धोका प्रतिक्रियावाद्यांचा!

मध्यंतरी व्हॉट्स ऍपला एक विनोद आला.

एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला.
देशी कुत्र्यांनी त्याला विचारलं, ‘‘मित्रा, तुमच्याकडे कशाची कमतरता होती, ज्यामुळं तू इथं आलास?’’
तो म्हणाला, ‘‘आमच्याकडं राहणीमान, वातावरण, खाणंपिणं, जीवनाचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीनं झकासच आहे…. पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठंही नाही…!’’


यातील विनोदाचा भाग सोडला तरी किती खरे आहे हे! कुणीही उठतो आणि वाटेल ते मत मांडून मोकळा होतो. ‘अभिव्यक्ती’च्या नावावर आपण फक्त ‘प्रतिक्रियावादी’च झालोय की काय असे वाटायला लागले आहे. घरात काय अडचणी आहेत याची माहिती नसते आणि हे महाभाग भारत-अमेरिका संबंधांवर, काश्मीर प्रश्‍नावर, दहशतवादावर मते मांडत असतात. बरं, त्यातला थोडाफार अभ्यास असेल असेही नाही. म्हणजे श्रीपाल सबनीसांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावर काही अभ्यास केलाय हे कोणी कधी ऐकलंय का? त्यावर त्यांचे एखादे पुस्तक आहे का? पण ते बोलून गेले की, ‘नरेंद्र मोदी तिकडे सीमेवर का बोंबलत फिरतोय? एखादी गोळी लागली तर कसा मेला तेही कळणार नाही…’

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष देशाच्या पंतप्रधानाविषयी असे बोलतो! जणू मोदी म्हणजे काही त्यांचा वर्गमित्रच! त्यात संमेलनाध्यक्षाच्या तोंडी भाषा कशी? तर ‘बोंबलत फिरतोय!’ वा रे वा!!

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि अर्ध्या तासाच्या आत तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ‘‘यात हिंदुत्त्ववाद्यांचा हात आहे…’’ म्हणजे खुनी कोण हे तुम्हाला आधीच माहीत होते! कुठे गेले ते हिंदुत्त्ववादी? तपास यंत्रणेच्याही आधी तुम्ही प्रतिक्रिया देऊन आणि दोषारोप करून मोकळे! मग का पकडले नाही त्यांना? खरंतर तुमच्यावरच गुन्हे दाखल व्हायला हवेत. ‘हिंदुत्त्ववाद्यांचा हात’ असे म्हणून तपासाची दिशा बदलली गेली का? आता तर इतके पाणी वाहून गेलेय की खुद्द खुनी पुढे आला आणि त्याने कबुली दिली तरी त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होणे अवघड.

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. कृष्णा किरवले यांचा आज कोल्हापूरात खून झाला आणि क्षणात असे एसएमएस सुरू झाले. कोणतीही हत्या वाईटच, त्याचे समर्थन होणारच नाही. अशा प्रकाराचा करावा तितका निषेध कमी! पण तपास यंत्रणेला त्यांचे काम आपण करू देणार की नाही? डॉ. किरवले यांचे साहित्यातले, चळवळीतले योगदान निश्‍चितपणे मोठे आहे; पण या खुनाचा संबंध थेट दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्याशी जोडून आपण मोकळे. किरवले यांनी नेमके काय लिहिले? त्यांनी कोणता ‘विचार’ दिला यावर मात्र कोणीच काही बोलत नाही. ‘प्रतिक्रियावाद्यां’पैकी खूप कमी जणांनी त्यांचे साहित्य वाचले असणार! तरीही ‘अच्छे दिन आ गए’, ‘हिंदुत्त्ववादी शक्तींचे कारस्थान’, ‘आणखी किती जणांचे आवाज घोटणार?’ असे प्रश्‍न आणि मते मांडणे सुरू!

प्रा. कृष्णा किरवले यांच्या मित्राच्या मुलाने फर्निचरच्या पैशाच्या न देण्यावरून खून केला असून, आरोपीला अटकही केल्याचे सूत्रांकडून कळते. विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासारखा कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी स्वतः यात लक्ष घालून तपास करतोय. असे असताना आपण निष्कर्ष काढून आणि विशिष्ट विचारधारेला दोष देऊन मोकळे! समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया पडल्यात त्या पाहता प्रत्येक घटनेचे आपण किती आणि कसे राजकारण करतोय हे सहजी ध्यानात येईल.

महात्मा गांधी असतील, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी किंवा आता किरवले असतील! इथे कायदा प्रत्येकाला सारखाच आहे. इथल्या सामान्य माणसाचा खून झाल्यावर जी कलमे लावली जातात तिच यांच्या मारेकर्‍यांवरही लावली जातात. गुन्हेगारांना शिक्षाही सारखीच असते. कुणाचाही खून तितकाच क्लेषकारक, निंदनीय आणि निषेधार्ह असतो. मग तपास यंत्रणेला त्यांचे काम करू देण्याऐवजी आपण त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप का करतो? जर एखाद्या घटनेचा, दुष्कृत्याचा तपास व्यवस्थित होत नसेल, त्यात हलगर्जीपणा केला जात असेल तर लोकशाही व्यवस्थेत न्याय मागण्याची अनेक साधने आहेत. मात्र घटना घडल्याबरोबर आपण त्यावरील आपली मते आणि निष्कर्ष मांडून मोकळे होतो. आपल्याला हवा तसा आणि हवा तितकाच तपास व्हावा असाही ग्रह करून घेतो.

गुरमेहर कौर या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थीनीने सांगितले की, ‘तिच्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले.’ तिचे वडील देशासाठी कामी आलेत. कारगिलच्या युद्धात त्यांना हौतात्म्य आले. गुरमेहरला मत मांडण्याचा अधिकार आहे. तिने ते मांडले. त्या विधानाचा थेट बुद्ध, गांधींशी संबंध लावून आपण प्रतिक्रिया दिल्या. प्रतिक्रिया देणार्‍यांपैकी कुणाचा आंतरराष्ट्रीय संबंध, युद्धनीती याचा अभ्यास असेलच असे नाही. गुरमेहरच्या वडिलांचे देशासाठीचे बलिदान निश्‍चितच महत्त्वपूर्ण आहे. म्हणून तिने कितीही अपरिपक्व विधाने करावीत आणि आपण त्यावर चर्चेचे गुर्‍हाळ चालवावे हे काही खरे नाही. चिंतेची गोष्ट म्हणजे, गुरमेहरने समाजमाध्यमांद्वारे एक गंभीर आरोप केलाय की, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुलांनी तिला बलात्काराची धमकी दिलीय.’ हे तर निव्वळ राजकारण झाले. जर कोणी असा करंटेपणा केला असेल तर त्या ‘नीचोत्तमा’वर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. मात्र तसे काही न करता केवळ आरोप करायचे आणि राजकारण साधत प्रसिद्धीच्या झोतात रहायचे असा एक नवा खेळ सध्या आपल्याकडे सुरू झालाय. गुरमेहर ही आपल्या देशासाठी प्राणार्पण करणार्‍या एका हुतात्म्याची मुलगी आहे. त्यामुळे तिच्याविषयी सहानुभूती आहेच; पण अशी धमकी इथल्या कोणत्याही भगिनीला मिळाली तर आधी तिने गुन्हे दाखल करावेत आणि त्यावर त्वरीत कारवाई व्हावी. आपल्याकडे कायद्याचे राज्य आहे याचेच भान या ‘प्रतिक्रियावाद्यांना’ राहिलेले नाही.

मध्यंतरी एक बातमी वाचण्यात आली होती. ‘वीज पडून दलित युवकाचा मृत्यू.’ आता त्या विजेलाही वाटले असेल हा ‘दलित’ आहे, आपण याच्यावरच अन्याय करावा आणि ती बरोबर त्याच्यावर पडली. ही घटना दुर्दैवी आणि अपघाती आहे. मात्र तिथेही ‘जात’ आणून आपण, आपली प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे नक्की काय साध्य करू इच्छितात? एकीकडे जातीअंताच्या लढाईची भाषा करायची आणि दुसरीकडे सातत्याने जातींचे-ज्ञातींचे मेळावे घ्यायचे, सभा घ्यायच्या, त्यावरून राजकारण करायचे हे कशाचे लक्षण म्हणावे? मध्यंतरी ज्या काही जातीयवादी घटना घडल्या, माध्यमांनी राळ उठवली, राज्य पेटले, दलित अत्याचार म्हणून प्रचंड बोभाटा झाला त्याचा शेवट काय झाला ते आपण बघितलेच! घरच्याच लोकांनी वैयक्तिक कारणातून ते हत्याकांड घडवले होते. अशा कितीतरी घटना आहेत. आपण फेसबूक, ट्विटर, ब्लॉगवरून हवे ते निष्कर्ष काढतो, यंत्रणेला गुन्हेगारांच्या पिंजर्‍यात बसवतो आणि शेवटी वेगळेच सत्य पुढे येते.

व्हॉट्स ऍपसारख्या माध्यमांमुळे तर कहरच झालाय. एखादा संदेश आला की लगेच तो पुढे ढकलायचा. त्याची थोडीही शहानिशा करायची नाही. जणू आपल्याला खूप मोठ्या सत्याचा शोध लागलाय आणि आपण ही माहिती पुढे पाठवली नाही तर फार मोठा अनर्थ होईल अशा आविर्भावात आपण या संदेशांची उचलफेक करतो. मग त्यात कधी अमिताभ बच्चन यांना श्रद्धांजली वाहिली जाते, कधी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मारले जाते तर कधी कोणत्या नेत्याला जिवंतपणीच स्वर्गात पाठवले जाते. हे खूप घातक आहे. अशाने जर इतर काही देशांप्रमाणे आपल्याकडेही समाजमाध्यमांवर बंधने आली तर आश्‍चर्य वाटायला नको.
माहिती आणि तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारत चालले असताना आपला विवेक शाबूत रहावा, आपण जे काही करतोय त्याची किमान जाणीव आणि गरजेपुरते गांभीर्य असावे इतकीच अपेक्षा आहे. असे म्हणतात की, बाळाला बोलणे शिकायला वर्ष-दोन वर्षे लागतात; पण काय बोलावे हे कळायला संपूर्ण आयुष्य निघून जाते! त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत आपली मते जरूर मांडा मात्र त्यामुळे आपण यंत्रणेत अडथळे निर्माण करणार नाही, चुकीची माहिती पसरवणार नाही, द्वेष वाढवणार नाही, सामाजिक ऐक्य धोक्यात आणणार नाही इतकी माफक काळजी घ्या! अन्यथा भविष्यात ‘सोशल’ माध्यमे आपल्याला ‘सोसणा’र नाहीत, हे मात्र
नक्की!!

घनश्याम पाटील
7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा