गुरू हा संतकुळीचा राजा

गुरू हा संतकुळीचा राजा

गुरू हा फारच भव्य, व्यापक, उदात्त आणि आदर्श शब्द आहे. त्यामानाने शिक्षक हा मर्यादित अर्थ असणारा व्यवहारी शब्द आहे. भारतीय संस्कृतीच्या संदर्भात गुरू हा शब्द बहुधा आध्यात्मिक अर्थाने वापरला जातो. ‘गुरूवीण उनभव कैसा कळे?’ असा प्रश्‍न संत ज्ञानेश्‍वर माऊलींनी विचारलेला आहे. अर्थात गुरूशिवाय आध्यत्मिक अनुभव येणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आध्यात्मिक गुरूंना सद्गुरू असेही म्हणतात. या आध्यत्मिक गुरूंचे किंवा सद्गुरूंचे माहात्म्य संतसाहित्यात आपणास पानापानांवर असलेले दिसून येते. भारतीय आध्यात्मिक क्षेत्रात अशा गुरूशिष्यांच्या शतावधी परंपरा आणि जोड्या असलेल्या आपणास दिसतात.

मात्र भारतीत संस्कृतीत फक्त आध्यत्मिक क्षेत्रातील गुरूंचीच महती आहे असे नव्हे तर युद्धविद्या, अस्त्रविद्या, राजधर्म याबाबत शिक्षण देणारे आणि मार्गदर्शन करणारेही अनेक गुरू भारतीय सांस्कृतिक इतिहासात तळपताना दिसतात. परशुराम, गुरू द्रोणाचार्य हे अस्त्रविद्या शिकवणारे प्रख्यात गुरू आहेत. भीष्म, कणक, कौटिल्य हे राजनीती शिकवणारे गुरू आहेत. भगवान श्रीकृष्ण तर सर्वच प्रकारची विद्या शिकवणारे महान गुरू होते.

आजच्या काळातही आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही विद्या देणारे तळमळीचे गुरू अनेक आहेत. आधुनिक शिक्षण क्षेत्रातही अनेक शिक्षक गुरूपदास शोभणारे, विद्यादान ही निष्ठा मानणारे गुरू आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातही वैराग्यमूर्ती असणारे गुरू तुरळक प्रमाणात का होईना आहेत.

मला घडविणार्‍या गुरूंचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल. एक आध्यत्मिक गुरू! दुसरे शिक्षक आणि तिसरे ग्रंथ! आध्यात्मिक गुरूंच्या बाबतीत संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात,

गुरू हा संतकुळीचा राजा । गुरू हा प्राणविसावा माझा ।
गुरूवीण देव नाही दुजा । पहाता त्रिलोकी ॥
गुरू हा सुखाचा सागर । गुरू हा प्रेमाचे आगर ।
गुरू हा धैर्याचा डोंगर । कदाकाळी डळमळेना॥
आध्यात्मिक गुरूंविषयी संत तुकारात महाराज म्हणतात,
सद्गुरूवाचोनी सापडेना सोय । धरावे ते पाय आधी त्यांचे ॥

माझा जन्मच आध्यात्मिक कुटुंबात झालेला असल्याने या गुरूंचे माहात्म्य हे आम्हास लहानपणापासूनच परिचित होते. आध्यात्मिक गुरू हे उनग्रह करीत असतात. गुरूमंत्र देत असतात. त्यालाच संतमहात्मे नाम असे म्हणतात. असे नाम आपण ज्याच्याकडून घेतले त्यांना सद्गुरू असे म्हटले जाते. या सद्गुरूंविषयी संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात,

सद्गुरूसारिखा असता पाठीराखा।
इतरांचा लेखा कोण करी ।
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिद्धी पावे ॥

आमच्या घरातील लोकांनी हिंचेगिरी संप्रदायातील धोंडोपंत महाराजांना आध्यत्मिक गुरू मानले होते. त्यांच्याकडून अनुग्रह घेतला होता. माझ्या जन्माच्या आधीपासून ही गुरूपरंपरा आमच्या घरात सुरू होती. लहानपणी या गुरूपरंपरेचा फार मोठा प्रभाव माझ्यावर झालेला आहे. या गुरूपरंपरेची नित्य नेमाची प्रवचने, बारा अभंगांचे भजन, ज्ञानेश्‍वरी वाचन याचा फार मोठा संस्कार माझ्या बालमनावर झालेला आहे. माझी आजी आणि चुलते शिवदासआबा या संप्रदायाचे भजन नित्यनेमाने म्हणत असत. त्याचा सहज पण खूप खोल असा परिणाम झाला आहे.

हा हिंचेगिरी संप्रदाय हा कर्नाटकातील संप्रदाय असून तो दत्तसंप्रदायाची एक शाखा समजली जाते. त्यांचे अनेक शिष्य महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. श्री दत्त – काडसिद्धेश्‍वर महाराज – गुरूलिंग जंगम महाराज – भाऊसाहेब महाराज – सिद्धरामेश्‍वर महाराज – धोंडोपंत महाराज अशी त्यांची परंपरा आहे. या परंपरेत मी वाढलेलो आहे.

या गुरूपंरपरेत ज्ञानेश्‍वरी, दासबोध आणि तुकाराम महाराजांचे नित्यपाठाचे बारा अभंग यांचे फार महत्त्व होते. यामुळे लहानपणी घरातूनच ओवी आणि अभंगांचा संस्कार घडला. त्या दृष्टिने पाहता हिंचेगिरी संप्रदाय, घरची आज्जी, चुलते (आबा) आणि वडील हेच माझे पहिले गुरू म्हणावे लागतील.

आमचे चुलते आबा हे खरेतर आमचे आजोबा शोभतील अशा वयाचे होते. ते दररोज देवपूजा करून ज्ञानेश्‍वरीवाचन केल्याशिवाय भोजन घेत नसायचे. ते खड्या आवाजात ज्ञानेश्‍वरी वाचायचे. आजी आणि आबा लहानपणीच रामायण, महाभारत आणि संतांच्या अनेक गोष्टी सांगायचे. त्यांच्यामुळेच मला प्राचीन भारतीय संस्कृती आणि संतसाहित्याची आवड निर्माण झाली.

आबा नेहमी म्हणायचे, ‘‘अरे गुरू केला पाहिजे. गुरूशिवाय परमेश्‍वराचे खरे ज्ञान होत नाही. तू आपल्या संप्रदायातल्या श्रीधर स्वामींकडून अनुग्रह घे. ते बालब्रम्हचारी आहेत. फार थोर योग्यतेचा गुरू आहे’’ पण मला श्रीधरस्वामींकडून अनुग्रह घेणे शेवटपर्यंत जमले नाही.
आध्यात्मिक क्षेत्रात मी दुसरे गुरू मानतो ते कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील साळुंखे गुरूजी यांना! त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर गडद परिणाम झालेला आहे. गुरूजी खरेतर एक प्राथमिक शाळेचे शिक्षक होते आणि मुख्य म्हणजे कीर्तनकार होते. ते कीर्तन करण्यासाठी नेहमी आमच्या गावी यायचे. कधी कधी आमच्या घरी त्यांचा मुक्काम असे. ते खूपच गोड आवाजात कीर्तन करीत. गायन तर एवढे गोड की काकडा म्हणायला लागल्यावर ऐकतच रहावे वाटे.

या गुरूजींचे एक वैशिष्ट्य होते. त्यांनी कीर्तनाचे बिदागी कधीच घेतली नाही. एवढे निस्पृह कीर्तनकार मी कधी पाहिले नाहीत. आपल्या कीर्तनातून धन ही माया आहे, गोमांसासमान । तुका म्हणे आम्हा धन । असे ओरडून सांगणारे आणि कीर्तन संपल्यावर पैशासाठी तंडणारे पायलीचे पन्नास कीर्तनकार मी पाहिले आहेत पण साळुंखे गुरूजींची बातच अलग होती. त्यांची संप्रदायावर गाढ निष्ठा होती. ते म्हणायचे, द्रव्यासाठी संत । झाले कलीत बहुत । आम्ही जर कथेचे द्रव्य स्वीकारले तर देवाला आमच्यासाठी स्वतंत्र नरक निर्माण करावा लागेल.
या गुरूजींचा एकच उपदेश असे. राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। मंत्र हा जपावा सर्वकाळ । बस्स! बाकी काशीला जायची गरज नाही, पंढरीलाही जायची गरज नाही. ठायीच बैसोनी करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा॥ हा त्यांचा उपदेश असे.

शैक्षणिक क्षेत्रातील गुरू हा वेगळा विषय आहे. मराठी शाळेत असताना आमच्या शाळेत माळी गुरूजी नावाचे एक गुरूजी होते. पहाडी आवाज आणि वक्तृत्वाची देणगी त्यांना निसर्गत:च लाभली होती. ते प्रत्यक्ष आम्हाला शिकवायला नव्हते पण आमचे गुरूजी नसल्यावर कधी कधी आमच्या वर्गावर यायचे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचे. वर्गातच तानाजीचा पोवाडा म्हणायचे. त्यांचा भारदस्त आवाज वर्गात घुमायचा, ‘‘यशवंती, पुन्हा परत आलीस तर खांडोळी करून शिळ्या तुकड्यांबरोबर खाईन!’’ त्यांच्या पोवाड्याने वर्गात वीर रस उचंबळून येत असे. त्यांच्यामुळेच आम्हाला शिवरायांच्या इतिहासाची आवड निर्माण झाली.

हे माळी गुरूजी भावार्थ रामायणाचा अर्थही फारच छान सांगायचे. आमच्या गावात लहानपणी भावार्थ रामायण लावत. गुरूजींच्या पहाडी आणि भारदस्त आवाजात रामायणाची कथा ऐकताना अंगावर काटा येई. या गुरूजींचाही माझ्या बालमनावर फार परिणाम झालेला आहे
हायस्कूलमध्ये ढेरे सर, पिंगळे सर, मारकड सर, ओहोळ सर, उपळाईकर सर असे दिग्गज शिक्षक आम्हाला लाभले. खरे तर मी जो आज आहे तो याच शिक्षकांमुळे! ढेरे सर अत्यंत मायाळू. ते खूपच प्रेमाणे मराठी हा विषय शिकवायचे. त्यांच्यामुळेच मला मराठी विषयाची आवड निर्माण झाली. पिंगळेसर मराठीचेच शिक्षक. वीटच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात अध्यापन करणारी ही शिक्षक मंडळी म्हणजे अक्षरश: सोने होती. पिंगळे सरांचा आवाज मधूर! ते प्रत्येक कविता चाल लावून अगदी स्वरात म्हणायचे. वसंत बापटांची,
गतकाळाची होळी झाली । धरा उद्याची उंच गुढी । पुराण तुमचे तुमच्यापाशी । ये उदयाला नवी पिढी । ही कविता तर अंत:करणात घर करून बसली आहे.

उपळाईकर सर यांचा मराठीचा आणि इतिहासाचा गाढा व्यासंग. ते कधी कधी स्थानिक नियतकालिकांमध्ये लेख आणि कथा लिहायचे. ‘सत्यकथा’ या मासिकाचे नियमित वाचन करणारा हा ग्रामीण भागातील, हायस्कूलमधील मराठीचा त्याकाळातील एकमेव शिक्षक असावा. सत्यकथा हे मासिक किंवा दिवाळीअंक कायम त्यांच्या हातात असे. मराठीच्या या व्यासंगी शिक्षकाचा माझ्यावर खूपच परिणाम झालेला आहे. ते अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतरही पुष्कळ गोष्टी सांगायचे. त्यांच्या बोलण्याला एक धार असे. ते शिस्तीचेही कडक. त्यांना मध्ये बोललेले अजिबात आवडत नसे. वळ उठेपर्यंत मारायचे. मात्र भाषा आणि व्याकरणशुद्धी! बोलायलाच नको. वि. स. खांडेकर, आनंद यादव, जी. ए. कुलकर्णी, इंदिरा संत, शांत ज. शेळके यांच्याविषयी ते भरभरून बोलत. त्यावेळी दहावीला असणारी कवी कुंजविहारी यांची
मनी धीर धरी शोक आवरी जननी ।
भेटेन नऊ महिन्यांनी ॥

ही कविता शिकवताना त्यांनी मुलांना अक्षरश: रडवले. ते नेहमी म्हणायचे, तुम्ही मुलांनी वाचले पाहिजे. ययाती ही खांडेकरांची कादंबरी जरूर वाचा. त्यांचे व्यक्तिमत्त्व, शिस्त, व्यासंग याचा माझ्या मनावर खूप परिणाम झालेला आहे.

ओहोळ डी. आर. हे इंग्रजीचे शिक्षक. हेही गुरूतुल्य. इंग्रजीचे जबरदस्त ज्ञान आणि आकलन, ते समजून द्यायची हातोटी, विनोदी विवेचन आणि प्रचंड अवांतर वाचन यामुळे या शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी आली होती. तेही खूपच कडक शिस्तीचे. मात्र शिकवताना तास संपूच नये असे वाटे. कुठलेही प्रकरण शिकवताना त्या संदर्भातील एक-दोन कथा ते सांगणारच. त्यांनी नल दमयंती हे प्रकरण शिकवताना लैला मजनू आणि हीर रांझाची गोष्ट सांगितलेली आजही आठवते.

हायस्कूलमध्ये असताना मला प्रत्येकच विषयाचे शिक्षक हे खर्‍या अर्थाने गुरूच भेटले. हिंदीचे काझी सरही असेच. राजेंद्र यादव यांची पतंग ही कथा, प्रेमचंद यांची बडे घर की बेटी, यशपाल यांची दु:ख ही कथा शिकवताना ते अक्षरश: विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत.
त्यामानाने महाविद्यालयात मला तेवढ्या ताकदीचे गुरू भेटले नाहीत अशी माझी खंत आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठीच्या भंडारे मॅडम बर्‍या होत्या. अर्थशास्त्राच्या झरकर उर्फ नवले मॅडम मात्र हाडाच्या शिक्षिका. दिसायलाही सुंदर आणि घरंदाज. बाकी भूगोलाचे फाटे सर सोडले तर कॉलेजमध्ये मला प्रभावित करतील असे शिक्षक भेटलचे नाहीत.

शिवाजी विद्यापीठात गेल्यावर मात्र भूगोलाचे भीष्माचार्य शोभतील असे प्रा. मुस्तफा आणि डॉ. पणदूरकर हे शिक्षक लाभले. भूगोल त्यांनीच शिकवावा. त्यांच्यामुळेच मी आज भूगोलाचा प्राध्यापक आहे. एवढे मात्र खरे.

अमृत महाराज शिंदे हे माझे अध्यात्मिक क्षेत्रातील खरे गुरू. मी त्यांच्याकडूनच अनुग्रह घेतला. संतसाहित्याचा प्रदीर्घ व्यासंग, उत्तम वक्तृत्व, प्रभावी निवेदन, कमावलेली भाषा, विनोदी शैली आणि आध्यात्मिक आत्मानुभवामुळे आलेले तेज यामुळे त्यांचे कीर्तन विलक्षण प्रभावी होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतरांवर नक्कीच प्रभाव पाडते.

खरेतर हाडामांसाच्या जिवंत माणसांइतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त ग्रंथ हे मनुष्याचे गुरू असतात. त्यामुळे लेखक आणि कवी हे माझे अप्रत्यक्ष पण खोलवर परिणाम करणारे फार मोठे गुरू आहेत. माझ्यावर प्रभाव पाडणारे आणि माझे व्यक्तिमत्त्व घडवणारे साहित्यिक म्हणजे संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे संत. संत ज्ञानेश्‍वरांची ज्ञानेश्‍वरी, संत एकनाथांचा भागवत, संत तुकारामांची गाथा आणि समर्थांचा दासबोध यांनी एकेकाळी मला वेड लावले होते. पंडित कवीतील मुक्तेश्‍वर, श्रीधर, महिपती यांचे ग्रंथ माझ्या आवडीचे आहेत. श्रीधरांचे पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय या ग्रंथांनी महाविद्यालयीन जीवनात अक्षरश: वेडे केले. याशिवाय नवनाथ भक्तीसार, काशीखंड, रामाश्‍वमेध हे ग्रंथ गुरूतुल्य होते. या ग्रंथाचा अर्थ सांगणारे माझे वडील या क्षेत्रातील माझे परमगुरू आहेत.
आधुनिक ललित वाड्मयातील वि. स. खांडेकर, गो. नी. दांडेकर, पद्माकर गोवईकर, श्री. ना. पेंडसे, सदानंद देशमुख, संजय सोनवणी यांच्या लेखनाने माझ्यावर खूप परिणाम केलेला आहे. ययाती, अमृतवेल, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, मुंगी उडाली आकाशी, गारंबीचा बापू, बारोमास, आणि पानिपत हे माझे गुरूतुल्य ग्रंथ आहेत. कवींमध्ये संत आणि पंडित कवींशिवाय इतरांचा फारसा प्रभाव नाही. तरीही बालकवी, कुसुम्राग्रज, आरती प्रभू, गिरीश, बा. भ. बोरकर यांची कविता मला भावते.

विचारवंतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. त्यांचे अनेक ग्रंथ मी वाचले आहेत. याशिवाय वि. दा. सावरकर, नरहर कुरूंदकर, पु. ग. सहस्त्रबुद्धे, आ. ह. साळुंखे यांच्या लेखनाने मला विचारप्रवृत्त केले आहे. यांचे अनुक्रमे सहा सोनेरी पाने, व्यासाचे शिल्प, महाराष्ट्र संस्कृती, बळीवंश हे उल्लेखनीय ग्रंथ आहेत. इतिहाकारांमध्ये बाबासाहेब पुरंदरे, वा. सी. बेंद्रे, जयसिंगराव पवार यांचे ग्रंथ गुरूतुल्य आहेत.

शेवटी गुरू म्हणजे काय? व्यापक अर्थाने मार्गदर्शक. मनुष्याच्या जीवनामध्ये फक्त एकच एक गुरू नसतो. अनेकांच्या मार्गदर्शनाने आणि अनुकरणाने मनुष्याचे जीवन घडत असते. गुरूंचे हे अनेकत्व श्रीमद्भागवतानुसार श्री गुरू दत्तांनाही आणि त्याअनुषंगाने संत एकनाथांनाही मान्य आहे. परंपरेने श्री गुरू दत्तांनी चोवीस गुरू केले आहेत अशी मान्यता आहे. संत एकनाथ म्हणतात,
जो जो जयाचा घेतला गुण ।
तो तो गुरू मी केला जाण ।
गुरूंसी आले अपारपण ।
जग संपूर्ण गुरू दिसे ॥

मात्र गुरू हा गुरूच असावा. तो लफंगा किंवा ढोंगी, जगाला लुबाडणारा भोंदू नसावा. अशा लोकांचा संत तुकारामांना प्रचंड तिटकारा आहे. ते म्हणतात,

गरूशिष्यपण । हे तो अधमलक्षण ।
गुरूमार्गामुळे । भ्रष्ट झाले सकळ ।
तुका म्हणे गेले गुरूत्व गुखाडी ।
पूर्वजांसी धाडी नरकवासा ॥

काही विद्यार्थीही माझे गुरू आहेत. आपणास सायकल शिकवणारे, पोहायला शिकवणारे, संगणक शिकवणारे हेही आपले गुरूच आहेत आणि सर्वात मोठा गुरू आई आहे. जिने आपल्याला जगायलाच शिकवले आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त या सर्वांना अभिवादन!

-प्रा. दादासाहेेब मारकड
ओवीबद्ध साहित्याचे अभ्यासक
9921402714

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा