latest presidential candidate from bjp for 2017 presidential election

कोविंदाऽ कोविंदाऽऽ कोविंदाऽऽऽ

Share this post on:

भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आहे. कोविंद हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील असून दोन वेळा भाजपतर्फेच राज्यसभेवर गेले होते. अगदी प्रारंभीपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. आदिवासी असलेल्या द्रोपदी मुरूमू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कोविंदा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना ते दलित असल्याचे आवर्जून सांगितले आहे त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप याचेही राजकारण करणार हे स्पष्टच आहे.

यापूर्वी कॉंग्रेसने के. आर. नारायणन (1997-2002) यांना राष्ट्रपती करून त्यांच्या दलित असण्याचे भांडवल केले होते. मोदीही त्याच मार्गावरून जात आहेत. पुरेसे संख्याबळ असल्याने मोदी ज्या नावाला पाठिंबा देतील तो राष्ट्रपती होणार हे नक्की होते. वाजपेयी यांचे कडबोळ्याचे सरकार असल्याने त्यांनाही अपेक्षित उमेदवार देता आला नव्हता. तेव्हा मराठमोळ्या प्रमोद महाजनांनी पुढाकार घेत अब्दुल कलामांचे नाव समोर आणले आणि त्याला मान्यताही मिळवली. त्यामुळेच कलाम यांच्यासारखा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ आपल्याला राष्ट्रपती म्हणून मिळू शकला. कॉंग्रेसने प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती करून कलामांमुळे उंचीवर नेलेले राष्ट्रपतीपद पुन्हा जमिनीवर आणले. हिंदुत्त्ववादी विचारधारेचा राष्ट्रपती करण्याची संधी प्रथमच भाजपला मिळाली. त्यामुळे मोहनजी भागवतांपासून द्रोपदी मुरूमू, विजय भटकर, एम. एस. स्वामीनाथन, रतन टाटा, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन अशा अनेकांची नावे चर्चेत येत होती. कोविंद यांची निवड बहुमताच्या बळावर जवळपास निश्‍चित झाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय सन्यासाचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी ज्याप्रमाणे अचानक पुढे आणण्यात आले तसेच कोविंद यांच्याबाबतही घडले. अमित शहा यांनी कोविंद यांची उमेदवारी जाहीर करताना सर्व घटक पक्षांना याबाबतची कल्पना दिली गेली असल्याचे सांगितले आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही दूरध्वनीवरून याबाबत कळविल्याचे शहा यांनी सांगितले. काही मिनिटातच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी कोविंद यांच्या नावाला पाठिंबाही जाहीर केला आहे.

कोविंद हे सर्वोच्च न्यायालयात वकील होते. राज्यसभेच्या कामकाजाचाही त्यांना अनुभव आहे. दलित मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. मात्र तरीही सामान्य माणसाला त्यांच्याबाबत फारशी माहिती नसल्याने ‘भाजपमधील प्रतिभा पाटील‘ असेच त्यांचे वर्णन केले जात आहे. राष्ट्रपतीचा ‘रबरी शिक्का’ म्हणून आपल्याकडे उल्लेख केला जातोच. अब्दुल कलाम यांच्यासारख्या थोर शास्त्रज्ञाने या पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या ‘मर्जी’तील उमेदवार जाहीर करून भाजपने त्यांचा राजकीय अजेंडा पुढे दामटला आहे. ‘देशात मोदींचा शब्द ऐकणारा’ माणूसच त्या त्या ठिकाणी निवडला जातो हे गेल्या काळातले चित्र आहे. मोदी हे गुजराती असल्याचा अभिमान बाळगणारे पंतप्रधान आहेत. ‘मी गुजराती असल्याने उद्योजकता माझ्या रक्तात आहे’ असे ते वेळोवेळी अभिमानाने सांगतात. या सगळ्यात देश म्हणजेच एक ‘इंडस्ट्री’ होऊ नये म्हणजे झाले!

कोविंद यांच्या उमेदवरीनंतर कॉंग्रेसही त्यांच्या विरूद्ध लढण्यासाठी दलित चेहराच शोधेल असे सांगितले जात आहे. भाजपचे संख्याबळ पाहता कदाचित कॉंग्रेस कोविंद यांच्याविरूद्ध उमेदवार देणारही नाही. दिलाच तर ती केवळ औपचारिकता ठरेल. पुढच्या निवडणुकीत आपण देशाला ‘दलित’ राष्ट्रपती दिला याची जाहिरातबाजी भाजपकडून मोठ्या प्रमाणात केली जाईल. प्रत्येक गोष्टीचे श्रेय वाजत-गाजत घेण्याची परंपरा भाजपने निर्माण केली आहे. त्यातून राष्ट्रपतीपदही सुटू नये हे देशाचे दुर्दैव! तुर्तास रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा देऊयात! ‘मोदी-मोदी’ नंतर आता देशात ‘कोविंद कोविंद’चा गजर होणार हे मात्र नक्की!

रामनाथ कोविंद यांचा अल्पपरिचय
जन्म
– 1 ऑक्टोबर 1945
शिक्षण – बी.कॉम., एल.एल.बी. (कानपूर विद्यापीठ, उत्तरप्रदेश)
पत्नी – सविता कोविंद
अपत्ये – मुलगा प्रशांत कुमार (विवाहित) आणि मुलगी स्वाती –
सध्या निवास – राजभवन, पाटणा, बिहार
1971 – दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य
1977 – पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्वीय सहाय्यक
1977 ते 1979 – दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील
1980 ते 1993 – सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील
1990 – घाटमपूर येथून लोकसभा निवडणूक पराभूत
1994 ते 2006 – राज्यसभेचे दोनदा सदस्य
2007 – भोगनीपूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत
2015 पर्यंत – उत्तरप्रदेश भाजपचे महामंत्री
2015 – बिहारचे राज्यपाल

■ घनश्याम पाटील
7057292092

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >
error: Content is protected !!