नीतांजली – प्रेमदिनाचे चिंतन!

नीतांजली - नीता जयवंत यांचा लेख

प्रेमाचा दिवस! कल्पना मोठी छान आहे, पण मग फक्त एक दिवसच प्रेमाचा असतो का? आणि बाकी सारे दिवस ते कशासाठी? 14 फेब्रुवारी साजरा करणे, त्यानिमित्त फुले भेटी, मनीचे भाव व्यक्त करणे याला विरोध करावा किंवा व्हावा असं मला अजिबात वाटत नाही! पण फक्त एक दिवस प्रेमाचे गोडवे गावे अन् मग सारेच विसरुन जावे, हे कुठेतरी टोचतं. पाश्‍चात्यांची परंपरा म्हणून घ्यावं की… की घेऊ नये? हा ज्यांचा त्याचा प्रश्‍न! पण प्रेमाची नाती आणि त्या नात्यातला प्रेमाचा ओलावा मात्र आयुष्यभर जपावा. हे हा दिवस अधोरेखीत करतो असं मला वाटतं. प्रेम ही एकदिवसीय गोष्ट नाही, ती मनाच्या आतल्या कप्प्यातील एक हळूवार पण तितकीच बळकट भावना असावी. प्रेम तकलादू अन् कचकडी असूच नये!

आजची युवा पिढी ही अत्यंत प्रॅक्टिकल आहे. अतिचिकीत्सा हे त्यांच्या स्वभावाशी मिळतेजुळते असेलच असं नाही. पटलं नाही की ही पिढी वादविवाद, तंटाबखेडा न करता त्या गुंत्यातून अलगद बाहेर पडते. उलट आपण खरंच गुंता सोडवतो की त्यात अधिक अडकतो? कोडं आपणच निर्माण करतो. चित-पट दोन्ही आपणच होतो ना? कोणतंही नातं तोडलं जाऊ नये याकडे कटाक्ष असण्यापेक्षा, हे नातं तुटताना असा काय फरक पडणार? ही वृत्ती रुजतेय याचं अधिक दु:ख आहे. प्रेमावर काही बंधन नाही. ते कोणावरही जडू शकतं पण ते निभावणे ही जबाबदारी मोठी असते. चंचल मनाने त्या प्रेमाकडे निव्वळ खेळ म्हणून पाहणे, ही प्रेमाची फसवणूक ठरेल. प्रेमासाठी मन ही तितकंच सक्षम हवं. प्रेम करणं सोपं पण निभावताना मात्र कसोटी असते कारण नुसतं रोज भेटणं म्हणजे प्रेम नसतं.

आठवण जपणं हेच प्रेम! मनाचे रंग एकमेकात मिसळतात आणि आपल्याही नकळत एक गोफ विणला जातो. हे रंग कधी गडद होतात तर कधी फिकट… यांच्यात योग्य प्रकाशरेषा मिसळल्या तर गोफाचे सौंदर्य वाढतं. मला वाटतं आग्रह आणि दुराग्रह हे नात्यातल्या अगत्याचा आधार काढून घेतात. शोधायचा फक्त सहृदय माणूस! वाद, संवाद ,चर्चा, मत, गुणदोष यातूनच सुरूवात होते. मनामनांची जपणूक आणि मग प्रेमाचा रंग अधिक गडद होतो.

प्रत्येक नात्याचं एक चक्र असतं. नात्यांची सुरवात गतिमान असते, झिंग आणणारी असते पण जसा जसा काळ पुढे सरकतो, तशी गती मंदावते. आवेग आणि ओढही कमी होते. कारण कुठल्याही नात्यांचा आत्मा असतो प्रेम! ते विरता कामा नये. कारण शेवटपर्यंत साथ देणारी तीच मजबूत दोरी आहे. नात्यांतल्या प्रेमाचा ओलावा संपला की सारंच कोरड होतं. हा ओलावा संपायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. सवयी, आवडीनिवडी, स्वभावातील टोकदार कंगोरे, आर्थिक व्यवहार! कारण काहीही असू शकतात पण समजुतदारपणे त्यातून मार्ग काढण्याची गरज असते. हवंहवंस असं हे प्रेम म्हटलं की मंगेश पाडगावकर आठवतात आणि त्यांच्या सुप्रसिद्ध ओळी तुमचं-आमचं सेम नसतं. भावना, ओढ, माधुर्य तेच पण जातकुळी वेगळी. मनातल्या रंगीबेरंगी भावना मूर्त स्वरूप घेतात अन् मग प्रेमाचा मोहर फुलू लागतो.

मग प्रेम कशावरही करावं…

वार्‍याच्या वेगावर, तार्‍यांच्या चमचमण्यावर
पावसाच्या सरींवर, फुलांच्या सुंदरतेवर
निसर्गाच्या हिरवेपणावर, माणसातल्या माणुसकीवर
तान्हुल्याच्या स्पर्शावर, प्रेम कशावरही करावं!
पण हे प्रेम समजून करावं त्यातला अर्थ उमगून करावं
प्रेम अगदी भरभरून करावं,
उतू जाणार्‍या दुधासारखं फसफसून करावं
प्रेम ही भावना मनाला सुखावते,
प्रेमाची उत्कटता ओठातून विलगते
प्रेम करताना हातचे राखू नये,
पण त्याचे दुकानही मांडू नाही
प्रेम करावं तान्हुल्याच्या जावळावर,
त्याच्या निष्पाप निरागसतेवर
प्रेम करावं त्याच्या मिटलेल्या चिमुकल्या मुठींवर
प्रेम करावं त्याच्या मऊ मुलायम रेशीम स्पर्शावर
प्रेम कशावरही करावं!

– नीता जयवंत, अंबरनाथ
चलभाष – ९६३७७४९७९०

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा