तत्त्वज्ञान जगात निश्चितपणे टिकू शकत नाही. हिंदू समाज हा इतिहासात आणि आत्ता वर्तमानातही टोकाचा शांतीप्रधान बनताना दिसतो आहे. कालांतराने असा समाज नष्ट होऊ शकतो या चिंतेतूनच सावरकरांनी शक्तीप्रधान हिंदू समाजाची कल्पना अधिक जोरदारपणे मांडली असणार असे निश्चितपणे म्हणता येते. त्यासाठी ते उदाहरणादाखल अवताराचा उपयोगही करतात. देवाचे गुण भक्तात उतरतात असे म्हणतात. गायीला देव मानता मानता आणि गायीची पूजा करता करता हिंदुंचे राष्ट्रच्या राष्ट्र गाय होऊन गेले आहे. त्याने दाती तृण धरले आहे. आता जर कोणाच्या पायावर आपले हिंदुत्त्व उभारायचे असेल तर ते सिंहाच्या पायावर उभारायला हवे. मदोन्मत्त दिग्गजांची गंडस्थाने एका झेपेसरशी फोडून पाडून टाकणारी क्रकच तीक्ष्ण नखरे ज्याची आहेत तो नृसिंह आता पुजायला हवा.
अर्थात सावरकरांच्या काळातील हिंदू समाज आता बराच बदलला आहे. त्यामुळे आता निव्वळ शांती वा शक्तीप्रधानतेऐवजी या दोहोंचा सुवर्णमध्य साधणे हे जास्त महत्त्वाचे झाले आहे.
प्रत्येक राष्ट्रपुरुष हा त्या काळाशी सुसंगत असतो पण म्हणून त्याचे प्रत्येक वाक्य हे ब्रह्मवाक्य मानणे म्हणजे भक्तीची परिसीमा झाली. खुद्द सावरकरांना हे अपेक्षित नाही. कोणत्या काळात आणि कोणत्या प्रसंगात, कोणी आणि काय भूमिका घेतली व ती का घेतली याचा सुसंगत अभ्यास करून आजच्या काळातील उत्तरे शोधावी लागतात. तसे केले तर कोणत्याही राष्ट्रपुरुषाचे एका विशिष्ट काळात मांडलेले अत्यंत सुसंगत मत हेच कदाचित पुढच्या काळात विसंगत ठरू शकते, याचा साकल्याने विचार करून आपण पुढे जायचे असते. गांधी, सावरकर अथवा मार्क्स यांच्या विचारातच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात असे मानणे हा निखळ भाबडेपणा ठरेल.
सावरकरांची व्यक्ती, कार्य, विचार आणि चरित्र अशा अनेकविध अंगांनी खूप चांगली आणि तटस्थ चिकित्सा करायला कोणाची ना नाही किंबहुना अनेक सावरकर अभ्यासक आज ती उत्तम करू शकतात. तथापि सावरकरांविषयी सध्या अनेक माध्यमातून चालू असलेला अतिरेकी अप्रामाणिकपणा, बदनामीची मोहीम, अत्यंत गलिच्छ आणि निंद्य आरोप यांची उडणारी राळ या गोष्टी अशा चिकित्सेपासून रोखतात हे सत्य आहे. कारण पूर्वी असे चिकित्सक लेखन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर – एक रहस्य’ नामक ग्रंथातून द. न. गोखले यांनी केले होते. मात्र पुढे त्या पुस्तकाचा काहींनी गैरवापर केला असल्याचे दिसते. त्यामुळे आजच्या चिकित्सकांना आपल्या लेखनाचाही पुढेमागे असाच वापर करून त्यातून अपसमज पसरवला जाण्याची साधार आणि स्वाभाविक भीती वाटत असावी. ज्यांना सावरकर समजून घ्यायचे असतील त्यांनी प्रथम माझी जन्मठेप, यानंतर शि. ल. करंदीकर आणि धनंजय कीर लिखित सावरकर चरित्र, वि. श्री. जोशी लिखित त्रिखंडी आणि बाळाराव सावरकर लिखित चार खंडी सावरकर चरित्र वाचावे. त्यानंतर द. न. गोखले वाचून झाल्यावर प्रा. शेषराव मोरे यांनी लिहिलेली चार पुस्तके आवर्जून वाचावीत. या पुस्तकांशिवाय सावरकर कळणे कठीण आहे. हा पायाभूत अभ्यास झाल्यावर सावरकरांवर लिहिलेली अन्य लेखकांची पुस्तके खुशाल वाचावीत. अगदी टीकाकारांची सुद्धा. पाया पक्का झाल्यावर त्यांना उत्तरे सहज देता येऊ शकतात.
आपल्या जीवनाचा उद्देश सांगताना जो माणूस
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले,
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले
तू तेचि अर्पिली नवकविता रसाला,
लेखांप्रती विषय तूच अनन्य झाला
असे सांगतो, त्याच्यावर निरर्गल आरोप करणार्‍यांना जनाची नाही तरी किमान मनाची तरी शरम वाटायला हवी. सावरकरांची वाक्ये संदर्भ सोडून अथवा अर्धवट तोडून आपल्याला हवी तशी मांडत वैचारिक लबाड्या करणार्‍यांना डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजराची उपमा शोभून दिसावी. तुम्ही डोळे मिटले तरी जग तुम्हाला पाहत असते हे अशांच्या गावीही नसते किंवा ठराविक अजेंडा रेटून त्यांना तोच राबवायचा असतो. ज्या माणसाने आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून केवळ देशबांधवांची चिंता केली त्यांच्या एक सहस्रांश तरी आपले कार्य आहे का? याचा विचार असा क्षुद्र स्वार्थ साधू पाहणारे कसा करतील? अशांचा समाचार प्रा. शेषराव मोरे यांनी ‘सावरकरांचे समाजकार्य-सत्य आणि विपर्यास’ या ग्रंथात घेतला आहे.
प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या संगमाच्या जोडीला क्रांतिकार्याची अपूर्व जोड असलेल्या विलक्षण तेजोमयी क्रांतिकारकाच्या अंदमानी शिक्षेच्या बुटात अशा लोकानी एकदा तरी आपला पाय घालून पहावा. त्या भयानक शिक्षेच्या काळातही एकीकडे शारीरिक यातना भोगत असताना तरल मानसिकता शिल्लक राहणे आणि त्यातून प्रतिकूल परिस्थितीतही काव्य निर्माण होणे हेच मुळात अपूर्व नव्हे काय? आजच्या युवकांनी प्रतिकूलतेतूनही खचून न जाता अनुकुलता प्राप्त होईपर्यंत प्रयत्नांची कास सोडायची नाही हा धडा यातून घेतला तरी त्यांचे भविष्य उजळून निघेल. संकटाचे संधीत रुपांतर करण्याची किमया सावरकर चरित्रातून मिळते. रत्नागिरी स्थानबद्धतेत त्यांनी राजकीय हालचालींवर असलेल्या बंदीचे रुपांतर समाजकारणात करून केलेले जातीभेद निर्मूलन आणि भाषाशुद्धीचे कार्य पाहिले तर संकटांचे पहाड कोसळले तरी कर्तृत्ववान व्यक्ती त्याचे रडगाणे न गाता नवीन संधी शोधून कशी मार्गक्रमणा करतात याचे मार्गदर्शन सहज मिळेल. ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिन्ता प्रवर्तते’, या ठाम समजुतीमुळे त्यांनी सदैव राष्ट्राची सुरक्षितता प्रतिपादिली.
सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडचे आयुष्य ते जगल्यामुळे आपल्याला अनाकलनीय वाटत असतील तर दोष त्यांचा नसून आपला आहे. क्रांतिकारक, पत्रकार, नाटककार, कवी, पक्षाध्यक्ष, लेखक, इतिहासकार, साहसी, हिंदूसंघटक, समाजसेवक, विचारवंत आदी अनेक रूपे त्यांच्यात एकवटल्यामुळे सावरकर म्हणजे एका मानवी शरीरात असणारे अनेक अवतार वाटतात.
हुतात्मा भगतसिंग म्हणतात, वीर सावरकर म्हणजे विश्वप्रेमाच्या लाटांवरून चालत आपल्या पायाखाली गवताची कोवळी काडीही चिरडली जाऊ नये म्हणून काळजी घेणारा महान क्रांतिकारक.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मानवतावाद आणि विश्ववाद आजचे कोणी विरोधक सांगतात का? सावरकर म्हणतात, मनुष्यजातीवर प्रेम करा! स्वदेश हा तुमचा पाळणा आहे व मनुष्यजाती ही तुमची माता आहे. तिच्यावर प्रेम केल्याशिवाय तुम्ही त्या पाळण्यातील आपल्या बंधूंवर प्रेम करावयास शिकणार नाही. आल्पस्च्या पलीकडे व समुद्राच्या पलीकडे इतर राष्ट्रे गुलामगिरीतून सुटण्यासाठी धडपडत आहेत! त्यांनाही तुम्ही याच दृष्टिने शक्य तेव्हा मदत करा. भूतदया ठेवा व तरूणांनो, ध्येयावर अत्यंत प्रेम करून त्याला पूज्य माना. तात्विक ध्येयासाठी स्वार्थत्याग करा. दुःखाला कंटाळू नका, संकटांना त्रासू नका. आयुष्य हे सुख नाही तर आयुष्य हे कर्तव्य आहे.
अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांच्या अनुज्ञेने काही ठराव मांडण्याची माझी इच्छा आहे. आपण हात वर करून अनुमोदन द्यावेत अशी माझी प्रार्थना आहे.
1. स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ विनाविलंब देण्यात यावे.
2. पोर्ट ब्लेअरला ‘वीर सावरकर नगर’ असे नाव देण्यात यावे.
3. स्वा. सावरकरांचे लंडन येथील निवासस्थान केंद्र वा राज्य सरकारने ताब्यात घेऊन तिथे स्मारक निर्माण करावे.
4. ‘जयोस्तुते’सारखे मंगलगीत शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत करावे.
5. शालेय अभ्यासक्रमात किमान एक वर्ष सैनिकी शिक्षण अनिवार्य करावे.
6. राष्ट्रपुरुषांचीआणि क्रांतीवीरांची कोणत्याही माध्यमातून होणारी बदनामी बंद व्हावी.
7. राजस्थान राज्य सरकारने सावरकरांच्या नावाने विपर्यस्त माहिती इतिहास पुस्तकात प्रकाशित केली आहे आणि वीर ही उपाधी काढली आहे त्याबद्दल तसेच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने खोडसाळपणा करून ऐन सावरकर जयंतीच्या दिवशी ‘सावरकर नायक की खलनायक?’ या अवमानास्पद शीर्षकाचा चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता व त्याबद्दल अद्याप स्पष्ट क्षमा मागितली नाही. या दोघांचा निषेध.
सावरकर या विषयावर खूप काही बोलण्यासारखे आहे. त्यांच्यावरील आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी तरुणांनी मुळातून सावरकर समजून घेण्याची आवश्यकता आहे. वर बोलताना अनेक पुस्तकांचा उल्लेख केला त्यात भर म्हणून आमचे ‘….आणि सावरकर!’ व दुर्गेश परुळकरांसमवेत लिहिलेले ‘स्वा.सावरकर-ज्ञात आणि अज्ञात’ ही पुस्तके वाचावीत. त्याचप्रमाणे अक्षय जोग यांचे ‘सावरकर-आक्षेप आणि खंडन’ हे पुस्तक अवश्य वाचावे.
दिवसभरात होणारे कार्यक्रम लक्षात घेता येथेच थांबतो. सायंकाळी समारोपात पुन्हा येतो आहेच. तोवर भरगच्च संख्येने उपस्थिती लावलेल्या आपणा सर्व सावरकर प्रेमींना नमस्कार करतो.
वंदे मातरम्!
– डॉ. सच्चिदानंद शेवडे
राष्ट्रीय निरुपणकार, डोंबिवली.
8080121704
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “सावरकर समजून घ्या…!”

  1. Vinod s.Panchbhai

    ज्ञानवर्धक व माहितीपूर्ण लेख

  2. स्मिता आपटे

    काळाच्या खूप पुढे असलेले सावरकर आजही लोकांना झेपत नाहीत.त्यांचे विचार आजसुद्धा कालबाह्य झालेले नाहीत यातच सगळे आले.खूप सुंदर लेख..

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा