बहुआयामी आचार्य अत्रे – अरुण कमळापूरकर

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे शब्द जरी उच्चारले तरी माझ्या पिढीच्या म्हणजे पन्नासच्या दशकात जन्मलेल्या आणि त्याच्या आधीच्याही पिढ्यांच्या डोळ्यापुढे एक भारदस्त, धिप्पाड व्यक्तिमत्त्व उभे राहते. येत्या 13 ऑगस्टला आचार्यांच्या जन्माला 126 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या निर्वाणालाही 55 वर्षे होऊन गेली तरीही मराठी मनातली त्यांची प्रतिमा जराही धूसर झालेली नाही. त्यांच्या आयुष्यातील लहानमोठ्या घटना, जीवनाच्या विविध क्षेत्रातील त्यांची उत्तुंग कर्तबगारी उभ्या महाराष्ट्राला उत्तमपणे ज्ञात आहेच. त्यामुळे जयंतीनिमित्ताने नव्याने काय लिहावे हा प्रश्नच आहे; पण तरीही याप्रसंगी त्यांची आठवण जागी न करण्याचा करंटेपणा करणे केवळ अशक्य.

पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरात दिगंत कीर्ती मिळवणाऱ्या अत्र्यांचे बालपण गेले सासवडसारख्या त्यावेळच्या छोट्या खेड्यात. साधारण आठव्या वर्षी जेव्हा ते पुण्यात प्रथमच आले तेव्हा त्यांचा पुण्यात प्रवेश झाला तो झोपेत असताना, मध्यरात्री. सकाळी जाग आली ती आगगाडीच्या प्रचंड ककाळीने. अक्षरशः दचकून ते आगगाडी पाहण्यासाठी खिडकीकडे धावले. अर्थात कसबा पेठेतील त्या घरातून आगगाडी दिसणे शक्यच नव्हते पण खिडकीतून खाली पाहताना अंगणातील पाण्याचा नळ दिसला. नायगारा धबधबा प्रथमच पाहणाऱ्या माणसाला वाटणार नाही इतके आश्चर्य त्यांना नळातून पडणारे पाणी पाहून वाटले. तोपर्यंत हा नळराज त्यांनी पाहिलाच नव्हता. कसब्यातील घराजवळ सुगंधी मालाची अनेक दुकाने होती. (आजही आहेत.) त्या परिसरात फिरताना येणारा सुगंध त्यांच्या डोक्यातून कधीच निघून गेला नाही. अत्रे म्हणतात ‘मला पुण्याची आठवण झाली की माझ्या डोक्यात तीन आवाज आणि एक सुवास जागा होतो. तांबटांची ठकठक, आगगाडीची शिट्टी, घागरीत पडणारे नळाचे पाणी आणि उदबत्त्यांचा सुगंध. पुण्याने माझ्या मनावर केलेले संस्कार हे होत‌’
1910 च्या सुमारासच्या पुण्याचे त्यांनी केलेले वर्णन वाचले की खरोखर त्याच पुण्यात आपण राहत आहोत का? अशी शंका येते. वीज नाही, ड्रेनेज व्यवस्था नाही, रस्ते धुळीने माखलेले अशा पुण्याची आज कल्पनाही करवत नाही. एक मात्र खरे की त्यावेळचे आणि आजचे पादचारी यांच्यात काहीच फरक पडला नाही. साधारण ऐंशी वर्षापूर्वीच्या आपल्या कवितेत ते म्हणतात,
मना सज्जना नीट पंथे न जावे
नशापाणी केल्याप्रमाणे चलावे
जरी वाहने मागूनी कैक येती
तरी सोडीजे ना कधी शांतवृती
यानंतरच्या काळात अत्र्यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे सर्वच पैलू सर्वांगाने बहरून आले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील त्यांची घणाघाती भाषणे ज्यांनी ऐकली ते केवळ धन्य होत. वय पाच वर्षांच्या आत असल्याने मला काही ते भाग्य लाभले नाही. अर्थात जाणत्या वयात त्यांची चार व्याख्याने ऐकण्याची संधी मिळाली हेही नसे थोडके. भावे स्कूलमध्ये असताना सलग चार वर्षे वकृत्त्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या अत्र्यांची वक्ता म्हणून पायाभरणी झाली ती शाळेत पण उत्तम वक्ता व्हायचे असेल तर उत्तम वक्त्यांची भाषणे ऐकलीच पाहिजेत हे त्यांनी मनावर घेतलं आणि त्या काळात वसंत व्याख्यानमालेतील एकही व्याख्यान त्यांनी कधी चुकविले नाही. त्या व्याखानमालेशी श्रोता म्हणून जुळलेले त्यांचे नाते पुढे वक्ता म्हणून अधिकच दृढ झाले. इतके की त्यांच्या आयुष्यातील शेवटचे व्याख्यानही पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतच झाले. हाडाचा वक्ता हा केवळ त्या-त्या व्याख्यानांची तयारी करत नसतो तर असंख्य विषयांचा त्याचा अभ्यास सदोदित चालू असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आचार्य अत्रे. पत्रकार आणि नाटककार विद्याधर गोखले यांच्या एका व्याख्यानात ऐकलेला हा एक किस्सा –
गोखले विद्यार्थीदशेत असताना त्यांच्या शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तैलचित्र लावण्याचे ठरले. नेताजींच्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारीला हा कार्यक्रम करण्याचा निर्णय झाला. तैलचित्राचे अनावरण आचार्य अत्रे यांच्या हस्ते व्हावे म्हणून गोखले आणि काही सहाध्यायी अत्र्यांना भेटले आणि समारंभाचे आमंत्रण दिले. अत्र्यांनी तत्काळ होकार दिला.
ठरल्या दिवशी अत्रे शाळेत हजर झाले. आधीच्या काही कार्यक्रमांमुळे बहुधा त्यांना यायला उशीर झाला. त्यामुळे सर्व सोपस्कारांना फाटा देऊन अत्र्यांना लगेचच भाषणासाठी पाचारण करण्यात आले. त्यामुळे तोपर्यंत नेताजी ‘पडदानशीन‌’ होते. अत्रे बोलायला उभे राहीले… ‘आज राम गणेश गडकरी यांची पुण्यतिथी. गडकरी मास्तर म्हणजे…’ अशी सुरुवात करून तासभर गडकरी यांचे जीवन आणि साहित्य याचा उत्तम परामर्श घेतला. समस्त श्रोत्यांनीही त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीचा आस्वाद घेतला. व्याख्यान संपल्यावर अत्रे तैलचित्राचे अनावरण करायला गेले. तसबिरीवरील पडदा बाजूला झाला अन्‌ नेताजींचे चित्र पाहताच ते चमकले. काय गडबड झाली हे त्यांना चटकन उमगले. तसेच ते माईकपाशी गेले आणि ‘आज तेवीस जानेवारी म्हणजे माझ्या डोक्यात फक्त गडकरी हा एकच विचार असतो. शिवाय इथे येण्यापूर्वी मी गडकरी पुण्यतिथीच्या दोन कार्यक्रमांना हजेरी लावून आलोय त्यामुळे जरा गोंधळ झाला. असो. तर नेताजी म्हणजे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या क्रांतियज्ञातील एक धगधगती ज्वाला…’ अशी सुरुवात करून पाऊण तास नेताजींच्या कार्याचा उत्कृष्ट आढावा घेतला. उत्तम संपादक आणि वक्ता कसा सव्यसाची असावा याचे हे मूर्तिमंत उदाहरण होते.
नवयुग’, ‘मराठा‌’चे संपादक म्हणून त्यांच्या डोळ्यापुढे तुकोबारायांचा आदर्श होता. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी‌’ हे त्यांचे वचन ‘मराठा‌’च्या अग्रलेखाच्या वरील बाजूस कायम विराजमान असे आणि खालचा अग्रलेख त्याची ग्वाही देत असे. त्यामुळेच नेहरुंच्या हयातीत ‘औरंगजेब‌’ अशी त्यांची निर्भर्स्तना करणारे अत्रे नेहरुंच्या मृत्युनंतर त्यांचे गुणसंकीर्तन करणारे अग्रलेख लिहू शकले. यात विरोधाभास कुठेही नव्हता. वज्राप्रमाणे कठोर असणारा हा माणूस फुलाप्रमाणे कोमलही होता. त्यांनी लिहिलेले अनेक मृत्युलेख याची साक्ष देतात. प्रसिद्ध व्यक्तिच काय पण आपल्या वाहनचालकाच्या मृत्युने व्यथित होऊन ‘माझा बाबू गेला‌’ असा अग्रलेख लिहिणारे अत्रे किती हळव्या मनाचे होते याची प्रचिती येते.
विडंबनकार म्हणूनच प्रामुख्याने प्रसिद्ध असणारे अत्रे मुळात उत्तम कवी होते. किंबहुना जो मुळात कवी आहे तोच उत्तम विडंबनकार होऊ शकतो हे त्यांचे ठाम मत होते. ‘उंच पाटी पालथी उशाखाली‌’सारखी लहान मुलांसाठीची कविता असो, ‘द्रौपदीस बंधु शोभे नारायण‌’सारखे चित्रपट गीत असो अथवा ‘उगवला चंद्र पुनवेचा, देह देवाचे मंदिर‌’सारखी नाट्यगीते असोत. या सर्व रचना अत्र्यांच्या अस्सल कवित्वाचीच ग्वाही देतात. यातील ‘देह देवाचे मंदिर‌’ हे गीत मी जेव्हा जेव्हा आकाशवाणीवर ऐकले आहे त्या प्रत्येक वेळी ती संत तुकारामांची रचना आहे असे सांगितले गेले. आचार्यांच्या प्रासादिक रचनेवर हे शिक्कामोर्तबच जणू… असो.
आचार्य अत्रे यांच्या जीवनपटाचा आढावा घेणे हा या लिखाणाचा उद्देश नाहीच. ते कुणाच्याही आवाक्यातलं काम नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हाच एकमेव हेतू आहे. शेवटी माझ्या आणि त्यांच्या नजरभेटीची आठवण सांगून थांबतो.
प्रसंग आहे दि. 21 एप्रिल 1969 या दिवशीचा. पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा सोहळा. उद्घाटक होते आचार्य अत्रे. महाराष्ट्रातील तेव्हाचे एक वादळी व्यक्तिमत्त्व. व्याख्यानाचा विषय होता ‘समर्थांचे विरोधक.’ अध्यक्ष होते पुण्यातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व अर्थात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार. वक्त्यांचे वेळेवर आगमन झाले. वर्षानुवर्षे पहाडासारखे उभे राहून लाखोंच्या सभा गाजवणारे अत्रे त्यादिवशी मात्र शारीरिक अस्वास्थ्यामुळे खुर्चीत बसूनच बोलले.
पण वाणीतील जोश यत्किंचितही कमी झालेला नव्हता. व्याख्यानाचा विषय होता – ‘समर्थांचे विरोधक.’
न. र. फाटकांपासून केशवराव धोंगडेंपर्यंत अनेकांचा यथेच्छ समाचार घेऊन तासाभरात ती तोफ थंड झाली. पोतदार यांचे अध्यक्षीय भाषण झाल्यावर अत्रे व्यासपीठावरून खाली आले. मी त्यांच्यासमोर जाऊन जरा दबकतच हात पुढे केला. त्यांनी मंद स्मित करत आपल्या भल्या मोठ्या पंजात माझा हात पकडला. मी खरंच थरारून गेलो आणि आश्चर्यचकितपण झालो. वर्षानुवर्षे विरोधकांवर आग ओकणाऱ्या लेखणीमागील हात एवढा मृदू-मुलायम? सावरीच्या कापसाची गुबगुबीत उशी हातात घेतल्यासारखे वाटले मला. सहा फुटांहून अधिक उंची आणि साजेशी रुंदी लाभलेल्या देहाशी तो स्पर्श अगदी विसंगत वाटला. त्या उबदार स्पर्शाचा काही क्षण मला लाभ देऊन ते काठी टेकत टेकत सभास्थानाच्या बाहेर पडले. त्या क्षणी अर्थात कल्पना नव्हती पण ते त्यांच्या आयुष्यातले शेवटचे व्याख्यान होते.
आज पंचावन्न वर्षांनंतरही मी तो प्रसंग आणि तो हस्तस्पर्श विसरू शकलो नाही.

– अरुण कमळापूरकर

( प्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ ऑगस्ट २ ० २ ४ )

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा