मागच्या काही वर्षापासून माझे बाबा सतत सुचवताहेत की, ‘‘ताई, वयाच्या या टप्प्यावर तू आता एखादा गुरू कर!’’
त्यांचं मन राखण्यासाठी मी त्यांना ‘हो’ म्हणत वेळ मारून नेते; पण मग विचार करत राहते की, खरं तर आई ही मुलाचा पहिला गुरू असते मात्र त्यानंतर सांगायचं तर माझा सुपुत्र श्रीहरी हाच माझा गुरू आहे. त्यानंच मला खरं जगणं शिकवलं, आयुष्याचा सुदंर अर्थ दाखवून दिला. फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच आज मी इतकं मोठं शिवधनुष्य पेलण्याचं धाडस करू शकले.
कोणे एके काळी आपलंही एक चाकोरीबद्ध पण सुदंर, सहज, साधं, सोपं आयुष्य चालू होतं. जगलोच असतो चारचौघांसारखं कुठल्यातरी शहराच्या एखाद्या काना-कोपर्यात! पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. विधात्याला काहीतरी वेगळ्याच, अद्भूत कामासाठी आम्हाला तयार करायचं होतं. त्याचा आरंभ म्हणूनच आयुष्यात श्रीहरी नामक गुरूचा शिरकाव झाला. पौराणिक कथेमध्ये माता अनसूयेच्या पोटी जसा श्री दत्तगुरूंचा जन्म झाला तसाच माझ्या पोटी श्रीहरीचा जन्म झाला अन् सारं आयुष्य मग चैतन्यमय झालं.
चांगला जीवनसाथी, छानसं गोंडस निरोगी मूल हेच स्वप्न असतं प्रत्येक सामान्य विवाहितेचं! पण कदाचित तुमचं क्षितिज भव्य करायच्या हेतूनंच की काय पण त्याच्या स्वमग्नतेचं सत्य उघड झालं. अर्थात क्षणभर आयुष्य होत्याच नव्हतं झालं असंच वाटलं पण त्यानंतरच्या खडतर जगण्यातून अनेक गोष्टी ह्या गुरूनं शिकवल्या. जेव्हा सगळे तुमच्या विरोधात असतात तेव्हा नेमकं कसं वागायचं, शांत कसं रहायचं, तुमचं मत वादविवाद न करता समोरच्याला कसं पटवून द्यायचं अशा एक ना अनेक गोष्टी त्यानं मला त्याच्या कृतीतून शिकवल्या.
असा एखादा सद्गुरू तुम्हाला सतत घडवत असतो. गर्व, अंहकार, राग, सगळं हळूहळू कमी करत तुम्हाला क्षमाशील, शांतचित्त बनवत जातो. न बोलताच त्याच्या कृतीतून खूप काही शिकवत असतो, जे की जास्त परिणामकारक असतं. तो सावलीसारखा सतत सोबत असला की, मी कुठेही जायची हिम्मत करू शकते. नवीन घर पाहण्यासाठी निर्जन साईट बघायला जायची हिंमत, तो चल म्हणाला म्हणूनच करू शकले. डोनेशनसाठी बरेचदा अनेक ठिकाणी जावं लागतं पण तो सोबत असला की अगदी बिनधास्त असते. परवा पुण्याहून औरंगाबादला यायला रात्रीचे साडेबारा वाजलेले, गाडीत आम्ही दोघंच. माझ्या मनात सतत धाकधूक पण माझ्या बाजूला बसलेला तो शांतपणे स्मितहास्य देत होता. ही खरी सोबत.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविशी हाती धरोनिया!
तुकोबांच्या ह्या ओळी आठवतात.
मी ज्या क्षेत्रात आहे, तिथं सतत दुसर्यांचं ऐकून घ्यावं लागतं. कुणी पालक येतो, रडून जातो. कुणाला कॉन्सिलींग करताना त्याचं भरपूर ऐकून घ्यावं लागतं. लोक वरकरणी साळसूद वाटणारे पण कायम लक्षात राहणारे टोमणे मारून जातात. तुम्ही सामाजिक संस्था चालवता म्हणजे कायम तुम्ही ऐकूनच घेतलं पाहिजे, हा गोड गैरसमज संस्थेला भेट देणारा बाळगून असतो. सरकारनं तुम्हाला मदत केली पाहिजे, सरकारनं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे असं एक ना अनेक ठासून ऐकवणारा असतो. तर अनेकदा, एकेकाचं ऐकता ऐकता आपण चक्क डस्टबीन होऊन जातो. तसं तर आपणही खूप काही बोलू इच्छित असतो. आपल्याही मनातलं, मनापासून ऐकणारं कुणीतरी असावंसं वाटतं. प्राब्लेमचं सोल्यूशन किंवा सल्ले नकोच असतात. फक्त हवी असते मनाचं मनापर्यंत पोंहचवणारी सोबत.
…आणि हवा असतो एक विश्वास की, हे मनातलं बोललेलं, कुठं तिसरीकडं जाणार नाही. त्याला तिखटमीठ लावून पुढं फॉरवर्ड होणार नाही. खूपदा मनातलं मांडतांना आपल्या प्रॉब्लेम्सची उत्तरं आपल्यालाच सापडत जातात. कधी कधी जावू दे गं, दे सोडून… असा त्याचा आविर्भाव, आपल्याला न बदलणार्या गोष्टी सोडून द्यायला मदत करतो अन् गंमत म्हणजे काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात.
कधी कधी मनाची खूप चिडचिड होते, तेव्हाही हा फक्त त्याचं… ‘हाय मै मर जांवा…’ असं शांत, संयमी स्माईल देत असतो. मग आपणही त्या मूडमधून बाहेर येतो अन् नकळत आपल्याही चेहर्यावर तसंच स्माईल येतं. दिलखुलास खळखळून हसून दाद द्यावी तर फक्त त्यानंच. तसंच
तुका म्हणे क्षमा
सर्वांचे स्वहित
धरा अखंडित
सुखरूप
त्यानंच मला सहजतेनं माफ करायला आणि तितक्याच सहजतेनं माफी मागायलाही शिकवलं. कमीत कमी बोलूनही आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देणं, समोरच्यांनी कितीही उपरोधिक बोललं तरी ते शांतपणे ऐकूण घेणं अशा एक ना अनेक गोष्टी शिकवणारा तोच माझा गुरू.
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपलाची वाद आपणाशी
ह्या ओळी सार्थ ठरतात.
सतत श्रीहरी श्रीहरी नामस्मरण केल्यानं कदाचित आयुष्याची नावही मार्गी लागेल. ज्या कार्यासाठी भगवंतानी निवड केली असेल ते कार्य पूर्णत्वास नेताना त्या प्रवासाच्या प्रत्येक पावलावर तो आजवर कायम शांत, हसतमुखानं सोबत राहिला आणि पुढंही राहील. फक्त एका मुलापासून सुरू झालेला हा प्रवास आज तब्बल 55 मुलांपर्यंत येऊन पोहोचला. पुढं अजून त्यांच्या पुर्नवसनाचं मोठ्ठ काम हातून घडायचं आहे अन् मला विश्वास आहे की माझा हा गुरूवर्य माझ्या हातून तेही पार पाडून घेईल.
मिळणारा मानसन्मान, प्रसिद्धी, कौतुक ह्या सगळ्यांनी हुरळून न जाता, त्यास शांतपणे प्रतिसाद द्यावा ही महत्त्वाची कसोटी त्याच्याच आचरणानं मला शिकवली. तसंच आयुष्यात लोक सोडून जातच असतात तेव्हा त्यांच्या जाण्याचं जास्त दु:ख न करता पुढं मुव्ह ऑन होणं हेही त्यानं आपल्या कृतीतून शिकवलं. असा माझा कायम सोबत करणारा सखा, सांगाती, श्रीहरी. त्याच्याजवळ मी कायम बडबडत असगते अन् तोही तितक्याच शांतपणे सगळं काही ऐकून घेत असतो…! आयुष्यात कायम आनंदी कसं रहावं ते शिकावं तर फक्त ह्याच्याचकडून…!
कर्मे ईशू भजावा असं माऊलींनी लिहूनच ठेवलेलं आहे.
खरं तर असं खूप काही आहे मनात पण सगळंच शब्दांत पकडणं अवघड! तर असा पावलोपावली सोबत करणारा हा गुरू माझ्याच पोटी जन्मलेला असताना मी कशाला करू दुसरा गुरू?
म्हणून या गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं मी ‘ओम गुरवे नम:’ असं म्हणणार ते फक्त माझ्या सखा श्रीहरीलाच !
-अंबिका टाकळकर
संचालिका, आरंभ ऑटीझम सेंटर
औरंगाबाद
8275284178
पारदर्शी आणि खूप सुंदर लिहलंय ताई !
गुरुतत्व कसे आपल्या अवतीभवती असते, आपल्याच माणसातून आपल्या सोबत वावरत असते. आपण ते बघू शकलो, अनुभवू शकलो तर अवघे जगणे कृतार्थ कसे होते याचा उत्तम आशय अंबिकताईंच्या या लेखात आहे. स्वमग्न मुलांसाठी चाललेले त्यांचे संस्थात्मक काम खूप मोठे आहे.