सैनिक हो तुमच्यासाठी! – राजेंद्र ल. हुंजे

आपल्या देशाची सीमा अहोरात्र पहारा देत उभ्या असलेल्या जवानांमुळे अत्यंत सुरक्षित आहे. या जवानांनी कधीही आपल्या जिवाची तमा बाळगली नाही, ना कधी मनात आपल्या कुटुंबीयांबद्दल आलेला विचार कवटाळला. व्रत एकच देशसेवेचं, निर्धार एकच शत्रूला जागेवर गारद करण्याचा. सीमा सुरक्षा दलाच्या अशा अनेक जवानांवर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे प्रेम करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा एखादाच अवलिया असतो, जो त्याच्या सुट्टीच्या दिवशीही फक्त जवानांच्या आरोग्याचीच काळजी करत असतो. हो, असाच एक अवलिया सेवाभावी डॉक्टर आहे, अहमदाबादमधील डॉ. प्रकाश कुरमी.

श्री. हरिश्चंद्र कुरमी मेमोरियल शिवम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना 2007 साली डॉ. कुरमी यांनी केली. या ट्रस्टची स्थापना करताना त्यांनी कुठल्याही प्रकारे फक्त स्वतःचा विचार केला नाही तर त्या ट्रस्टवर त्यांच्याशिवाय इतरांना महत्त्वाच्या पदावर विराजमान केले. त्यांची पत्नी सौ. आरती प्रकाश कुरमी ह्या ट्रस्टच्या चेअरमन आहेत. हे सेवाभावी काम करताना हा ‘माझा‌’ ट्रस्ट आहे अशी कुठलीही ‘ग‌’ ची बाधा आपल्याला होऊ नये यासाठी ट्रस्टच्या कोणत्याही पदावर राहण्याचं त्यांनी टाळलं पण त्यासाठी काम मात्र अहोरात्र ते करताहेत. मुळात या ट्रस्टचं उद्दिष्टच त्यांनी लोकाचे आरोग्य सुधारणे, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तिला मोफत वैद्यकीय उपचार मिळणे हेच आहे. याशिवाय गुजरातमधील खेडोपाडीच्या, वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये जाऊन लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांचा ट्रस्ट खूप मोलाचे काम करतोय.

2014 पासून शिवम चॅरिटेबल ट्रस्टने गुजरातमधील सीमेवर मोठे काम केले आहे. विशेषतः कच्छच्या वाळवंटात 24 तास गस्त घालून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचे आरोग्य ठणठणीत रहावे यासाठी तिथे आरोग्य शिबिर भरवायला सुरूवात केली. तिथल्या परिस्थितीबाबत डॉ. कुरमी जेव्हा बोलू लागतात तेव्हा आपसूकच डोळ्यातून अश्रू ओघळायला सुरूवात होते. बोलता-बोलता त्यांनी एक भयंकर किस्सा सांगितला. ते म्हणाले, “आपले जवान इकडे रखरखत्या उन्हात चहूबाजूने असलेल्या वाळवंटात 52-55 डिग्री तापमानात चोख पहारा देत असतात. त्याच उन्हात सीमेवर सलग 12 किलोमीटर जा-ये करत एकूण 24 किलोमीटर चालत सीमेची सुरक्षा करत असतात. तिकडे पाकिस्तानच्या बाजूला मात्र पूर्ण हिरवळ असते. पाकिस्तानचे जवान झाडांच्या सावलीत बसून आपले बीएसएफचे जवान वाळवंटात कसा पहारा देत आहेत बघत असतात. हे वाळवंट काही साधं नाही. कच्छच्या या वाळवंटाला ‘पांढरे वाळवंट‌’ म्हणूनही संबोधलं जातं कारण त्यात मीठाचे प्रमाण जास्त आहे. जेव्हा वाऱ्याच्या वेगामुळे वाळवंटातील रेतीचे बारीक कण उडून जवानांच्या डोळ्यात जातात त्यावेळी अनेकदा त्यांच्या डोळ्यांना जखमा होऊन डोळ्यातून रक्तही वाहते. हा मर्द जवान मात्र डोळे चोळत थांबत नाही. उलट तितक्याच ताकदीने आणि उत्साहाने आपली सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज असतो.
पावसाळ्यात तर पाकिस्तानमधून वाहून आलेले पुराचे पाणी इकडे आपल्या वाळवंटात साचते. तिथे चिखल होतो. याच चिखलात साप, वचू हे विषारी प्राणीही असतात. तशा चिखलात न डगमगता या आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना गस्त घालावी लागते. त्यात अनेक जवानांना आत्तापर्यंत या साप आणि वचवांचा विषारी दंश झाला आहे. त्या विषामुळे जवानांना गँगरीन झाल्याने अनेकांना आपला पाय गमवावा लागला. पाय गेला म्हणजे नोकरी गेली. अशा तरूण उमद्या जवानांना देखील त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात केवळ एका अशा आरोग्याच्या समस्येमुळे नोकरी सोडून घरी बसावे लागते. जेव्हा ह्या गोष्टी आम्ही डॉक्टर कुरमी यांच्याकडून ऐकत होतो त्यावेळी क्षणाक्षणाला अंगावर रोमांच उभे राहत होते आणि त्याचवेळी डोळ्यातून अश्रू आपली वाट शोधत बाहेर येत होते. हा सगळा विदारक प्रकार पाहिल्यानंतर गप्प बसतील ते डॉ. कुरमी कसले? त्यांनी त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी त्यांचे मित्र श्री. परेश पाठक यांच्याशी चर्चा केली. कुठलाही विलंब न करता पाठक यांनी थेट इस्रायलमधील एका कंपनीशी संपर्क साधला… अर्थात इस्रायल आणि भारत सरकार यांच्या सहकार्यानेच! अशा अत्यंत जोखमीच्या ठिकाणी उंच असे मनोरे गस्तीसाठी उभे करणे आणि तेही पावसाळ्यात त्यावर कसलाही गंज न चढता ते मनोरे सुस्थितीत उभे राहिले पाहिजेत, हा त्यामागचा उद्देश होता. असे मनोरे बनवणारी कंपनी ही इस्रायलमध्येच होती. तिथून हे मनोरे मागवून ट्रस्टच्या वतीने या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना देण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यातल्या पुराच्या पाण्यात फिरून गस्त घालताना चावणाऱ्या साप-वचवांपासून अनेक जवानांची सुटका झाली.

डॉ. कुरमी हे दिवसरात्र या जवानांसाठी आपल्याला काय करता येईल याकरता सतत विचार करत असतात. याच सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांच्यासाठी तिथे उपलब्ध असलेली सर्व औषधे याबाबतचा सगळा समन्वय डॉ. कुरमी ठेवतात. त्यांच्याकडे उपलब्ध नसलेली पण त्यांना तिथे अचानक लागणाऱ्या उपचारासाठी आवश्यक असणारी सगळी औषधे त्यांना तिथे जागेवर उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. कुरमी सतत प्रयत्नशील असतात.
आपल्या कुटुंबापासून कोसो मैल दूर काम करणाऱ्या या जवानांचा आत्मविश्वास तसूभरही कमी होऊ नये यासाठी डॉ. कुरमी आणि त्यांचे शिवम चॅरिटेबल ट्रस्ट सतत कार्यमग्न असते. जवानांच्या आवश्यकतेनुसार आत्तापर्यंत या ट्रस्टच्यावतीने 125 स्वयंचलित सौरदिवे वितरित करण्यात आले आहेत. यासोबतच कोरोनाच्या काळात डॉ. कुरमी यांनी सीमेवरच्या या जवानांची विशेष काळजी घेतली आहे.
दरवर्षी दिवाळीत आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदात, उत्साहात सण साजरा करत असतो. हे जवान मात्र सणासुदीत आपला आनंद द्विगुणित व्हावा यासाठी सीमेवर डोळात तेल घालून खडा पहारा देत असतात. मग यांची दिवाळी गोड कशी करायची असा प्रश्न एकदा डॉ. कुरमी यांना पडला. त्यांनी त्यांच्या मित्रांशी चर्चा केली. गुजरातमधल्या लोकाना त्यांनी या जवानांच्या दिवाळी विषयी आवाहन केलं. बघता बघता मदतीचा ओघ सुरू झाला. डॉ. कुरमी आणि त्यांचे मित्र अहमदाबादहून 5 हजार किलो मिठाई आणि भेटवस्तू घेऊन सीमेकडे निघाले. सगळ्या जवानांनी तोंडात लाडू घातल्यानंतरच डॉ. कुरमी आणि त्यांच्या मित्रांनी मिठाईला हात लावला. दिवाळीची ही सेवा गेल्या दशकभरापासून अशीच अविरत सुरू आहे.
आत्तापर्यंतचं सगळं आयुष्य डॉ. कुरमी यांनी केवळ सीमेवरचे जवान, वाडी वस्तीवर राहणारा आदिवासी बांधव आणि त्यांची लहान लहान मुले यांच्या आरोग्यसेवेसाठीच खर्ची घातले आहे. आत्तापर्यंत या माणसाने स्वतःसाठी सुट्टी म्हणून कधी घेतली नाही. सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने तिथेच आधुनिक पद्धतीने जवानांवर आवश्यक ती शस्रक्रियाही केली जाते. याशिवाय या जवानांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरओ मशीनही त्यांनी बसवून दिल्या आहेत. एवढंच नाही तर जवानांना ताज्या, हिरव्यागार, लुसलुशीत पालेभाज्या खायला मिळाव्यात यासाठी सौरउर्जेचा वापर करून ताज्या भाज्या पिकवण्याचं तंत्रज्ञानही तिथं उभं करून दिलं आहे. जेणेकरून या जवानांना रोजच्या जेवणात ताज्या, हिरव्यागार पालेभाज्यांचाही आस्वाद घेता येईल.
डॉ. कुरमी हे प्रखर देशभक्त आहेत. त्यांचे अहमदाबादमधील मणिनगर परिसरात मोठे हॉस्पिटल आहे. इथे गरजू आणि गरीब रुग्णांवर अत्यंत माफक दरात उपचार केले जातात. शिवाय तिथे उपचारासाठी ॲडमिट असलेल्या रुग्णांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचे जेवण मोफत दिले जाते. विशेष म्हणजे या हॉस्पिटलची पुनर्बांधणी केल्यानंतर  कुरमी यांनी त्यांच्या कक्षापासून ते रुग्णातील प्रत्येक कक्षाला महापुरूषांची नावे दिली आहेत. एवढं करून ते थांबले नाहीत तर ज्या कक्षाला ज्या महापुरुषाचे नाव दिले असेल त्या ठिकाणी उपचारासाठी प्रवेश केला की, पहिला डॉक्टरांचा टेबल आहे आणि बरोबर त्यांच्या मागे आणि येणाऱ्या पेशंटला समोर दिसेल अशा पद्धतीने त्या महापुरूषाचा फोटो आणि त्यांची संपूर्ण माहिती तिथे लावलेली आहे. आपला इतिहास जरी विस्मृतीत गेला असला तरी आपण आपल्या महापुरूषांना आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला विसरता कामा नये, ही त्यामागची डॉ. कुरमी यांची खरी तळमळ.
डॉ. कुरमी यांच्यासारखी ‘स्व‌’ सोडून समाजाचा विचार करणारी अवलिया माणसं कदाचित बोटावर मोजण्याइतकीच असतील. समाज म्हणून ते करत असलेल्या विधायक कामांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे, नाही का? डॉ. कुरमी करत असलेल्या अविरत समाजसेवेला माझा मानाचा मुजरा!
जय हिंद !!!! 

राजेंद्र हुंजे
ज्येष्ठ पत्रकार
9930461337

प्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ ऑगस्ट २०२४

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा