पर्मनंट माजी मुख्यमंत्री

इलेक्शनचे किस्से लिहिताना नेत्यांचे काही धमाल किस्से मांडणंही गरजेचं आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं नाव सिमेंट घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

 किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदात दिल्लीत ठाण मांडून बसले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मराठा नेतृत्व मिळावं अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती. सातार्‍याच्या अभयसिंहराजे भोसले यांचं नाव त्यांना अपेक्षित होतं पण चुकून त्यांनी बाबासाहेब भोसले यांचं नाव पुढे केलं असं सांगितलं जातं. मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले यांचं नाव जाहीर होताच त्यांचा स्वतःचाही त्यावर विश्वास बसला नव्हता.
त्याकाळी एक रिवाज होता. काँग्रेसकडून ज्या नेत्याचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केलं जायचं तो नेता दिल्लीत जाऊन इंदिरा गांधी यांचे आशीर्वाद घ्यायचा. बाबासाहेबांनी नेमकं उलट केलं. त्यांनी राजभवनात जाऊन आधी शपथविधी उरकला आणि मग ते दिल्लीत गेले. याविषयी पत्रकारांनी त्यांना छेडलं असता ते म्हणाले, ‘‘आमच्या काँग्रेसच्या परंपरेत इतकी स्पर्धा आहे की शपथ घेऊन राज्यपालासमोर सही करण्यास जाईपर्यंत कोणीतरी मागून कोट ओढेल आणि अचानक दुसरेच नाव पुढे केले जाईल. एकदा ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही चिंता नाही.’’
‘‘श्रेष्ठींना वाटलं तर आताही तुम्हाला घरी बसवलं जाऊ शकतंच की…’’ असं म्हटल्यावर ते म्हणाले, ‘‘त्याने काय फरक पडतोय? एक दिवसासाठी तरी मी राज्याचा मुख्यमंत्री झालो असल्याने आता माझ्या नावाआधी माजी मुख्यमंत्री असं कायम लिहिलं जाईल.’’
आपल्या हजरजबाबीपणामुळं प्रसिद्ध असलेेले बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होईपर्यंत कुणालाच फारसे माहीत नव्हते. काही ज्येष्ठ पत्रकारांकडून असं सांगितलं जातं की ते मुख्यमंत्री झाल्यावर कुणाकडे त्यांचा फोटोही उपलब्ध नव्हता. बातमीसाठी तो आवश्यक असल्याने राज्याच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून तो मागविण्यात आला. त्यांच्याकडेही बाबासाहेबांचा फोटो नसल्याने मोठी अडचण आली मात्र त्यांनी ‘लोकराज्य’ मासिकातून त्यांचा एक फोटो फाडून त्याचे कात्रण पत्रकारांना दिले. त्यावरून त्यांचा फोटो बातमीत प्रकाशित करण्यात आला.

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

त्यांच्याबाबतचा आणखी एक खास किस्सा आहे. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात अनेक नेत्यांना तुरूंगवासाला सामोरे जावे लागले. बाबासाहेब भोसले यांनाही अटक करून दीड वर्षाची शिक्षा देण्यात आली. तुरूंगात त्यांच्यासोबत तुळशीदास जाधव हे स्वातंत्र्यसैनिक होते. ‘गोळ्या घाला पण डोक्यावरची गांधी टोपी काढणार नाही,’ असे त्यांनी इंग्रज अधिकार्‍यांना निक्षून सांगितले होते. त्यामुळे थेट इंदिरा गांधी यांच्यापर्यंत त्यांची ओळख होती. दिल्लीत त्यांच्या नावाला ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून वजन होते.
येरवड्याच्या तुरूंगात त्यांची बाबासाहेब भोसले या तरूणाशी ओळख झाली. स्वातंत्र्य आंदोलनातील या हरहुन्नरी तरूणाचे योगदान पाहून त्यांच्यात बोलणी झाली आणि जाधव यांची कन्या कलावती यांच्याशी त्यांचा विवाह निश्चित झाला. हा विवाह आपल्या डोळ्यासमोर व्हावा अशी त्यांची वडील म्हणून इच्छा होती. मग तुरूंगाधिकार्‍यांच्या सहकार्याने येरवड्याच्या तुरूंगातच यांचा विधिवत साखरपुडा करण्यात आला. अशा पद्धतीने तुरूंगात साखरपुडा झालेले बाबासाहेब हे ‘एकमेव नेते’ असावेत.
त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले; मात्र अंतर्गत बंड, दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा संप, पोलिसांनी केलेले बंड अशा अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागला. याचवेळी शरद पवार विरोधी पक्षनेते असल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या. ‘एक दिवस मुख्यमंत्री राहिलो तरी पर्मनंट माजी मुख्यमंत्री असेन’ असे सांगणार्‍या बाबासाहेबांना अंतर्गत राजकारणामुळे एक वर्षानंतर राजीनामा द्यावा लागला.

– घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 20 मे 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा