बालवाचकांसाठी सुंदर पर्वणी-सुभाषचंद्र वैष्णव यांची नवी बारा पुस्तके

बालवाचकांसाठी सुंदर पर्वणी

Share this post on:

सुप्रसिद्ध बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांनी बालगोपालांसाठी लिहिलेली तब्बल बारा पुस्तके मुंबईच्या ‘सम्राट प्रकाशन’ने नुकतीच प्रकाशित केली आहेत. या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टींमुळे बच्चे कंपनीचे भरपूर मनोरंजन तर होणारच आहे शिवाय त्यातून मोलाचा संदेश दिलेला असल्याने त्यांचे प्रबोधनही होणार आहे. या गोष्टींच्या माध्यमातून लेखक सुभाषचंद्र वैष्णव यांनी विविध विषयांमार्फत, जीवन जगताना आपण जागरूक कसं रहावं यावरही मार्मिक भाष्य केलं आहे.

सर्वच पुस्तकांमध्ये कथेला अनुसरून सुबक व आकर्षक चित्रांची मनोवेधक मांडणी केली असल्याने त्यातील गोष्टी वाचताना वाचक या पुस्तकांच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाही हे निश्‍चित! ‘मजेदार कथा’ या पुस्तकात एकूण सात छोट्या छोट्या कथा आहेत. सर्वच कथा अतिशय उद्बोधक आणि वाचनीय असल्याने त्या वाचताना वेगळाच आनंद मिळतो. ‘लाख मोलाचा धडा आणि इतर गोष्टी’ या पुस्तकात सांगितलेली लाख मोलाचा धडा ही कथा खरोखरच अत्यंत लाखमोलाची आणि सामान्य माणसाचे डोळे उघडणारी आहे.

‘कर्तव्य आणि इतर गोष्टी’ या पुस्तकात लेखकांनी लिहिलेल्या सर्वच गोष्टी बोधप्रद आहेत. ‘देवावर श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी’, ‘प्रत्येकाने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे’ अशा प्रकारचे मोलाचे संदेश या गोष्टींच्या माध्यमातून दिल्याने बालवाचक सजग होणार यात शंका नाही. ‘जलदान आणि इतर गोष्टी’ या पुस्तकात एकूण आठ छोट्या छोट्या सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीतून काही ना काही धडा वाचकांना मिळतो. हेच या पुस्तकाचे सामर्थ्य आहे.

‘दिसतं तसं नसतं आणि इतर गोष्टी’ व ‘करावं तसं भरावं आणि इतर गोष्टी’ या दोन्ही पुस्तकांद्वारे लेखकांनी अतिशय सोप्या भाषेत व्यवहारज्ञानाचे धडे बालवाचकांना दिले आहेत. ते त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहेत हे गोष्टी वाचताना पदोपदी जाणवते! त्याचप्रमाणे ‘लोभीपणाचे फळ आणि सोन्याचा कलश’ या पुस्तकांतील कथा वाचकांना खिळवून ठेवून उत्सुकता वाढवतात.

‘चतुर प्रधान आणि इतर गोष्टी’ या पुस्तकात तीन वेगवेगळ्या पण मस्त भन्नाट गोष्टी वाचायला मिळतात. ‘गर्विष्ठ झाड आणि इतर गोष्टी’ या पुस्तकातून ‘गर्वाचे घर खाली’ हा अमूल्य संदेश मिळतो. तसेच आपल्याला समाजात वावरताना काही प्रसंगात युक्ती किती श्रेष्ठ ठरते याचाही प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे ‘गर्वहरण आणि इतर गोष्टी’ या पुस्तकात एकूण आठ गोष्टी सांगितल्या आहेत. या सर्वच गोष्टी बच्चे कंपनीसाठी संस्कारक्षम ठरणार आहेत.

‘अनमोल ठेवा आणि इतर गोष्टी’ या पुस्तकात निरनिराळ्या विषयांवरील उद्बोधक गोष्टी वाचकांना विचार करण्यास भाग पाडतात. तसेच ‘जित्याची खोड आणि इतर गोष्टी’ या पुस्तकाच्या माध्यमातून ‘पेरले तसे उगवते’ व ‘जशी माती तसा घडा’ या म्हणींना अनुसरून गोष्टी आणि इतरही काही रंजक गोष्टी वाचायला मिळतात. एकंदरित सर्वच पुस्तके म्हणजे ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिनाच आहे.

लेखक सुभाषचंद्र वैष्णव यांनी लिहिलेल्या तब्बल बारा पुस्तकांचा हा संच बालवाचकांसाठी विलक्षण व अपूर्व पर्वणी ठरणार आहे. ही पुस्तके म्हणजे एकप्रकारची अक्षरमेजवानीच आहे यात वाद नाही! या पुस्तकांच्या माध्यमातून लेखकांनी बालमनावर योग्य संस्कार व्हावेत अशा प्रकारच्या सुंदर प्रबोधनात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत. केवळ शाळेच्या पुस्तकातून न मिळणारे व्यवहार ज्ञान, या बाराही पुस्तकातील गोष्टींमधून बालवाचकांना प्राप्त होऊ शकते एवढे सामर्थ्य या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आहे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्याचप्रमाणे आजकाल सहसा न मिळणारे मूल्यशिक्षणाचे धडे सुद्धा या पुस्तकांतून निश्‍चित मिळत असल्याचे ही पुस्तके वाचताना पदोपदी जाणवते!
या सर्वच बारा पुस्तकातील बोलकी रंगीत चित्रे आणि त्या चित्रांना अनुसरून असलेल्या सुंदर गोष्टी या पुस्तकांचं खरं बलस्थान आहेत. त्यामुळे गोष्टी वाचताना बालवाचकांना अवर्णनीय आनंद मिळणार हे निश्‍चित! या सर्व पुस्तकांची अतिशय आकर्षक अशी मुखपृष्ठे ज्येष्ठ चित्रकार रमेश भरताल यांनी चितारली आहेत. तसेच पुस्तकांच्या आतील सगळीच सुंदर सुंदर चित्रे सुद्धा त्यांनीच चितारली आहेत. एकूणच हा बारा पुस्तकांचा संच अत्यंत वाचनीय असल्याने बालवाचकांसाठी तरी प्रत्येकाच्या संग्रही असावाच असे मनापासून वाटते. त्यासाठी सजग पालकांनी या पुस्तकरूपी खजिन्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्यांना ही बारा संस्कारक्षम पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; जेणेकरून त्यांना वाचनाची गोडी अगदी बालवयापासून लागण्यास मदत होईल.

बालवाचकांसाठी या बारा पुस्तकांची भेट उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखक सुभाषचंद्र वैष्णव यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशीच सुंदर, अप्रतिम पुस्तके लिहिण्यासाठी, त्यांच्या न संपणार्‍या यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

-विनोद श्रा. पंचभाई
चलभाष – ९९२३७९७७२५

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!