दहावी नंतर काय करायचं? – डॉ. श्रीराम गीत

35% ते 65% मिळवून यशस्वी होणार्‍यांसाठी गरजेचे

कोणताही अभ्यासक्रम शिकण्यासाठी एक अडचण असते. आपण पहिलीपासून दहावीपर्यंत कुठला ना कुठला तरी क्लास लावून शिकत आलेलो असतो. ज्यांनी लावलेला नाही त्यांच्या संदर्भात हा प्रश्न येत नाही पण असे विद्यार्थी फारच क्वचित सापडतात. ही अडचण अकरावी नंतरच्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये बर्‍यापैकी उद्भवते. ज्या संस्थेच्या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेतो त्यासाठीचे पैसे बँक कर्ज म्हणून देऊ शकते पण कोणत्याही क्लाससाठी किंवा खाजगी शिकवणीसाठी पैसे कोणीही देत नाही. केवळ याच कारणामुळे सायन्स, कॉमर्स अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या मुलांची फरपट होते. यश मिळत नाही. यावर काय उपाय आहे हे या लेखात आपण वाचणार आहोत. एखादे काम मिळाले तरी ज्यांना अजून शिकावे, मोठी नोकरी मिळवावी असे वाटते त्यांना याचा उपयोग होईल.

लेखन, वाचन, शुद्ध लिहिणे –

या तीन गोष्टींवर जी मुले-मुली भर देतात, स्वतःचा लिहिण्याचा वेग वाढवतात त्यांना कोणतीही परीक्षा देताना अडचण तर येत नाही पण यशाची शक्यताही वाढते. इयत्ता दहावीपर्यंत आपण मराठी किंवा इंग्रजीतून शिकलो असलो तरीपण स्वतःच्या शब्दात वाक्य लिहिणे, स्वतःच्या मनातील विचार व्यक्त करणे याची सवय झालेली नसते. याला जर सुरुवात केली तर कोणत्याही स्वरूपाची परीक्षा देण्याकरता लागणार्‍या गोष्टींची तयारी सुरू होते. त्याचा उपयोग एखाद्या ठिकाणी नोकरीची मुलाखत देण्यासाठी तर होतोच होतो.

वाचणे : मनातल्या मनात वाचून स्वतःचे उच्चार, दोन वाक्यात कधी थांबायचे, कोणत्या शब्दावर भर द्यायचा हे कधीच आपल्या लक्षात येत नाही. मोठ्याने वाचण्याची सवय ज्यांनी लहानपणापासून लावून घेतली असेल त्यांना हे माहिती असते. इतरांनी ही सवय लावून घेण्याचा प्रयत्न दहावीची परीक्षा झाल्यापासूनच करावा.
याचे विविध फायदे असतात. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजेच सेवा उद्योगात संवाद महत्त्वाचा असतो. आलेला फोन घेणे, त्याला उत्तर देणे, समोर आलेल्या माणसाला त्याच्या कामाची माहिती करून घेऊन योग्य शब्दात उत्तर देणे, हे करत असताना शक्यतो ज्या भाषेत प्रश्न विचारला आहे त्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करणे हेही गरजेचे आणि उपयुक्त ठरते.
सर्वात जास्त नोकरीची उपलब्धता मार्केटिंग व सेल्स या प्रकारात असते.

संवाद कौशल्य : हा पुढचा टप्पा. त्या टप्प्यावर काय बोलायचे व कधी बोलायचे याची सुरुवात होते. मुळात बोलणे स्वतःला शिकायचे असते. काय, कधी, कसे, कुठे बोलायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.

शुद्ध लिहिणे: एखादा लिखित मजकूर किंवा निरोप कोणाला द्यावयाचा असेल तर त्याचे स्वरूप विविध पद्धतीत बदलते. एसएमएससाठीचा निरोप वेगळा. ई-मेल करायचा वा पाठवायचा ही निरोपाची भाषाही शिकावी लागते. हाताने लिहिलेला मजकूर पाठवण्याची पद्धत जवळपास बंद होत आल्यामुळे आता संगणकावर टायपिंग हे यायलाच पाहिजे. किमान इंग्रजी व छान मराठी तेही व्याकरण शुद्ध गरजेचे असते.

सामान्य ज्ञान : याची नोकरी करता कायमच गरज पडते. व्यवसाय करावयाचा असेल तर ते जास्तच गरजेचे असते. नोकरीमध्ये मोजक्या माणसांबरोबर संबंध येतो तर व्यवसायामध्ये दररोज नवीन व्यक्तिंबरोबर आपल्याला संबंध साधावा लागतो. या व्यक्ती करतात काय, राहतात कुठे, त्यांच्या आवडीनिवडी कशा असू शकतील यातून त्यांच्या गरजा ओळखता येतात. त्यासाठी सामान्य ज्ञानाची प्रत्येक व्यवसायात गरज पडते. इथे एक छोटेसे उदाहरण देतो. रोज पान खाणारी एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या पानाच्या ठेल्यावर जाते तेव्हा त्याच्या सर्व सवयी ओळखून त्याच्या हाती त्याचे नेहमीचे लाडके पान सुपूर्द केले जाते. त्यामुळेच ती व्यक्ती त्याच पानाच्या टपरीवर जाते. याला मी नाक-कान-डोळे उघडे ठेवणे असे गंमतीत म्हणतो.
यातून छान गुण मिळवून कला शाखेत बारावीनंतर विविध रस्ते उघडतात.
————

फक्त दहावी किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार किवा केंद्र सरकारच्या काही नोकर्‍या उपलब्ध असतात. त्याची तयारी कशी करायची याची नेमकी माहिती घेतली व याआधी सांगितलेली तयारी केली तर यश मिळू शकते कारण अशा सार्‍या परीक्षांमध्ये दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित तसेच सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात.

डॉ. श्रीराम गीत

करिअर मार्गदर्शक
9960674094

( चित्र – ए आय )

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा