‘राज्याचा व्यापार म्हणजे राज्याची शोभा आहे, राज्य संपन्न व्हायचे असेल तर राज्यात व्यापार चांगल्या प्रकारे व्हायला हवेत’ हे त्याकाळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी सांगितले होते. ‘आज्ञापत्रा’त व्यापारविषयक धोरण सांगताना त्यांनी नोंदवून ठेवले आहे की, ‘साहुकार म्हणजे राज्याची व राजर्षिंची शोभा. परमुलखी जे जे साहुकार असतील त्यांची समाधानी करून ते आणावे. त्यांसि अनुकूल पडे तरी असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून, आपली माया त्यांस लावावी. व्यापारामुळे राज्य श्रीमान होते म्हणून राज्यात नवे व्यापार आणावेत…’
यातील ‘साहूकार’ म्हणजे ‘सावकार’ नव्हे तर व्यापारी, उद्योजक! शिवाजी महाराजांच्या या आदर्श सूचनेचा विसर पडल्याने आज राज्यातील अनेक उद्योग परराज्यात गेले आहेत. हे मांडण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना या गोष्टीचे भान होते. त्या दृष्टिने त्यांनी अनेकांना प्रोत्साहन दिले. त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे नीलकंठ कल्याणी! बाबा कल्याणी, त्यांचे वडील नीलकंठ कल्याणी आणि आजोबा आण्णाप्पा कल्याणी या तिन्ही पिढ्यांचे व्यापारविषयक योगदान आणि वारसा अफाट आहे. शंतनूराव किर्लोस्कर यांच्यासारख्या तगड्या उद्योगपतीने नीलकंठ कल्याणी यांना बरीच मदत केली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना मदतीसाठी बोलावून घेतले. यशवंतराव दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीची धाव’ असं त्यांचं सार्थ वर्णन केलं गेलं. त्याचवेळी यशवंतरावांच्या मदतीलाही काही उद्योजक गेले होते ज्यांनी संरक्षण खात्याला लागणारं उत्पादन सुरू होण्यासाठी अखंड आणि अविरत परिश्रम घेतले. त्यातलंच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे कल्याणी कुटुंब. महाराष्ट्रातील वीरशैव जंगम कुटुंबात जन्माला आलेल्या या उद्योजकांनी भारत फोर्जच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचा इतिहास बदलला.
कल्याणी घराण्याचा तीन-चार पिढ्यांचा उद्योग पाहता ते हळद, गूळ, शेंगा विकत घेऊन ते कोकणात जाऊन विकायचे. नारायणशेठ मादप्पा कल्याणी यांच्यापर्यंत सुरू असलेले हे काम नीलकंठराव कल्याणी यांनी बदलले आणि कसलीही पार्श्वभूमी नसताना कारखाना सुरू करण्याचा घाट घातला. शंतनूराव किर्लोस्कर यांनी त्यांना सूचना केली की, ‘फक्त फोर्जिंगचा कारखाना सुरू करण्याऐवजी क्रॅकशाफ्ट करण्याचा परवाना घ्या!’ त्यांच्या या मार्गदर्शनानंतर त्यांनी तो प्रयत्न सुरू केला. महाराष्ट्राचे तेव्हाचे उद्योगमंत्री स. गो. बर्वे यांनी त्यांना याकामी मदत केली आणि पुढचा प्रवास सुरू झाला.
फोर्जिंगच्या क्षेत्रात वाहन उद्योगाचे उत्पादन करताना त्यांनी बाजारातील परिस्थितीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. संरक्षणविषयक योगदान देताना त्यांनी तोफेची नळी निर्माण करण्याचे कार्यही सहजपणे केले. त्यांचा दावा आहे की, त्यांनी कारगिल युद्धात बोफोर्स तोफेपेक्षा अधिक शक्तिमान आणि हलकी तोफ निर्माण केली आहे. बाबा कल्याणी यांच्या भारत फोर्जने एक लाख तोफगोळे बनवून भारतीय सैन्यदलाकडे दिले.
पुण्यातील सुलोचना आणि नीलकंठ कल्याणी यांच्या घरी जन्मलेल्या बाबा कल्याणी यांचे शालेय शिक्षण बेळगाव येथील राष्ट्रीय सैनिकी शाळेतून झाले. त्यानंतर त्यांनी बिटस पिलानी येथून मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये बीई ही पदवी मिळवली.
संरक्षणविषयक उत्पादने मोठ्या प्रमाणात बनविल्याशिवाय भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, हे बाबा कल्याणी आग्रहाने आणि ठामपणे सांगतात. या क्षेत्रात आल्यानंतरही त्यांनी ‘मी ऑर्डरची वाट न पाहता माझे उत्पादन करत राहणार’ असे धाडसाने सांगितले होते. या सगळ्या प्रवासात 1996 साली त्यांना एक मोठा धक्का सहन करावा लागला. त्यांच्या उत्पादनाचा वेग प्रचंड असताना अचानक ग्राहकांकडून येणारी मागणी एकदम घटली. मोठ्या प्रमाणात तयार असलेले उत्पादन, त्यासाठीच साठवून ठेवलेला कच्चा माल आणि कुशल मनुष्यबळ या सर्वांचं काय करायचं असा पेच निर्माण झाला. आठवड्याचे कामाचे तास घटत घटत तीन दिवसांवर आले; मात्र या सगळ्यांवर मात करत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. महाराष्ट्रातील सर्वात सशक्त उद्योजक अशी त्यांची सार्थ ओळख त्यांनी निर्माण केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कमालीची स्पर्धा असताना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, प्रचंड आणि दुर्दम्य इच्छाशक्ती, आपल्या कार्यावरील अढळ निष्ठा यामुळे त्यांनी सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात केली.
लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ‘उद्या आकाश जरी माझ्यावर कोसळलं तरी त्यावर पाय देऊन ठामपणे उभे राहण्याची ताकद माझ्यात आहे.’ बाबा कल्याणी यांनी टिळकांचा हा विचार प्रत्यक्षात आणला. 1839 साली स्थापन झालेली जर्मन कंपनी विकत घेण्यापर्यंत त्यांच्या भारत फोर्जने किमया साधली. भारताचं नाव जागतिक स्तरावर उंचावणार्या बाबा कल्याणी यांनी अनेक चढ-उतार बघितले. कोणतीही आणि कसलीही परिस्थिती आली तरी त्यावर मात करत त्याचे संधीत रूपांतर करणार्या बाबा कल्याणी यांची वाटचाल देदीप्यमान आहे.
भारताच्या नवनिर्माणात बाबा कल्याणी आणि त्यांच्या भारत फोर्जने दिलेले योगदान मात्र विलक्षण आणि अभिमानस्पद आहे.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 22 मे 2024